सिबिल स्कोअर आणि गैरसमज

Reading Time: 2 minutes

नेहमीच्या अनेक आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणारी सिबिल संस्था आणि त्यावर आधारित या संस्थेकडून मिळणारा सिबिल स्कोअर ह्या दोन्ही गोष्टी गांभिर्याने घेण्यासारख्या आहेत. शेवटी, कर्ज मंजूर होणं, किंवा न होणं हे ह्याच दोन घटकांवर अवलंबून असतं. पण सिबिल संस्थेबद्दल आणि त्याहून जास्त सिबिल स्कोरबद्दल अनेक गैरसमज आपल्याला ऐकायला मिळतात. मुळात, हे त्या त्या व्यक्तीचे तेव्हाच्या परिस्थितीनुसारचे वैयक्तिक अनुभव असतात. पण ही बाब लक्षात न घेता त्याची सरसकट विधानं केली जातात आणि खऱ्या माहिती किंवा प्रक्रियेऐवजी गैरसमजच जास्त पसरतात.

 1. सिबिल कर्ज नाकारते-
  सर्वाधिक पसरलेला गैरसमज म्हणजे सिबिल संस्था स्वतः कर्ज नाकारते. सिबिल ही कर्जदायी संस्था नसून, फक्त पत-मानांकन(क्रेडिट रेटिंग) संस्था आहे. तिच्याद्वारे तुमच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून तुमचा आर्थिक अहवाल तयार केला जातो, त्यालाच क्रेडिट रिपोर्ट म्हणतात. यामध्ये तुमचा सिबिल स्कोअर नमूद असतो ज्याचा संदर्भ आणि मदत घेऊन कर्जदायी संस्था तुम्हाला कर्ज मंजूर करायचे की नाही हे ठरवतात.
 2. क्रेडिट रिपोर्ट फक्त सिबिल पुरवते-
  जरी बहुतांश कर्जदायी संस्था सिबिलद्वारे मिळणाऱ्या क्रेडिट रिपोर्टवर अवलूंन असल्या तरी असे अहवाल पुरवणारी सिबिल ही एकच संस्था भारतात कार्यरत नाही. रिझर्व बँकेने सिबिलशिवायही अनेक आर्थिक संस्थांना नागरिकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंद ठेऊन, अभ्यास करून त्यांचे क्रेडिट रिपोर्ट तयार करण्याचे अधिकार दिलेले आहेत. इक्विफॅक्स (Equifax) ही अशीच एक पत-मानांकर संस्था आहे.
 3. वाईट सिबिल स्कोअर म्हणजे कर्जाची दारं बंद-
  सिबिल स्कोअर कर्ज मंजूर करताना पाहिला जातोच, पण याचा अर्थ तो चांगलाच असल्यावर कर्ज मिळतं ही माहिती खोटी आहे. सिबिल स्कोअर उच्च नसला तरी कर्ज मंजूर होतं, फक्त त्यासाठीचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. काही संस्था तारण ठेवून तर काही संस्था वाढीव व्याजदर लावून कर्ज देऊ करतात. कदाचित तुम्हाला हव्या असणाऱ्या संस्थेकडून कर्ज मिळण्यात अडचणी येतील, पण वाईट सिबिल स्कोअर असला तरी कोणती ना कोणती आर्थिक संस्था त्यांच्या नियम व अटींनुसार कर्ज द्यायला तयार असते.
 4. चांगला सिबिल स्कोअर म्हणजे कमीत कमी व्याजदर-
  सिबिल स्कोअर चांगला असल्यास आणि कर्जदायी संस्थेच्या नियमात बसत असल्यास ती संस्था ग्राहकाला आहे त्यापेक्षा कमी व्याजदरात कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडू शकतात. पण चांगला सिबिल स्कोअर आहे म्हणजे व्याजदर हमखास कमीच मिळेल असा नियम नाही.
 5. आर्थिक नोंदीच नाहीत, म्हणजे कर्ज मिळणं सोपं-
  आर्थिक नोंदी असणं याचा अर्थ तुमच्या सगळ्या आर्थिक उलाढालींची माहिती ठेवणं. यात चांगली आणि वाईट असे दोन्ही प्रकार येतात. तुमच्या नावावर आर्थिक नोंदी आहेत म्हणजे काहीतरी वाईट शेरेच असतील, आणि चांगली माहिती असेल तर त्याची विशेष अशी नोंद ठेवावी लागत नाही असं समीकरण सिबिल रिपोर्टद्दल नक्कीच नसतं. तुमच्या नावावर काहीतरी नोंदी आहेत, त्यावरूनच कर्जदायी संस्थांना तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही हे ठरवता येतं. जर काहीच नोंदी नसतील तर हा निर्णय घेणं अजून कठीण असतं.
 6. आयकर विवरण पत्रांची पुर्तता म्हणजे चांगला सिबिल स्कोअर-
  आयकर विवरण पत्र अर्थात इन्कम टॅक्स रिटर्न्सचा तुमच्या सिबिल स्कोअर सुधारण्यात काहीच वाटा नसतो. आयकर नियमीत भरणं ही चांगली सवय आहे, परंतू ही सवय तुमचा सिबिल स्कोअर ठरवण्यातला घटक नसते.
 7. वारंवार सिबिल स्कोअर तपासणे चूक-
  सिबिल स्कोअर हा खरंतर प्रत्येकाने नेहमी तपासत राहिला पाहिजे. आपापला स्कोअर वारंवार तपासल्याने सिबिल स्कोअरवर काहीच परिणाम होत नाही. मात्र, अनेक संस्थांनी तुमचा वारंवार तुमचा स्कोअर तपासायची विनंती केली तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
 8. चांगला पगार म्हणजे चांगला सिबिल स्कोअर-
  सिबिल स्कोअरचा आणि पगाराचा काहीच संबंध नसतो. कमी पगार आहे म्हणजे सिबिल स्कोर कमी आणि जास्त पगार म्हणजे सिबिल स्कोअर चांगला ही माहिती चुकीची आहे. सिबिल स्कोअर हा तुमच्या उत्पन्नावर नाही तर उत्पन्न खर्च करण्याच्या सवयी आमि पद्धतींवर ठरतो.
 9. जामीन किंवा सह-कर्जदार असणे-
  एखाद्या कर्जाचा सह-कर्जदार (co-borrower) किंवा जामीन राहिल्याने आपल्या सिबिल स्कोअरवर परिणाम होत नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला असलेली माहिती चुकीची आहे. कर्जासाठी सह-कर्जदार, जामीन किंवा इतर कोणत्याही मार्गाने तुम्ही संबंधित असाल तर त्याचे जसेच्या तसे परिणाम तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर दिसून येतात. जर कर्जदाराने कर्ज बुडवले तर तुमचाही सिबिल स्कोअर घसरण्याची शक्यता असते.
 10. डेबिट कार्ड वापरल्याने स्कोअर सुधारतो-
  डेबिट कार्डचा वापर केला तर सिबिल स्कोअर घसरतही नाही, आणि सुधारतही नाही. त्यामुळे डेबिट कार्डद्वारे खर्च केल्याने सिबिल स्कोअरवर परिणाम दिसून येत नाहीत.

  (चित्र सौजन्य- https://bit.ly/2HNRyyJ )

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *