Reading Time: 3 minutes

“आपण कामापासून निवृत्त होतो, जीवनापासून नव्हे. जीवन जगण्यासाठी मुलामुलींवर अवलंबून राहण्यापेक्षा आपले स्वतःचे नियमित उत्पन्न हवे म्हणजे आत्मसन्मानाने जगता येईल.”

आजच्या लेखात सेवानिवृत्तीच्या कालावधीत नियमितपणे उत्पन्न कसे मिळेल? याबद्दलची माहिती घेऊया.

  • महाभारतातल्या ‘अभिमन्यूला’ चक्रव्यूह भेदणे माहीत होते मात्र त्यातून बाहेर पडणे माहीत नव्हते. सद्यस्थितीत घरभाड्याच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी ‘सेकेंड होम’ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची अवस्था महाभारतातील ‘अभिमन्यु’सारखी झालेली आहे. 
  • मिळणारे घरभाडे गुंतवणुकीच्या तुलनेत खूप कमी तर आहेच आणि नगरपालिकेचे कर – घरपट्टी, पाणीपट्टी आणि भाडेकरूच्या तक्रारी या साऱ्यामुळे तो पुरता भांबावून गेला आहे. तसेच, ही मालमत्ता विक्रीला काढली तर मिळणारी रक्कम अपेक्षेपेक्षा खूपच कमी किंबहुना गुंतवणूक केलेल्या रकमेएवढीही मिळणार  नाही. 
  • सद्यस्थितीत रियल इस्टेट या क्षेत्रात खूप मोठी मंदी आहे. यापूर्वी अनेक लोक नियमित उत्पन्नासाठी गुंतवणूक म्हणून ‘सेकंड होम’ हा पर्याय स्वीकारत असत.पण आता मात्र गुंतवणूकदारांनी आपला ‘अभिमन्यु’ होऊ नये अशी काळजी घेतली पाहिजे.
  • नियमित उत्पन्नासाठी काही ना काही गुंतवणूक करायची असेल तर या लेखाद्वारे आम्ही एक सूंदर पर्याय सुचवीत आहोत. तो म्हणजे ‘म्युच्युअल फंडाचा ई-फ्लॅट’! हा ‘सेकेंड होम’ चा आकर्षक पर्याय आपणास स्वीकारता येईल व तो नियमित दरमहा उत्पन्नही देईल. बॅंकेतील अथवा पोस्टातील ‘एफडी’ किंवा एखादा फ्लॅट विकत घेऊन ‘भाड्याने देणे’, हे दोन पर्याय अनेक वर्षांपासून प्रचलित आहेत. 
  • पोस्ट किंवा बॅंकेच्या एफडीमध्ये आता महागाईच्या तुलनेत परताव्याच्या दृष्टीने काही ‘अर्थ’ राहिलेला नाही. पण ज्यांची कुवत आहे असे  गुंतवणुकदार एखादा फ्लॅट विकत घेऊन तो भाड्याने देऊन त्यातून नियमित उत्पन्न मिळवीत असतात. 
  • परंतु या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचा आपण महागाईच्या तुलनेत कधी विचार केलाय का? म्हणूनच फ्लॅट विकत घेऊन भाड्याने देणे कितपत योग्य ठरते ते आज आपण ‘अर्थसाक्षरते’च्या दृष्टीकोनातून बघूयात.
    • समजा एक वन किंवा टू बीएचके फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर त्याची किंमत जवळपास ४० ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान असते. या गुंतवणुकीतुन फ्लॅट भाड्याने दिल्यावर दरमहा १० ते १२ हजार भाडे मिळेल असे गृहीत धरूयात.
    • अर्थात चांगला भाडेकरू मिळण्यासाठी तुम्हांला ब्रोकरला भेटावे लागेल. ब्रोकरची फी आणि मग भाडेकरूकडून भाडे वसूल करण्याची डोकेदुखी हा त्रास परत आलाच. 
    • या १०-१२ हजार रुपये भाड्यातून मेंटेनन्सचा खर्च, घरपट्टी, पाणीपट्टी, सोसायटीचे चार्जेस हा सर्व खर्च तुम्हांलाच करावा लागतो. हा सगळा खर्च झाल्यावर निव्वळ भाडे हातात किती राहील ? फक्त ६ ते ७ हजार रुपये म्हणजे ५० लाखांवर वर्षाला परतावा फक्त ७२ ते  ८४ हजार रुपये. म्हणजेच फक्‍त २ टक्के परतावा. 
    • कदाचित आपण असे म्हणू शकता की घेतलेल्या फ्लॅटची किंमत काही वर्षांनी वाढेलच की! परंतु जर अभ्यासपूर्ण बघितले तर आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. रियल इस्टेट क्षेत्रात अनेकांनी केलेली गुंतवणूक परतावा तर सोडाच पण आहे ती किंमतही मिळवून देत नाहीये. 
    • अनेक गुंतवणूकदारांची अवस्था या क्षेत्रात गुंतवणूक करून महाभारतातल्या ‘अभिमन्यु’सारखी झाली आहे. फ्लॅट घेउन केलेल्या  गुंतवणुकीतील तरलता (Liquidity) हा प्रश्न आणखी वेगळा. या गुंतवणुकीतून बाहेर पडायचे असेल तर ते सहज शक्‍य नाही. 
    • फ्लॅटच्या विक्रीसाठी पुन्हा ब्रोकर आणि आपल्याला अपेक्षित असलेली किंमत देऊ शकणारा ग्राहक मिळेलच याची शाश्वती नाही. तसेच, या गुंतवणुकीतून बाहेर पडायची वेळ येईल त्यावेळेस मिळणाऱ्या फायद्यावर तुम्हांला मोठा कर द्यावा लागतो याचाही विचार केला पाहिजे.
  • या साऱ्याचा परिस्थितीकडे पाहता तुम्ही ‘म्युच्युअल फंडाच्या सेकंड होम ई- फ्लॅटचा नियमित उत्पन्नासाठी नक्कीच विचार केला पाहिजे. ‘म्युच्युअल फंड्स सही हैं’ यानुसार म्युच्युअल फंडाच्या ई- फ्लॅटमधील ‘गुंतवणूक’ सध्याच्या काळात फायदेशीर ठरु शकेल. ही गुंतवणूक कशी करावी? तुमची ही ५० लाखांची गुंतवणूक म्युच्युअल फंडातील ‘बॅलन्स्ड’ फंडात करून त्यातून आपण नियमित उत्पन्न मिळवू शकतो. 
  • आपण गुंतवणुकीची ५० लाखांची रक्कम जर बॅलन्स्ड फंडात ठेवली तर आपल्याला नियमित उत्पन्न मिळू शकते. ते साधारणपणे  दरवर्षी ८% दराने रु. ३३,३३३ दरमहा मिळेल आणि तेही आपण हयात असेपर्यंत म्हणजेच ‘नियमित पेन्शनच’ म्हणा की! 
  •  म्युच्युअल फंडाच्या ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लॅन’च्या (SWP) माध्यमातून हे सहज शक्‍य आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिन्याला मिळणाऱ्या परताव्यावर तुम्हाला करही कमी भरावा लागतो.
  • चांगला परतावा देणाऱ्या बॅलन्स्ड फंडांनी सर्वसाधारणपणे सरासरी ११ ते १२% किंबहुना त्यापेक्षा अधिक परतावा दिला आहे. जर आपण ही गुंतवणूक पंधरा वर्षांसाठी केली असेल आणि जर या फंडाने सरासरी १२ टक्के जरी परतावा दिला तरी आपल्याला दर महिन्याला मिळणाऱ्या नियमित रकमेशिवाय पंधरा वर्षांनंतर केलेल्या गुंतवणुकीचे मूल्यांकन साधारण १ कोटीहून अधिक होईल. महत्त्वाचे म्हणजे या गुंतवणुकीतुन आपण तरलता असल्याने कधीही बाहेर पडू शकतो.
  • ढोबळमानाने तुम्हाला तुमच्या रियल इस्टेट फ्लॅटमधून वार्षिक उत्पन्न जर ३% पेक्षा कमी येत असेल तर, ती गुंतवणूक नक्कीच फायदेशीर नाही. तसेच, समजा तुम्हाला तुमच्या फ्लॅटच्या गुंतवणूकीमधील रक्कम ठराविक अथवा आंशिक हवी असेल तर ते मात्र शक्य नसते. म्युच्युअल फंडाच्या ‘ई- फ्लॅट’मधील रक्कम तुम्ही अंशतः देखील काढू शकता, हा फरक आपण लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

एकंदरीत म्युच्युअल फंडाचा हा ‘सेकेंड होमचा’ पर्याय म्हणजेच म्युच्युअल फंडचा हा ‘ई- फ्लॅट’ आपणास चांगले नियमित उत्पन्न देऊ शकतो. 

सद्यस्थितीत तशीही रियल इस्टेट क्षेत्रात प्रचंड मंदी आहे. दिवसेंदिवस कायदेही बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर आपली गुंतवणूक रक्कम, त्यातील तरलता, त्यातून मिळणार फायदा, त्यावर बसणारा कर या सर्व गोष्टी लक्षात घेता ‘ई फ्लॅट’मधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकते. म्हणूनच  म्युच्युअल फंडातील ‘ई फ्लॅट’ चा विचार सेकंड होम खरेदी करणाऱ्यांनी नक्कीच करायला हवा. 

– सुनील कडलग .

( लेखक हे पूर्णवेळ ‘आर्थिक नियोजन तज्ज्ञ’ म्हणून कार्यरत असून आपण त्यांना [email protected] अथवा  9422855786 या व्हाट्सएपवर मेसेज करून संपर्क साधू शकता.)

म्युच्युअल फंड योजनेसबंधी माहिती,

एस.आय.पी.(SIP) – स्मार्ट गुंतवणुकीचा एक पर्याय,

डायरेक्ट वि. रेग्युलर म्युच्युअल फंड गुंतवणूक योजना,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील चुका कशा टाळाव्यात?

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved. 
Share this article on :
You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…