Reading Time: 5 minutes

शेअरबाजार : रोटी, कपडा, ‘इक्विटी’.. और मकान !!!

रोमन कॅथलिक चर्चच्या मान्यतेनुसार सात पापांची गणना महत् पापे (Cardinal Sins) म्हणून होते… आपल्याकडील षड्रिपुंसारखीच, मात्रगंमतीचाआणिवेगळाभागहा, कीबायबलकालपासूनचचालतआलेलीहीसातपापांचीमूळयादीतशीलवचीकस्वरूपाचीआहे. पोपग्रेगरीयांनीत्यातप्रथमबदलकेलाआणिनंतरहीत्यांतक्वचित, कालपरत्त्वेबदलहोतअसतो. ‘The only thing that is constant… is change’हीउक्तीमलामनापासूनपटते…

अब्राहम मास्लो या मानसशास्त्रज्ञाने प्रथमत: मानवी गरजांचे पृथक्करण केले. त्यात सर्वप्रथम अन्न, वस्त्र व निवारा ह्या मूलभूत ‘गरजा’ भागविल्यानंतर मनुष्य हा ‘इच्छापूर्ती’च्या दिशेने धावू लागतो असे त्यांचे सर्वसाधारण प्रतिपादन आहे. ह्या वेगवेगळ्या भौतिक, सामाजिक वा मानसिक सुखांची उतरंड सर करावयाच्या प्रयत्नांना वास्तवात आणण्यासाठी काय केले पाहिजे? याचा मी स्वांतसुखाय, स्वत:साठी म्हणून केलेल्या चिंतनाचा सारांश म्हणजे मूळ उक्तीत केलेला बदल आहे असे आपण म्हणू शकता.

माझा एक जवळचा मित्र श्री. श्रीकांतने बरेच दिवसांपासून मारुतीची ‘स्विफ्ट’ गाडी घ्यायचा घाट घातला होता. ‘कर्ज काढणार नाही’ ह्या सर्वपरिचित मध्यमवर्गीय बाणेदार खाक्याला अनुसरून गाडीखरेदीसाठी आवश्यक असणारे पैसे तो निकराने जमवित होता. आता येत्या महिन्यांत गाडी बुक करणार एवढ्यात बादशहा अकबरच्या काळापासून जगातील सर्वश्रेष्ठ म्हणून गणल्या जाणार्‍या पुरुषाचा, म्हणजेच त्याच्या एकुलत्या एक मेहुण्याचा त्याला फोन आला. साहेबांना म्हणे त्यांच्या एका महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टकरिता भांडवल म्हणून तातडीने ५-६ लाख रुपयांची आवश्यकता होती. झाले; ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार, सहनही होत नाही…’ वगैरे स्थिती म्हणजे काय, याचे प्रत्यंतर माझ्या मित्राला आले. पण काय करणार? शेवटी आपण नाही मदत करायची तर कोणी? आणि तो देणारच आहे नं एफ.डी. एवढे व्याज… मा. सुप्रीम कोर्टाच्या घरगुती पूर्णपीठाने दिलेल्या काहीशा अशा सूचनावजा आदेशाने श्रीकांतरावांनी चेकवर मारुतीच्या डीलरऐवजी आपल्या मेहुण्याचे नाव टाकले.

परमेश्वरकृपेने सर्वकाही व्यवस्थित पार पडले आणि माझ्या मित्राला दिलेले मुद्दल अगदी व्याजासह (अर्थात एफ.डी.च्या दराने) तीन वर्षांनी परत मिळेल असा मला विश्वास आहे. पण तरीही तेव्हा, तीन वर्षांनी ही रक्कम श्रीकांतची पुर्वनियोजित ‘स्विफ्ट’ घ्यायला पुरेशी ठरेल का? तुम्हाला काय वाटते?

आकडेवारी सांगते, गेल्या पाच वर्षांत की मारुती सुझुकी या कंपनीच्या विक्रीमध्ये प्रतिवर्षी (चक्रवाढ दराने) अदमासे १६% आणि नफ्यांत १७.६०% वाढ झाली आहे. साहजिकच असा अंदाज बांधता येतो की, कंपनीच्या उत्पादनांच्या किंमतीही एवढ्याच प्रमाणांत वाढत असणार. मग विचार करण्याची गोष्ट ही आहे की, श्री. श्रीकांत काय किंवा आपण काय, आपल्या एफ.डी.ज (किंवा आपला मेव्हणा) आपल्याला कधी १६-१८% व्याज देतात का? उलट नफ्याच्या वर्ष-प्रतिवर्षाच्या अशा पौष्टिक खुराकाने या कंपनीच्या शेअरच्या भावाने मात्र मारुतीरायांसारखे उड्डाण केले आहे. सुरुवातीस फक्त १२५, होय फक्त सव्वाशे रुपयांत मिळालेला हा शेअर बरोब्बर दोन वर्षांपूर्वी (१ ऑगस्ट २०१३ला) १३५० रुपयांना मिळत होता.आज तो ४२०० रुपयांना मिळतोय. साहजिकच माझ्यासारख्याला त्याचे चारचाकीचे स्वप्न गंगाजळीच्या माध्यमातून लवकर साकार करावयाचे असेल, तर मी R.Ds, F.Dsच्या फंदात न पडता मारुती-सुझुकी (वा अशाच एखाद्या अन्य ब्लुय-चीप कंपनीचे) शेअर्स जमविण्यास सुरुवात करणे, वा त्याहीपेक्षा सोपे म्हणजे एखाद्या प्रथम दर्जाच्या ईक्विटी फंडात SIP सुरू करणेच बरे नाही का?

SIP म्हणजेच Systematic Investment Planचा विषय निघालाच आहे, तो एका आघाडीच्या फंडाने केलेले एक उत्तम सादरीकरण मला आठवले. त्याचा गोषवारा सांगतो.

समजा तुम्ही नवीन घर विकत घेतले असून त्यासाठी रु. २० लाखांचे गृहकर्ज १५ वर्षे मुदतीने घेण्याची आपली योजना आहे. आजच्या दराने आपणास या कर्जावर रु. २१,६७६ एवढा मासिक हप्ता पडेल आणि १५ वर्षे मुदतीअखेर आपण मूळ कर्जाबरोबरच रु. १९,०१,६८२ एवढे व्याज अशी एकूण रु. ३९,०१,६८२ ची परतफेड कराल. (http://ww.sbi.co.in/portal/web/home/emi-calculator)

आता येथे मांडलेली कल्पना नक्कीच लक्षवेधी आहे, जरुर पाहा. फंड सुचवितो की आपण आपली कर्जाची मुदत १५ ऐवजी २० वर्षे करा. यामुळे आपला मासिक हप्ता रु. १९,५०० म्हणजे दरमहा साधारणत: रु. १२००ने कमी होईल आणि मुदतीअखेर आपण मूळ कर्जाबरोबरच रु. २६,८०,००० एवढे व्याज, अशी एकूण रु. ४६,८०,०००ची परतफेड कराल.

महत्त्वाची, खरी म्हणजे निर्णायक बाब म्हणजे, कर्जफेडीच्या सुरुवातीबरोबरच आता आपण ह्या, बचत केलेल्या हप्त्याची, म्हणजेच रु.१२००ची SIP सुरू करावयाची आहे. नुकताच २० वर्षांचा कालावधी पुर्ण करणार्‍या ‘HDFC Equity Fund’ या योजनेचा संदर्भ घेतला (http://www.hdfcfund.com/CMT/Upload/attachments/HDFC_Equity_Fund_Leaflet_June%20_2015_1.pdf) तर प्रतिवर्षी २५%पेक्षा अधिक परतावा देणार्‍या या योजनेत एखाद्याने रु. १२०० ची SIP२० वर्षे ईमाने ईतबारे भरल्यास शेवटी गुंतवणुकीचे मूल्य रु. ६०,५०,०००; म्हणजेच आपल्या अपेक्षित एकूण परतफेडीपेक्षा कितीतरी अधिक झाले आहे!!!

मला स्पष्ट केले पाहिजे की लेखांतील कंपनी वा फंडांचे उल्लेख हे शिफारस म्हणून केलेले नसून केवळ प्रातिनिधिक व आकलन सुलभतेकरिता आहेत. ‘‘HDFC Equity Fund’’ या योजनेच्यासारखाच उत्तम परतावा देणार्‍या किमान दोनतीन अन्य योजनाही मी सांगू शकेन. महत्त्वाचे हे आहे की,‘उद्या हा आज किंवा कालसारखाच असेल’ ह्या सर्वसामान्य गृहितकावर विश्वास ठेवून अशा पद्धतीने आपण बँकेला केलेल्या एकूण परतफेडीपेक्षा कितीतरी अधिक पैसे विनासायास मिळविणे अगदी शक्य आहे!!!एका अर्थाने ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ ठेवून मिळणारे असे बोनस आपण कितीवेळा मिळवतो?

परवाच वाचनात आले, स्व. राजेश खन्नांचा कार्टर रोडस्थित ‘आशीर्वाद’ बंगला तब्बल ८५ कोटी रुपयांत विकला गेला. स्व. काकांनी १९७०मध्ये ही मिळकत ३.५ लाखांना विकत घेतली होती म्हणे, म्हणजेच गेल्या ४५ वर्षांत ही गुंतवणूक २४२८ पट झाली आणि टक्केवारीत बोलावयाचे तर हा दर चक्रवाढीने १९.३८% पडला.

प्रसिद्ध गोदरेज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. आदि गोदरेज यांनी त्यांचे पहिले घर सन १९६३मध्ये दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध अशा ‘उषाकिरण’ या ईमारतीत एक लाख रुपयांत घेतले. पुढे २०११मध्ये त्यांनी ते घर २५०० पट जास्त किंमतीला, म्हणजेच रु. २५ कोटींनाविकले. नफ्याचा हा दर १७.७०% पडतो.

‘आता ह्या लक्ष्मीपुत्रांच्या कथा आम्हाला कशाला ऐकवतोय हा माणूस?’ही आपल्या मनांत आलेली स्वाभाविक प्रतिक्रिया असणार हे मी जाणतो. ह्या अशा प्रकारच्या मिळकती घेणे येड्या-गबाळ्याचे काम नव्हे, हेही मला माहीत आहे. पण असेच कल्पनातीत ‘रिटर्न्स’ देणार्‍या या आणखी एका ईमारतीबद्दल मला आपणाला सांगावयाचे आहे. आणि हो, तीही अशी, की जिथे आपण कोणीही मालकी मिळवू शकतो, बरं का…१९८० साली १०० स्क्वे. फुटांनी उपलब्ध असलेल्या या जागेचा आजचा भाव आहे रु. २७००० स्क्वे. फुट!!! ही जागा म्हणजे (एव्हाना काही चाणाक्ष वाचकांनी ओळखलेही असेल) आपले ‘दलाल स्ट्रीट’!!!, मित्रहो, स्क्वे. फुट हे एक रूपक आहे. एका युनिटसाठी, मला आपल्याला आवर्जून सांगावयाचे आहे की, आपल्या बाजारानेही गेले ३४ वर्षे २० टक्क्यांहून अधिक परतावा दिलेला आहे. सबब आपण भलेही नसू उद्योगपती, नसू सेलिब्रिटी, पण हा शेअर बाजार आपल्या हक्काचा आहे. आवश्यकता फक्त विचार बदलण्याची आहे.

लो. टिळक एकदा त्यांच्या सहकार्‍यांबरोबर काही महत्त्वाचा विचारविनिमय करत बसले असतानाच दोन होतकरू (आमच्या गावी येणारे किर्तनकार बुवा या वर्गातील लोकांची ‘होईल तितकेच करू’ अशी व्याख्या करायचे) तरुण तेथे आले आणि त्यांनी थेट लोकमान्यांना ‘सांगा, देशासाठी काय करू शकतो आम्ही?’असा प्रश्‍न केला. लोकमान्यांनी ‘बाळांनो, प्रपंच नीट करा, संसार सांभाळा’ असा ‘जनरल’ सल्ला देऊन त्यांची बोळवण केली. तेव्हा टिळकांबरोबर बरोबर असलेले सहकारी त्यांना म्हणाले,“अहो, का नाजार केले तुम्ही त्यांना? किती उत्साहाने आले होते ते तुमच्याकडे…” लोकमान्य उत्तरले, “हे पाहा, ज्याला काही खरेच करावयाचे असते तो विचारायला येत नाही, मी देशासाठी काय करू म्हणून… तो करून दाखवतो. मी केले हे योग्यच केले असे माझे मत आहे.” अशी कथा मी कुठेतरी वाचली होती. मला काय म्हणावयाचे आहे हे एव्हाना स्पष्ट झाले असावे. आता ‘माझ्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी मी काय करावयास हवे?’हा प्रश्‍न मला तुम्ही बहुधा विचारणार नाही.

लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की, आपल्याला काही एखादा मोठ डोंगर एका दिवसांत उलथून टाकावयाचा नाही. महानदीचा उगमही एक क्षीण प्रवाहच असतो आणि मोहीम कितीही महान असो, सुरुवातीचे पाऊल नेहमीप्रमाणेच फूट-दीडफुट अंतराचेच असते. स्मरणात असलेला आणखी एक किस्सा सांगतो, ‘टुर दी फ्रान्स’ (Tour de France) ही युरोपांतील एक अतिशय प्रतिष्ठेची सायकल शर्यत आहे. २१ दिवस चालणारी आणि जवळजवळ ३५०० कि.मी. अंतराची ही स्पर्धा जिंकावी यासाठी अनेक संघ अहमहमिकेने प्रयत्न करतात. प्रसिद्ध सायकलिंग कोच डेव्ह ब्रेल्स्फोर्ड यांच्यावर एकदा ब्रिटिश संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. या, इतक्या उच्च पातळीवर दैनंदिन सराव, व्यायाम, शारीरिक तंदुरुस्ती या गोष्टी तर आधीपासून होत्याच, पण ब्रेल्स्फोर्ड सरांचे वेगळेपण हे, की त्यांनी दैनंदिन बाबींत किरकोळ दिसणारे, अगदी साधेसोपे बदल केले, उदा., झोप चांगली लागावी यासाठी आरामदायी उशा वापरणे, पोट बिघडू नये यासाठी सॅनिटायझर वापरूनच हात धुणेअशा बाबींना त्यांनी त्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमांत प्राधान्य दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार अशा छोट्याछोट्या गोष्टींमुळेच त्यांच्या संघाचे ५ वर्षांत ‘टूर दी फ्रान्स’ जिंकण्याचे स्वप्न साकार होणार होते. अर्थात पुढे त्यांचा अंदाज चुकला… त्यांच्या संघाने ५व्या नव्हे तर तिसर्‍याच वर्षी ही स्पर्धा जिंकली!!! अतिशय माहितीपूर्ण व रंजक असा हा किस्सा तपशीलांत वाचावयाचा असल्यास http://jamesclear.com/marginal-gains या दुव्यावर जाऊन वाचावा.

…तेव्हा, पुन्हा एकदा धृवपदाकडे येतो ते हे, की या इहलोकातील तुम्हा आम्हा पामरांना आपली लौकिकार्थातील इप्सिते साध्य करावयाची असतील तर ‘इक्विटी’ ला पर्याय नाही.‘इक्विटीय नमस्तस्मै एस.आय.पी.ब्रह्मारुपिणे। आर्थिक क्लेष नाशाय, बाजाराय: नमो नम:’ हा आधुनिक जगातील मूलमंत्र हवा. अर्थात खरेदी वा विक्रीचा आंधळा साहसवाद केव्हाही घातकच. गुंतवणूकदाराची भूमिका ऑलिम्पिकमधील नेमबाजासारखी, एकाग्र चित्ताने लक्ष्यवेधाचा प्रयत्न करणारी असावी, हिंदी मारधाड चित्रपटांतील व्हिलनसारखी, अंदाधुंद गोळीबार करणारी नसावी, या माझ्या भूमिकेचा पुनरुच्चार करणे हे मी महत्त्वाचे समजतो.

शेवटी जाताजाता आणखी एक गमतीशीर सत्यघटनेची माहिती देतो. आपल्या शेजारी राष्ट्राबरोबरील झालेल्या युद्धानंतर दोन्ही अनेक नागरिक आपापल्या मालमत्ता तेथेच टाकून स्थलांतरित झाले. भारतातील अनेकजणही शत्रुराष्ट्राचे नागरिक बनले. देश सोडून गेलेल्या अशा नागरिकांच्या येथे राहिलेल्या मालमत्तांना शत्रु-मालमत्ता (Enemy properties) असे संबोधले जाते व Enemy property Act of १९६८या कायद्यान्वये गृहमंत्रालयातर्फे एक खास विभागामार्फत त्यांची देखरेख केली जाते. सांगावयाचे हे की सन १९६५ व ७१च्या युद्धानंतर केलेल्या मोजणीनुसार भारत सरकारकडील शत्रु-मालमत्ता विभागाकडे अशा नागरिकांच्या नावावर असलेले २९ कोटी रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स होते. असे म्हणतात की यांत टाटा समूहातील महत्त्वाच्या कंपन्या, युनिट ट्रस्ट, हिंदुस्थान लीव्हर, स्टेट बँक, अशोक लेलँड, सिप्ला अशा एक सो एक ब्ल्युचीप कंपन्याचा समावेश आहे. सरकारी, अधिकृत माहितीनुसार अलीकडेच, २०१५ साली केलेल्या मूल्यमापनानंतर त्या शेअर्सचे बाजारमूल्य रुपये १०,००० कोटी एवढे आहे. बघा ३४५ पट वाढले ४५ वर्षांत…आहात कुठे? अधिक कुतूहल असेल तर हा घ्या आंतरजालावरील दुवा- http://www.business-standard.com/article/markets/enemy-shares-to-be-dematerialised-115041700037_1.html

आता मला सांगा, आपला बाजार जर ‘शत्रूची मालमत्ता अशी भरभक्कमपणे वाढवू शकतो, तर आपल्याला, या देशांच्या नागरिकांना हा फायदा का नाही मिळणार??

चीनी लोकांत एक म्हण आहे ‘The best time to plant a tree was 20 years ago and the second best time is now.’ शेअर्समध्ये करावयाच्या गुंतवणुकीबद्दलही हेच तत्त्वज्ञान १००% लागू पडते. चला मग वाट कसली पाहताय?? गुरू…हो जाओ शुरू!!!

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…