अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक करीत आहेत. जून 22 च्या मध्यावर तो बऱ्यापैकी म्हणजे सर्वोच्च स्थानापासून 20% खाली आला होता. आता बाजार वाढणारच नाही, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्यावर हळूहळू वाढत तो 12 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर वरच्या स्तराला स्थिरावला. आता बाजारास कोणी रोखू शकत नाही.
इथून वाढणारच अशी स्थिती झाली असताना तेथून खाली येऊन 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर खालच्या स्तरावर स्थिरावला. अनेक जणांनी या वर्षात बाजार रेकॉर्ड पार करेल अशी आशा सोडल्यावर वाढू लागला. 1 डिसेंबरला त्याने नवा विक्रम प्रस्थापित केला. या पार्श्वभूमीवर मार्केट कधी पडणार? हा सर्वसामान्य प्रश्न आहे.
खर तर या सर्वच काळात म्हणजे तेजी असो अथवा मंदी, गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असतात. परंतु बाजार खाली जायला लागल्यावर तो अजून खाली जाईल अशी शक्यता दिसू लागते. त्यामुळे प्रत्येक जण अजून किती खाली जाणार याचा अंदाज, तर वर जात असताना वर किती जाईल याविषयी छातीठोकपणे अंदाज व्यक्त करीत असल्याने संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे व्यवहार केले जात नाहीत, त्यामुळे होणारा नफा नुकसान आभासीच राहते.
तुम्ही अल्पकालीन किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदार असलात,स्विंग ट्रेडिंग करत असाल किंवा एफएनओ तर या बाजारातून नफा मिळवणे हे तुमचे उद्दिष्ट असणारच तो नेमका किती असावा याचा तुम्ही नक्की विचार केलेला असला पाहिजे. या संदर्भात गुंतवणूक करण्याच्या विविध पद्धती तुम्हाला माहिती असायला हव्यात. तुमची स्वतःची एक पद्धत पद्धत (भले ती चुकीची का असेना) तुम्हाला निश्चितपणे सांगता यायला हवी. त्यावर ठरवल्याप्रमाणे त्वरित निर्णय घेता यायला हवा. ती पद्धत आपल्याला लागू पडते की नाही ते पाहावे. निश्चित कालावधी नंतर त्याचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करता आले पाहिजेत.
नक्की वाचा : शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करताय? योग्य मार्गदर्शनासाठी हा लेख नक्की वाचा.
आपले वय, उपलब्ध पैसे, जोखीम स्वीकारण्याची क्षमता, आपल्यावरील जबाबदाऱ्या, नजीकच्या काळात आवश्यक असलेले खर्च याचा विचार करून गुंतवणूक घोरण ठरवावे लागते. याचबरोबर आपला पुरेसा जीवन विमा, आरोग्यविमा आणि सेवानिवृत्ती विषयक धोरण ठरवाययलाच हवं यासाठी जितक्या लवकर सुरुवात कराल तितका त्याचा आर्थिक स्थैर्य येण्यास उपयोग होईल. याशिवाय आवश्यक असल्यास गरजेनुसार अन्य विमाप्रकार घेता येतील. ते जितके लवकर घेतले जातील तेवढा त्यासाठी येणारा खर्च कमी असेल.
शेअरबाजारात गुंतवणूक करताना होणाऱ्या सर्वसामान्य चुका.
फारशी माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक:
- आपल्याला माहिती नसलेल्या क्षेत्रात गुंतवणूक करू नये असे तज्ञ सांगतात. अनेकदा विशिष्ट व्यवसायात असलेल्या व्यक्तींना त्यातील खाचाखोचा माहिती असतात.
- त्यात होणारे बदल, नवनवीन कल्पना त्यांना आधी माहिती होतात. अशा कल्पेनेचे भवितव्य ओळखून त्यात सर्वात आधी गुंतवणूक केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा त्यांना मिळण्याची शक्यता अधिक असते.
एखाद्या कंपनी किंवा व्यवसायाबद्धल वाटणारे तीव्र प्रेम:
- काही लोक एकाच कंपनीत किंवा एकाच क्षेत्रात गुंतवणूक करतात. बाजारात येणाऱ्या आणि व्यवसायात यशस्वी ठरणाऱ्या कंपन्यांतील फक्त 3% कंपन्या व्यवसायातील सातत्य 50 वर्षाहून अधिक काळ टिकवू शकतात.
- उरलेल्या 90% कंपन्या 15 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात तर 7% कंपन्या 25 वर्षांनंतर कालबाह्य ठरतात. तेव्हा गुंतवणूक करताना एखादी कंपनी किंवा एखादे क्षेत्र याच्या फार प्रेमात असू नये.
संयमाचा आभाव:
- अनेक व्यक्ती गुंतवणूक करतात. परंतु गुंतवणूक मूल्य वाढले किंवा कमी झाले की त्याच्या त्यावरील प्रतिक्रिया तीव्र स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
अत्यल्प फायद्यातील मोठे व्यवहार:
- अनेक जण खूप मोठे मोठे व्यवहार करून त्यातून अत्यल्प नफा मिळवतात. खरेदी विक्री केल्यावर मिळणारा फायद्यातील 50% हून अधिक भाग जर ब्रोकरेज, एक्सचेंजचे टर्न ओव्हर फी, जीएसटी, स्टॅम्प ड्युटी, एस टी टी या सारखे स्थिरखर्च म्हणून जात असल्यास मिळणारा, मिळणारा फायदा पुरेसा नसेल तर अशा नफ्याला काही अर्थ उरत नाही.
- याशिवाय ब्रोकरेज व्यतिरिक्त मिळालेल्या नफ्यावर आयकर आकारणी होईल. ते वेगळेच तेव्हा आपल्याला होऊ शकणाऱ्या खरोखरच्या निव्वळ नफ्याचा (ब्रेक इव्हन) विचार करूनच भावातील फरक मिळवावा.
नक्की वाचा : शेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी?
मोह:
- अनेकदा क्षणिक नफा मिळवण्याच्या नादात होऊ शकणारा मोठा नफा निसटून जातो. तेव्हा या मोहापासून दूर कसे राहता त्यावर होणाऱ्या नफा तोट्याचे प्रमाण बदलेल.
वेळीच योग्य ते बदल न करणे:
- अनेकदा आपल्याला मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणातून भविष्याचे संकेत मिळतात. त्याप्रमाणे आपल्या गुंतवणूक घोरणात बदल करावा लागतो.
भावना प्रधानता:
- भावना प्रधानता हा जीवनात चांगला गुणधर्म असला तरी गुंतवणूकीत तो दुर्गुण ठरतो.
यावर मात करण्यासाठी-
स्वतःची योजना बनवा:
- वर म्हटल्याप्रमाणे स्वतःची निश्चित अशी गुंतवणूक योजना हवी. त्याचा वेळोवेळी आढावा घेऊन आवश्यक असल्यास त्यात बदल करावेत.
ती आपोआप कार्यान्वित होईल ते पहा:
- गुगल शीट, एक्ससेल यांचा वापर करून किंवा काही ब्रोकर्सनी त्यांच्या अँपमध्ये पुरवलेल्या सवलतींचा वापर करून आपली गुंतवणूक अधिक स्मार्ट करता येईल.
नवनवे प्रयोग करण्यासाठी काही फंड राखून ठेवा:
- आपल्या गुंतवणुकीतील अत्यल्प भाग यासाठी राखून ठेवा. कोणत्याही परिस्थितीत असा फंड 5%हून अधिक नको.
- यातील नुकसानमर्यादा गुंतवणूक प्रमाणात असावी. याहून अधिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई अन्य ठिकाणातून करावी लागेल.
- कदाचित सर्व रक्कम गमवावी लागेल.कुठे नेमके थांबावे ते ठरवावे लागेल.
काही बंधने स्वतः पाळा:
- या सर्वच प्रवासात आपण स्वतःच काही नियम ठरवावे आणि त्यांचे कटाक्षाने पालन करावे. हे नियम असे असू शकतात-
- गुंतवणुकीसाठी कर्ज न घेणे.
- रोज एकच ट्रेड घेणे.
- आपली नुकसान मर्यादा सांभाळणे (स्टॉप लॉस)
निष्कर्ष :
- असे किंवा या प्रमाणे नियम आपल्यावर स्वखुशीने लादून त्याचे पालन करावे.
- बाजार वरखाली होत राहिलंच आणि तो आज ना उद्या वाढणारच!
- बाजारात एक वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून आपले व्यवहार बाजारावर मोठा परिणाम करू शकत नाहीत याची जाणीव ठेवून नेहमी विविध संधींचा शोध घेत राहावे.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकारणीचे सदस्य असून लेखातील मते ही त्यांची वैयक्तिक मते आहेत)