ध्येय व उद्दिष्ट्ये
आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. आपण सगळेच सतत कोणत्या ना कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन असतो. जिथे एक टिचकी मारल्यावर जगभरात उपलब्ध असलेली सगळी माहिती आपल्यासमोर उभी ठाकते, तिथे साधारणपणे ११ कोटी लोकसंख्या असणाऱ्या मराठी भाषिकांसाठी फायदा, गुंतवणूक, नवनविन आर्थिक योजना, आणि जनसामान्यांना पडलेल्या अर्थसंंबंधित प्रश्नांसाठी एकही समर्पित संकेतस्थळ नसावं ही आश्चर्याची बाब आहे. रोजच्या जीवनात अनेक आर्थिक व्यवहार करताना त्याविषयीचे खरे नियम, व सखोल माहिती आपल्याला नसते. ती आंतरजालावर(इंटरनेटवर) शोधायचा प्रयत्न केल्यास फक्त इंग्रजी आणि अत्यंत तांत्रिक संज्ञा वापरून लिहिलेले लेख समोर येतात. या सगळ्यातून आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी ते समजून घेण्याची इच्छाच लोेप पावते. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही अर्थसाक्षर.कॉम हे संकेतस्थळ सुरू केले आहे.
- अर्थसाक्षरद्वारे गुंतवणूक, कर्ज, अर्थसाक्षरता, विविध प्रकारचे कर-कायदे जसे की आयकर, जी.एस.टी. या प्रमुख व दैनंदिन जीवनातल्य़ा इतर अर्थसंबंधित विषयांवरील खरी, सखोल व पारदर्शक माहिती आपणासमोर प्रकाशित करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
- ह्या लेखांद्वारे आपली आर्थिक गोष्टींबद्दलची अनावश्यक भिती दूर व्हावी असेच प्रयत्न आम्ही सातत्याने करू.
- या संकेतस्थळ द्वारे कुठलेही प्रॉडक्ट्स, सेवा विकण्याचा व संलग्न होण्याचा आमचा मानस नाही.
- मराठी भाषेतून अर्थविषयक लिहिताना आम्ही प्रमाण भाषेचा वापर करणार आहोत. पण योग्य माहितीचा प्रसार हे आमचे प्रमुख ध्येय असल्याने कधी कधी १००% शुद्ध मराठी भाषा वापरता येणार नाही.
योग्य अर्थविषयक माहिती असल्यास होणाऱ्या फसवणूकी टाळता येऊ शकतात. अभ्यासू व जागरूक व्यक्तीस कोणीही फसवू शकत नाही. चला तर मग या नव्या अर्थजागृती अभियानात सामील व्हा !