Reading Time: 3 minutes
 • ‘गोपी’ चित्रपटातील दिलीप कुमार यांनी अभिनय केलेले आणि मोहम्मद रफींनी गायलेले हे अजरामर गीत सध्या शेअर बाजारात अथवा म्युच्युअल फंडात स्वप्रशिक्षित किंवा मोफत सल्ला मिळतोय म्हणून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना नक्कीच आठवत असेल. कारण चढत्या बाजारात सगळेच तज्ञ असतात आणि बाजार उतरणीला लागला कि, मी ३ महिन्यांपूर्वीच सांगितले होते, असे सांगून पडद्याआड गायब होणारे आपल्या आसपास नक्कीच असतात. नुकसान मात्र सामान्य बचतकर्त्याचं  होत असतं.
 • कदाचित सत्य हे आहे कि,आपण गुगलच्या जगात वाढतोय. जिथे मिळणाऱ्या माहितीलाच आपण “ज्ञान” समजतोय. आज गुगलवर शोधलेली माहिती आणि यु टयूबवर मिळणारे व्हिडीओज आपल्याला गुंतवणूक कशी करावी? एखादा आजार कशाने बरा होवू शकतो? विमान कसे उडवावे? इथवर सगळं शिकवू शकतात. परंतु सामान्य तापाचे जेव्हा ज्वरात रुपांतर होते तेव्हा तुम्ही गुगल करता का? गुंतवणुकीबाबत तर खूपदा आपल्याला “काय माहित नाही? हे सुद्धा माहित नसते.”
 • “वित्तीय किंवा आर्थिक सल्ला का घ्यावा?” याच्या प्रमुख कारणांपैकी एक अतिमहत्वाचे कारण म्हणजे गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेले पर्याय चलनाशी निगडीत तर असतातच पण तेवढेच गुंतागुंतीचे देखील असतात.
 • आजपासून २५ वर्षांपूर्वी आपण पारंपारिक मुदत ठेवी करत होतो. त्या प्रकारच्या गुंतवणूकीचा निर्णय घेण्यासाठी परिचयातील बँक, परताव्याचा व्याजदर आणि मुदत एवढया गोष्टी माहित असल्या तरी पुरेसे होते. शेअर बाजारातील किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्त कर्जरोखे आणि शेअर्स एवढचं नसून त्यातील संधी ओळखण्याची विशिष्ट कला आहे. वित्तीय ध्येय गाठण्यासाठी तुमच्या गुंतवणूक क्षमतेनुसार विविध पर्याय उपलब्ध असतात.
 • शेअर बाजारात खरेदी-विक्री (ट्रेडींग) करणारे आणि ध्येय ठरवून गुंतवणूक करणारे यातला फरक ज्यांना समजत नाही असे अर्धशिक्षित गुंतवणूकदार हव्यासापोटी बाजारात येतात आणि रिकामा खिसा घेऊन घरी जातात. ”म्युच्युअल फंड सही है….” या एका वाक्याने अनेक लोकांना गुंतवणूकदार बनविण्यास म्युच्युअल फंड विक्रेत्यांना तसेच ऑन लाईन विक्रेत्यांना सुद्धा मदत केली पण त्यात देखील, “गुंतवणूकदारास साजेशा पर्यायांचा अभ्यास करणारे खूप कमी सल्लागार आहेत.
 • गेल्या ४ वर्षात ज्यांनी डिजीटल क्रांतीचे शिलेदार म्हणून स्वतःच्या परिक्षणानुसार फक्त समभाग म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली त्यांचे गुंतवणूक तक्ते आता नकारात्मक परतावा दाखवत असतील. बाजाराशी निगडीत गुंतवणूक करतांना समतोल पर्यायात गुंतवणूक करावयाची असते. ज्यांना कर्जरोखे (Debt) फंडापासून मिळणारा परतावा किरकोळ वाटतो त्यांना आता कदाचित गुंतवणूक विभाजनाचे महत्व कळले असेल,अशी अपेक्षा करू या.
 • गुंतवणूक करणे म्हणजे केवळ ‘पैसे कमविणे’  एवढेच नसून चूका टाळण्याचा प्रयत्न करणे ही देखील गुंतवणूक असते, हा मुद्दा ध्यानात घेतला पाहिजे. गुंतवणूकीचे निर्णय समंजसपणे घ्यावयाचे असतात कारण त्यासोबत भावना, अस्तित्व व अनुभव यांची जोड असते. मनुष्य स्वभावानुसार तोटा सहन न करणे, भीतीमुळे अस्वस्थ होणे तसेच ऐकीव माहितीनुसार निर्णय घेणे अशा प्रकारची आपल्यात मानसिक मतभिन्नता असते.
 • अचानक एखादया क्षेत्रात गुंतवणूकदार वाढले, उदा.बांधकाम क्षेत्र किंवा एखादे ‌‍मोबाईल अॅप खूप लोकांनी डाऊनलोड केले की आपणदेखील डाऊनलोड करतो, ही मानवी स्वभावाची नैसर्गिक प्रवृत्ती असते.
 • नजीकचे उदाहरण सांगायचे झाल्यास २००७च्या बाजारात उच्चतम पातळीवर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी २००८च्या पडझडीत घाबरून खालच्या पातळीवर समभाग विक्री केली. परिणाम भांडवली तोटा झाला आणि पुन्हा २०१३ मधे बाजारात आलेली संधी दवडली.
 • वित्तीय सल्लागार तुम्हाला माहिती,बातम्या आणि अफवा यांच्यातील फरक समजावून सांगून होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून वाचविण्यास मदत करतो.
 • वित्तीय अथवा गुंतवणूक सल्ला हा वित्तीय उत्पादनाच्या (शेअर्स किंवा म्युच्युअल फंड योजना) विक्रीपेक्षा खूप वेगळा आहे.  कारण गुंतवणूक हा एकदा होणारा व्यवहार (Transaction) नसून निरंतर चालणारा प्रवास आहे.
 • सामान्यपणे गुंतवणूक प्रवास पंचविशीत सुरु होतो.  कारण तेव्हा नुकतीच कमवायला सुरुवात झालेली असते. आपण करत असलेल्या बचतीतून मत्ता बांधणी व संपत्ती निर्मितीचे काम तिशीत होते.  तर चाळीशीत निवृत्तीचे नियोजन सुरु होत असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असू शकतो मात्र ध्येय समान असतात. त्यासाठी लागणारा वित्तीय सल्ला कायमस्वरूपी व तुमच्या गरजेनुसार असला पाहिजे.
 • मला भेटणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रश्न पुढीलप्रमाणे असतात. “सध्या बाजार पडतोय तर कुठले शेअर्स विकत घेतले पाहिजेत? गुंतवणूकीसाठी सध्या कुठला चांगला फंड किंवा कुठले फंड घराणे चांगले आहे? मी स्मॉल कॅप फंड घेतला पाहिजे कि लार्ज कॅप?” परंतु “मला चांगला आर्थिक सल्ला कोण देऊ शकेल”? असे विचारणारे फारच क्वचित भेटत असतात.
 • असं म्हणतात कि, संघनायक त्याच्या डावपेचांनी एखादया सामन्याचा निर्णय फिरवू शकतो परंतु एक उत्तम प्रशिक्षक एखादया खेळाडूचे आयुष्य घडवू शकतो. उदाहरणच दयायचे ठरले तर रमाकांत आचरेकर आणि सचिन तेंडुलकर यांच्याकडे बघितले पाहिजे.
 • ५ दिवसांच्या दीपावलीच्या सणाला धनत्रयोदशीपासून प्रारंभ होत असतो. आज धन्वंतरीचे पूजन केले जाते. धन्वंतरीला आयुर्वेदाची देवता म्हणजेच आरोग्याची देवता मानले जाते. तिच्या पूजनापाठीमागचा शुद्ध हेतू हा असतो की, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी प्रत्येकास सद्बुद्धी व सर्व सुखांचा उपभोग घेण्यासाठी निरामय आरोग्य मिळू दे. तेव्हा या ५ दिवसांत पुढील ५ संकल्प करू या.
  • दररोज निरामय आरोग्यासाठी किमान २० मिनिटे व्यायाम करणे.
  • वही पूजन करून घरासाठी होणारे दैनंदिन जमा-खर्च लिहिणे.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी जोखीमांक चाचणी करून घेणे.
  • चांगला आर्थिक सल्लागार नेमणे.
  • वरील ४ संकल्प लक्षात ठेवणे.

 

 

 

सर्व वाचकांना दीपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

– अतुल कोतकर

 

 

Share this article on :
2 comments
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…