Reading Time: 3 minutes

सन 2023 हे भांडवल बाजाराच्या दृष्टीने उत्तम परतावा देणारे वर्ष ठरले. लोकप्रिय बाजार निर्देशांक निफ्टी 50 ने 19% तर सेन्सेक्सने वर्षभरात 18% वाढ नोंदवली. मागील लेखात आपण शेअरबाजारावर प्रभाव पाडणाऱ्या

★हिंडणबर्ग अहवाल,

★एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण, 

★गो फस्ट ची दिवाळखोरी, 

★वेदांतचा सेमिकंडक्टर क्षेत्रातील जुना भागीदारी करार मोडून नवा करार, ★आयटीसीच्या हॉटेल व्यवसायाचे विभाजन, 

★टीसीएस नोकरभरती घोटाळा, 

★टाटा टेक्नॉलॉजीची प्रारंभिक भागविक्री, 

★एअर इंडिया इंडिगोकडून मोठ्याप्रमाणात विमानखरेदी, 

★डिस्ने हॉटस्टार आणि बायजुस अडचणीत 

       या महत्वाच्या घटनांचा थोडक्यात आढावा घेतला.  या घटना त्या संबंधित कंपन्यांच्या बाजारभावावर परिणाम करणाऱ्या होत्या. याशिवाय अशा आर्थिक क्षेत्रांतील अनेक घडामोडी होत्या ज्या भांडवल बाजाराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या मानता येतील, त्यातील काही घटनांवर एक दृष्टिक्षेप.

★व्यवहारांची सौदापूर्ती एक दिवसानंतर- भारतीय शेअरबाजार हा जगातील जुना आणि आशियातील पहिला शेअरबाजार आहे. पूर्वी येथील व्यवहारांच्या सौदापूर्तीचे चक्र अनियमित होते. आर्थिक सुधारणा झाल्यावर त्यात नियमितता आली आणि व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होऊ लागले सौदापूर्ती T+5 म्हणजे व्यवहार दिवस सोडून कामाच्या पाचव्या दिवशी होऊ लागली त्यात T+3, T+2 अशी प्रगती होऊन 27 जानेवारी 2023 पासून T+1 या पद्धतीने होऊ लागली. अमेरिका, ग्रेट ब्रिटन, जपान यासारख्या अतिप्रगत देशात अजूनही व्यवहारांच्या दुसऱ्या दिवशी सौदापूर्ती होत नाही. आता हे देश सदर पद्धतीने आपण लवकरच सौदापूर्ती करू असे म्हणू लागले असून आपण दोन टप्यात 31 मार्च 2024 पूर्वी T+0 म्हणजे ज्या दिवशी व्यवहार त्याच दिवशी सौदापूर्ती करण्याचा संकल्प केला आहे.

★प्रारंभीग भागविक्री झालेल्या शेअर्सची सुचिबद्धता (listing) T+6 वरून T+3 वर-  आयपीओ नंतर विक्री केलेले शेअर बाजारात लिस्ट होण्यासाठी पूर्वी बराच कालावधी लागत असे आता तंत्रज्ञानाने त्यात प्रगती होऊन इशू बंद झाल्यावर बाजारात कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार कामकाजाच्या सहाव्या दिवशी होत असत यावर्षी 1 डिसेंबर 2023 पासून ते कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी होऊ लागले.

★बँक निफ्टी आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मधील डिरिव्हेटिव व्यवहार दिवसात सुधारणा- यापूर्वी यातील साप्ताहिक व्यवहारांची आठवड्याची सौदापूर्ती दर गुरुवारी आणि मासिक सौदापूर्ती महिन्यातील शेवटच्या गुरुवारी होत होती. 12 जुलै 2023 पासून यात बदल होऊन आता सौदापूर्ती गुरुवारी होण्याऐवजी बुधवारी होत आहे. जर यादिवशी सुटी असेल तर त्यांची सौदापूर्ती आधल्या दिवशी होईल.

★सेन्सेक्स 30 आणि बँकेक्स करारांचे पुनरुज्जीवन- निफ्टी 50 आणि बँक निफ्टीच्या यशानंतर मुंबई शेअरबाजाराने मे 2023 मध्ये सेन्सेक्स30 आणि बँकेक्स हे  डिरिव्हेटिव व्यवहारातील करार पुनरुज्जीवित केले हे करार पूर्वी सेन्सेक्स 15 आणि बँकेक्स 20 च्या लॉटमध्ये केले जात होते त्याची लॉट साईज कमी करून ती आता अनुक्रमे 10 आणि 15 च्या लॉटमध्ये आहे.

★विलीनीकरण अधिग्रहण- अनेक कंपन्यांचे विलीनीकरण आणि अधिग्रहण झाले त्यातील काही महत्वाचे –

*अडाणी एंटरप्राइजेसची उपकंपनी एएमजी मीडिया नेटवर्कने आएएनएस इंडिया प्रा लिमिटेडचे 50% अधिक भागभांडवल खरेदी केले.

*रिलायन्स गृपमधील रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने ऍडए मम्मामधील 51% भांडवल खरेदी केले.

*कारटेकट्रेडने सोबेक्स आटोमधील 100% भागभांडवल खरेदी केले.

*सरेगामाने पॉकेट एसेस पिक्चरमधील 52% हिस्सा खरेदी केला असून येत्या 15 महिन्यात आणखी 41% हिस्सा खरेदी करणार आहेत.

*कोटक महिंद्रा बँकेने सोनाटा फायनान्सचे अधिग्रहण केल्याने ती आता बँकेची उपकंपनी होईल.

*एचडीएफसी बँकेने सॉफ्टसेल टेकमधील आपला पूर्ण हिस्सा विकला आहे.

*लिबर्टी ग्लोबलने व्होडाफोन मधील भांडवल विकत घेतले.

*हिंदुस्थान इन्फरॉलॉगचे हिंदुस्थान पोर्टमध्ये विलीनीकरण.

*पीव्हीआर आणि आयनॉक्स लिजर मर्ज होऊन पीव्हीआर आयनॉक्स पिक्चर नावाची नवी कंपनी अस्तीत्वात आली.

*अडाणी समूहाने एसीसी आणि अंबुजा सिमेंटवर ताबा मिळवला.

*एचडीएफसीचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाले.

★सर्वाधिक भागविक्री झालेले वर्ष- एसएमइ (173 इशू)आणि मेनलाईनमधील (52 इशू) यामुळे जगात सर्वाधिक संख्येची प्रारंभिक भागविक्री या वर्षात झाली. मागील वर्षीच्या तुलनेत ती 50% अधिक आहे.19 वर्षानंतर प्रथमच टाटा ग्रुपकडून आलेल्या आयपीओचे जंगी स्वागत गुंतवणूकदारांनी केले. सेबीने शेअरवर किती प्रीमयम घ्यावा याविषयी मुक्त धोरण स्वीकारले असल्याने बाजारातील सकारात्मकतेचा फायदा उठवत अधिकाधिक कंपन्यांकडून प्रारंभिक भागविक्री चालू वर्षातही अपेक्षित आहे.

★डेट म्युच्युअल फंड योजनांवरील आयकर सवलत रद्द- 1 एप्रिल 2023 पासून खरेदी केलेल्या म्युच्युअल फंडांच्या डेट योजनांवरील भांडवली नफ्यावरील निर्देशांक फायदा आणि विशेष दराने आयकर सवलती रद्द झाल्या त्यामुळे या योजना आता मुदत ठेवी सारख्याच झाल्या आहेत. यामुळे चलाख गुंतवणूकदार बाजारात नोंदणी केलेल्या बॉण्ड्समध्ये त्यांची गुंतवणूक वळवण्याची शक्यता आहे त्यामुळे डेट मार्केटला चालना मिळून त्यातील तरलता वाढण्याची शक्यता वाटते.

★रिझर्व बँकेकडून व्याजदाराचा आढावा- रिझर्व बॅंकेकडून वर्षातून सहा वेळा पतधोरण आढावा घेण्यात येतो फेब्रुवारी 2023 मध्ये रेपोरेटमध्ये (रिझर्व बँकेचा व्यापारी बँकांना देण्याच्या कर्जावरील व्याजदर) पाव टक्का वाढ करण्यात येऊन तो साडेसहा टक्के करण्यात आला डिसेंबर 2023 पर्यंत त्यात बदल झाला नाही.

★एमएससीआय ग्लोबल इंडेक्समधील भारताचा भारमूल्य वाढले- जगातीक निदेशांक ठरवणाऱ्या विकसनशील देशातील निर्देशांकात आपला भारांक 15.9 वरून 16.3% वर उंचावला.

★जे पी मॉर्गनने आपल्या बॉण्ड निर्देशांकात भारतीय रोखे समाविष्ट- जे पी मॉर्गन इमर्जिंग मार्केट ग्लोबल इंडेक्समध्ये भारतीय कर्जरोख्यांचा समावेश करण्याचे ठरवले असून यावर्षी जून अखेर या निर्देशांकात सरकारी बॉण्डसचा समावेश होईल.

★म्युच्युअल फंड व्यवसायाची वाढ: म्युच्युअल फंडाची एकत्रित मालमत्ता 50 लाख कोटींच्यावर प्रथमच पोहोचली. 17 हजार कोटीहून अधिक रुपये एसआयपीच्या माध्यमातून भांडवल बाजारात येत असून हाही विक्रमच आहे. भांडवल बाजारात वाढणाऱ्या पैशांच्या ओघामुळेच विदेशी वित्तसंस्थानी काही काळ जोरदार विक्री करूनही शेअरबाजारात प्रथमच मोठी घसरण झाली नाही.

★शेअरबाजार निर्देशांकाचा उच्चांक: आता कधीही बाजार पडू शकेल असे वाटत असतानाच नोव्हेंबर अखेर आणि डिसेंबरमध्ये आलेल्या जोरदार तेजीमुळे बाजार निर्देशांक विक्रमी स्थानापर्यंत पोहोचले असून ते सध्या त्याच्या आसपास घुटमळत आहेत विदेशी वित्तसंस्थांकडून गुंतवणूक होत असल्याचे संकेत मिळत असल्याने अधिक वेगवान घडामोडी घडून तेजीचे नवे विक्रम सन 2024 मध्ये पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.

       

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

     (लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य आहेत. याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…