Reading Time: 3 minutes

“मनी”ला नाही भाव आणि महागाई घालते “घाव”….

कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची रास्त अपेक्षा काय असते? माझ्या मिळकतीत ठराविक प्रमाणात वाढ व्हावी. का? कारण प्रत्येकाच्या गरजा दिवसागणिक रुपयाच्या होत असलेल्या अवमूल्यनामुळे “महाग” होत चालल्या आहेत. मिळकत आणि खर्च यांच्या पाठशिवणीच्या खेळात “महागाई” नावाचा गडी कसा खो घालतो, याचे उत्तर शोधण्याचा आज प्रयत्न करू या.

कारण महागाई सोबतच उत्पन्न देखील वाढत आहे. फक्त वाढत्या उत्पन्नाचे योग्य आर्थिक नियोजन केल्यास महागाईची झळ बसणार नाही.

सरत्या महिन्यात दुधाचे दर ५ रुपये प्रति लिटर वाढून ग्राहक खरेदी दर अंदाजे प्रति लिटर ४० रुपयांवर पोहचला आहे. समाज माध्यामांवरून दुध उत्पादकांना मोबदला मिळालाच पाहिजे अशा भावनेने पाठींबा देणारा सामान्य ग्राहक राजा खिशाला झळ बसू लागल्यावर मात्र फारच महागाई वाढली आहे,अशा गप्पा मारू लागला. महागाई आणि रुपयाची क्रयशक्ती(खरेदी क्षमता) एकमेकांना पूरक आहेत. ते कसे? आपण एका उदाहरणातून समजून घेऊ या. ऑगस्ट २००९ मधे २० रुपये प्रति लिटरने मिळणारे दुध ऑगस्ट २०१४ मधे ३० रुपयांच्या जवळपास मिळत होते तेच आज आपण ४० रुपये प्रति लिटर प्रमाणे विकत घेत आहोत.

२००९ साली चलनात असलेल्या १०० रुपयांच्या नोटेचे मूल्य आज २०१८ मधे देखील १०० रुपये एवढेच आहे. परंतु २००९ साली तुम्हाला १०० रुपयात ५ लिटर दुध मिळत होते तर आज त्याच १०० रुपयात फक्त २.५ लिटर दुध मिळू शकते. जरी १०० रुपयांचे मूल्य तेवढेच असले तरी त्याची खरेदी क्षमता म्हणजेच क्रयशक्ती कमी झाली आहे, हे स्पष्टपणे निदर्शनास येते.

महागाईचे मोजमाप ढोबळपणे मागणी आणि पुरवठा या दोन निकषांवर होत असते. 

१) एखाद्या विशिष्ट वस्तूची मागणी वाढणे.

उदा. सध्या दुचाकी व चार चाकी गाड्यांच्या विक्रीचा आलेख प्रत्येक तिमाहीत वरच्या दिशेने प्रवास करतो आहे. परिणामी गेल्याच आठवड्यात सर्व प्रमुख उत्पादकांनी त्यांच्या उत्पादनांच्या किमतीत वाढ केली आहे. याचाच अर्थ बाजारात पैसा खर्च करणारे मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे वाढती मागणी आहे परंतु पुरवठा कमी पडतोय.

२) मागणीपेक्षा पुरवठा कमी असणे.

उदा.जुलै २०१७ पासून लागू झालेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीमुळे व्यावसायिकांकडून कर सल्लागारांची वाढती मागणी आहे.परंतु सेवा देण्यास पुरेसे कर सल्लागार नसल्यामुळे त्यांच्या सेवा शुल्कात वाढ झाली आहे.

यासोबत अर्थव्यवस्थेतील इतर घटक महागाई निर्देशांक ठरविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. जसे खनिज तेलाचे भाव, देशावरील कर्ज, आयात-निर्यातीतील तफावत इत्यादी. सामान्य माणसाच्या आर्थिक ताळेबंदावर घाऊक महागाई निर्देशांक व ग्राहक(किरकोळ) महागाई निर्देशांक हे घटक अधिक परिणाम करत असतात. आर्थिक सांख्यिकी विभागाच्या अहवालानुसार गेल्या २१ वर्षांचा घाऊक महागाई दर ६.०७% असा राहिला आहे. या कालावधीत १०० रुपयांची क्रयशक्ती एका विशिष्ट आर्थिक सूत्रानुसार २९ रुपये एवढी येते. याचाच अर्थ २१ वर्षांपूर्वी २९ रुपयांना मिळणाऱ्या वस्तूची किंमत आज १०० रुपये झाली आहे. घाऊक महागाई दरापेक्षा ग्राहक अथवा किरकोळ महागाई दर किमान २% जास्त असतो.

आता तुम्ही अर्थव्यवस्थेत नेमकी कुठली भूमिका बजावताय, ते बघू या.

  1. कर्जदार – जर तुम्ही घेतलेल्या कर्जाचा व्याजदर महागाई दरापेक्षा कमी असेल तर तुम्ही स्वतःला नशिबवान समजले पाहिजे. परंतु हे दिवास्वप्न असेल. कारण महागाई दरापेक्षा कर्जाचे व्याजदर कधीही कमी नसतात.

  2. पगार घेणारा वर्ग – यांच्या पगाराच्या रकमेत कुठलाही बदल होत नसला तरी हातात येणाऱ्या मिळकतीची क्रयशक्ती कमी झालेली असते.

  3. बचतकर्ते – यांनी बचत केलेली रक्कम ४% वार्षिक परतावा देणाऱ्या बचत खात्यात अथवा ७.५% व्याज देणाऱ्या मुदत ठेवीत किंवा ८% खात्रीशीर परतावा देणाऱ्या विमा योजनेत गुंतविलेले असतात. यांच्या मुद्दलाची परतावा प्राप्तीनंतर क्रयशक्ती कमी झालेली असते.

आता महागाईचे काही सकारात्मक परिणाम बघू या.

  1. वस्तू व सेवा वापरकर्त्यांच्या वाढत्या सहभागामुळे देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न(GDP) वाढण्यास मदत होत असते.

  2. महागाई दरातील संतुलीत वाढ अर्थव्यवस्थेची समृद्धीकडे वाटचाल दर्शविते.

  3. अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ फिलिप्स यांच्या प्रमेयानुसार वाढती संतुलीत महागाई बेरोजगारी कमी करत असते.

त्यामुळे महागाईचे “घाव” बेताचे उत्पन्न असणाऱ्या वर्गाला मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. त्यांची दैनंदिन गरजा भागविण्याची तारेवरची कसरत महागाईमुळे आणखीनच बिकट होते. कारण महागाई दराच्या प्रमाणात त्यांच्या बचतीवर परतावा मिळत नाही. मग सर्व बचत मुलभूत गरजा व जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात संपते.

म्हणूनच वाढत्या महागाईचे “घाव” झेलून तुमच्या “मनी”ला भाव मिळवून देण्यासाठी बचतीचे रुपांतर गुंतवणूकीत केले पाहिजे. गुंतवणूक करतांना अति धाडस न करता १०० वजा तुमचे वय एवढी रक्कम तुम्ही समभाग किंवा समभाग सलंग्न योजनांमधे गुंतविली पाहिजे. कारण अशा गुंतवणूका दीर्घ मुदतीत चक्रवाढ पद्धतीने तुमची गुंतवणूक समृद्ध करत असतात. तर स्थिर उत्पन्न देणाऱ्या योजना निवडतांना करपश्चात अधिकचा परतावा कसा मिळेल? याकडे लक्ष असू दया.

अतुल कोतकर

(लेखक आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

(चित्र सौजन्य- https://bit.ly/2xQngax )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.