Reading Time: 4 minutes

महागाईच एवढी झालीय की कितीही पैसा असला तरी पुरवठा येत नाही, असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे आपल्या निष्क्रीयतेवर पांघरून घालण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जर बचत करत राहिलात तरच ती वाढेल त्यातून थोडी जोखीम स्वीकारून गुंतवणूक करता येईल. एकदा ही सवय अंगात भिनली की ती आपल्या वर्तणुकीचा एक भाग बनेल. प्रत्येक खर्च अनावश्यक की आवश्यक याचा विचार केला जाईल, तरीही तूट येत असल्यास उत्पन्नाचे मार्ग शोधाता येतील. अंथरूण पाहून पाय पसरावे त्या ऐवजी अंथरूण वाढवता येईल. 

नोकरी किंवा व्यवसायाची जबरदस्त सुरुवात काही मोजक्याच लोकांना प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने पैसे मिळवणे ही खर्चाच्या तुलनेत समस्या नसतेचं, अशा मोजक्या व्यक्ती सोडल्या तर अनेकांना अगदी कमी रकमेवर सुरुवात करावी लागते मग त्यात अनुभव आणि कौशल्य यामुळे हळूहळू वाढ होत राहते. या काळात काही सवयी लावून घेतल्या तर त्या संपत्तीची वृद्धी आणि जपणूक नक्की करता येईल.

★आपल्या गरजा ओळखा – आपल्याला अनेक गोष्टी हव्या आहेत त्यातील अत्यावश्यक गोष्टी कोणत्या त्याचा प्राधान्यक्रम काय असावा याची सुरुवातीपासूनच सवय लावून घ्यावी. त्या सर्वात आधी सिर सलामत तो पगडी पचास ही जाणीव ठेवून सर्वात गरजेचा पुरेसा टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल इन्शुरन्स काढून घ्यावा. दरवर्षी त्याचा हप्ता भरता येईल असे रिकरिंग डिपॉझिट काढावे त्याची मॅच्युरिटी म्हणजे याचा हप्ता भरण्याचा काळ अशी योजना करावी म्हणजे या महत्त्वाच्या गोष्टींचा हप्ता चुकूनही विसरला जात नाही. याला कोणताही पर्याय माही. 

★आधी बचत मग खर्च- उत्पन्नातून खर्च केल्यास जी काही शिल्लख राहील ती बचत, हे सूत्र बदलून उत्पन्नातून प्रथम बचत करून शिल्लख रक्कम खर्च करा. आजकाल अनेकांना मिळालेले पैसे घरात देण्याची आवश्यकता नसल्याने अनावश्यक खर्च केले जातात हे टाळण्यासाठी आपल्याकडे आवश्यक पैसे राहतील तेवढेच ठेऊन अधिकाधिक रक्कम बाजूला कशी राहील आणि तुमचा तोच प्राधान्यक्रम कसा राहील ते पहा.

★बचतीतून भांडवल निर्मितीसाठी योग्य योजना निवडा- तुमच्याकडे नोकरी व्यवसाय आहे म्हटल्यावर अनेकजण बचतीचे अनेक मार्ग  सुचवतील त्यात त्यांचे सुप्त हेतू अथवा किंवा अज्ञान गैरसमज असू शकतं भविष्याचा विचार करताना –

*जर आपला पी एफ जात असेल तर त्यात स्वतःची वर्गमी वाढवा यावर सर्वाधिक दराने व्याज मिळते आणि ही रक्कम सहजासहजी काढता येत नाही.

*पीपीएफमध्ये पैसे टाका. या खात्यात ते चालू ठेवण्यासाठी ₹500/- इतकीच अल्प रक्कम टाकावी लागते. वर्षभरात जास्तीतजास्त या खात्यात दीड लाख रुपये भरता येतात. महिन्याच्या पाच तारखेपूर्वी रक्कम टाकल्यास पूर्ण महिन्याचे व्याज मिळते. भविष्यात या खात्यातून कोणत्याही कारणास्तव काही पैसे काढता येत असल्याने पैशांचे स्मार्ट नियोजन करता येते.

*एनपीएस खाते काढा ते चालू ठेवण्यासाठी वर्षभरात केवळ ₹ 1000/- भरावे लागतात. यावर कोणतीही उच्चतम मर्यादा नसल्याने मोठी भांडवल निर्मिती होऊ शकते. आयुष्यात पाच वर्षाच्या अंतराने योग्य कारणांसाठी तीन वेळा पैसे काढता येतात.

★म्युच्युअल फंड एसआयपी: म्युच्युअल फंडात ₹ 500 पासून (आता काही फंडानी कोणत्याही रकमेच्या) एसआयपीची सुरुवात करा. फंड योजना निवडताना फेक्झिकॅप फंड योजनांचा विचार करून त्यात ग्रोथ ऑप्शन निवडा.

★डीमॅट आणि ट्रेंडिंग खाते उघडा: किमान ब्रोकरेज एसेट होल्डिंग फीअसलेले खाते उघडून त्यात जमेल तशी रक्कम गुंतवत जावी चांगल्या कंपन्यांचा एक एक शेअर घेत जा. चांगली कंपनी निवडताना इंडेक्सला वरची दिशा देणारे, म्युच्युअल फंडाच्या खरेदी यादीत असणारे, विदेशी फंड खरेदी करीत असलेले किंवा एखाद्या सेक्टरमध्ये भविष्यात वाढ होण्याची शक्यता असलेले शेअर्सच घेणे असे निकष लावता येतील. रिटस, इनवीट या आधुनिक पर्यायांचा विचार करता येईल. थेट सोने खरेदी करण्यापेक्षा  सुवर्ण सार्वभौम रोखे खरेदी करा.

★संधीचा फायदा घ्या : आपल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित दराने नफा मिळत असल्यास त्याचा लाभ घ्या. आभासी नफा तोट्याच्या भ्रमात राहू नका. 

★कर भरणा योग्य वेळी करा आणि निश्चित्त राहा.

यासंबंधी तज्ञांनी सांगितलेले काही नियम

■तीसचा नियम-विचार करण्यासाठी कोणतीही खरेदी तत्परतेने न करता तीस दिवसांनी करा.

■वीस पन्नास तीसचा नियम: 20% बचत 50% अत्यावश्यक गरजा,  30% इच्छा याप्रमाणे खर्च विभागणी.

■चाळीस तीस वीस दहाचा नियम: 40% बचत 30% आवश्यक गरज 20% प्रवास मौजमजा, 10 %देणगी याप्रमाणे खर्चाची विभागणी

■सत्तर वीस दहाचा नियम; 70% गरजा 20% बचत 10% दानधर्म याप्रमाणे विभागणी.

■सत्तर दहा दहा दहाचा नियम : 70% नियमित खर्च 10% दीर्घकालीन गुंतवणूक 10% अल्पकालीन गुंतवणूक 10% देणगी याप्रमाणे विभागणी.

      

आपले उत्पन्न, गरजा, जबाबदाऱ्या यांची सांगड यातील नियमांशी घालता येईल किंवा जरुरीप्रमाणे वेगळी विभागणीही करता येईल.

याशिवाय-

★खर्चाची नोंद ठेवून वेळोवेळी आढावा घ्या, आवश्यक ती दुरुस्ती करा.

★आपली नियमित देणी वेळेत देण्यासाठी मोबाईल मध्ये रिमाईंडर लावा अशी देणी योग्य वेळेत दिली गेल्याने त्यावर दंड भरावा लागत नाही. आवश्यक तेथे आपल्या बँकेस स्टँडिंग इन्स्ट्रक्शन देऊन ठेवा. अनावश्यक अटो रिन्यूअल वेळीच काढून टाका.

★कर्ज काढून बचत करणे टाळा यात कोणतेही कौशल्य नसून त्यातून कोणताही  हेतू साध्य होत नाही. आर्थिक मागासलेपणाचे हे लक्षण असून जास्त व्याजदाराचे कर्ज लवकरच फेडण्याचा प्रयत्न करा.

★मॉल सुपरमार्केट यातील खरेदी टाळा यामुळे अनेकदा अनावश्यक गोष्टी खरेदी केल्या जाऊन खर्च वाढतो. एकत्रित सामुदायिक खरेदी जेथून होते तेथून वस्तू खरेदी करण्यास भर द्या. नियमित औषधे विशेष सवलत मिळणाऱ्या दुकानातून किंवा जेनेरिक दुकानातून खरेदी करा अत्यावश्यक आरोग्य तपासण्या अनेक ट्रस्ट मार्फत माफक दरात केल्या जातात शक्य असल्यास त्यांचा लाभ घ्या. 5 स्टार असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, डीमर, एलईडी यांचा वीज बचतीसाठी वापर करा.

★वेगवेगळ्या कारणाने अनेक बँक खाती आवश्यक नसतात ती कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करा जर आवश्यक असेल तर खर्चाची विभागणी करून नियमित खर्च कुठून करायचा आणि आकस्मित खर्च कुठून करायचा ते ठरवून घ्या.

★आपल्या निवृत्तीचा आधीच विचार करून त्यासाठी तरतूद करा ही तरतूद मासिक उत्पन्नाच्या 10% राहून प्रतिवर्षी त्यात वाढ करण्याचा प्रयत्न करीत राहा. होता होईतो हे पैसे अन्य कोणत्याही कारणासाठी वापरू नका.

★स्वतःवर गुंतवणूक करा- आपले व्यक्तिमत्त्व, कामाचे स्वरूप, नोकरी व्यवसायातील कौशल्य यात भर घालणारे शिक्षण घ्या यात केलेली गुंतवणूक तुनच्या उत्पन्नात वाढ करून देईल.

★आपल्या ऐपतीच्या एक पाऊल कमी खर्च करण्याचा प्रयत्न करा खोटी प्रतिष्ठा दाखवून आपण कर्जबाजारी कधी होऊ ते समजणार नाही. पत वाढवण्याचे मार्ग शोधा. क्रेडिट कार्ड हे कर्ज आहे त्याचा सुयोग्य वापर करा. काहीतरी सवलत आहे म्हणून अनावश्यक खरेदी करू नका.

★आकस्मित काही रक्कम मिळाल्यास ती पूर्णपणे खर्च न करता त्यातील काही भाग बाजूला ठेवा.

★योग्य व्यावसायिक आर्थिक सल्लागार निवडा त्यासाठी काही रक्कम मोजण्याची तयारी ठेवा. आर्थिक सल्ला ही फुकट मिळणार नाही याची जाणीव ठेवा.

         

ही यादी अंतिम नाही त्यात काही वगळता/ वाढवता येऊ शकते, शुभेच्छांसह नियमितपणे आपल्या प्रगतीचा आढावा घ्या आत्मचिंतन करा.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे पदाधिकारी असून लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…