Reading Time: 3 minutes

आपल्याला मिळत असलेल्या उत्पन्नाचे आपल्या गरजा, इच्छा, जबाबदाऱ्या ओळखून योग्य असे नियोजन करणे ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची बाब आहे.  हे एक असे महत्वाचे कार्य आहे जे आपले  आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यात, भविष्य सुरक्षित करण्यात आणि आपले एकूण आर्थिक कल्याण राखण्यात मदत करते.  तथापि, बर्‍याच व्यक्ती आर्थिक नियोजनाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष करतात.  आर्थिक सल्लागार त्यांचे आर्थिक नियोजन अधिक चांगल्या प्रकार करू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कशीही असली प्रत्येकासाठी नियोजन करणे हे महत्त्वाचे पाऊल आहे.

जसा डॉक्टर हा आरोग्यविषयक समस्यांचे निदान आणि उपचार करण्यात तज्ञ असतो, वकील आपल्याला योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन करतो तसाच वित्त नियोजक किंवा आर्थिक सल्लागार हा आपल्या वैयक्तिक आणि वंशपरंपरागत मालमत्तेचे व्यवस्थापन करून आपल्या अनुकूल करण्यात तज्ञ असतो. आर्थिक सल्लागार तुम्हाला अनेक मार्गांनी मदत करू शकतो, मग तुम्ही –

●पगारदार कर्मचारी असाल

●व्यवसाय मालक किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारे असाल

आर्थिक सल्लागाराची आपल्याला कशी मदत होऊ शकेल ते या दोन शक्यतांवर एक नजर टाकून पाहूयात.

★पगारदार कर्मचारी: पगारदार कर्मचारी म्हणून, तुमचे उत्पन्न स्थिर असू शकते, परंतु पुरेसा खर्च करून आणि त्याचबरोबर स्वतःच्या भविष्याची तरतूद करणे आव्हानात्मक असू शकते. एक आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमचे अंदाजपत्रक तयार करण्यात, सेवानिवृत्तीची  योजना बनवण्यात आणि तुमची गुंतवणूक व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतो.

★व्यवसाय मालक किंवा स्वतंत्रपणे आपल्या मर्जीनुसार करणाऱ्या व्यक्ती: व्यवसाय मालक म्हणून, तुमचे उत्पन्न अनियमित असू शकते. अशा वेळी आपला रोखता प्रवाह व्यवस्थापित करणे आव्हानात्मक असू शकते. एक आर्थिक अल्लागार तुम्हाला तुमचे वित्त व्यवस्थापित करण्यात, कर कमी करण्यात आणि तुमच्या व्यवसायाच्या भविष्यासाठी योजना बनवण्यात मदत करू शकतो. जर आपण स्वतंत्रपणे मर्जीनुसार व्यवसाय करणारे असाल तर तुमच्या उत्पन्नात खूप फरक असू शकतो अशा परिस्थितीत तुमचे वित्त व्यवस्थापित करणे आव्हानात्मक असू शकते.  अशावेळी एक आर्थिक सल्लागार  तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार अंदाजपत्रक तयार करण्यात, कर सवलती मिळवण्यात आणि सेवानिवृत्तीसाठी योजना करण्यात मदत करू शकतो.

वित्तीय नियोजन हे केवळ श्रीमंत किंवा निवृत्तीच्या जवळ आलेल्या लोकांसाठी आहे अशी एक समजूत आहे. खरं तर एक अशी प्रक्रिया आहे जी जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर, खरंतर जितक्या लवकर करण्यास सुरुवात करू अशा कोणालाही अधिक फायदेशीर ठरू शकते.  उदाहरणार्थ, एका तरुण व्यावसायिकाचा विचार करूयात.  ज्याने त्यांची कारकीर्द नुकतीच सुरू केली आहे. त्यांच्याकडे लक्षणीय मालमत्ता नसू शकते, परंतु एक आर्थिक सल्लागार त्याला उपलब्ध साधनसामुग्रीत अंदाजपत्रक तयार करण्यात, आर्थिक उद्दिष्टे निश्चित  करण्यात आणि त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यास मदत करू शकतो. जेव्हा हा उद्योजक त्यांच्या व्यवसायात प्रगती करेल तेव्हा त्याचा आर्थिक सल्लागार अधिक मालमत्ता जमा करण्यात, त्त्यातून मिळणारा परतावा वाढवण्यासाठी आणि त्याची करदेयता कमी करण्यासाठी आवश्यक असे गुंतवणूक धोरण विकसित करण्यात मदत करू शकेल.

     आपल्याला आपल्या आयुष्यात आर्थिक सल्लागाराची गरज असण्याची काही कारणे अशी-

●आर्थिक उद्दिष्टे निश्चित करणे: एक आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजना ओळखण्यात आणि विकसित करण्यात मदत करू शकतो.  यामध्ये सेवानिवृत्तीसाठी बचत, कर्ज फेडणे किंवा घराच्या डाउन पेमेंटसाठी रक्कम जमा करणे यांचा समावेश असू शकतो.

●बजेट तयार करणे: एक आर्थिक सल्लागार तुम्हाला आणि तुमच्या जीवनशैलीसाठी उपयुक्त असे बजेट तयार करण्यात मदत करू शकतो.  तो तुम्हाला पैसे वाचविण्यात, कर्ज कमी करण्यात आणि तुमच्या अर्थाप्रमाणे अपेक्षित जगण्यात मदत करू शकतो.

●गुंतवणुकीचे व्यवस्थापन: एक आर्थिक सल्लागार तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करू शकतो, मग ते स्टॉक, म्युच्युअल फंड असो किंवा  इतर आर्थिक साधनांमध्ये.

●कर कमी करणे: एक आर्थिक सल्लागार कर-कार्यक्षम गुंतवणूक सुचवून आणि कर-बचत संधींचा लाभ घेऊन तुमचे कर दायित्व कमी करण्यात मदत करू शकतो.

●जोखीम व्यवस्थापित करणे: एक आर्थिक सल्लागार योग्य विमा पॉलिसींची शिफारस करून अनपेक्षित खर्च, अपंगत्व किंवा मृत्यू यासारख्या जोखीमींचे  व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतो.

      अनेक गोष्टी आपणास फुकटात आणि झटपट मिळवण्याची सवय लागली आहे. कोणीही उठावे आणि त्याच्या मर्जीनुसार स्वतःला मी आर्थिक सल्लागार म्हणून घोषित घोषित करावे असे होत नाही. अशा अनधिकृत सल्लागारांना रोखणारी ठोस यंत्रणा नसल्याच्या गैरफायदा सध्या अनेक जणांकडून घेतला जात आहे. गुंतवणूक सल्लागार होण्यासाठी सेबीने काही पात्रता निकष ठरवले असून यातून  आर्थिक नियोजनासंबंधीत उच्च व्यावसायिक शिक्षक घेतलेल्या व्यक्ती ज्यांना  वित्त नियोजक/ आर्थिक सल्लागार म्हणून थेट काम करता येते त्यांना वगळून इतर सर्वांना NISM द्वारे घेतल्या जाणाऱ्या Investment Advicer Part 1 and 2 हे अभ्यासक्रम पूर्ण  करणे कायद्यानुसार किमान आवश्यक आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता पदवीधर असून ही पदवी कॉमर्सची असण्याची सक्ती नसली तरी अशी पदवी आणि इतर अनुभव असेल उपयोग होऊ शकतो. अभ्यासक्रमात गुंतवणूक सल्ला कसा द्यावा, त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा, कररचना, कर मोजण्याची पद्धत, कमी करण्याचे उपाय, निवृत्ती नियोजन, विविध गुंतवणूक प्रकार, गुंतवणूकीतील जोखीम, जोखीम व्यवस्थापन यासारख्या अनेक उपयुक्त गोष्टींचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी व्यक्ती नोंदणी करून काही दिवस एखाद्या आर्थिक सल्लागाराकडे उमेदवारी करून अनुभव मिळवून स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकते. स्वतंत्र व्यवसाय करताना सेबीने आवश्यक केलेल्या सर्व नियम आणि अटींची पूर्तता करावी लागते. व्यवसाय करत असताना त्यातून होणाऱ्या व्यावसायिक ओळखीतून काही ग्राहकांनी केलेल्या शिफारशींतून आपल्या व्यवसायात जम बसवू शकते.

       एक आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य गुंतवणूक पर्यायांबद्दल सल्ला देऊन, तुमचा गुंतवणूक संच संतुलित करण्यास आणि बाजारातील चढ उताराच्या कलाचे निरीक्षण करून तुमची ती किफायतशीर बनण्यास मदत करू शकतो.  यातून तुमचा गुंतवणूक परतावा वाढतो आणि त्यात असलेली जोखीम कमी होण्यास मदत होऊ शकते.  त्यामुळे, जास्त वाट पाहू नका आणि आजच तुमच्या आर्थिक भविष्याची योजना सुरू करा. त्यासाठी फी आकारून सल्ला देणाऱ्या आणि कोणतीही एजन्सी नसलेल्या कारण यामुळे स्वतंत्र सल्ला देण्यावर मर्यादा येतात, नोंदणीकृत सल्लागाराची निवड करा.

उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून महारेराच्या सलोखा मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…