Reading Time: 5 minutes

शेअरबाजार : आलिया संधीसी………!!!

                      

त्या  छोट्याश्या  गावांतील  टुमदार  चर्चमध्ये  ‘फादर’ म्हणुन  नुकताच  रुजु  झालेला  राजबिंड्या  व्यक्तीमत्वाचा ‘तो’  वयाने  तसा  तरुणच  होता.. दोन तीन  रविवार  गेले  असतील  नसतील…प्रार्थनेसाठी  नियमाने  येणा-या  एका शालीन, सुस्वरुप, लाघवी  तरुणीने  त्याचे  लक्ष वेधुन घेतले होते.. का कोण जाणे, तिला  एकदा तरी भेटावे  अशी तीव्र  ईच्छा  त्याला  होवु  लागली  होती.  एखादवेळी  त्याने  तसा  प्रयत्न  करुनही पाहिला, पण  प्रार्थनेच्या  अगदी वेळेवर  चर्चमध्ये  येणारी ‘ती’  नंतर  मात्र  लगेचच  निघुन जाई.. ती चर्चची सभासद नसुन  कोणाकडेतरी  काहीशा कारणाने  थोड्याच  दिवसाकरीता  आली आहे  हे ही  त्याला  कळले  होते.

तो  आठवड्यांतील  एक  शांत  दिवस  होता, काही  महत्वाच्या  कामासाठी  शेजारील  शहरांत  जाणे  आवश्यक असल्याने  फादर’ चर्च  बाहेरच  बसची  पाट  पहात  उभे होते.. अकस्मात ‘ती’ प्रकटली, तशीच, नेहमीसारखी सुंदर, सुहास्यवदना, प्रसन्न…..तीलाही  कोठेतरी  जायचे  होते  बहुधा….दोघांनीही  एकमेकांकडे  पाहुन स्मितहास्य केले.

थोडा  वेळ  गेला  आणि  अचानक  पाउसाची  रिमझिम सुरु  झाली, तिने  चटकन  आपल्याजवळची  छत्री उघडली, फादर  मात्र  छत्रीविनाच  आले  होते…काही क्षण तसेच गेले,  त्या तरुणीशी  जवळीक, संवाद साधण्याची  ही  संधी… साधावी  की  नाही अशी घालमेल  तारुण्य सुलभ भावना  आणि  ‘fatherhood’  यांत  चालु  झाली  होती., तिच्या जवळ असलेल्या   छत्रीचा  फायदा  घेवुन, थोडे  जवळ  सरकुन  तिच्याशी  काही  बोलणार  तो  तीनेच आपल्या  स्नेहार्द आवाजात  विचारले ” Father.. DO you remember  the first part  of Ephesians 5:16??”.. फादर गडबडले…त्यांना वेळेवर  काही  आठवेना,  मात्र  आपली  अशी  सलगी  न  आवडल्यानेच  तीने  आपल्याला हे ‘संतवचन’ विचारले असावे  अशी  खात्री  होवुन  ते तात्काळ  भानावर आले अणि वेगाने मागे सरकले…. नेमकी  पुढच्याच काही  क्षणांतच  ‘तीला’ हवी असलेली बस आली..अणि ‘ती’ निघुनही  गेली..

या अनपेक्षित प्रसंगाने अस्वस्थ झालेले फादर आपला मुळ बेत बदलुन  बसस्टॉपवरुन  परत  चर्च  मध्ये  आले  ते केवळ त्या वचनाचा अर्थ पहाण्याकरिता…ताबडतोबीने  त्यांनी New Testament चे  पुस्तक  काढ्ले आणि  त्यांना ‘ती’च्या  प्रश्नाचे उत्तर मिळाले-

 

Ephesians 5:16 –  make the most of every opportunity..!!!

……दुर्दैवाने आता त्यांना फक्त तिच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच मिळणार होते, ती नव्हे…..  यानंतर फादरना ‘ती’ परत कधीही दिसली नाही.

आपलेही  असेच होते,  अनेकदा बाजार आकर्षक  असतो,  एवढेच नव्हे तर  आपल्याला खुणावत असतो,  सुचवत असतो…  मात्र  त्याच्याशी  जवळीक साधण्याच्या एकापेक्षा एक सुंदर संधी आपल्या  मनांतील  व्दिधा, शंका कुशंका, व आत्मविश्वासाच्या अभावामुळे  तशाच सुटुन जातात……-

अलिकडेच माझे परिचित व हितचिंतक जेष्ठ गुंतवणुकदार श्री.पटवर्धन काका एका  व्याख्यानात  भेटले  ( त्यांच्या ‘अहम ब्रह्माSस्मि’  बाण्यामुळे मी त्यांना माझे क्लायंट म्हणणे मात्र  टाळतो).  विद्वान, अभ्यासु माणुस… मी  बाजाराबद्दल, त्यांच्या पोर्टफोलियोबद्दल विचारले तेंव्हा ” २२००० वरुन एकदम २७०००?? काय चाललय काय ??

 सध्या चोरांच्या हातात आहे बाजार,…. विनाकारण  फुगवुन ठेवलाय ,…पण टिकणार नाही…. एकदा  25,000 आल्याशिवाय (चालु भाव 27,000 जवळ) मी खरेदीचा विचार सुद्धा करणार नाहीये, आणि  या उपर  ज्यांना (म्हणजे बहुधा अस्मादिकांना) घाई आहे ना…. त्यांनी घ्या… विकत घ्या, आणि बसा नंतर हरि हरी म्हणत” असे दुर्दम्य आत्मविश्वासचे उद्गार काढले. श्री. काका हे C.A असुन अलिकडेच बहुराष्ट्रीय कंपनीतुन वरिष्ठ व्यवस्थापक पदावरुन सेवानिवृत्त्त झाले आहेत. त्यांनीच ठरविलेल्या 10/12 निवडक कंपन्यांच्या बॅलन्स-शीट मधील काही आकडेवारी व गुणोत्तरांचा  सखोल अभ्यास करुन  ते  आपल्या बाजारांतील  निर्देशांकाची ‘खरी व योग्य’   पातळी  ठरवितात. दुर्दैवाने  त्यांनी खुप अभ्यास करुन ठरविलेली ही पातळी बाजारात ती क्वचितच पहायला मिळते. मजेचा भाग म्हणजे गेल्या दिवाळीत जेंव्हा बाजार 20,000 या श्री. काकांच्या आत्ताच्या अपेक्षित पातळी जवळ होता …काकांची बाजार ‘मॅन्युप्लेटेड’ आहे हीच भुमिका होती.

सांगावयाचे हेच ,  की  काही  प्रश्नांबाबत अधिक किंवा  अतिविचार म्हणजे जास्त अचुक उत्तराची खात्री…असे नसते, बाजाराची भविष्यातली दिशा कोणती?? हा याच पठडीतला एक प्रश्न आहे ज्याचे खरे उत्तर कोणासही ठावुक नसते. प्रख्यात गुंतवणुक गुरु जे. पी मॉर्गन यांना ‘पुढे बाजार काय करेल असे वाटते?’ हा प्रश्न विचारण्यात आला, तेंव्हा ते म्हणाले, “It will fluctuate.” ….. बाजाराचा असा बेभरवशी  स्वभाव आणि क्षणाक्षणाला बदलणारे त्याचे रुप पाहुन नवख्या गुंतवणुकदारास तो सार्वजनिक ठिकाणी  पडलेल्या एखाद्या बेवारशी बॅगेसारखा संशयास्पद आणि धोकादायक वाटु लागतो. ‘काय करावे, गुंतवणुकीसाठी थोडे थांबावे की सुरवात करावी??’ हा प्रश्न बहुतेक सर्व नवगुंतवणुकदारांच्या ‘अजेंड्यावर’ असतो. .

तरुण वयांतच देशांतील नामांकित सॉफ्ट्वेअर कंपनीत आपल्या कर्तबगारीने उच्चपदावर कार्यरत असलेला  सौरभ ह्याच द्विधेमुळे गोंधळुन गेला होता. माझे एक जुने क्लायंट असलेल्या त्याच्या वडिलांबरोबर तो माझ्या  ऑफिसमध्ये आला होता. “तुला आत्ता मिळणारा पगार नजिकच्या काळांत कधीकाळी कमी होईल असे वाटते का??”- मी विचारले. त्याने थेट उत्तर टाळले, पण त्याचा देहबोलीवरुन हा प्रश्न त्याला बहुधा वेडगळपणाचा वाटला हे स्पष्ट होते. मी साहेबांकडे वळलो- “साहेब, आपण दोन वर्षापुर्वी बंगला घेताना पुढे 05 वर्षानी घेऊ असा विचार का नाही केलात??” मी विचारले  ” प्रसाद, बाबा तेंव्हा झाले ते झाले, आता नाही हो जमणार…आजच 20 लाख जास्त मिळतील मला… अरे सिमेट, लोखंड, वाळु,, सगळे भाव वाढलेत  की रे.”-साहेब. नेमक्या याच उत्तराची वाट पहात असलेल्या मी पुढे विचारले .”मला सांग सौरभ,  जर तुझा पगार, तुमचा बंगला यांच्या किंमती कमी होणार नाहीत याची तुम्हाला खात्री असते,  त्याची कारणेही तुम्हाला ठावुक असतात.. मग शेअर बाजारानेच काय घोडे मारले आहे?? शेवटी तुझी कपंनी काय किंवा सिमेट, लोखंड उत्पादकांसारख्या कंपन्या,  ह्यानीच तर ठरतो की नाही बाजाराचा कल आणि ‘ईंडेक्स’?? ” ….आणि  पुढे “त्यातुनही तुला गुंतवणुकीसाठी अधिक ‘सेफ’  काळ शोधावयाचा असेल तर मग “OCTOBER: This is one of the peculiarly dangerous months to speculate in stocks  in. The other are July, January, September, April, November, May, March, June, December, August, and February.” हे श्री. मार्क ट्वेन यांचे सुप्रसिद्ध वचन ऐकवले. थोड्या्च वेळांत मला  एक नवीन उमदा क्लायंट मिळाला हे सांगावयास नकोच.

खरे तर निर्देशांकाची ताजी पातळी ही केवळ एक सापेक्ष कल्पना आहे, त्याच्या प्रवासाचा शेवट नव्हे, आणि वर उल्लेखिल्या प्रमाणे जोपर्यंत निर्देशांकातील समाविष्ट कंपन्या आपली नफा मिळविण्याची क्षमता राखुन आहेत, तो पर्यंत कोणीही बाजाराच्या दीर्घकालीन भविष्याची चिंता का करावी??’ The best time to plant a tree was 20 years ago. The second best time is now.’अशी एक चिनी म्हण आहे, बाजारातील दीर्घकालीन गुंतवणुक केव्हा करावी ?? या प्रश्नाचेही हे समर्पक उत्तर आहे.

बाजारातील संभाव्य घसरणीचा(correction) फायदा उठविण्यासाठी आपली नियोजित गुंतवणुक पुढे ढकलण्याचा मोह बहुतेक गुंतवणुकदारांस होतो खरा, पण गुंतवणुकशास्त्र गुरु पीटर लिन्च यांचे “Far more money has been lost by investors preparing for corrections or trying to anticipate corrections than in corrections themselves” हे वाक्य आपण लक्षांत ठेवावयास हवे. पानिपताच्या लढ्यांत महमद्शहा अब्दालीने दुथडी भरुन वहाणारी यमुना प्रवाहाला उतार पडण्याची वाट न पहाता ओलांडली, या उलट आपण मराठे मात्र यमुनचे पात्र  ओलांडायची योग्य वेळ शोधत राहिलो, . पानिपतच्या पराभवाचे हे एक प्रमुख कारण सांगण्यात येते,  हे आपण विसरु नये.

बाजार आहे म्हणजे त्यात चढ उतार हे अपरिहार्य आहेत, मात्र त्यावर मात करुन अचुक वेळ पकडण्याच्या ईर्षेपोटी आकडेवारी, विश्लेषणे, मते मतांतरे यांच्या गदारोळात हरवुन जाण्यापेक्षा दीर्घकालीन लाभ पदरात पाडुन घ्यावयाचा असेल, तर आपापल्या क्षेत्रातील अग्रगण्य अशा, निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करणा-या किंवा एकुणांत ‘ब्ल्यु चीप’ म्हणुन समजल्या जाणा-या कपन्यांमधे नियमितपणे गुंतवणुकीस सुरवात करण्यास  कोणत्याही मुहुर्ताची आवश्यकता  नसते. बाकी  या ‘इन्स्टंट’ युगात सा-या ठिकाणी ‘आत्ता..लगेच..ताबडतोब’ हा खाक्या असणारे आपण, अशा महत्वाच्या मुद्द्यावर मात्र ‘आज करे सो कल  कर..कल करे सो परसो, इतनी जल्दी क्या है भाई…जीना है सो बरसो’  असा बाणा का बाळगतो हे मात्र समजत नाही.

शेवटी कोठेतरी वाचलेला एक किस्सा – गावातील एका होतकरु तरुणाचे गावच्या पाटीलाच्या मुलीवर प्रेम असते. बरेच दिवस झाल्यानंतर या प्रकरणाबाबत पाटीलांना सांगण्याशिवाय ईलाज नाही अशी वेळ येते. रोज पहाटे पाटील पैलवानी करुन ताजे दुघ पिण्यासाठी त्यांच्या शेतावरील गोठ्यावर जातात हा रिवाज माहिती असल्याने हा तरुण त्यांना भल्या पहाटे गोठ्यावर गाठुन घाबरत चाचरत विषय काढतो. पाटील ह्या ‘पाप्याच्या पितराला’ आपादमस्तक न्याहाळतात, मात्र सुदैवाने कोणतीही शारिरिक कसरत न करता ते शांतपणे या तरुणाला सांगतात. “पाव्हनं, ह्ये बघा, माझ्या गोकुळात आत्ता 05 वळु आहेत..समोरच्या झाडाखाली तुम्ही उभे र्‍हावा, मी येक येक वळु तुमच्या अंगावर सोडतो, त्यातल्या येका बी वळुची शेपटी तुम्ही पिरगाळुन  दावायची…जमलं तुम्हास्नी, तर पोरगी दिली तुम्हाला..नाय तर मग गुमान चालायला लागायचं, फिरुन कधी बी फिरकायच नाही वाड्याकडं,.हां”… हे  जरबदार बोलणे ऐकुन, ह्या प्रेमवीराच्या पायाखालची जमीनच सरकते, नाक फेंदारुन धावत येणा-या वळुंच्या पायाखाली त्याच्या भावी संसाराच्या सुखस्वप्नांचा चुराडा झालेला त्याला दिसु लागतो. तरीपण होते नव्हते ते बळ एकवटुन तो ही अट मान्य करतो .वधस्तंभाप्रमाणे भासणा-या त्या झाडाकडे जाण्यापुर्वी तो सहजच गोठ्यात नजर टाकतो. एकापेक्षा एक मस्तवाल असे चार वळु त्याला दिसतात, मात्र तेवढ्यातच एक काहीसा अशक्त आणि आजारी असावा असा एक कृश वळुही तो पाहतो. “बस्स, मी निदान या हडकुळयाची शेपटी तरी नक्कीच पिरगाळू शकेन…” तरुण ठरवतो आणि कामगिरीस तयार होतो. पाटील वळु सोडायला सुरवात करतात. त्या उन्मत्त वळुंपासुन स्वतःचा बचाव करताना ह्या तरुणाचे पाण कंठाशी येत असतात, पण तरीही ‘तो’ कमकुवत वळु आठवुन पठठ्या खुशीत असतो. शेवटी 04 वळुंच्या हल्ल्यातुन सहीसलामत वाचल्यानंतर हा वीर तो शेवटचा वळु बाहेर येताना पहातो. तो बाकीच्यां सारखा उधळत नव्हे तर अगदी हळुहळु चालत बाहेर येत असतो. तरुणाला वाटते  ‘सुटलो, झाले आपले काम!!’.. आणि अधीर होवुन तोच या वळुवर शेपटी पकडण्यासाठी झेपावतो…….पण दुर्दैव,… त्या आजारी वळुची शेपटी कसल्याश्या विकाराने पुर्णपणे झडुन गेलेली असते…..

तात्पर्य- हे नवीन गुतवणुकदारांनो, भावी सुखस्वप्नांना वास्तवात आणावयाचे असेल तर सशक्त, उधळलेल्या ‘बुल’ ची शेपटी पिरगाळण्याची, त्याच्यावर काबु मिळविण्याची, हिम्मत बाळगा… आजच, आत्ता..लगेच..ताबडतोब !!! …धन्यवाद.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…