Reading Time: 3 minutes

सध्या शेअरबाजारात व्यवहार होऊ न शकणारे म्हणजेच असुचिबद्ध पण भविष्यात याच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता असलेल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या जाहिराती विविध समाज माध्यमात आपण पाहिल्या असतील. काही कंपन्यांचे शेअर्स बाजार नियमावलीचं पालन करत नाही,असं केल्यानं त्यांच्यावर कारवाईचा भाग म्हणून बाजारातून असुचिबद्ध (डिलिस्ट) केल्याच्या किंवा काही कंपन्यांनी आपले शेअर्स बाजारातून स्वेच्छेनं असुचिबद्ध केल्याच्या तुरळक घटना आपण ऐकल्या असतील. सुचिबद्ध शेअर्सना बऱ्यापैकी तरलता असते, त्यांचे बाजारभाव मागणी-पुरवठा तत्वानुसार कमी अधिक होऊन शेवटी कंपनीची कामगिरी आणि सर्वसाधारण बाजारकल, यावर कुठेतरी स्थिरावतात. शेअरबाजारात व्यवहार केलेल्या शेअर्सच्या व्यवहारपूर्ततेसाठी बाजाराची हमी असते म्हणजे विकलेल्या शेअर्सचे पैसे अथवा खरेदी केलेले शेअर्स निश्चित कालावधीमधे आपल्या डीमॅट खात्यात येतात. काही तांत्रिक अडचणींमुळे व्यवहार पूर्ण न झाल्यास बाजार नियमानुसार त्याची पैशात भरपाई केली जाते. 

असुचिबद्ध शेअर्स : 

  • असुचिबद्ध शेअर्समधे खरेदीविक्री व्यवहार होऊ शकतो. त्यासाठी विक्रेता आणि खरेदीदार समोरासमोर येणं आवश्यक आहे, त्यासाठी विविध मंच आहेत. 
  • असुचिबद्ध शेअर्समधे तरलता नसल्यानं त्याची योग्य किंमतशोध या मंचावर होईलच असं नाही. त्याचप्रमाणं या शेअर्सचे व्यवहार प्रत्येकवेळी अधिक शेअर्सच्या पटीत करावे लागतात, त्यामुळे अनेकदा ते विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना अडचणीचं होऊ शकतं.
  • याशिवाय या शेअर्सच्या गुंतवणूकदारांना सुचिबद्ध शेअर्सवर मिळणारे भांडवली नफ्याचे विशेष फायदे मिळत नाहीत. 
  • शेअर्स सुचिबद्ध करायला हवेत असं कंपनीवर कोणतंही बंधन नाही. त्याप्रमाणं त्यावर किती अधिमूल्य आकारावं याचंही बंधन नाही त्यामुळे अधिक भाव मिळावा या हेतूनं  बाजार चढा असतानाच सर्वसाधारणपणे ते सर्वाना उपलब्ध करून दिले जातात. ज्यांचे शेअर्स सुचिबद्ध असतील, त्या भांडवल बाजारातल्या कंपन्यांना अनेक करविषयक सोई-सवलती आहेत. त्यांना भांडवल बाजार आणि सेबी यांचे नियम पाळून मोठ्या प्रमाणांत भांडवल (भाग भांडवल आणि कर्ज अश्या दोन्ही स्वरूपात) उभं करता येतं.

सुचिबद्ध शेअर्स सामान्यतः त्या कंपन्यांचे प्रवर्तक, त्यांचे नातेवाईक, त्यांचे धनको (कर्ज देणारे), धाडसी गुंतवणूकदार काही प्रमाणात म्युच्युअल फंड योजना, गुंतवणूक संच व्यवस्थापन कंपन्याच्या योजना पर्यायी गुंतवणूक फंड योजना, अशा कंपन्यांतील कामगार, हितचिंतक आणि काही प्रमाणात वेगळ्या गुंतवणूक पर्यायाचा शोध घेणारे सामान्य गुंतवणूकदार असू शकतात. 

सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्समधील फरक-

  • तरलता: सुचिबद्ध शेअर्समधे जगभरातून मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असल्यानं ते असुचिबद्ध शेअर्सहून अधिक तरल आहेत.
  • पारदर्शकता: सुचिबद्ध शेअर्सचे भाव बाजारातील मागणी-पुरवठा तत्वावर आणि कंपनीच्या कामगिरीवर ठरत असल्यानं ते अधिक पारदर्शक असतात.
  • नियमन: सुचिबद्ध शेअर्सना शेअर बाजार आणि सेबी यांच्या नियमावलीचं पालन करावं लागतं. त्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्सची नियमावली कंपनी व्यवस्थापनाच्या दृष्टीनं कमी जाचक आहे.
  • मूल्यांकन: सुचिबद्ध शेअर्सच्या मूल्यांकनाबद्दल बरीच माहिती उपलब्ध असल्यानं त्यांच्या आधारे मूल्यांकन करणं सोपं आहे तर असुचिबद्ध शेअर्सबाबत मर्यादित माहिती उपलब्ध असल्यानं त्यांचं  अचूक मूल्यमापन करणं कठीण आहे.  
  • व्यवहार सुलभता: सुचिबद्ध शेअर्सचा केवळ एक शेअर्सच्या पटीत (संच) व्यवहार होऊ शकतो. त्यातुलनेनं असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार मोठ्या संचात करावे लागतात जर असे व्यवहार कमी संचात करायचे असतील तर सामान्य गुंतवणूकदारांना त्यांची अधीक किंमत चुकवावी लागते.

असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायचे घटक-

  • गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता: असुचिबद्ध शेअर्स कमी तरल आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे अधिक धोकादायक असल्यानं ते अधिक जोखीमयुक्त आहेत, त्यामुळे त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी आपली जोखीमक्षमता ओळखून त्या मर्यादेतच गुंतवणूक करावी. यातले बरेचसे व्यवहार केवळ विश्वासावर होत असल्यानं काही वेळा नुकसान होऊ शकतं. अनेकदा अस्थिर बाजारामुळे सदर कंपन्यांची सुचिबद्धता अपेक्षित काळापेक्षा अधिक काळ लांबणीवर पडू शकते.
  • गुंतवणूकीमागील हेतू: जर दीर्घकालीन गुंतवणूक या दृष्टीनं या गुंतवणूकीकडे पहात असाल तर ती कदाचित योग्य गुंतवणूक होऊ शकते.
  • तरलतेचा अभाव: झटपट व्यवहारांची गरज हा आपला गुंतवणूक हेतू नसेल तर आणि तरच ही गुंतवणूक आपल्याला कदाचित योग्य असू शकते.
  • गुंतवणूक संच विविधता: आपल्या गुंतवणूक संचात विविधता असावी असं अनेक गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात, आपण या मताशी सहमत असल्यास एक अधिकचा पर्याय म्हणून याचा विचार करता येईल.
  • नियामक उपलब्धता: या कंपन्या नोंदणीकृत नसल्यानं सेबीच्या अंतर्गत येत नाहीत त्यामुळे त्या अनुषंगानं उपलब्ध संरक्षण या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना उपलब्ध नाही. ज्या वेळी या कंपन्या नोंदवण्याची प्रक्रिया चालू होतील तेव्हाच त्याचा सेबीशी आणि भांडवल बाजाराशी संबंध येतो.

असुचिबद्ध कंपन्यात गुंतवणूक कशी करायची?

  • थेट गुंतवणूक: गुंतवणूक करण्यासाठी थेट कंपनी अथवा त्याच्या मध्यस्थांशी संपर्क साधा. विश्वास ठेवावे असे अनेक गुंतवणूक मंच, फिनटेक कंपन्या, दलाल या संबंधात कार्यरत आहेत, त्यांची मदत घेता येईल. ही गुंतवणूक आता सॉफ्ट कागदपत्रांचा वापर करून ऑनलाईन होऊ शकते. डिमॅट खाते, चेक कॉपी, आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या सॉफ्ट कॉपी आणि पैसे दिले की 24 ते 48 तासात शेअर्स तुमच्या खात्यात येतील किंवा हेच डिटेल्स वापरून तुम्हाला ते शेअर्स तुमच्या खात्यातून विकता येतील.
  • इसॉपच्या माध्यमातून: तुम्ही असुचिबद्ध कंपनीचे कामगार असाल आणि तुमच्या मालकाकडून हे शेअर्स तुम्हाला मिळत असतील तर गुंतवणूकीची प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता.
  • खाजगी फंड आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांची गुंतवणूक: खाजगी फंड आणि व्हेंचर कॅपिटल फंड असुचिबद्ध कंपनीत गुंतवणूक करतात आणि त्याची पुनर्विक्री करतात. त्याच्या मार्फत सर्वसाधारण लोक गुंतवणूक करू शकतात.

करआकारणी: असुचिबद्ध कंपनी शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक 2 वर्षाच्या आत अल्पकालीन गुंतवणूक समजली जाऊन त्यातून होणारा नफा नियमित उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दरानं  कर आकारणी केली जाते. तर दोन वर्षानंतर विक्री केली तर होणारा नफा  दीर्घ मुदतीचा समजून त्यावर 12.5% दरानं कर आकारणी होते.

नियामक बंधने: असुचिबद्ध कंपनीचा पब्लिक इशू जाहीर झाल्यावर शेअर्सची नोंदणी झाल्यापासून किमान 6 महिने, हे शेअर्स गुंतवणूकदार बाजारात विकू शकत नाही.

सुचिबद्ध नसलेले पण पुढे बाजारात सुचिबद्ध होण्याची शक्यता असलेले शेअर्स योग्य वेळी योग्य किमतीस घेतल्यास दिर्घकाळात मोठा लाभ होऊ शकतो. त्यांचे व्यवहार करणारे विश्वासू मंच आणि सध्या त्यावर उपलब्ध असलेल्या शेअर्सची माहिती आपण पुढील लेखातून घेऊयात.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.