Nidhi Company: निधी कंपन्यांची मनमानी

Reading Time: 3 minutes

Nidhi Company

आजच्या लेखात आपण निधी कंपन्यांबद्दल (Nidhi Company) माहिती घेऊया. यापूर्वी आपण कंपन्यांच्या विविध प्रकारांची प्राथमिक माहिती करून घेतली आहे. कंपन्यांचे सभासद संख्येवरून तीन, त्यावर कोणाचे नियंत्रण आहे त्यावरून चार आणि विशेष प्रकारावरून चार असे वेगवेगळे प्रकार आहेत. याशिवाय शेअरबाजारात झालेल्या नोंदणीवरून नोंदणीकृत व अनोंदणीकृत असे दोन प्रकार सांगता येतील. यासाठी लागणारे सभासद, किमान भांडवल ते गोळा करण्याचे मार्ग,  त्यावरील नियंत्रण आणि त्याचे उत्तरदायित्व यामुळे अशा प्रकारची कोणतीही कंपनी स्थापन करणे हे कौशल्याचे काम आहे. 

कंपनी –

 • व्यक्तिप्रमाणे कोणत्याही कंपनीस स्वतंत्र कायदेशीर अस्तीत्व असते तिला शाश्वत उत्तराधिकार असून स्वतःची मुद्रा असते. 
 • ज्यावर तिचे नाव, नोंदणी वर्ष, नोंदणी राज्य या गोष्टींची माहिती असून त्याचा वापर महत्वाच्या कागदपत्रांवर केला जातो. 
 • ज्याप्रमाणे बँकेत व्यक्तीची ओळख त्याच्या सहीने सिद्ध होते त्याचप्रमाणे कागदपत्रांची सत्यता ही कंपनीच्या मुद्रेने पूर्वी होत असे. 
 • आता बदललेल्या नव्या कंपनी कायद्यानुसार अशा प्रकारे मुद्रेचे बंधन नसले तरी काही गोष्टींची अधिकृतता स्पष्ट होण्यासाठी याचा उपयोग होतो. 
 • अशाप्रकारे आपल्या देशातील कोणत्याही कंपन्या या कंपनी कायद्यानुसार अथवा संसदेस मान्य अशा स्वतंत्र कायद्यानुसार स्थापन झाल्या आहेत. 

निधी कंपनी (Nidhi Company)

 • निधी कंपन्या या अशाच कंपनी कायदा 2013 मधील कलम 406 नुसार अस्तित्वात आलेल्या किंवा नोंदणी करण्यात आलेल्या कंपन्या असून सभासदांमधील बचतीची भावना वाढीस लागावी आणि त्याच्या आर्थिक गरजेस त्यांना तत्परतेने मदत व्हावी असा यामागील हेतू आहे. 
 • निधी कंपन्या या साधारणपणे भिशीची सुधारीत आवृत्ती असून यासाठी लागणारे भांडवल, सभासद संख्या यावर मर्यादा आहे. परंतू यासंबंधात अनेकांकडून फसवणूकीच्या तक्रारी वाढल्याने सुधारित निधी नियम 2019 नुसार त्यांनी आपले कामकाज करणे हे 15 ऑगस्ट 2019 पासून सक्तीचे झाले आहे. 
 • या कंपन्या एक प्रकारे बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या असल्या तरी त्यापेक्षा वेगळ्या असून यासाठी रिझर्व बँकेच्या परवानगीची गरज नसते. यातील सभासदच ठेव ठेवतात किंवा कर्ज घेतात.
 • कंपनी पटकन ओळखता यावी म्हणून त्यांच्या नावात निधी हा शब्द असतो. या कंपन्या कायमस्वरूपी निधी फंड, फायदा निधी फंड, परस्पर फायदा निधी फंड, परस्पर फायदा निधी कंपनी अशा अन्य नावानेही ओळखल्या जातात.

कंपनीच्या कार्यपद्धतीची नवीन नियमावली 

या कंपनीची कार्यपद्धती कशी असावी या विषयीची सुधारित नियमावली जाहीर झाल्यानंतर नवीन नियमावलीनूसार-

 • नव्याने नोंदणी झालेल्या कंपनीस  365 दिवस पूर्ण केल्यावर पुढील 60 दिवसात कंपनी कामकाज मंत्रालयाकडे (MCA), NDH- 4 हा फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. 
 • ज्या कंपन्या 15 ऑगस्ट 2019 पूर्वी स्थापन झाल्या त्यांनी या तारखेपासून 6 महिन्यात किंवा निधी कंपनी नोंदणी झाल्यापासून 365 दिवसानंतर यातील जी तारीख अंतिम असेल त्याच्या पुढील 60 दिवसांत NDH-4 फॉर्म भरून देणे बंधनकारक आहे.
 • हा फॉर्म एकदाच भरून द्यायचा असून हा फॉर्म भरणे म्हणजे हयातीचा दाखला देण्यासारखे असून त्याचा अर्थ सदर कंपनीचे कामकाज नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमानुसार चालवले जात असल्याचा पुरावा आहे.

या कंपन्या निम्न किंवा अल्प उत्पन्न असलेल्या लोकांच्या आर्थिक गरजा भागवत असल्याने अनेक गरीब लोक आपली बचत तेथे ठेवतात आणि अडीअडचणीस किरकोळ रक्कम कर्ज म्हणून घेतात. त्यांची आर्थिक गरज काही अंशी पूर्ण व्हावी आणि त्यांनी जमेल तशी बचत करावी असा या कंपनी निर्मितीमागे हेतू असल्याने अशी कंपनी स्थापन करणे हे त्याच्या विशेष रचनेमुळे तुलनेत सुलभ आहे. यासाठी-

 • कंपनीचे अधिकृत मालमत्ता ₹ 10 लाख असून सुरुवातीस किमान भांडवलाची गरज नाही त्यामुळे कमीतकमी पैशात कंपनी स्थापता येते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास अशी कंपनी 15 दिवसात स्थापन करता येणे शक्य. 
 • त्यात सुरुवातीला 7 व नंतर किमान 200 सभासद असू शकतात. याच सभासदातील किमान 3 व्यक्ती संचालक म्हणून काम पाहतात. 
 • कंपनी भागविक्री करू शकत नाही पण भाग हस्तांतरण सुलभ, मुद्रांक शुल्क माफी. 
 • बचत आणि कर्ज देण्याचे धोरण स्पष्ट, सभासदांव्यतिरिक्त कोणासही ठेवी किंवा कर्ज वितरण नाही. 
 • याशिवाय अन्य कोणताही व्यवसाय करण्यास बंदी. 
 • ठेवींच्या 10 % रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत मुदत ठेवीत ठेवलेली असावी. 
 • ठेव आणि कर्ज यावरील व्याजदर वेळोवेळी ठरवून दिलेल्या नियमानुसार असावेत. 
 • विनातारण कोणासही कर्ज देऊ नये. मालमत्तेच्या किमतीच्या 50% हून अधिक रक्कम कर्ज म्हणून देऊ नये. 
 • यामध्ये सामान्य गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्या हिताचा विचार करूनच सुधारित नियम ठरवण्यात आले आहेत व कंपनी कामकाज याच पद्धतीने चालत असल्याचे जाहीर करणे आणि त्यास आवश्यक पुरावे जोडणे हाच NDH-4 फॉर्म भरून घेण्यामागील हेतू आहे. 
 • या संबंधात जाहीर करण्यात आलेली माहिती धक्कादायक असून अशा कंपन्यांशी संबंधित ग्राहकांनी आपली गुंतवणूक येथे ठेवावी की नाही याचा विचार करण्याची गरज आहे. 
 • 24 ऑगस्ट 2021 रोजी 348 कंपन्यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली असून त्यातील एकही कंपनी किमान अपेक्षांची पूर्तता करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निधी कंपनी म्हणून कामकाज करण्यास त्यांना मान्यता मिळू शकत नाही. 
 • यावर कळस म्हणजे कायद्याने आवश्यक असलेला NDH-4 हा फॉर्म अनेक कंपन्यांनी त्याना दिलेली मुदत उलटून गेल्यावरही भरलेला नाही. कंपनी कामकाज मंत्रालयाने अशा कंपन्यात आपली कष्टाची कमाई ठेवू नये असा इशारा दिला आहे. 

यावर सरकार काय करणार? माहिती नाही, सध्यातरी त्यांनी एक इशारा देणारे पत्रक काढले आहे. आपल्यापैकी कुणाचा या कंपन्यांशी संबध येत नसल्याने फारसा फरक पडणार नाही परंतू आपल्याकडे येणारे अनेक छोट्या कष्टकरी, सेवेकरी व्यक्तींचा अशा कंपन्यांशी संबध येतो तेव्हा त्यांनी आपली कष्टाची कमाई अशा ठिकाणी ठेवण्यापूर्वी एक सामाजिक जाणिव म्हणून कंपनी निधी व्यवसाय करण्यास नोंदली असून त्यांनी NDH-4 फॉर्म भरून दिला आहे व तो रद्द झालेला नाही याची खात्री, त्यांना आपण ऑनलाईन तपासणी करून द्यावी आणि संभाव्य फसवणूकीपासून वाचवावे.

उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies

Web search: Nidhi Company in Marathi, Nidhi Company Marathi Mahiti, Nidhi Company Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.