Reading Time: 3 minutes

 शेअरबाजारात गुंतवणूकदार म्हणून शेअर्स खरेदी विक्री करून झालेला नफातोटा हा भांडवली नफा किंवा तोटा समजण्यात येतो. आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर किती कालावधी नंतर विकले यावरून तो अल्पमुदतीचा आहे की दीर्घ मुदतीचा ते ठरवले जाते. एक वर्षाच्या आतील भांडवली नफा तोटा हा अल्पमुदतीचा तर त्याहून अधिक कालावधी नंतरचा नफातोटा हा दीर्घ मुदतीच्या असतो. 31 मार्च 2018 पर्यंत दीर्घ मुदतीचा नफा पूर्णपणे करमुक्त होता. त्यामुळे असा नफा किंवा तोटा किती आहे तो कुठे समायोजित करता येईल का हा प्रश्न नव्हता. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर सरसकट 15% या सवलतीच्या दराने कर द्यावा लागेल. शेअर्सवर मिळणारा डिव्हिडंड करदात्यांच्या पूर्णपणे करमुक्त होता यावरील कर कंपनीस भरावा लागत असे. आता डिव्हिडंडपासून मिळणारे उत्पन्न करपात्र झाल्याने करदात्यांची डोकेदुखी वाढली आहे. डिव्हिडंड हे अन्य मार्गाने मिळालेले उत्पन्न समजण्यात येते. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा आता करपात्र आहे यातील एक लाख रुपयांपर्यंत नफ्यावर कोणताही कर नाही तर त्यावरील उत्पन्नावर 10% कर अधिक सेस द्यावा लागेल. कर निर्धारणाच्या जुन्या प्रणालीनुसार सर्वसाधारण लोकांना अडीच लाख, ज्येष्ठ नागरिकांना तीन लाख तर अती ज्येष्ठ नागरिकांना पाच  लाखावरील उत्पन्नावर त्यांच्या उत्पन्नानुसार 5% ते 30% कर द्यावा लागेल. नवीन प्रणालीनुसार सरसकट सर्वाना त्याच्या उत्पन्नानुसार तीन लाखावरील रकमेवर उत्पन्नानुसार 5 ते 30% कर द्यावा लागेल. याशिवाय कलम 87 A नुसार मिळणारी करातील सूट जुन्या प्रणालीत ₹ 12500/- आहे तर नवीन प्रणालीत ₹25000/- आहे. यामुळे जुन्याप्रणालीत ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख आहे त्यांना आणि नवीन प्रणालीत  ज्यांचे उत्पन्न 7 लाख आहे त्यांना कर द्यावा लागत नाही. जर याहून अधिक उत्पन्न झाले तर जुन्या प्रणालीत वयानुसार अडीच ते तीन किंवा पाच लाख उत्पन्नावर तर नवीन प्रणालीत तीन लाखावरील उत्पन्नावर कर द्यावा लागतो. 

       

मला माहित आहे की वरील विधान खूप गुंतागुंतीचे आहे ते निटपणे समजून घेण्यासाठी तुकड्यातुकड्यात पुनःपुन्हा वाचून समजून घ्यावे लागेल. याशिवाय 1 एप्रिल 2023 पासून 35% शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या रोखे आधारित फंडांना मिळणारी भांडवली नफ्याची सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे यातून होणारा नफा करदात्यांच्या उत्पन्नात मिळवून करआकारणी होईल. खर तर कररचना खुप सोपी सुटसुटीत असायला हवी. नवी करप्रणाली लागू करण्यामागे सुलभ कररचना हा एक निकष होता परंतु सध्या अस्तीत्वात असलेले कायदे हे गोंधळात अधिक भर घालणारे आहेत. यामुळे दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यासंबंधात वेगवेगळ्या प्रसंगात काही प्रश्न उपस्थित होतात. 

           

भांडवली नफ्याच्या संदर्भात आयकर कायद्यात कलम 112 आहे, ते सर्व प्रकारच्या म्हणजे व्यक्तीगत निवासी अनिवासी करदाते, हिंदू अविभक्त कुटुंब, फर्म परदेशी कंपन्या या सर्वांना लागू पडते. यात वेगवेगळ्या मालमत्ता प्रकारांवर अल्प आणि दीर्घ मुदतीचा नफा कधी होईल ते स्पष्ट करण्यात आले आहे. दिर्ध मुदतीचा नफा मोजण्याचा कालावधी काही मालमत्ताच्या बाबत 1 वर्ष तर इतर सर्व मालमत्ताच्याबाबत 3 वर्षे आहे. यात मिळणारा नफा हा महागाई निर्देशांकाच्या (इंडेक्ससेशन) तुलनेत वाढ करून किंवा न करता मोजला जाऊन त्यावर 10% ते 20% अधिक सेस या दराने कर आकारणी केली जाते. शेअर्सवरील भांडवली नफ्यास वगळण्यात आले आहे यासाठी कलम 112 A आहे त्यानुसार शेअर्सवरील दीर्घकालीन भांडवली नफ्यास रुपये एक लाखापर्यंत कर नाही व त्यावरील नफ्यास 10% कर आणि सेस द्यावा लागतो. यामुळे करमोजमी आणि आकारणी संदर्भात विविध परिस्थितीत  विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उकल यांची माहिती घेऊयात.

◆प्रश्न-माझे फक्त दीर्घ मुदतीचे भांडवली नफ्याचे उत्पन्न एक लाख पन्नास हजार आहे अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही ते ऐकून करमुक्त उत्पन्नाहुन कमी असल्याने मला कर आणि आयकर विवरणपत्र भरायला नको ना?

■उत्तर- दीर्घ मुदतीचा भांडवली नफा एक लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे येथे दीड लाख भांडवली नफा असल्याने वरील रकमेवर 10%  दराने कर आणि सेस द्यावा लागेल. आपले केवळ हेच उत्पन्नाचे साधन असल्यास आयकर विवरणपत्रसुद्दा भरावे लागेल. करप्रणाली नवी जुनी काही फरक पडणार नाही. फक्त भांडवली नफा कितीही असो करसुट फक्त एक लाख रुपयास मिळेल. 

◆प्रश्न-मी खरेदी केलेले शेअर्स खूप जुने आहेत यावरील भांडवली नफा पूर्वी करमुक्त होता त्याची भरपाई कशी करणार?

■उत्तर- यासाठी शेअर्सची योग्य खरेदी किंमत निवडण्याचा पर्याय करदात्याकडे आहे 31 जानेवारी 2018 ची बाजारातील सर्वोच्च किंमत ही त्याची योग्य खरेदी किंमत होईल. अशा पद्धतीने मोजणी करण्यास ग्रँडफादरिंग अशी संज्ञा आहे.

●प्रश्न-माझे इतर एकत्रित करपात्र उत्पन्न साडेचार लाख आहे, याशिवाय 80 हजार दीर्घकालीन भांडवली नफा आहे. करसुट घेतल्यास मला कोणताही कर द्यावा लागणार नाही. हे बरोबर आहे का?

■उत्तर- नाही आपले उत्पन्न करसुट मर्यादेपेक्षा कमी असले तरी कर नसलेले दीर्घ मुदतीचे 80 हजार उत्पन्न असल्याने आपले एकूण उत्पन्न पाच लाख तीस हजार होईल त्यामुळे 80 हजार नफ्यावर कर न लागता उत्पन्न 5 लाखावर गेल्याने आपणास वयानुसार साडेचार लाखातून अडीच किंवा तीन लाखावर कर नाही त्यावरील उत्पन्नावर जुन्या प्रणालीनुसार 5% दराने कर अधिक सेस द्यावा लागेल. करमोजणी करताना भांडवली नफा एकूण करपात्र उत्पन्नात मिळवूनच करआकारणी होईल. जर तो पाच लाखाहून अधिक होत असेल तर निर्धारित दराने त्यावरील कर द्यावा लागेल.

         

शेअर्सवरील भांडवली नफा नुकसानीचे आपल्या करदेयतेवरील नेमके काय परिणाम होतील हे जाणकार व्यक्तीच निश्चित सांगू शकेल परंतु या संदर्भात लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे असे-

★अल्पकालीन भांडवली तोटा अल्पकालीन नफ्यात किंवा दीर्घकालीन नफ्यात समायोजित होऊ शकतो तरीही तोटा असल्यास तो त्यापुढील तीन वर्षात अशाच प्रकारच्या उत्पन्नात समायोजित केला जाऊ शकतो. एकूण उत्पन्न किती त्यानुसार करदेयतेवर त्याचा प्रभाव पडतो.

★दीर्घकालीन भांडवली तोटा हा दीर्घकालीन नफ्यासोबत समायोजित होतो.

★दिर्घमुदतीचा निव्वळ भांडवली नफा एक लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे त्यावरील नफ्यावर तो कितीही असला तरी 10% सवलतीच्या दराने कर आणि सेस द्यावाच लागेल. करमोजणी करताना तो करपात्र उत्पन्नात मिळवला जाईल त्यावरून करदेयता ठरेल. 

★तरीही तोटा शिल्लख राहत असल्यास असा दीर्घ मुदतीचा तोटा पुढील 7 वर्ष अश्याच प्रकारच्या नफ्याशी समायोजित करता येईल.

★डिरिवेटिव्ह व्यवहारातून होणारा तोट्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा आणि अन्य उत्पन्न यात समायोजित करता येईल.

★आयकर विवरणपत्र नेमून दिलेल्या मुदतीत भरल्यासच संचित तोटा पुढील वर्षांसाठी वर्ग होईल.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयं:सेवी ग्राहक संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तिक आहेत.यासंबंधात निर्णय घेण्यापूर्वी आपल्या आयकर सल्लागाराशी चर्चा करावी.) 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…