आर्थिक विषय समजून घेताना त्यामधल्या काही संकल्पना निश्चित काय आहेत, याबद्दल गोंधळ उडण्याची शक्यता असते. यातल्या काही संकल्पनांचा उल्लेख एकमेकांसोबत केला जातो तर काही संकल्पनांमधे शेवटचा शब्द अथवा अक्षर सारखं असल्यामुळे त्यातून नाद उत्पन्न होतो.
अशाच दोन काहीशा सारख्याच वाटणाऱ्या पण त्याच्या अर्थाबद्दल गोंधळात भर घालणाऱ्या संकल्पना त्यांच्या अर्थासह यापुढील दोन तीन भागात क्रमशः समजून घेऊयात.
- उत्पन्न आणि नफा (Revenue and Profit): व्यवसायाच्या दृष्टीनं,
- उत्पन्न: म्हणजे व्यवसायाच्या सामान्य कामकाजातून मिळणारे एकूण पैसे, जसं की मालाची विक्री किंवा सेवा पुरवल्याबद्दल मिळालेले पैसे. या उत्पन्नामध्ये कोणताही खर्च वजा केलेला नसतो. त्यामुळे व्यवसायात झालेली वाढ आणि बाजारातील मागणी याचा अंदाज घेता येतो.
- नफा: म्हणजे व्यवसायाने मिळवलेल्या उत्पन्नामधून सर्व खर्च (उदा. उत्पादन खर्च, वेतन, व्याज, कर इ.) वजा केल्यावर शिल्लक राहणारी रक्कम. नफा हा व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. नफा वाढल्यास व्यवसाय अधिक सक्षम आणि फायदेशीर ठरतो.
उदाहरणार्थ, जर एका दुकानाचं एकूण उत्पन्न ₹ 1,00,000/- रुपये असेल आणि एकूण खर्च ₹ 80,000/- रुपये असेल, तर त्या दुकानाचा नफा (Profit) ₹ 20,000/- रुपये असेल.
- ‘जमा लेखा’ (Accrual Accounting) आणि ‘रोख लेखा’ (Cash Accounting):
- जमा लेखा : या पद्धतीत, व्यवहार रोख स्वरूपात झाला की नाही याचा विचार न करता, तो व्यवहार नोंदवला जातो. म्हणजे, जर तुम्ही एखादी वस्तू विकली आणि पैसे येणं बाकी असेल तरीही ती विक्री नोंदवली जाते.
उदाहरणार्थ, जर उत्पादकानं एखाद्या ग्राहकाला वस्तू दिली आणि त्यानं पैसे 30 दिवसानंतर देण्याचं वचन दिलं, तर तुम्ही लगेच विक्री नोंदवाल, जरी पैसे लगेच मिळाले नसले तरी. या पद्धतीमुळे व्यवसायाची खरी आर्थिक स्थिती अधिक स्पष्टपणे दर्शविली जाते, कारण तेथे महसूल आणि खर्चाची नोंद वेळेनुसार केली जाते.
- रोख लेखा : या पद्धतीत, व्यवहार फक्त रोख स्वरूपात झाल्यावरच नोंदवला जातो. म्हणजे, पैसे मिळाल्यानंतरच विक्री नोंदवली जाते आणि जेव्हा पैसे दिले जातील तेव्हाच खर्च नोंदवला जातो.
उदाहरणार्थ, जर एखाद्या ग्राहकाला वस्तू विकली आणि त्याने लगेच पैसे दिले, तरच तो व्यवहार लगेच नोंदवला जातो. ही अतिशय सोपी पद्धत असून लहान व्यवसायांसाठी उपयुक्त आहे.
- मालमत्ता (Assets) आणि दायित्वं (Liabilities):
- मालमत्ता: ही अशी संसाधनं आहेत जी एखाद्या व्यक्ती किंवा व्यवसायाच्या मालकीची किंवा नियंत्रित असतात आणि त्यांचं आर्थिक मूल्य असतं.
उदाहरणांमध्ये रोख रक्कम, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक, उत्पादन उपकरणं आणि रक्कम प्राप्त करण्यायोग्य खाती, शिल्लक कच्चा आणि पक्का माल यांचा समावेश आहे. ही मालमत्ता रोख रकमेत रूपांतरित केली जाऊ शकते, त्याचप्रमाणं भविष्यात आर्थिक फायदा मिळवण्यासाठी वापरली जाऊ शकते.
- दायित्वं : हे एखाद्या व्यक्तीनं किंवा व्यवसायानं इतरांना दिलेलं वचन किंवा कर्ज दर्शवितात.
उदाहरणांमध्ये उधारीवर उचललेला कच्चा माल, व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज, अन्य देय खाती, यांचा समावेश होईल.
- भांडवली खर्च (Capex) आणि परिचालन खर्च (Opex):
- भांडवली खर्च: मालमत्ता, इमारती, तंत्रज्ञान किंवा उपकरणं यासारख्या दीर्घकालीन मालमत्ता मिळवण्यासाठी त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि देखभाल करण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा समावेश होतो.
उदाहरणांमध्ये नवीन यंत्रसामग्री खरेदी करणं, कारखाना बांधणं किंवा सॉफ्टवेअर अपग्रेड करणं समाविष्ट आहे. हे खर्च सामान्यतः एकदाच करावे लागतात, आवर्ती नसलेले असतात आणि दीर्घकालीन फायदा मिळवण्याच्या हेतूनं केले जातात.
- कार्यक्षम खर्च (Opex): व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले दैनंदिन खर्च जसं की, कच्या मालाची खरेदी, पगार, भाडं, विपणन, देखभाल खर्च यांचा समावेश होतो. हे खर्च सामान्यतः आवर्ती असतात आणि व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असतात.
- एकूण नफा टक्केवारी (Gross Margin) आणि निव्वळ नफा टक्केवारी (Net Margin):
- एकूण नफा टक्केवारी: याचा अर्थ कंपनीनं तिच्या महसुलातून विक्री केलेल्या वस्तूंच्या निर्मिती करण्यासाठी केलेला खर्च वजा केल्यानंतर मिळवलेल्या नफ्याचा संदर्भ दिला जातो, यात कर आणि दिलेले व्याज याचा समावेश केला जात नाही. तो महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो. कंपनी तिच्या उत्पादन खर्चाचे व्यवस्थापन किती कार्यक्षमतेनं करते हे ते यातून समजतं. यातून व्यवसायाचा ढोबळ नफा समजतो.
- निव्वळ नफा टक्केवारी : निव्वळ नफा काढताना कंपनीच्या महसुलातून उत्पादन परिचालन खर्च, व्याज आणि कर यासह सर्व खर्च वजा केल्यानंतर मिळणाऱ्या नफ्याचं खरेखुरे प्रतिनिधित्व करतो, हा नफा देखिल महसुलाच्या तुलनेत टक्केवारीत व्यक्त केला जातो.
- व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई (EBITDA) आणि
निव्वळ उत्पन्न (Net Income)
- व्यवसायाची व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफी पूर्वीची कमाई: कंपनीच्या मुख्य व्यवसायिक कामगिरीचं मोजमाप करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे गुंतवणूकदारांना कंपन्यांची तुलना करता येते.
ते मोजण्याची पद्धत,
EBITDA = परिचालन उत्पन्न + घसारा + कर्जमाफी.
- निव्वळ उत्पन्न: कंपनीचा एकूण नफा, जो सर्व खर्च आणि उत्पन्नानंतर शिल्लक राहतो. यामुळे कंपनीच्या एकूण आर्थिक स्थितीचा अंदाज येतो. असं असलं तरी त्यातून निश्चित असा रोख प्रवाह समजून येत नाही ही त्यातील त्रुटी आहे.
मोजण्याची पद्धत,
निव्वळ उत्पन्न = एकूण महसूल – सर्व खर्च.
- गुंतवणुकीवर परतावा (Return on Investment) आणि समभागावरील परतावा (Return on Equity):
- गुंतवणुकीवरील परतावा: हा वाक्यांश गुंतवणुकीच्या एकूण नफ्याचा संदर्भ देतो, जो बहुतेकदा टक्केवारीतच व्यक्त केला जातो.
- समभागावरील परतावा: हा वाक्यांश विशेषतः कंपनीच्या भागधारकांच्या समभागाद्वारे निर्माण होणाऱ्या नफ्याचा किंवा मालकांनी गुंतवलेल्या पैशाच्या रकमेचा संदर्भ देतो.
- बाजार मूल्य (Market Cap) आणि उद्योग मूल्यांकन (Enterprise Value):
- बाजारमूल्य: बाजारमूल्य म्हणजे कंपनीच्या सर्व विक्रीयोग्य शेअर्सची बाजारभावानुसार एकूण किंमत.
उदाहरणार्थ: जर एका कंपनीचे 100 लाख शेअर्स असतील आणि प्रत्येक शेअरची किंमत ₹100 असेल, तर त्या कंपनीचं बाजारमूल्य ₹100 कोटी (100 लाख * ₹100) असेल.
बाजारमूल्यामुळे कंपनीच्या आकाराचं आणि बाजारातील स्थानाचं (size and position) मोजमाप करता येते. लार्ज, मिड, स्मॉल कंपन्यांचे निकष त्यांच्या बाजारमूल्यानुसार ठरतात. बाजार मूल्यानुसार कंपन्यांचा क्रम लावला असता पहिल्या 100 कंपन्या या मोठ्या आकाराच्या (लार्ज कॅप) 101 ते 250 क्रमांकाच्या कंपन्या मध्यम (मिड कॅप) आकाराच्या आणि अन्य सर्व छोट्या आकाराच्या ( स्मॉल कॅप) समजल्या जातात.
- उद्योग मूल्यांकन: कंपनीच्या एकूण मूल्याचं मोजमाप, ज्यात कंपनीचे समभाग, कंपनीवरील कर्ज आणि त्यातील मालकीचे स्वारस्य यांचा समावेश होतो. यामुळे कंपनीच्या एकूण मूल्याचं अधिक व्यापक आणि वस्तुनिष्ठ चित्र डोळ्यासमोर येतं, जे मार्केटकॅपपेक्षा अधिक उपयुक्त असू शकतं. याचा वापर कंपनीच्या मूल्यांकनासाठी आणि वित्तीय विश्लेषण करण्यासाठी केला जातो.
9.स्थिर खर्च (Fixed Cost) आणि परिवर्तनीय खर्च (Variable Cost):
- स्थिर खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात वाढ किंवा घट झाल्यास, या खर्चावर फारसा कोणताही परिणाम होत नाही.
उदाहरणार्थ: भाडं, पगार, कर्जाचे हप्ते, इत्यादी. या खर्चाला ‘निश्चित खर्च’ असेही म्हणतात.
- परिवर्तनीय खर्च: उत्पादन किंवा विक्रीच्या प्रमाणात बदलल्यास, या खर्चात बदल होतो.
उत्पादन वाढलं तर खर्च वाढतो आणि उत्पादन घटलं तर खर्च घटतो.
उदाहरणार्थ : कच्चा माल, पॅकेजिंग, वाहतूक खर्च.
- आर्थिक कर्ज (Financial leverages) आणि निधीतून कार्यक्षम वापर (Operating leverages):
- आर्थिक कर्ज: व्यवसाय विस्तारासाठी कर्ज घ्यावं लागतं , त्यावर व्याज द्यावं लागतं किंवा अधिमूल्यानं समभाग वितरित केल्यास अधिक निधी प्राप्त होतो. यातल्या समभागावर लाभांश द्यावा लागतो. हे करत असताना कंपनीला आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. जर भांडवलावर परतावा कर्जावर द्याव्या लागणाऱ्या व्याजाहून अधिक असल्यास किंवा काही कालावधीनंतर अधिक होण्याची शक्यता असेल तर सकारात्मक मानला जाईल. कर्जाची तीव्रता ईपीएसमध्ये टक्केवारीतील बदलाला ईबीआयटीमध्ये टक्केवारीतील बदलाला भागून मिळवता येते.
- निधीचा कार्यक्षम वापर : जेव्हा एखादी कंपनी कार्यात्मक क्रियाकलापांमध्ये निश्चित खर्च-वाहक संसाधनांचा वापर करून तिच्या एकूण खर्चाची काळजी घेण्यासाठी अधिक उत्पन्न मिळवते, तेव्हा त्याला ऑपरेटिंग लीव्हरेज म्हणतात. विक्रीच्या समायोजनामुळे व्याज आणि कर (EBIT) पूर्वीच्या कमाईवर होणारा परिणाम मोजण्यासाठी ऑपरेटिंग लीव्हरेजची तीव्रता (DOL) मोजली जाते. EBIT मधील बदलाच्या टक्केवारीस विक्रीमधील टक्केवारीतील बदलाने भागून ती मोजता येते.
यापुढील भागात आपण आणखी काही गोंधळात पाडणाऱ्या आर्थिक संकल्पना समजून घेऊयात. (अपूर्ण)
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)