Reading Time: 5 minutes

गोंधळात टाकणाऱ्या आर्थिक संकल्पना’ या  विषयावरच्या काही संकल्पना आपण गेल्या आठवड्यात समजून घेतल्या. आजही या लेखातून एकमेकांसोबत उल्लेख केल्या जाणाऱ्या त्यामुळेच सारख्या वाटणाऱ्या परंतु सारख्या नसलेल्या काही संकल्पनांतील फरक आपण समजून घेऊया.

पुस्तकी मूल्य (Book Value) आणि बाजारभाव (Market Value) : 

1 . ‘पुस्तकी मूल्य’ म्हणजे कंपनीच्या मालमत्तेच्या (assets) मूल्यामधून तिच्या देयकांची (liabilities) किंवा कर्जाची (debts) रक्कम वजा केल्यानंतर शिल्लक राहणारी किंमत असते. जी कंपनीच्या आर्थिक स्थितीचं (financial position) एक महत्त्वाचं मापक आहे. ते कंपनीच्या निव्वळ मालमत्तेचं (net assets) प्रतिनिधित्व करते, म्हणजेच कंपनीच्या मालमत्तेतून देयके वजा केल्यानंतर शिल्लक राहते. यामुळे गुंतवणूकदारांना कंपनीच्या मूल्याचा अंदाज लावण्यास मदत करू शकते, विशेषत: हे कमी मूल्यांकित (undervalued) समभाग शोधण्यासाठी उपयोगी ठरू शकते. समजा,

  • जर कंपनीकडे 100 कोटींची मालमत्ता (assets) असेल आणि 50 कोटींची देयकं किंवा कर्जं  (liabilities) असतील, तर तिचं पुस्तक मूल्य 50 कोटी असेल.
  • काहीवेळा ‘प्रति शेअर पुस्तक मूल्य’ (Book Value Per Share) देखील वापरले जाते, जे कंपनीच्या एकूण ‘पुस्तक मूल्याला (book value) तिच्या एकूण शेअर्सच्या संख्येने भागून काढले जाते.
  1. बाजार मूल्य म्हणजे कोणतीही वस्तू, मालमत्तेची किंवा कंपनीच्या शेअर्सची, सध्याच्या बाजारात ती विकता किंवा खरेदी करता येईल अशी पैशातील किंमत असते. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे सर्व शेअर्स विकले, तर ते किती किमतीला विकले जातील, त्यावरून त्या कंपनीचे बाजार मूल्य ठरेल. बाजार मूल्य खरेदीदार आणि विक्रेत्यांसाठी किमतीची एक पारदर्शक कल्पना देतं. हे मालमत्तेची  सध्याची मूल्य अथवा किंमत दर्शवते, जे खरेदी-विक्रीसाठी आधार म्हणून काम करते.

वाजवी बाजार मूल्य (Fair Market Value): ही एखाद्या मालमत्तेची किंमत असते, जी सामान्यतः निष्पक्ष आणि विशिष्ठ पद्धतीने निश्चित केली जाते, जी बाजार मूल्यापेक्षा कमी किंवा अधिक असू शकते. 

  1. रोख प्रवाह (Cash Flow) आणि नफा (Profit)
  • रोख प्रवाह’ म्हणजे व्यवसायात येणाऱ्या आणि जाणाऱ्या रोख रकमेचा (cash) आणि रोख-समकक्ष (cash equivalents) रकमेचा (उदा. बँक ठेवी, अल्प-मुदतीची गुंतवणूक) ओघ होय. उदाहरणार्थ,
  • येणारी रोकड (Inflow):

ग्राहकांकडून वस्तू /सेवेच्या विक्रीतून मिळणारी रक्कम होय .बँकेतल्या ठेवींवर मिळणारं व्याज किंवा गुंतवणुकीतून मिळणारा लाभांश, भाडं अथवा नफ्याच्या स्वरूपात मिळणारी रक्कम होय. 

  • जाणारी रोकड (Outflow):

कर्मचाऱ्यांचं वेतन. खरेदी केलेलं साहित्य किंवा सेवांसाठी केलेलं पेमेंट असतं.

  1. तरलता (Liquidity) आणि पत (Solvency)
  • तरलता (Liquidity) म्हणजे आर्थिक मालमत्तेची (asset) किंवा गुंतवणुकीची (investment) क्षमता होय, जी सहजपणे आणि वेळेत रोखीमध्ये (cash) रूपांतरित करता येते, उदाहरणार्थ,
  • रोकड (Cash):

रोकड ही सर्वात तरल मालमत्ता आहे, ती लगेच खर्च करता येते.

  • बँक खाते (Bank Account):

बँक खात्यातील रक्कम लगेच काढता येते, म्हणून ती तरल आहे.

  • समभाग (Share):

समभाग विकून एक दिवसात रोख रक्कम मिळू शकते, त्यामुळे ते देखील तरल असतात.

  • सोनं (Gold):

सोन्याची विक्री करून लगेच रोख रक्कम मिळू शकते, म्हणून ते देखील तरल आहे.

  • घर (House):

घराला विकायला वेळ लागतो, म्हणून ते तुलनेनं कमी तरल आहे.

  • ‘पत’ किंवा ‘ऐपत’, म्हणजेच एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेकडे आपल्या कर्जाची आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करण्याची असलेली क्षमता! उदाहरणार्थ,

एका कंपनीकडे तिच्याकडील मालमत्तेपेक्षा जास्त कर्जं नाहीत, तर तीची बाजारात पत आहे असं समजलं जातं. तिला सहज आणि वाजवी दरानं कर्ज मिळू शकतं. भांडवल बाजारातून समभाग आणि रोखे विक्री करून आवश्यक भांडवल मिळवता येते.

  1. घसारा (Depreciation) आणि ऋण परिशोध (Amortization)
  • घसारा म्हणजे एखाद्या मालमत्तेच्या (asset) किमतीत, तिच्या वापरामुळे, वेळेनुसार किंवा इतर कारणांमुळे होणारी घट अथवा कमी होणारी किंमत असते. उदाहरणार्थ, गाडी किंवा मशीन वापरल्यानं तिची किंमत कमी होते, बाजारातील बदल किंवा तंत्रज्ञानामुळे एखादी वस्तू अप्रचलित झाल्यास, तिची किंमत कमी होते म्हणजेच मालमत्तेच्या किमतीत होणारी घट. उदाहरणार्थ, गाडी, मशीन, इमारत, फर्निचर, इत्यादी. घसारा हा व्यवसायासाठी केलेला खर्च म्हणून नोंदवला जातो त्यामुळे कर देयता कमी होते.
  • ऋण परिशोध म्हणजे निश्चित कालावधीत कर्जाची व्याजासह परतफेड (मुद्दल आणि व्याज) पूर्वनिर्धारित हप्त्यांमध्ये करणं, किंवा अमूर्त मालमत्तेचे मूल्य कमी करणं, जसं की पेटंट किंवा कॉपीराइट. उदाहरणार्थ,

कर्ज परतफेड: जर तुम्ही बँकेकडून 10 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे कर्ज घेतलं, तर ऋण परिशोध म्हणजे दर महिन्याला निश्चित रक्कम (मुद्दल आणि व्याज) भरून 10 वर्षात कर्ज पूर्णपणे फेडलं  जाईल. 

6 अमूर्त मालमत्तेचे मूल्य कमी करणं:

जर कंपनीने 5 वर्षांसाठी 10 लाख रुपयांचे पेटंट खरेदी केले, तर ऋण परिशोध म्हणजे दरवर्षी 2 लाख रुपये (10,00,000/5) ही रक्कम पेटंटच्या वापरासाठी केलेल्या  खर्चात नोंदवले जाईल.

  1. व्याजदर (Interest Rate) आणि वार्षिक टक्केवारी (Annual Percentage Rate)
  • व्याजदर म्हणजे तुम्ही कर्ज घेतल्यास किंवा ठेवी ठेवल्यास मिळणाऱ्या किंवा द्याव्या लागणाऱ्या व्याजाची टक्केवारी, जी मुद्दल (principal) रकमेवर आधारित असते. 

उदाहरणार्थ::

कर्ज:

  • जर तुम्ही बँकेकडून 1,00,000 रुपयांचे कर्ज 10% वार्षिक व्याजदराने घेतले, तर तुम्हाला वर्षाला 10,000 रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल.

ठेव:

  • जर तुम्ही बँकेत 1,00,000 रुपयांची ठेव 5% वार्षिक व्याजदराने ठेवली, तर तुम्हाला वर्षाला 5,000 रुपये व्याज म्हणून मिळतील. 

व्याजदराचे घटक:

  • मुद्दल (Principal):कर्जाची किंवा ठेवीची मूळ रक्कम.
  • व्याजदर (Interest Rate): व्याजाची टक्केवारी, जी मुद्दल रकमेवर आकारली जाते.
  • व्याज (Interest): मुद्दल रकमेवर मिळणारे किंवा द्यावे लागणारे व्याज.
  • व्याज आकारणीचा प्रकार (Compounding Frequency):

व्याज कसं आकारलं जातं, उदा. वार्षिक, सहामासिक, किंवा त्रैमासिक.

  1. कालावधी (Time Period):

कालावधी म्हणजे कर्ज किंवा ठेवीची मुदत किती दिवसांची किंवा वर्षाची तो काळ असतो. 

  • वार्षिक टक्केवारी दर (Annual Percentage Rate – APR) म्हणजे कर्जावर (loan) किंवा गुंतवणुकीवर (investment) मिळणाऱ्या व्याजाची (interest) वार्षिक टक्केवारी, ज्यात व्याजासोबतच इतर सर्व खर्च (fees) देखील समाविष्ट असतात.  उदाहरणार्थ, जसं की प्रक्रिया शुल्क, कर्ज काढल्यास लागणारा खर्च, इत्यादी. कर्जाची एकूण किंमतबजी वार्षिक दरानं व्यक्त केली जाते. 

कर्जदारांसाठी हे कर्ज घेताना महत्त्वाचे आहे, कारण ते तुम्हाला कर्जाची एकूण किंमत समजायला मदत करते, ज्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देते, ज्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडण्यासाठी मदत होऊ शकते.

  1. लाभांश (Dividend) आणि भांडवली नफा (Capital Gain)
  • लाभांश: कंपनी तिच्या नफ्यातील काही हिस्सा भागधारकांना (shareholders) वाटून देते, त्यालाच लाभांश म्हणतात. कंपन्या नफा मिळवल्यावर तो पुन्हा व्यवसायात गुंतवू शकतात किंवा भागधारकांना लाभांशाच्या अथवा बक्षीस भागाच्या स्वरूपात वाटू शकतात. लाभांश रोख स्वरूपात (cash), बक्षीस समभाग  (bonus shares) किंवा विशेष लाभांश स्वरूपात दिला जाऊ शकतो. लाभांश बक्षीसभाग दिलेच पाहिजेत असं कोणतंही बंधन नाही जर तुम्हाला लाभांशासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला लाभांश अधिक नियमित देणाऱ्या कंपन्या विशेषत: निवडल्या पाहिजेत. सर्वसाधारणपणे चांगल्या कंपन्यांचा  भाव जास्त असल्यानं लाभांशातून मिळणारा परतावा अत्यंत कमी असतो. 
  • भांडवली नफा: याचा अर्थ आहे कोणत्याही भांडवली मालमत्तेच्या विक्रीतून मिळणारा नफा, जो मालमत्तेच्या मूळ किमतीहून अधिक असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एक घर 10 लाखांना विकत घेतलं आणि 15 लाखांना विकलं, तर 5 लाखांचा नफा हा भांडवली नफा झाला. शेअर्स खरेदी करून ते जास्त किमतीला विकल्यास मिळणारा नफा देखील भांडवली नफा आहे. 

म्हणजेच एखाद्या मालमत्तेच्या (जसं की घर, जमीन, शेअर्स) विक्रीतून मिळणारा नफा, जो त्या मालमत्तेच्या खरेदी किमतीपेक्षा जास्त असतो, त्याला भांडवली नफा म्हणतात. 

आता सर्व भांडवली मालमत्ता, शेअरबाजारात नोंदणीकृत आणि नोंदणी नसलेल्या प्रकारात विभागून त्यातील काळवधीनुसार मिळणारा नफा अल्प अथवा दीर्घ ठरवण्यात येतो. त्यातील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर  विशेष दरानं (12.5%) कर आकारला जातो तर अल्प मुदतीचा बहुतेक नफा उत्पन्नात मिळवून त्यावर नियमित दरानं कर आकारणी होते. अपवाद,

  • भांडवली बाजारात नोंदलेल्या मालमत्तांसदर्भात दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याचा कालावधी एक वर्षाचा असून त्यावरील एक लाख पंचवीस हजारावरील नफ्यावर विशेष दरानं कर आकारणी होते, तर याहून कमी अवधीच्या नफ्यावर सरसकट 20% या विशेष दरानं कर आकारणी होते.
  • 23 जुलै 2024 पूर्वी खरेदी केलेल्या घराच्या बाबतीत दीर्घ कालीन भांडवली नफा मोजताना करदात्यांना सरसकट विशेष दरानं (12.5%) किंवा महागाई निर्देशांक किमतीचा आधार घेऊन मिळणाऱ्या नफ्यावर 20% या विशेष दरानं यापैकी कोणत्याही एका पद्धतीने कर देता येईल. 
  • 1 एप्रिल 2023 नंतर खरेदी केलेल्या रोखे आधारित योजनांच्या युनिटवर ते कधीही विकले तरी त्यावरील नफा हा अल्प मुदतीचा समजून तो उत्पन्नात मिळवून कर आकारणी होईल.

एकमेकांबरोबर उल्लेख केल्या जाणाऱ्या, शब्दांत किंवा शेवटात साम्य असल्याचे सूचित करणाऱ्या आणखी कोणत्या संकल्पना अजून स्पष्ट व्हाव्यात असे आपल्याला वाटते, त्या कळवल्या आणि योग्य वाटल्या तर यापुढील शेवटच्या भागात त्याचा नक्कीच विचार करण्यात येईल.(अपूर्ण)

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.