Reading Time: 3 minutes

माझ्या पत्नीच्या नावाचे, मी सहधारक असलेले सेव्हिंग खाते ऍक्सिस बँकेत आहे. त्याचे क्रेडिट कार्ड मार्केटिंग करणारे लोक लैचं भारी आहेत. ग्राहकांनी त्याचेच  कार्ड काही करून घ्यावेच म्हणून ते इतकी गळ घालतात. त्या प्रकारास एखाद्याच्या मागे हात धुवून लागणे हे कुत्र्यासारखे मागे लागतात असे वाटते. माझ्या पत्नीचे नावे खाते असले तरी मोबाईल नंबर माझा असल्याने सर्व मॅसेज, कॉल मलाच येतात. मध्यंतरी अनेक दिवस या कार्ड मार्केटिंग करणाऱ्या मंडळींनी आपल्या गोड आवाजात पण दररोज चारचार वेळा, वेळी अवेळी कधीही फोन करून भंडावून सोडलं होतं. शेवटी कस्टमर केअरकडे तक्रार करून,  मला क्रेडिट कार्ड नकोय, यापुढे क्रेडिट कार्ड संबंधित फोन आल्यास मी बँकेतील खातेच बंद करेन असा निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यानंतर काही दिवसांनी हे फोन यायचे बंद झाले. माझे अजूनही मन:परिवर्तन होऊन मी त्यांचे क्रेडिट कार्ड घेईन अशी भाबडी आशा त्यांना अजूनही वाटत असावी, त्यामुळेच काही दिवसांनी माझी आठवण झाल्यावर त्यांचा एखादा फोन येतोच.

पूर्वी वारंवार फोन येत असताना आमच्यात होणारा संवाद साधारण असा असायचा-

●हॅलो मी ऍक्सिस बँकेतून बोलतोय

■बोला

●हा अमुक अमुक नंबर अमक्याचा आहे का?

■हो

●मॅडमना जरा फोन देता का

■ती माझी पत्नी आहे पण तुम्ही माझ्याशी बोलू शकता, मी त्या अमुक अमुक  खात्याचा जॉईंट होल्डर आहे.

●बँक आपल्याला लाईफ टाईमसाठी एक क्रेडिट कार्ड ऑफर करतेय त्याचे बल्ला… बल्ला… बल्ला… फायदे, एवढे पॉईंट मिळतील एवढे कॅशबॅक मिळेल वगैरे वगैरे

■मॅडमना थोडे दिव्यांगत्व आलेले असल्याने त्या एकट्या कुठे जात नाहीत, त्यांना कार्ड नकोय.

●असं का? सॉरी सर,  मग तुम्ही घ्याना, आमचं हे क्रेडिट कार्ड त्याचे हे, हे फायदे आहेत, बल्ला… बल्ला… बल्ला…..

■माझ्याकडे दुसऱ्या बँकेचं कार्ड आहे तेच फारसं वापरलं जातं नाही त्यामुळे आम्हाला दुसऱ्या कार्डची गरज नाही.

●घ्याना सर लाईफ टाइम फ्री आहे,ऑफर आहे

■मी (किंचित रागावून) तुम्ही फ्री देताय म्हणजे मी घेतलं पाहिजे अशी सक्ती आहे का?

●अस नाही सर पण…. 

■नकोय आम्हाला कार्ड!


असं म्हणून मी फोन कट करत असे तरी

रोज दिवसातून चार पाच वेळा फोन यायला लागल्यावर मी वैतागलो मग फोनवर

●हॅलो मी ऍक्सिस बँक….

■क्रेडिट कार्ड संबधी आहे का? 

●हो

■आम्हाला कार्ड नकोय 

म्हणून फोन कट


भारतातील खाजगी क्षेत्रातील  मोठी बँक, ऍक्सिस बँक आणि फइब यांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतातील पहिलंच नंबर विरहित को ब्रॅण्डेड क्रेडिट कार्ड ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. आजपर्यंत गेली अनेक वर्षे आपण कार्ड धारकाचे नाव,16 अंकी कार्ड क्रमांक, त्या कार्डची वैधता ही सर्व माहिती सर्वसाधारणपणे एका बाजूवर तर दुसऱ्या बाजूस या कार्डची खात्री सिद्ध करणारा सिविवी क्रमांक असलेलं क्रेडिट कार्ड पहात आलो आहोत. हे नंबर बहुदा खाचलेले किंवा फुगीर असतात, अलीकडे अगदी साधे डिजाईन असलेली कार्डही अनेकांनी आणली असली तरीही त्यावर नंबर असतोच. 10 ऑक्टोबर 2023 रोजी हे नंबर विरहित क्रेडिट कार्ड प्रथमच वितरित करण्यात आलं. यावर फक्त धारकाचे नाव आहे.

        ऍक्सिस बँक आणि फइब यांच्या सहकार्याने ही अभिनव निर्मिती आपल्यापुढे आली आहे. फईब म्हणजेच फेडरेशन ऑफ युरोपियन अँड इंटरनॅशनल इन बेल्जियम, सन 1949 कोणतेही आर्थिक लाभ न  मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेली नामवंत संस्था आहे. आपल्या सभासदांना अनेक बाबतीत योग्य ते मार्गदर्शन आणि मदत या संस्थेमार्फत केली जाते. ते कोणत्याही बाबतीतील व्यावसायिक सल्ला, आवश्यक असल्यास त्या क्षेत्रातील दिग्गजांचा संपर्क, विविध प्रश्नावरील सर्व्हे, अत्यावश्यक प्रशिक्षण, सभासदांच्या अडचणी, विचारांची देवाण घेवाण, वादविवाद, नवीन माहितीची देवाणघेवाण अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. ऍक्सिस बँकेच्या मदतीने त्यांनी हे अधिक सुरक्षित तंत्रज्ञान देऊ केले असून फइबचे मोबाईल अँप्लिकेशन वापरणाऱ्या ग्राहकांना लाभ होईल. याच फइबची भारतातील कंपनी सोशल वर्थ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड येथे आपल्या व्यावसायिक भागीदारांच्या सहाय्याने पूर्णपणे पेपरलेस पद्धतीने तात्काळ कर्ज,पगारदारांना पगाराची उचल देणारा सावकारी व्यवसाय करते. त्कंपनीचे कर्ज देणारे अँप असून, बिगर बँकिंग वित्तीय संस्था म्हणून रिझर्व बँकेकडे कंपनीची नोंदणी झालेली आहे. क्रेडिट कार्ड वरील व्यवहार हे एक कर्जच आहे, त्यावर ग्राहकांची वैयक्तिक माहिती नसल्याने  कार्डवरील माहितीच्या चोरीमुळे होणारे गैरव्यवहार टळतील. ग्राहक या कार्डावर विश्वास ठेवून निश्चिंत राहू शकतात असा ऍक्सिस बँकेच्या कार्ड विभागाचे प्रमुख संजीव मोघे यांचा दावा आहे. 

        या कार्डावरून उपहारगृह, मनोरंजन, पर्यटन यासंबंधी ऑनलाइन व्यवहार केल्यास दरमहा ₹1500/- च्या अधिकतम मर्यादेत 3% कॅशबॅक मिळेल. या नवीन कार्डाची ऑपरेटिंग एजन्सी व्हिसा, मास्टरकार्ड नसून एनपीसीआयने विकसित केलेली रूपे ही स्वदेशी आहे. याशिवाय हे कार्ड कोणत्याही यूपीआय प्रणालीशी जोडले जाऊ शकते त्यामुळे हेच क्रेडिट कार्ड वापरून ग्राहक गुगल पे, पेटीएम, फोनपे यासारख्या अँप्लिकेशन बरोबर त्यास लिंक करून पेमेंट करू शकतात. याचा वापर करून वर्षातून चारदा देशांतर्गत एअरपोर्टवरील लॉन्ज सेवेचा उपभोग घेता येईल. कार्डचा वापर करून ₹400/- ते ₹5000/-पर्यंत इंधन खरेदी केल्यास त्यावर सरचार्ज घेतला जाणार नाही. वेळोवेळी ऍक्सिस बँकेकडून दिल्या जाणाऱ्या विविध ऑफर्सचा कार्डधारकांना लाभ घेता येईल. फइबच्या ग्राहकांना हे कार्ड फिजिकल स्वरूपात त्याचप्रमाणे अँपवरदेखील मिळेल. त्याचा आयुष्यभर मोफ़त वापर करता येईल तसेच ते घेण्यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही.

      नंबर नसलेल्या कार्डचा वापर, हा सध्या जगभरात नव्याने आलेला ट्रेंड आहे. यातील फिजिकल कार्ड हरवले तरी तुमची माहिती अँपमध्ये सुरक्षित असल्याने त्यापासून कोणताही धोका संभवत नाही. हे कार्ड वापरणारा ग्राहक टेक्नोसॅव्ही असावा त्याला अँप वापरून कार्ड व्यवहारांवर नियंत्रण ठेवता यायला हवं. डिजिटल व्यवहार करणारी तरुणाई हे या क्रेडिट कार्डचे संभाव्य ग्राहक आहेत. भारतीय रिझर्व बँकेने अलीकडेच निवडक बँकांना त्याच्या  ग्राहकांना क्रेडिट लाईन ही कर्ज सुविधा देण्याची परवानगी दिली आहे त्यास अनुसरून या क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक ग्राहकांना घेतलेल्या कर्जाचे विविध माध्यमातून सुरक्षितरीत्या पेमेंट करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

 

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावीत, लेखात माहिती दिलेले क्रेडिट कार्ड आणि अन्य तात्काळ कर्ज योजना यांची कोणतीही शिफारस नाही)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.