Reading Time: 3 minutes

विकसित देशातील आरोग्य सुविधा तिथल्या नागरिकांचे स्वास्थ्य राखून तेथील नागरिक अशी सेवा स्वीकारण्यात सक्षम आहेत. भारतात प्रचंड लोकसंख्या, गरिबी आणि कमी अर्थसंकल्पीय तरतूद यामुळे सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरचा ताण लक्षात घेता त्यात स्थैर्य आणि विश्वास येण्यासाठी अजून कितीतरी वर्ष जातील. आरोग्य विम्याच्या वर्गणीवर आणि वैद्यकीय तपासण्या यासाठीच्या खर्चावर, आपण जुन्या पद्धतीने उत्पन्नाची मोजणी करणार असाल तर आयकरात काही सवलतीही आहेत.

 साहजिकपणे सर्वांनाच आपण आरोग्य विमा घेतला म्हणजे आपण निश्चिंत झालो असे वाटत असणार पण असा विमा घेत असताना त्यातील बारकावे किती लोक तपासून घेत असतील? जेव्हा काही कारणाने इस्पितळात दाखल करण्याची वेळ एखाद्या कुटुंबावर येते, तेव्हा विमा कंपनी म्हणते कि हा आजार किंवा उपचार आमच्या विमा योजनेत गृहीत धरलेला नाही आणि मग कुठेतरी आपली फसवणूक झाली असल्याची भावना मनात निर्माण होते. 

 

 

    आरोग्य विमा कसा असायला हवा आणि कुठल्या गोष्टी जागरूकतेने तपासून घ्यायला हव्या ते आपण आता पाहुया-

  • आरोग्यविमा हा ग्राहक आणि विमा कंपनी यांच्यातील करार असून त्याची अंमलबजावणी करारातील अटी आणि शर्तीनुसारच होते.
  • साधारणपणे लहान मुलांसाठी 3-5 लाख व मोठ्या माणसांसाठी 10 लाख कव्हरेज देऊ शकेल, एवढा विमा घेणे प्राप्त परिस्थितीत आवश्यक आहे. 
  • आरोग्य विम्यामध्ये वैयक्तिक विमा आणि कुटुंब विमा असे 2 पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या कुटुंबात 4 सदस्य असले तर चारही सदस्यांचा मिळून जर एक कुटुंब विमा काढला तर त्याचा हफ्ता हा वैयक्तिक विम्यापेक्षा कमी असणार पण विम्याचे मिळणारे संरक्षणसुद्धा चार लोकांमध्ये विभागले जाणार, हे लक्षात ठेवूनच कुटुंब विमा घेतला जायला हवा.

नक्की वाचा : Health Insurance Premium – तुमचा आरोग्य विमा प्रीमियम कमी कसा कराल ?

  • कुटुंब विमा घेताना आरोग्य विमा देणारी कंपनी परिवारातील ज्येष्ठ सदस्याचे वय लक्षात घेऊन त्यांना आधीपासून असलेल्या आजार आणि  इतर बाबी लक्षात घेऊन चार्ज किती असावा हे ठरवत असते.
  • आवश्यक असल्यास कुटुंब विमा घेताना वयोवृद्ध लोकांसाठी वेगळा आणि इतर सदस्यासाठी वेगळा आरोग्य विमा घेण्याचा विचार करावा. या विम्याचा जुन्या पद्धतीने करमोजणी करताना आयकर सवलत मिळवण्यात कोणतीही अडचण येत नाही. 
  • प्रत्येक योजनेत एखाद्या आजारासाठी जास्तीत जास्त किती भरपाई मिळते ते दिलेले असतं, ते आपल्या गरजेनुसार आहे का हे तपासावं.
  • तुम्ही उपचारासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल होता त्या हॉस्पिटलच बिल हे तुमच्या खोली भाड्यावर  अवलंबून असत. याची अधिकतम मर्यादा तपासावी अन्यथा औषधे सॊडून इतर खर्च ही प्रमाणशीर पद्धतीने कमी होऊन त्याचा भुर्दंड तुमच्यावर येतो.

 

नक्की वाचा : Life After retirement  : निवृत्तीनंतर करा ‘असे’ आर्थिक नियोजन

  • काही योजना को पे पद्धतीच्या म्हणजेच विमा कंपनीच म्हणण्यानुसार “थोडं तुम्ही भरा , थोडं आम्ही भरतो”  याची वर्गणी थोडी कमी असते. ज्यांनी जाणीवपूर्वक अशी योजना घेतली त्यांनी आपल्याला काही पैसे भरावे लागतील याची नोंद घ्यावी.
  • अनेक योजनांत विविध आजाराची भरपाई किती दिवसांनी मिळू शकते याचा स्पष्ट उल्लेख असतो. तो एक महिन्यापासून 3 महिन्यापर्यंत  असू शकतो. याशिवाय पूर्वीपासूनच असलेले आजार आणि गंभीर आजार यांची भरपाई किती कालावधीनंतर मिळेल  ते तपासून घ्यावं.
  • अनेक योजनांत एकदा झालेला आजार त्याचवर्षी पुन्हा झाल्यास त्याची भरपाई मिळत नाही, हे तपासून घ्यावं.
  • अनेकदा तुम्ही शहरात किवा गावात राहता यानुसार योजनेची वर्गणी बदलते हे पाहणं तितकच महत्वाच असते.
  • कोणत्या आजारांची कोणतीही भरपाई अजिबात मिळत नाही त्याची यादी असते ती नीट तपासून पाहावी. 
  • कॅशलेस किंवा भरपाई पद्धतीने दावा मंजूर होण्याचा कालावधी, डे केअर उपचार, हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी आणि नंतर किती दिवस उपचार मिळणार त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच एकही दावा नसल्यास योजना नूतनीकरण करताना मिळू शकणारे फायदे नमूद केलेले असतात ते पहावे.
  • अलीकडे नवीन योजनांत टॉप अप सुपर टॉप अप सवलती असतात यामुळे वर्गणी किंचित वाढते. त्यामुळे काय फायदे होतात ते समजून घ्यावे.
  • योजना एक वर्षाची असते तिचे वेळेत नूतनीकरण करावे अलीकडे 2 ते 3 वर्षाचा विमा प्रीमियम भरण्याची सोय आहे शक्य असल्यास त्याचा लाभ घेता येईल. असा विमा प्रीमियम प्रमाणशीर पद्धतीने प्रत्येक वर्षावर विभागून आयकर सवलत घेता येते.

 

नक्की वाचा : कॅशलेस आरोग्य विमा पॉलिसीचे फायदे

 

 

ही यादी परिपूर्ण नाही, यात सावधगिरीचा उपाय म्हणून अजून काही गोष्टी वाढवता येतील. त्याप्रमाणे आपली गरज, आर्थिक परिस्थिती, जरूरी ओळखूनच आरोग्य विमा निवडावा यासाठी योग्य सल्लागाराची मदतही घेऊ शकता. तरीही आरोग्य विमा पॉलिसी मिळाल्यावर ती आपल्याला सांगण्यात आली तशीच आणि आपल्या गरजा पूर्ण करणारी आहे ते तपासून घ्यावे त्यावरील मजकूर समजायला कठीण असल्यास योग्य व्यक्तीकडून समजून घ्यावे यात काही तफावत असेल तर पॉलिसी मिळाल्यापासून कोणतेही कारण न देता ती रद्द करता येते. अशावेळी काही प्रशासकीय खर्च वगळून आपली विमा प्रीमियम परत मिळतो या सवलतीचा गरज पडल्यास वापर करावा.

 अनेकदा एखादी गोष्ट खरेदी केल्यावर त्याचा मला काय फायदा हा विचार मनात येणे साहजिक आहे  पण या योजनेतील विमा प्रीमियम पासून आपल्याला काही कठीण प्रसंग आलाच तर माझी पॉलिसी आहे एवढेच समाधान मिळावे ती वापरावी लागू नये या सदिच्छा!

 

 

©श्रीवरद वाटवे

अर्थ अभ्यासक

(आरोग्यविम्याची सर्वसाधारण माहिती देणारा हा लेख आपल्याला कोणतीही शिफारस करीत नसून आपण आपल्या आर्थिक सल्लागाराशी याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

प्रवासविमा (Travel Insurance)

Reading Time: 3 minutes विमा हा विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील करार आहे आणि जोखीम व्यवस्थापन…