Reading Time: 4 minutes

 

          एखादी कल्पना, प्रकल्प किंवा व्यवसाय कितीही वेगळा, समाजोपयोगी किंवा धाडसी असला तरी तो पूर्णत्वास जाण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. यासाठी क्राउडफंडिंग हा निधी उभारणीचा पर्याय आहे. ही एक निधी उभारणी करायची पर्यायी योजना AIF (पर्यायी गुंतवणूक निधी) असून तो गोळा करण्यासाठी अनेकांना त्यात सहभागी करून घेतले जाते. समभाग देण्याचे सोडून सर्व प्रकारच्या क्राउडफंडिंगला सेबी परवानगी देते. समभाग म्हणून गुंतवणूक करायची असल्यास त्यासाठी पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून किमान गुंतवणूक ही अन्य गुंतवणूक तुलनेत खूपच मोठी आहे. फक्त उद्योगासाठी नाही तर सामाजिक, शैक्षणिक, संशोधन किंवा काही विशिष्ट हेतूने फार पूर्वीपासून क्राउडफंडिंग केले जात असून ते अनुषंगित नियम पाळल्यास पूर्णपणे कायदेशीर आहे. 

          अशा प्रकारे निधी जमा करून देणारे समर्पित असे विविध मंच सन 2000 पासून कार्यरत आहेत जे उद्योगांना/ संस्थांना  निधी उभारून देण्यात मदत करतात. निधी उभारणीचे  उद्दिष्ट निश्चित असल्यास ते पूर्ण करण्यासाठी सुयोग्य मंचाची मदत घेता येऊ शकेल. निधी उभारणीच्या कारणांची स्पष्टता आणि त्यासाठी अपेक्षित रक्कम निश्चित झाल्यावर अशा मंचाच्या मदतीने निधी गोळा करण्याची मोहीम आखली जाते. त्यामध्ये उद्दिष्ट, त्यासाठी लागणाऱ्या निधीची आवश्यकता स्पष्टपणे नमूद करून त्याचा पद्धतशीरपणे प्रचार आणि प्रसार केला जातो. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करून तेथे सदर मोहीम प्रसारित करून मदत करण्याचे आवाहन केले जाते. त्याद्वारे मदत करू शकणाऱ्या संभाव्य लोकांना तुम्ही आकर्षित करून घेऊ शकता. अपेक्षित निधी गोळा झाल्यावर, मंचाची फी वजा करून उरलेली रक्कम संबंधीत संस्थेच्या/ उद्योगाच्या खात्यात जमा केली जाते.

भारतातील सुप्रसिद्ध क्राउडफंडिंग मंच-स्थापना वर्ष- मंच फी

 • गिव्ह इंडिया (सन 2000) 9.1% 
 • मिलाप (सन 2010) विनामूल्य
 • केट्टो (सन 2012) सन 2020 पासून विनामूल्य
 • डोनेटकार्ट (सन 2018) विनामूल्य
 • इम्पॅक्टगुरू (सन 2014) 8%

क्राउडफंडिंगचे प्रकार-

 • कर्ज आधारित निधी (पी2पी):

यामध्ये गरजू व्यक्ती संस्था अनेक व्यक्ती अथवा संस्थाकडून ऑनलाइन कर्ज घेतात यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. अगदी सुरवातीच्या टप्यातील स्टार्टअप अशा व्यवसाय कर्ज आधारित क्राउडफंडिंग पद्धतीने निधी जमा करतात कारण कर्ज पत इतिहास नसलेल्यासाठी बँका किंवा वित्तीय संस्थाकडून कर्ज मिळवण्यात अधिक दिवस जाऊ शकतात त्याचप्रमाणे त्यावर ठराविक कालावधीनंतर  व्याजही द्यावे लागते.

 • पुरस्कार आधारित निधी:

या मध्ये गरजू व्यक्ती / संस्था दुसऱ्या अनेक व्यक्ती किंवा संस्था यांच्याकडून देणगी स्वरूपात कर्ज घेतो त्याची परतफेड न करता मूर्त अमूर्त स्वरूपात बक्षीस देऊन त्याची परतफेड केली जाते. भविष्यात त्याच्या गुंतवणूकीबद्धल निश्चित समभाग देऊन त्याची परतफेड करता येईल किंवा एकाद्या व्यक्तीस ऑनलाइन बातम्या देणारी संस्था सुरू करायची आहे ती चालू झाल्यावर देणगीदाराना बक्षीस स्वरूपात बातम्यांचे आजीवन सभासदत्व देऊन त्याची परतफेड करता येऊ शकेल.

 • मागणी पूर्व निधी: 

उद्योगासाठी उपयुक्त अशी ही निधी रचना असून व्यावसायिक गुंतवणूकदारास त्याने दिलेल्या निधीच्या ऐवजी उत्पादनाची पहिली तुकडी (Batch) बाजारात येण्यापूर्वी उत्पादीत माल पूर्वनिर्धारीत किंमतीस देण्याचे वचन देतो.

 • समभाग आधारित निधी: 

यातील गुंतवणूक ही थेट समभागात केलेली असते. समभाग निगडित जोखीम त्यात असते.यातील एकाहून अधिक प्रकार एकत्रित करून त्याद्वारेही निधी उभारणी करता येते.

हे वाचा  : पीएम सूर्य घर मोफत वीज योजना : नवीन सोलर रूफटॉप योजनेची सबसिडी कशी मिळवायची?

विविध स्टार्टअप आणि उद्योजकाना निधी उभारणीमुळे होणारे फायदे-

 • यातील अनेक निधी उभारणी मंच विनामूल्य काम करतात तथापि उत्पादनाच्या विक्रीसाठी साहाय्य करणारे काही मंच देणगी स्वरूपात काही निश्चित रक्कम घेतात.
 • निधीसाठी योग्य वापरकर्त्याच्या शोधात अनेकजण आहेत अशा व्यक्ती या मूळ कल्पनेच्या भविष्याचा वेध घेणारे असतात. त्यामुळे तारण विरहित भांडवल उपलब्ध होते.
 • याचा महत्वाचा फायदा म्हणजे उत्पादने / सेवा बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी घेण्याची परवानगी प्रचारकाना असते ते गुंतवणूकदारांना/ देणगीदारांना ते आपली उत्पादने/ सेवा पाठवू शकतात त्यांचा अभिप्राय समजून घेऊन योग्य ते बदल करू शकतात. विपणन साधन म्हणूनही याचा वापर करता येतो.
 • निधी संकलनाच्या मोहिमेतून होणाऱ्या देवाणघेवाणीतून महिमेस महत्व देऊ शकणारा नवा दृष्टीकोन उद्योजकास मिळू शकतो.
 • व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळवणे ही मोठी गुंतागुंतीची आणि दीर्घकाळ घेणारी प्रक्रिया असून निधी गोळा करून लक्ष साध्य झाल्यास पारंपरीक पद्धतीने कर्ज मिळवणे / भांडवल बाजारात प्रवेश करणे सुलभ होते.
 • नव्या विस्तार योजनेस निष्ठावान ग्राहक, समर्थक यांची मोठी फळी निर्माण होते.

संस्थेच्या उद्योगाच्या दृष्टीने निधी उभारणीचा हा किफायतशीर पर्याय असला तरी गुंतवणूकदार म्हणून अशी गुंतवणूक निश्चित जोखमीची ठरू शकते. त्यामुळे अशी गुंतवणूक करण्यापूर्वी-

 • देणगीदार/  गुंतवणूकदारांनी संशोधन करावे यात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 • समभाग आधारित म्हणून पर्यायी गुंतवणूक निधी म्हणून गुंतवणूक करताना यात अन्य गुंतवणुकीच्या तुलनेने मोठी रक्कम गुंतवावी लागते अशी गुंतवणूक केवळ उच्च उत्पन्न असलेले गुंतवणूकदार (HNI)  किंवा देवदूत (Angel) गुंतवणूकदारच करू शकतात. सेबी मान्यताप्राप्त क्राउडफंडिंग गुंतवणूकदार म्हणून मान्यता मिळवण्यासाठी नोंदणीकृत कंपनीची मालमत्ता 20 कोटी रुपयांची तर उच्च मालमत्ता गुंतवणूकदारांची मालमत्ता किमान 2 कोटी असावी लागते तर सर्वसामान्य गुंतवणूकदाराची किमान गुंतवणूक क्षमता सेबीच्या नियमानुसार  विविध प्रकारात 25 लाख ते 1 कोटी एवढी असावी लागते.

हे ही वाचा : शेअरबाजारातील तेजीतून गुंतवणूकदारांनी घ्यायचे बोध

यशस्वी क्राउडफंडिंग कसे करता येईल-

 • आपल्या उपक्रमाच्या अनुसार निधी उभारणीची योजना ठरवणे आणि त्याला निधी जमा करू शकणाऱ्या अनुरूप मंचाची निवड करणे.
 • वास्तववादी ध्येय निश्चित करणे त्याची निश्चित रूपरेषा मांडणे जेणेकरून संभाव्य गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होतील.
 • गुंतवणूकदारांना आकर्षित करणारे माध्यम पर्याय वापराणे यात लिंकडीनसारखे मंच, इ मेल मार्केटिंग, मेसेजिंग अँप याचा करता येईल, थेट जाहिरात करता येत नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींची यासाठी मदत होऊ शकते.
 • गुंतवणूकदारांना विश्वासात घ्यावे वेळोवेळी मोहिमेतील प्रगतीची माहिती द्यावे.
 • होता होई तो दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

क्राउडफंडिंग मंच म्हणून आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबी-

 • सेबीकडे निधी गोळा करणारा मंच म्हणून नोंदणी आवश्यक.
 • मोहिमेबद्धल सर्व माहिती उघड केली पाहिजे
 • मोहिमेच्या निर्मात्यांनी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे हे मंचाकडून अपेक्षित आहे.
 • मनी लोंड्रींग विरोधी कायद्याचे पालन केले पाहिजे.
 • पेमेंट सिस्टीम गेटवे आणि भारतीय रिजर्व बँक यांनी आखून दिलेल्या नियमांचे पालन करायला हवे. 

        कोणताही उपक्रम पुरेसा पैसा नसेल तर प्रत्यक्षात येणे कठीण आहे. कोणी कुणाला असेच पैसे का म्हणून द्यावेत? पैसे देण्यामागे त्यामागे एक तर  मदत योग्य त्या गरजू व्यक्तीकडे पोहीचल्याचे  मानसिक समाधान असू शकते किंवा भविष्यात मिळू शकणारे फायदे असे सुप्त हेतू असू शकतात.  प्रपंच या बोलपटासाठी गदिमांनी लिहिलेल्या लोकप्रिय गाण्याचे –

पोटापूरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी,

देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.    असे बोल आहेत.

        तुमची इच्छा आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर व्यवसाय सुरू करण्याच्या सुरवातीच्या कालखंडात निधी उभारणीस पर्याय म्हणून  फारशा लोकप्रिय नसणाऱ्या या अभिनव मार्गाचाही  निश्चित विचार करता येईल. आता अनेक इतर गोष्टीसाठी ही निधी संकलन या माध्यमातून होत आहे.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या कार्यकाराणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक आहेत.)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…