Reading Time: 6 minutes

कुणावरही अवलंबून न राहता आपल्या मर्जीनुसार हवे तसे पैसे स्वतः खर्च करता येणं म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य असं ढोबळमानाने म्हणता येईल. यासाठीची तरतूद खूप आधीपासूनच करावी लागते. सध्या अस्तित्वात असलेली आपली जीवनशैली आहे तशीच ठेवायची असेल तर त्यासाठी उपलब्ध रक्कम किती आहे. या रकमेची गुंतवणूक करीत असताना आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. याचा विचार करायला हवा. यासाठी आधी महागाई म्हणजे काय? त्याचबरोबर एखाद्या गोष्टीतील नफा/ नुकसान म्हणजे काय? याच्या संकल्पना आपल्या मनात पक्या असायला हव्यात.

 • आपल्या गरजेच्या आणि गरज नसलेल्या वस्तू आणि सेवा यांच्या भावात चढउतार होत असतात. काही कालावधीनंतर वाढलेले भाव लक्षात आले तर त्यास आपण महागाई झाली असे म्हणतो. 
 • आपली अर्थव्यवस्था तुटीची असल्याने चलनाचे मूल्य कमी होऊन भाववाढ अपरिहार्य होते. यातही ही भाववाढ पाहिली तर असे लक्षात येईल की अन्नधान्य, दुधदुभते, भाजीपाला याचे भाव सरासरी महागाईच्या तुलनेत फारसे वाढले नाहीत पण आरोग्य आणि शिक्षण या वरील खर्चात सातत्याने सर्वसाधारण महागाई दाराहून वाढत आहे.
 • यावर मात करणारी अशी आपली गुंतवणूक असायला हवी त्याचप्रमाणे ती कमी जोखीम युक्त असावी त्याचप्रमाणे ती मोडून कधीही पैसे उभे राहू शकतील अशी हवी. या सर्व गोष्टी पूर्ण करणारी कोणतीही योजना सध्या अस्तीत्वात नसल्याने महागाईवर मात करण्यासाठी केवळ पारंपरिक गुंतवणूक करून भागणार नाही त्यासाठी थोडी जोखिमयुक्त गुंतवणूक करायला हवी.
 •  यासोबत गुंतवणूक करीत असता होणारा नफा किंवा तोटा हा विक्री व्यवहार पूर्ण झाला की होतो. कागदोपत्री दिसणारा नफातोटा हा आभासी आहे.

आपल्या उत्तरायुष्यात जोखीम घेण्याची क्षमता कमीकमी होत जाते त्यामुळे गुंतवणूक वेगवेगळ्या प्रकारात विभागली की त्यातील जोखीम कमी होते. नोकरी करीत असल्यास पेन्शन आणि फंड या स्वरूपात तर व्यवसायातून निवृत्त होताना पुरेशी आर्थिक तरतूद केली तर मोठी रक्कम जमा होते. 

 • अगदी सुरवातीपासून उत्पन्नाच्या 10% गुंतवणूक केल्यास 30/35 वर्षात मोठी रक्कम जमा होते. ज्यांना महागाईशी निगडित पेन्शन मिळते त्यांना आणि त्यांच्या जोडीदारास आयुष्यभर पेन्शन मिळते, त्यामुळे त्यांना फंडाची रक्कम कमी असली तरी फारसा फरक पडत नाही. 
 • त्याचप्रमाणे काही लोकांना आयुष्यभर आरोग्यसेवा मिळत असल्याने फारशी चिंता करण्याची गरज नसते. असे मोजके भाग्यवंत सोडल्यास दैनंदिन जीवनातील सर्वच खर्च आपल्याला करावे लागतील किंवा कुणावर तरी अवलंबून राहावे लागेल.

सरसकट सर्व ज्येष्ठांना उपयोग होईल अशी कोणतीही कल्याणकारी योजना सरकार कडून उपलब्ध नाही. ज्या योजना आहेत त्या अल्प उत्पन्न गटासाठी मर्यादित आहेत तर ज्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे त्यांना महागाईशी सामना करण्याची चिंता नसते. 

 • सध्या लोकसंख्येच्या 10% ज्येष्ठ नागरिक आहेत असे गृहीत धरल्यास काही मोजकेच लोक सोडून बहुतेक ज्येष्ठ नागरिक हे सरकार आणि समाज या दोन्हीकडून उपेक्षित आहेत. 
 • त्यामुळे निवृत्ती स्वीकारताना हातात मोठी रक्कम असली तरी तिची योग्य पद्धतीने विभागणी होयला हवी. ती करताना व्यक्तीचे वाढते आयुर्मान विचारात घेऊन पुढील 30 वर्षांचे नियोजन करायला हवे ते करताना दिवसेंदिवस वैद्यकीय खर्चात होणारी वाढ दुर्लक्षित करून चालणार नाही. 
 • त्यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदतही घेता येईल.चांगला गुंतवणूक सल्लागार योग्य ती फी आकारून आपल्या सर्व गरजा शक्यता यांचा विचार करून आपल्याला गुंतवणूक पर्याय सुचवू शकेल.

हे वाचा : स्थावर मालमत्ता आणि पायाभूत सुविधेतील आधुनिक गुंतवणूक पर्याय

गुंतवणूक पर्याय : आता उपलब्ध असलेले काही गुंतवणूक पर्याय सुचवतो त्यातील आपल्याला कोणते आपल्याला लागू पडतील ते जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावे. यातील पाहिले तीन पर्याय सर्वाना लागू पडतील त्यास कोणतेही अन्य पर्याय नाहीत.

आरोग्यविमा: 

 • आपल्याकडे पुरेसा आरोग्यविमा असणे ही काळाची गरज आहे कारण वैद्यकीय खर्चात झालेली बेसुमार वाढ.एखादे मोठे आजारपण आपली सर्व जमापूंजी क्षणार्धात नाहीशी करु शकते. 
 • आपल्याकडे आरोग्यविमा असेल तर तो असल्याचे मानसिक समाधान मिळते आणि आजारपण आल्यास काही प्रमाणात मदत होते.अशा प्रकारची सवलत आपणास आधी घेतलेल्या योजनेतून, आपल्या पुर्वीच्या व्यवस्थापनाकडून अथवा आपल्या मुलामुलींकडून मिळत असेल तर ठीक, अन्यथा यासाठी तरतूद करणे जरुरीचे आहे. 
 • अनेक  बँकांच्याकडून त्यांच्या खातेधारकांसाठी गट आरोग्यविमा योजना  उपलब्ध आहे. सर्वात कमी किंमतीत मिळणारा हा आरोग्य विमा असून या पर्यायाचा अवश्य विचार करावा आणि दरवर्षी आठवणीने त्याचे नूतनीकरण करावे. 
 • आपल्या जास्तीच्या गरजेसाठी पॉलिसीबाजार, पॉलिसी एक्स या संकेतस्थळावरून आरोग्यविमा देणाऱ्या कंपनीचा शोध घेवून त्याचा हप्ता ऑनलाइन भरावा. अशा प्रकारे हप्ता भरल्यास भरीव बचत (20%)होते. काही कंपन्या 2/3वर्षांचा हप्ता एकदम स्वीकारून त्यात काही सवलत देत आहेत त्यांचाही विचार करता येईल.

वरिष्ठ नागरिक बचत योजना: 

 • आपली सध्याची जीवनशैली कायम ठेवण्यासाठी नियमीत उत्पन्नाची गरज आहे. सध्या आपली जमाराशी सुरक्षित ठेवून सर्वाधिक वार्षिक 8.2%व्याज देणारी सीनियर सिटीझन सेव्हीग स्कीम 2023  ही एकमेव सरकारी योजना आहे. 
 • या योजनेचे खाते पोस्ट, सरकारी /खाजगी बँकेत काढता येते. हे पैसे कुठेही ठेवलेले असतील तरी ते सरकारकडे असल्याने पूर्ण सुरक्षित आहेत. व्याज दर तिमाहीस  मिळते. 
 • या योजनेमध्ये एका व्यक्तीस जास्तीत जास्त 30 लाख रुपये ठेवता येतात. जोडीदारासह संयुक्त खाते काढता येऊ शकते.  एवढी रक्कम ठेवल्यास तिमाहीस ₹61500/- म्हणजेच मासिक ₹20500/-ची सोय होते. 
 • व्याज करपात्र असून गुंतवणुकीला 80/सी च्या मर्यादेत सूट मिळते. जोडीदार आपापल्या प्रथम नावे स्वतः अथवा जोडीदारासह प्रत्येकी 30 लाख रुपये ठेऊ शकतो.

महत्वाचे: SIP – म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायचे हे 7 पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

डिव्हिडंड देणाऱ्या युनिटची  खरेदी: 

 • म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करून जोखीम कमी होऊ शकते. यातील युनिटच्या मालमत्ता काही प्रमाणात खाली आल्या तरी कालांतराने त्यात वाढ होतेच त्यामुळे यातील जोखीम ही सामान्य असल्याने नजीकच्या काळात फारशी गरज नसलेली रक्कम तेथे गुंतवून  मासिक किंवा त्रैमासिक पद्धतीने डिव्हिडंड देणाऱ्या आकर्षक परतावा देणाऱ्या युनिटची खरेदी करता येईल. सर्वसाधारण गुंतवणूक धोरण म्हणून ही पद्धत आपल्याला वापरता येईल. याशिवाय गुंतवणूक म्हणून असलेले पारंपरिक आणि त्याला पूरक आधुनिक पर्याय असे-
 • मुदत ठेव योजना: अडीअडचणीस उपयोग व्हावा म्हणून काही रक्कम बचत खात्यातठेवण्याऐवजी बँक किंवा कंपनीच्या मुदत ठेवीत ठेवली जाते. ही रक्कम मधेच काढून घेतली तर व्याजाचे नुकसान होते यास पर्याय म्हणून म्युच्युअल फंड डेट योजनांचा वापर करता येईल. त्यावर थोडा अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.
 • आवर्ती ठेव ( रिकरिंग) योजना: यात दरमहा ठराविक रक्कम गुंतवून योजना पूर्ण झाल्यावर एकरकमी पैसे काढून घेऊ शकतो यावर मिळणारे व्याज मुदत ठेवींवरील व्याजाएवढे असते. याला पर्याय म्हणून म्युच्युअल फंडाच्या योजनेत निरंतर गुंतवणूक करणे. यात ठराविक अंतराने पैसे गुंतवता येतात. यातील पैसे कधीही काढून घेता येतात यावर दीर्घकाळात अधिक परतावा मिळू शकतो.
 • सोने: गुंतवणूक म्हणून सोने हा योग्य पर्याय असला तरी प्रत्यक्षात त्याचा वापर गुंतवणूकदार करीत नसल्याने त्यातील गुंतवणूकीस गुंतवणूक समजले जात नाही. प्रत्यक्ष सोने किंवा दागिने घेऊन ही गुंतवणूक केली जाते त्याऐवजी इ गोल्ड, गोल्ड इटीएफ, इजिआर, सोन्यातील वायदे व्यवहार हे स्मार्ट पर्याय गुंतवणूकदारांना उपलब्ध आहेत.
 • स्थावर मालमत्ता: एके काळी यातील गुंतवणूक किफायतशीर होती. सध्या मालमत्तांच्या किमती वाढल्याने आता ही गुंतवणूक पांढरा हत्ती ठरून आपला रोखता प्रवाह थांबवू शकते. रिटस, इनव्हीट यासारखे आधुनिक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत.
 • विविध पेन्शन योजना: यातील व्याजदर हे बाजारातील व्याजदराहून कमी असतात. त्याऐवजी एनपीएसचे खाते 70 व्या वर्षांपूर्वी काढल्यास त्यात 75 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते ज्यावर अधिक परतावा मिळेल. खाते पूर्ण होण्याच्या वेळेत 60% रक्कम करमुक्त म्हणून मिळते उरलेल्या रकमेची पेन्शन योजना घ्यावी लागते.
 • दुर्मिळ वस्तू, नाणी, तिकिटे, चित्रे हे पूर्वीपासून उपलब्ध असलेले पर्याय योग्य असले तरी त्यातील गुंतवणूक त्यातून मिळणारा परतावा अनिश्चित असून त्याची जपणूक करणे हे खर्चिक आहे.

याशिवाय,गुंतवणूक म्हणून-रिझर्व बँकेचे बदलत्या व्याजदराने रोखे, पी2पी लेंडिंग, अधिक रक्कम असल्यास पीएमएस योजना असे पर्याय आहेत.

काही नियम आणि सवयी : पैसे आहेत म्हणून भरमसाठ खर्च करणे आणि पुरवायचे आहेत म्हणून कंजूषपणा करणे यातील मध्यममार्ग स्वीकारावा. यासाठी काही नियम सवयी अंगिकराव्यात,उदा-

 • योग्य किमतीत योग्य वस्तू विकण्याचे उचित व्यवहार जेथे होतात तेथे वस्तूंची खरेदी करावी.
 • नियमित औषधे, आरोग्य तपासण्या कराव्या लागत असल्यास काही दुकाने औषधांच्या किमतीवर 20% सवलत देतात तेथे खरेदी करावी, नियमित तपासण्या काही ट्रस्ट मार्फत कमी दरात केल्या जातात तेथून करून घ्याव्या.
 • ब्रॅण्डेड औषधे खरेदी करण्याऐवजी जेनेरिक औषधे विकत घेता येतील का? ते पाहावे.
 • गुंतवणुकीची व्यवस्थित नोंद ठेवावी, शक्यतो वारसास नामनिर्देशित करावे. काही भाग अन्य कोणास देण्याची इच्छा असेल तर मृत्युपत्र बनवून त्याची नोंदणी करावी.
 • आपल्या व्यवहारातून करदेयता वाढणार नाही याची काळजी घ्यावी. करबचत करून आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल ते पाहावे.
 • खर्चाचा आढावा घेऊन अनावश्यक खर्च टाळावा.

आपल्याला पैसे मिळणार आहेत असे समजले तर आपल्या सभोवती अनेक जण अनेक हेतूने आजुबाजुस जमा होतात. यात मित्र,नातेवाईक, विविध योजनांचे अभीकर्ते, बँक कर्मचारी यांचा समावेश होतो. ते त्याना रस असलेल्या किंवा ते ज्यांचे अभीकर्ते आहेत अशाच योजना किंवा बँक कर्मचारी त्यांच्या बँकेने पुरस्कृत केलेल्या योजना प्रामुख्याने त्यांच्या फायद्यासाठी आपल्या गळ्यात कशा अडकवता येतील यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतात. 

त्यांच्या दृष्टीने आपण त्यांचे मित्र कमी आणि संभाव्य गिऱ्हाईक जास्त असतो. मात्र ते, त्याना आपली किती काळजी  वाटते,असे दर्शवतात एकदा का तुम्ही त्यांच्या योजनेत सहभागी झालात की एकदम अनोळखी व्यक्तिसारखे वागू लागतात. यातील काही लोक तर इतके गळी पडतात की ते आपल्यावर जात, धर्म, मराठी माणूस,मैत्रीची शपथ,पूर्वी त्यांनी केलेली मदत, गरीबी यासर्वाचा भांडवल म्हणून वापर करतात त्यांची योजना सोडून दुसऱ्या योजनेचे नाव जरी काढले तरी  ती योजना कशी बंडल आहे ते पटवण्याचा प्रयत्न करतात. आपण तरीही बधलाे नाही तर शेवटी माझ्यासाठी तरी किमान काहीतरी करच येथपर्यत येतात. या लोकांना निक्षून “नाही” म्हणून सांगणे हे मोठे आव्हान आहे.यात जर आपण यशस्वी झालो तर अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे.

महिलांचे आयुर्मान जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिकांत त्याचे प्रमाण अधिक आहे. केवळ सर्व महिलांसाठी असलेली प्रधानमंत्री महिला सन्मान ही योजना आहे. जोडीदार असेपर्यंत सर्वसाधारणपणे त्या जोडीदारावर विसंबून गुंतवणूक या विषयात रस घेत नाहीत. त्यानी किमान प्राथमिक गोष्टी माहिती करून घ्याव्यात. तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा, सारासार विचार करावा आणि भविष्यात कदाचित एकट्यानेच व्यवहार करावे लागले तर एका किमान पातळीवरील व्यवहार आपल्याला आलेच पाहिजेत एवढी माहिती मिळवावी. 

स्त्री पुरुष सर्वानीच आपले उत्तरायुष्य आनंदी आणि आनंददायी होण्यासाठी नेहमी आपले मित्र, नातेवाईक, स्नेही, समाजबांधव  यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवावा पण ठेवू नये. जग भक्ष आणि भक्षकांनी भरलेले असून आपण कोणाचेही भक्षण करणार नाही आणि सहजासहजी कुणाचे भक्ष बनणार नाही याची होता होईतो काळजी घ्यावी.

गुंतवणुकीची ही आर्थिक बाजू झाली पण गुंतवणूक हा शब्द अधिक व्यापक आहे यात मानसिक, भावनिक गुंतवणूक, समाधान याचा समावेश करता येईल आर्थिक बाजू भक्कम असेल तर जीवन सुसह्य होते. पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येत नसल्या तरी पैशाअभावी आपण अनेक गोष्टी  करू शकत नाही हे सत्य विसरू नये म्हणून नेहमीच पैशांचे आभार मानावेत त्याच्यामुळे आपण अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. काही गोष्टी नव्याने शिकू शकतो.  विविध लोकांना भेटणं त्याच्याशी बोलणं यामुळे उत्साहात वाढ होते नवी माहिती मिळते. सामाजिक कामाची आवड असल्यास समाजास योगदान होईल असे कार्य करू शकतो. 

आपल्या सर्वांच्या आनंददायी उत्तरायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक ‘मुंबई ग्राहक पंचायत’ या स्वयं:सेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. सदर लेख ‘सनवर्ड फॉर सिनियर सिटीजन’ या संस्थेने 22 जून 2024 रोजी आयोजित केलेल्या ‘माझी माणसं कोण? एक शोधयात्रा’ या परिसंवादात सहभागी झालेल्या 300 लोकांना संदर्भासाठी देण्यात आला)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…