Reading Time: 3 minutes

आर्थिक नियोजन करतांना बचतीतून जमा झालेल्या रकमेतून गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून सुयोग्य परतावा मिळाल्यास योग्यवेळी हमखास नियमित पैसे मिळावेत म्हणून बचत करावी लागते. यासाठी अनेक मार्ग उपलब्ध असले तरी त्यातील पीपीएफ आणि एनपीएस ही दोन खाती प्रत्येकाकडे असणे आवश्यकच आहे.

भविष्य निर्वाह निधी (PPF) :

 • यातील सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) हे खाते दीर्घकाळ चालू ठेवून त्यात जमा झालेल्या रकमेतून कोणकोणते लाभ मिळतात हे खाते ग्राहकांच्या करदेयतेच्या दृष्टीने किती चांगले आहे, ही एक स्मार्ट गुंतवणूक कशी होऊ शकते यावरील अनेक लेख आपण वाचले असतील. 
 • पीपीएफमुळे आपल्या निवृत्तीसाठी मोठी रक्कम जमा होते ज्याचा वापर गुंतवणूक किंवा व्यवसाय करण्यासाठी करता येऊ शकतो.अतिशय अल्पमोली बहुगुणी अशी ही योजना आहे. 
 • शेअर्स म्युच्युअल फंड यातील योजनांवर अनिश्चित तरीही अधिक परतावा मिळत असेल तरीही निवृत्तीनंतर हे खाते चालू ठेवून त्यातील काही रक्कम दरवर्षी नियमित काढून घेऊन अशी रक्कम मासिक खर्चासाठी दरमहा निवृत्ती वेतनाप्रमाणे वापरता येईल.

हे ही वाचा : जेष्ठ नागरीकांना महागाईवर मात करणारे निवृत्तीवेतन  

मिळालेली रक्कम करमुक्त असल्याने त्यावर कोणताही कर द्यावा लागणार नाही. ते कसे?  हे जाणून घेण्यापूर्वी मूळ योजनेबद्दल अधिक जाणून घेऊया.

★ करमुक्त व्याज देणारी आणि सर्व निवासी भारतीयांना उपलब्ध असणारी ही एकमेव बचत योजना आहे.

★ योजना कालावधी 16 आर्थिक वर्ष म्हणजेच किमान कालावधी 15 वर्ष 1 दिवस, कमाल कालावधी 15 वर्ष 364 किंवा 365 दिवस हा असू शकतो. 

★ कालावधी संपल्यावर  दरवर्षी गुंतवणूक करणे अथवा न करणे या पर्यायासह पाच वर्षे मुदत कितीही वेळा वाढवता येते. योजनेत सहभागी झाल्यावर अनिवासी भारतीय (NRI) झाल्यास असलेली किंवा वाढीव मुदत पूर्ण झाल्यावर खाते सक्तीने बंद करावे लागते.

★ हे खाते पोस्ट ऑफिस, सरकारी /खाजगी बॅंकेत उघडता येते. एक व्यक्ती एक खाते, अज्ञान मुलांच्या नावे सहअर्जदार म्हणून खाते उघडता येते. नामनिर्देशन सोय आहे.

★ एका आर्थिक वर्षात ₹500 ते ₹150000/- भरता येतील. भरणा केलेली रक्कम जुन्या करमोजणीनुसार 80 C च्या मर्यादेत करसवलतीस पात्र आहे.

★ किमान रक्कम न भरल्यास खाते निष्क्रिय होईल, दंड भरून सक्रिय करता येईल.

★ गेले कित्येक वर्षे यावर मिळणारा व्याजदर   7.1% आहे. बाजारात सर्वत्र व्याजदर वाढत असताना यावरील व्याजदरात वाढ होणे अपेक्षित होते. भविष्यात दर तीन महिन्यांनी यात बदल होऊ शकतो. असे झाले नाही तरी आर्थिक नियोजन करताना या खात्याचा विचार सजग गुंतवणूकदार किंवा त्यांचे सल्लागार प्राधान्याने करीत असतात.

★ दर महिन्याच्या 5 तारखेला किंवा त्यानंतर किमान शिल्लक असलेल्या रकमेवर मान्य केलेल्या दराने व्याज वर्षाअखेर दिले जाते. यामुळे 5 तारखेस किंवा त्यापूर्वी रक्कम जमा केल्यास कर्ज किंवा परतावा घेतला नसल्यास त्या पूर्ण महिन्याचे व्याज मिळेल.

★ काही अटींवर तिसऱ्या ते सहाव्या वर्षांमध्ये कर्ज तर सातव्या वर्षांपासून कोणत्याही कारणासाठी विनापरतावा रक्कम काढता येते.

★ भरलेली रक्कम, व्याज, मुदतपूर्तीनंतर मिळणारी पूर्णपणे रक्कम करमुक्त. जुन्या करमोजणी पद्धतीनुसार 80 सी च्या मर्यादेत करसवलतीस पात्र. 

 • तर अशा या योजनेचा आपल्या  निवृत्ती वेतनाचे साधन म्हणून वापरता येण्याची शक्यता आहे का? हा कळीचा प्रश्न आहे.
 • ज्यांचे आधीपासूनच पीपीएफ खाते असून ते वर्गणी म्हणून जास्तीत जास्त रक्कम त्यात दरवर्षी भरतात त्याचप्रमाणे वेळोवेळी त्यांनी खाते मुदत 5 वर्षांनी वाढवून घेतली असून ते आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यात अधिक रस असण्याची शक्यता आहे. 
 • अन्य व्यक्तींनीही या खात्याचा निवृत्ती वेतनासारखा कसा वापर करता येऊ शकेल ते माहिती करून घ्यावे.

 यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे खात्याची मुदत संपल्यावर गुंतवणूकदाराकडे  दोन पर्याय आहेत.

 1. खाते पूर्णपणे बंद करणे रक्कम काढून घेऊन आपल्या मर्जीनुसार अन्यत्र गुंतवणे.
 2. खात्याची मुदत दरवर्षी गुंतवणूक करण्याच्या बोलीने अथवा न करण्याचा बोलीने आणखी पाच वर्षे वाढवणे. ही मुदत यापैकी कोणत्याही पद्धतीने कितीही वेळा वाढवता येऊ शकते.
 • यातील दुसऱ्या पर्यायामुळे पीपीएफ खाते सलग 21, 26, 31, 36, 41…… या पद्धतीने पुढे चालू ठेवता येते. जेवढी वर्षे जास्त तेवढे त्यातील रकमेवर मिळणारे चक्रवाढव्याज जास्त मिळून रकमेत मोठी वाढ होऊ शकते. 
 • जर पती आणि पत्नी दोघांचे वेगवेगळे पीपीएफ खाते असेल तर 16 आर्थिक वर्षानंतर त्यात जमा झालेली रक्कम व्याजासह 40 लाखाहून अधिक असेल. 
 • या खात्याची मुदत दरवर्षी काहीही रक्कम जमा न करता 5 वर्षे वाढवली तर 56 लाखाहून अधिक 10 वर्षे वाढवली तर 79 लाखाहून अधिक 15 वर्षे वाढवली तर 1 कोटी 12 लाखाच्या आसपास होईल ही गणना करताना व्याजदर 7.1% प्रतिवर्षं असेल हे गृहीत धरले असून यात कमी अधिक झाल्यास मिळणारी रक्कम कमी अधिक होईल. 
 • सर्वसाधारणपणे  व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय 25 ते 30 वर्षे करेल असे गृहीत धरल्यास खाते काढल्यापासून फक्त 16 वर्षे दरवर्षी दीड लाख भरल्यास या हिशोबाने खात्याची मुदत 26 ते 31 वर्षे पूर्ण होण्याच्या कालावधीत व्यक्तीकडे किमान 80 लाख या खात्यात जमा असतील.

वाचावे असे : बचत गुंतवणुकीच्या सोप्या युक्त्या 

आता या खात्याची मुदत कोणतीही वर्गणी न भरता 5 वर्षे वाढवण्याचा अधिकार गुंतवणूकदारास आहे. 80 लाख रुपये त्याच्या खात्यात शिल्लख असून त्यातील 60% रक्कम एकदाच किंवा पाच वर्षात विभागून दरवर्षी घेता येईल. या रकमेतून दरवर्षी पाच लाख 60 हजार काढून घेतले तर त्यावर कोणतीही करदेयता नसेल. सदर रक्कम बचत खात्यात अगर डेट फंडात ठेवून मासिक 46 हजार स्वखर्चाकरिता वापरता येतील. यामुळे पीपीएफमधील शिल्लक रक्कम कमी न होता दरमहा बऱ्यापैकी रक्कम हातात येईल. जर जोडीदाराचेही असे खाते असेल तर त्यालाही तेवढीच वेगळी रक्कम मिळत राहील.

        आपल्या पीपीएफमध्ये आपल्याला पुरेशी निवृत्ती खर्चाची तरतूद लवकरात लवकर कशी जमा होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे. गेले कित्येक वर्षे यात अधिकतम दीड लाख रुपयेच जमा करता येतात आणि व्याजदर 7.1% आहे यात वाढ झाली त्याचप्रमाणे मुदतवाढ घेताना वर्गणी भरण्याचा पर्याय निवडला तर आपले उद्दिष्ट कमी कालावधीत पूर्ण होऊ शकते.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक असून हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

खाजगी कौटुंबिक न्यास

Reading Time: 3 minutes आर्थिक नियोजनाच्या बाबतीत करबचत Tax Savings करण्याचे जे मार्ग आहेत त्यात हिंदू…

करोडपती कसे व्हावे?

Reading Time: 4 minutes माझ्या लहानपणी म्हणजे 50 वर्षांपूर्वी दहा हजार ही खूप मोठी रक्कम होती…

Education – नामांकन : गरज की आवश्यकता ?

Reading Time: 3 minutes तुम्ही निवडलेली एखादी व्यक्ती जी तुमच्या पश्चात तुमच्या मालमत्तेची उत्तर अधिकारी असेल.…

डिजिटल रुपया म्हणजे काय ? घ्या समजून

Reading Time: 2 minutes डिजिटल रुपया म्हणजे काय आणि त्याचा व्यवहारात उपयोग कसा होईल याची उत्सुकता…