माझे एक अत्यंत अभ्यासू मित्र माधव भोळे यांनी अलीकडे समाज माध्यमावर टाकलेली पोस्ट वाचली. ती त्यांनी मला टॅग केली आहे. याचा अर्थ मी त्यावर माझे मत व्यक्त करावे असा त्याचा अर्थ होतो. मी यातील तज्ञ असे न मानता स्वतःला अभ्यासक असे समजतोय या पोस्टचा विषय एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो असे वाटत असल्याने मूळ पोस्ट मधील मुद्दा आणि त्यावरील माझे मत व्यक्त करतोय.
★कित्येक वेळा आपण शेयर मार्केट बद्दल पोस्ट वाचताना अशा पोस्ट वाचतो की विप्रो कम्पनिमध्ये 1980 साली रु 10,000 गुंतवले असते तर आज त्याचे 1400 कारोड झाले असते, राकेश झुंनझुनवला 39,000 कोटींचा मालक आहे वगैरे, वगैरे.
अशा प्रकारच्या हजाराचे कोटी रुपये झाल्याचा इतिहास असलेली अनेक उदाहरणे आहेत त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी लाखोंनी गुंतवणूक करूनही त्यांना बुडावणाऱ्या कंपन्यांनीही उदाहरणे आहेत. अस असलं तरी गुंतवणूक सल्लागार दीर्घकाळ गुंतवणूक करावी असा सल्ला देतात यात 2 / 3 चांगल्या कंपन्या मिळाल्या तरी इतर ठिकाणी होऊ शकणारे नुकसान भरून काढूनही मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. आता सन 1980 सालातील ₹ 10000/- बद्धल, आपण इतिहासात डोकावलो तर त्या काळी अनेकांचे वार्षिक उत्पन्नसुध्दा एवढे नव्हते त्यामुळे तेव्हाच्या हिशोबाने ती प्रचंड रक्कम होती त्यामुळे इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करण्याची संधी खूपच थोड्या लोकांपुढे उपलब्ध होतती यातील गुंतवणूक कदाचित त्यातील बऱ्याच जणांनी गुंतवणुकीशी निगडित जोखीम लक्षात घेऊन त्यांच्या हिशोबाने ती गुंतवणूक लगेचच काडून घेतली असणार. आज अनेक जणांकडे दीर्घकाळ गुंतवणूक करू शकतील एवढी रक्कम आहे यातील अनेकजण आमची गुंतवणूक दीर्घकालीन आहे म्हणत असले तरीही बाजारात थोडीशी उलथापालथं खरतर पालथच झाली की त्याचा जीव वरखाली होतो. त्यामुळे अशा पद्धतीने भावनांवर नियंत्रण ठेऊन गुंतवणूक करणारे आजही खूप कमी लोक आहेत ही वस्तुस्थिती आहे. मी स्वतः सन 1994 साली केलेल्या ₹ 1000/- गुंतवणूकीचे आजचे बाजार मूल्य ₹ 14 लाखाहून अधिक आहे तर सन 2016 साली केलेल्या ₹ 10000/- गुंतवणुकीचे आजचे बाजारमूल्य ₹ 3.75 लाखाच्या आसपास आहे. अशी चिकाटी आपल्याकडे असेल तर आज अनेक कंपन्या असा चमत्कार यापुढेही घडवू शकतील. गरज आहे अशा कंपन्या शोधून त्यात दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची चिकाटी बाळगणाऱ्यांची!
★आपण अशा अनेक पोस्ट वाचतो की हा स्टोक मल्टिब्यागर आहे तो स्टोक एव्हडे रिटर्न गेल्या एव्हडे वर्षात देऊन गेला वगैरे. पण असे स्टोक ओळखायचे कसे की जे पुढे जाऊन एव्हडे रिटर्न देतील.
हे खरं तर खूप कौशल्याचच काम आहे. अशी कंपनी जी दीर्घकाळात मल्टीब्यागर ठरेल आणि उत्तम परतावा देतील. या कंपन्या आपण जितक्या लवकर ओळखून खरेदी करून अधिक काळ बाळगू शकू तेवढी होणाऱ्या फायद्यात भर पडणार. यासाठी या विषयातील किमान प्राथमिक माहिती असणे जरुरीचे आहे. सध्या माहितीचा महापूर असलेल्या जगात योग्य आणि खरीखुरी माहिती शोधायची असल्यास ती नक्की आणि नेमकी कुठे मिळेल हे माहिती असले पाहिजे. या विषयावरील अधिक आणि अधिकृत माहिती ही NISM, BSE Training Institute आणि NSE ट्रेनींग सेंटर यांच्याकडूनच मिळू शकते हे लोक सतत विविध ट्रेनींग प्रोग्रॅम आणि त्यांच्या परीक्षा घेत असल्याने त्याच्याकडील माहितीत जसे बदल होतील ते अद्ययावत करत असतात. याशिवाय आपण निवड केलेल्या कंपनीचा अहवाल याचे वाचन करता यायला हवे त्यातील आकडेवारी बरोबरच डायरेक्टर रिपोर्ट, लेखा परीक्षकांचा अहवाल महत्वाचा आहे. कंपनी विषयी निश्चित आणि नेमकी माहिती अधिकृतपणे मिळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. याचबरोबर कंपनीचे व्यवस्थापन कुणाकडे आहे हे सुद्दा महत्त्वाचे आहे. आज या क्षेत्रातील जे दादा लोक आहेत त्याचे अनुभव, ट्रेडिंग करण्याची, स्टॉक निवडण्याची पद्धत यांचा अभ्यास करून आणि ते पडताळूनच स्वतःचे मत बनेल ते पुन्हा तपासून खात्री करून घ्यावी लागेल. नुसते वाचन करण्याऐवजी त्याची टिपणे काढली पर पुन्हा उजळणी होऊन मुद्दा अधिक चांगल्या रीतीने लक्ष्यात राहतो. यातील काही गोष्टी या केवळ अनुभवानेच लक्षात येतात. निफ्टी प्रमाणेच निफ्टी नेक्स्ट 50 नावाचा इंडेक्स आहे यातील शेअरही भविष्यात निफ्टीमध्ये येऊ शकतील.
कंपनीने घेतलेले कर्ज याचे भांडवलशी असलेले प्रमाण, प्रवर्तकांनी गहाण ठेवलेल्या शेअर्सचे प्रमाण, अस्थिरतेचा निर्देशांक या सारख्या अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो.
★अशी कोणती क्षेत्र आहेत ज्यात भारतीय कँपन्यांना जगभर वाव आहे आणि जगाचा पैसा अपल्याकडे खेचून आणतील?
इन्फर्मेशन आणि टेक्नॉंलॉजी हे असे क्षेत्र आहे की त्यात भारतीय कंपन्या सातत्याने टिकून असून यातील अनेक कंपन्यांनी दीर्घकाळात 25% हुन अधिक परतावा 25 वर्षाहून अधिक काळ दिला आहे. उदा इन्फोसिस, टीसीएस, विप्रो त्यामुळे आपण हे क्षेत्र हा हुकमी एक्का असे अजूनही म्हणू शकू. माहिती तंत्रज्ञान, त्यातील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर,
इलेक्ट्रिक वाहनांची किफायतशीर निर्मिती, हलक्या वजनाच्या बॅटरी मध्ये ऊर्जा साठवून ठेवण्याचे तंत्र, आपल्या परंपरागत ज्ञानाचा वापर करून तयार केलेली आणि सिद्ध झालेली औषधे, ड्रोन तंत्रज्ञान, ऍनिमेशन, सौर ऊर्जा निर्मिती यांचे किफायतशीर तंत्र, उच्च प्रतीचे हवामानातील बदलांना जुळवून घेणारे बी बियाणे यांची निर्मिती, विशेष रसायने बनवणाऱ्या कंपन्या ही कदाचित उज्वल भविष्य असलेली क्षेत्रे असतील. या सर्वानाच पैसा लागणार तो पुरवणारे बँकिंग फायनान्स क्षेत्रआहे त्यामुळे त्यालाही उज्वल भवितव्य आहे. यात आपल्या ज्ञानानुसार भर घालता येईल.
★अशा कोणत्या कँपन्यां आणि मॅनेजमेंट आहे की जे येणाऱ्या आव्हानांना तोंड देत, येणाऱ्या वरील संधीचा पुरेपूर फायदा उठवतील आणि शेयर होल्डर्सना मालामाल करतील? त्यांना ओळखायचे कसे? त्यांच्यामध्ये कोणते गुण आवश्यक वाटतात?
यादृष्टीने आपल्या नजरेसमोर काही कंपन्या ठेवाव्यात. उदा पॉलीकॅब, फाईन ऑर्गनिक्स, दीपक फर्टिलायझर, कोटक बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, लार्सन, टीसीएस, इन्फोसिस, पॉवरमॅक, टिमकेन इ यात अजूनही भर पडू शकते. अशा कंपन्या ज्यांनी सातत्याने चांगले रिटर्न दिले आहेत त्यात तुमची थांबण्याची तयारी असेल तर फायदाच होईल परंतू असे शेअर्स जर 52 आठवड्याच्या कमी भावाच्या जवळपास घेता आले तर लवकर आणि अधिक फायदा होऊ शकतो. आज ज्या आघाडीच्या कंपन्या आहेत त्या एकेकाळी सामान्य कंपन्या होत्या. असे शेअर ओळखण्यासाठी, काही प्राथमिक गोष्टी माहिती हव्यात त्यात –
*कोणत्या प्रकारातील कंपनी आहे, त्यांचे व्यवस्थापन त्यांचे अन्य व्यवसाय?
*व्यवसाय चक्राप्रमाणे तेजीत आहे की मंदीत?
*मूलभूत विश्लेषण आणि तांत्रिक विश्लेषण याचा भाग येईल.
यात विविध गुणोत्तराचा समावेश होतो त्यांची तुलना त्या प्रकारच्या उद्योगांच्या सरासरीशी करावी.
भाव आणि उलाढाल यांचा परस्परांशी असलेला संबंध.
उपलब्ध चार्टच्या साहाय्याने गोल्डन गेट तयार झाल्याचे संकेत मिळत असताना खरेदी कसण्याचे तंत्र
*वर्षभरात भावातील फरकाचा लाभ घेऊन या लाभाची आणि लाभांशाची योग्य वेळी त्याच शेअरमध्ये गुंतवणूक.
*वाजारात होणाऱ्या हालचालीमुळे मनोबल कमी अधिक न होता तेजी, मंदी यांच्याशी मुकाबला करून मंदी ही संधी समजून लाभ घेणे अथवा काहीही न करणे.
*योग्य वेळी बाहेर पडून आवश्यक असल्यास पुन्हा खरेदी करणे किंवा नुकसान होत असेल तरीही त्याचा कर नियोजन या दृष्टीने काही लाभ घेता येईल का? असा विचार करणे.
*कंपनीचा नफा,त्यात होणारी वाढ, नफा कमी होण्याची कारणे, भविष्यातील योजना.
*लार्ज, मिड, स्मॉल कंपन्या कुणाला म्हणायचे याचे निकष सेबीने ठरवले असून ही यादी दर सहा महिन्यांनी अद्ययावत होत असते या यादीत पूर्वी स्मॉलकॅप कॅम्पनी मिडकॅपमध्ये किंवा मिडकॅप कंपनीने लार्ज कॅपमध्ये प्रवेश केला आहे का ते पाहून निर्णय घेता येईल.
*नाविन्यपूर्ण क्षेत्रात असलेल्या आणि स्थिर होऊन नफा मिळवू लागणाऱ्या कंपन्या शोधता येतील.
★शेयर मार्केट वर क्लास चालवणारे डे ट्रेडिंग आणि टेक्निकल अनलिसिस वर भर देते ते फक्त तात्पुरत्या उपाययोजना असतात. त्यांची परिणीती ब्रोकर लोकांच्या व्यवसाय वृध्दीत होते.
ब्रोकरकडील लोकांना तुमचा भांडवल संच सतत हलता हवा असतो तरच उलाढाल वाढून त्याच्या व्यवसायात वृद्धी होते त्यामुळे असे तथाकथित व्यावसायिक किंवा क्लासचे चालक याना तुम्हाला स्वयंपूर्ण करणे हा उद्देश नसतोच ते कायमच तुम्हाला त्यांच्यावर अवलंबून राहायला लावतील, एखादे सॉफ्टवेअर घ्यायला लावतील, याला काही सन्माननीय लोक अपवाद आहेत पण सर्वसाधारण कल हा तुम्ही पांगळे कसे राहाल असाच आहे. यासर्वांचीच मदत आपण शिकण्यासाठी उपयोग होईल एवढी प्राथमिक माहिती मिळावी एवढ्यासाठीच करावा.
बँकेतील रिलेशनशिप मॅनेजर याहून भयानक आहेत ते तुमच्या गरजेचा अजिबात विचार करीत नाहीत. जरूर असो अथवा नसो, कोणालाही युलीप योजना स्वीकारण्यास सांगून फक्त तीन वर्षे पैसे भरा नंतर नाही भरलेत तरी चालतील असे सांगून गुंतवणूकदारांचे नुकसान करतात. बँकेत काम करणाऱ्या माणसाने सांगितल्याने लोक त्यावर पटकन विश्वास ठेवतात. एखादी गोष्ट जाणकार व्यक्तीकडून समजून घ्यावी त्यासाठी आवश्यक असेल तर थोडीफार रक्कम खर्च करावी ती ज्ञानातील गुंतवणूक ठरेल असे कुणाला वाटतच नाही. त्यामुळे 60% ते 84% या दराने व्याज देतो वर्षात पैसे दुप्पट करून देतो अशा आमिषाला लोक बळी पडतात सर्वस्व गमावतात. आज अनेकांना काही न करताच आपल्याला चागला परतावा मिळावा अशी योजना हवीय’ टिप्स हव्या आहेत,या मानसिकतेचा धूर्त लोक फायदा घेतात.
हे क्षेत्रच खूप मोठे आहे त्यामुळे ज्ञान आद्ययावत ठेवून निष्कर्ष काढावे आणि पडताळून पहावे. याचे निश्चित नियम बनवणे शक्य नाही वेगवेगळ्या कोनांतून याचा विचार करावा लागतो. इतके सर्व करूनही, पुरेशी काळजी घेऊनही निष्कर्ष चुकू शकतात याची जाणीव ठेवून त्यातूनही अजून नवीन काही शिकण्याची तयारी ठेवावी.
लेखात उल्लेख केलेल्या कंपन्या केवळ अभ्यासासाठी असून यात गुंतवणूक करण्याची शिफारस नाही.
1 comment
Very useful information.