Reading Time: 4 minutes

निवृत्ती नियोजन करतांना एका मोठ्या रकमेची आवश्यकता असते. ही रक्कम प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगवेगळी असू शकते यासाठी आर्थिक शिस्त आवश्यक असून त्याद्वारे नियमित बचत करून त्यातून सुयोग्य गुंतवणूक करणे आवश्यक असते. तुमची गुंतवणूक क्षमता आणि ध्येय यानुसार यात कमीअधिक फरक पडू शकतो.

       निवृत्ती नियोजन म्हणजे वेगळे काही नसून एक अशी योजना बनवणे ज्यामुळे आपली सोनेरी वर्ष सुखात जातील. ज्यांना महागाईशी निगडित पेन्शन त्याचप्रमाणे आरोग्यसेवा मिळते असे मोजके लोक सोडले तर निवृत्ती नियोजन ही प्रक्रिया जितकी वाटते तेवढी सोपी नाही. योग्य योजनेची निवड, त्याचे मूल्यांकन, त्यातील बदल, आपल्याला मिळणारे उत्पन्न, घेतलेले कर्ज आणि काही किमान आर्थिक गरजा यांचा संमतोल साधून काही रक्कम कटाक्षाने वेगळी करावी लागते प्रसंगी वाढवावी लागते. त्याचप्रमाणे अनपेक्षित संकटांचाही विचार करावा लागतो. याशिवाय ही रक्कम गुंतवताना आपल्याला अपेक्षित परतावा मिळतोय का? तो भविष्यात महागाईवर मात करू शकणारा आहे का? यांचीही काळजी घ्यावी लागते असे करत असताना होणारी एखादी चूक म्हणजे आपले आर्थिक नुकसानच! असे होऊ नये म्हणून काय काळजी घेता येईल याचे हे चिंतन.

हे ही वाचा – Life After retirement  : निवृत्तीनंतर करा असे आर्थिक नियोजन

           हे सर्व करत असताना कार्यरत असताना आपला पुरेसा टर्म इन्शुरन्स, आरोग्यविमा आणि गरजेनुसार अन्य योजना असणे गरजेचे आहे तेव्हा या योजना घेऊन त्या विनाखंड चालू ठेवाव्यात आणि मगच गुंतवणूक करावी. यासाठी सतत वाढत राहणारे हप्ते हे खर्च न समजता जोखीम रक्षणासाठी केलेली गुंतवणूक समजावी त्यात कोणतीही तडजोड करू नये. यात आता अनेक आकर्षक योजना आल्या आहेत त्यांचा विचार करावा. याशिवाय निवृत्तीसाठी  नियोजन करताना होऊ शकणाऱ्या चुका आणि त्यावरील मार्ग  विचारात घेऊ-

★निवृत्तीची योजनाच नसणे- आपल्या उत्पन्नातील किमान 10% रक्कम ही निवृत्ती योजनेसाठी कटाक्षाने बाजूला ठेवायला हवी. काहीही मोठी अडचण आली तरी या रकमेस होता होईतो हात लाऊ नये. याची जाणीव असणे आणि त्यानुसार वर्तन करणे अपेक्षित आहे. याची सुरुवात जितकी लवकर करता येईल तेवढा चक्रवाढ व्याजाचा लाभ गुंतवणुकीस मिळू शकेल.

★निश्चित रक्कम किती लागेल याचा अंदाज घेता न येणे- आपल्याला सध्या किती खर्च येतो त्यावरून आहे हेच राहणीमान कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात, महागाईचा विचार करून किती रक्कम लागेल याचा उदाज बांधता न आल्याने आवश्यक तेवढी रक्कम बाजूला करून गुंतवणूक करणे शक्य होत नाही. आजकाल भविष्यातील खर्चाचा अंदाज करू शकणारे रेडी रेकनर उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा.

★उत्पन्नाच्या प्रमाणात गुंतवणूक न वाढवणे- अनेक कारणांनी आपल्या उत्पन्नात वाढ होते उदा नोकरीत बदलणे, वार्षिक वेतनवाढ. तेव्हा त्याप्रमाणात जर निवृत्ती नियोजनासाठी 10%  गुंतवणूक करीत असाल तर त्यात प्रमाणशीर वाढ न केल्यास गुंतवणूक टक्केवारी कमी झाल्याने रक्कम वाढणार नाही आणि शिल्लखही राहणार नाही. तेव्हा या वाढीच्या प्रमाणात गुंतवणूक वाढवावी.

★मालकाकडून देऊ केलेल्या निवृत्ती योजनांचा लाभ न घेणे- अनेक चांगल्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कायदेशीर तरतुदींशीवाय स्वतःच्या वेगळ्या निवृत्ती योजना देऊ करतात. या योजना ऐच्छिक असतात त्यात काही निश्चित गोष्टींची हमी दिलेली असते त्याची माहिती करून घेऊन योग्य वाटल्यास त्याची वर्गणी भरावी. विशेषतः योजनेची परिचालन फी वाजवी आहे का? हे पाहून घ्यावे. यात काही छुप्या अटी असतील तर माहिती करून घ्याव्यात. याशिवाय मधेच नोकरी सोडल्यास योजनेचे भवितव्य लागू शकणारे कर याचाही साधकबाधक विचार करावा.

★योजनांच्या वारसांची नोंद न करणे/ बदल न करणे- विविध योजना घेतानाच त्यातील वारसांची नोंद करावी यात काही बदल झाल्यास त्याची दुरुस्ती करावी असे न केल्यास भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. आपल्या अपरोक्ष सर्व अवलंबित आणि कायदेशीर वारसांना त्याचा वाटा विनासायास मिळायला हवा याची जाणीव ठेवावी.

★केवळ सरकारी योजनांवर विसंबून राहणे- भविष्यात खर्चात होणारी वाढ आणि सर्वसाधारण उत्पन्न मिळवणाऱ्या व्यक्तींना उपलब्ध नसलेल्या योजना याचा विचार करून निश्चित उत्पन्न देणाऱ्या आणि निवृत्ती धारकांना उपयोगी असणाऱ्या योजनांच्या भरवश्यावर राहू नये या योजना प्रचलित व्याजदाराशी सांगड घालून तयार केलेल्या असतात तेव्हा पूर्णपणे त्यांच्या भरवशावर राहू नये. सध्या केवळ जेष्ठ नागरिकांना वरिष्ठ नागरिक बचत योजना आणि प्रधानमंत्री वय वंदना योजना या दोनच योजना उपलब्ध असून त्यामध्ये प्रत्येकी पंधरा लाख रुपये अधिकतम गुंतवणे शक्य असून पोष्टाची मासिक प्राप्ती योजना यात जोडीदारासह अधिकतम रुपये नऊ लाख टाकता येऊ शकतात. तर रिझर्व बँक फ्लोटिंग रेट बॉण्ड कोणत्याही मर्यादेशिवाय  उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणें विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड यांच्या मासिक प्राप्ती योजना आहेत. सरकारी आणि खाजगी कर्जरोखे उपलब्ध आहेत यातून मिळणारा परतावा हा 5.5% पासून 11%हून अधिक असला तरी निर्णय घेण्यापूर्वी या योजनांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे.

★आपण कधीच निवृत्त होणार नाही असा भ्रम बाळगणे- तुम्ही उत्साही आहात, अत्यंत कार्यक्षम आहात हे चांगलंच आहे पण या उत्साहाच्या भरात आपण कायम कार्यरत राहू पैसे मिळवत राहू आणि आपला चरितार्थ चालवू या भ्रमात राहू नका. हे शक्य नाही कदाचित एकाद्या व्यक्तीस ते जमेलही पण त्यानंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे काय? यासाठी तुम्हाला योजना बनवावीच लागेल. योजना बनवताना आपण निवृत्तीनंतरही कार्यरत राहू किंवा निवृत्तीनंतर आपल्याला काहीच करावे लागणार नाही या एकदम टोकाच्या भूमिका आहेत.

★कर योजनांचा कौशल्याने वापर न करणे- करलाभ देणाऱ्या काही योजनांचा लाभ आपणास कार्यरत असताना घेता येतो त्यामुळे करबचत तर होतेच पण मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याने भांडवल उपलब्ध होते त्यांचा जरूर लाभ घ्यावा.

★आपल्या पेन्शन योजना रद्द करून एकरकमी पैसे घेणे- अनेक पेन्शन योजनांना मुदतपूर्व विमोचन पर्याय असतो. यामुळे एकरकमी पैसे मिळत असतील तरी त्यामुळे भविष्यातील फायद्यास मुकावे लागते याशिवाय योजना बंद केल्याची काही किंमत द्यावी लागून आर्थिक नुकसान होते.

★एकाच कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाढवणे- अनेकदा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीचे शेअर सवलतीत दिले जातात तर अनेकजण एखादी कंपनी निवडून आपली सर्व गुंतवणूक त्यात करतात. आज ज्यांना आपण चांगली कंपनी म्हणतो अशा कंपन्या काही दिवसांनी बंद पडल्या चांगली कामगिरी करू शकल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे याकडे डोळेझाक करून एकाच कंपनीवर अवलंबून राहावे अत्यंत धोकादायक आहे.

★म्युच्युअल फंड चुकीच्या योजनेची निवड- निवृत्तीचा विचार करताना म्युच्युअल फंड जोखमीच्या अधीन राहून असे विशेष फंड किंवा फ्लेजीकॅप फंड तज्ञांच्या सल्याने निवडता येतील. सरसकट कोणतेही फंड निवृत्ती योजना म्हणून घेऊ नयेत.

★रियल इस्टेट घेणे हा निवृत्ती योजनेस पर्याय नाही- रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून आपल्याला भरघोस भांडवली नफा आणि चांगली भाडे कमाई होईल या भ्रमात राहू नये अनेकदा अशी गुंतवणूक ही आपले उत्पन्न कमी करणारी गुंतवणूक ठरू शकते यापेक्षा सध्या उपलब्ध असलेले रिटस आणि इनव्हीट हे अधिक दमदार पर्याय आहेत.

     यात अजून अनेक गोष्टी वाढवता येऊ शकतील सहज ज्या लक्षात आल्या त्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न.

©उदय पिंगळे

हे ही वाचा – Safety Retirement Tips : निवृ्त्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी वाचा या टिप्स

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…