Safety Retirement Tips : निवृ्त्तीनंतरच्या आर्थिक नियोजनासाठी वाचा ‘या’ टिप्स

Reading Time: 3 minutes

Safety Retirement Tips

भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर कमी झाल्यामुळे आता निवृत्त नोकरदार काय करणार, अशी होणारी चर्चा होत आहे. हा व्याजदर कमी होण्याचा हा प्रवाह असाच चालू राहणार, हे लक्षात ठेवून निवृत्तीच्या काळातील आर्थिक गरजांचा आता वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘एनपीएस’ मध्ये सहभाग आणि नव्या गुंतवणुकीचे मार्ग स्वीकारणे, हा आता त्यावरील खरा मार्ग आहे.

भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर ८.५ टक्क्यावरून ८.१ टक्का करण्याची शिफारस या निधीच्या विश्वस्तांनी अलीकडेच केली. ज्यांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळतो, असे देशात सुमारे सहा कोटी ४० लाख नोकरदार आहेत. नव्वदीच्या दशकात हे व्याजदर १२ टक्के होते. ते आता ८.१ टक्का होऊ घातले आहेत. देशात बँकिंग वाढत असल्याने बँकमनी वाढत चालला आहे आणि तो कमी व्याजदरात उपलब्ध झाला तरच कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे बँकांचे व्याजदर गेली काही वर्षे कमी होत आहेत. आणि यापुढे हा प्रवाह असाच राहणार आहे. त्याचाच परिणाम म्हणजे भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर कमी करण्याची विश्वस्तांनी केलेली शिफारस होय. असे करण्यास अनेकांचा विरोध आहे. विरोध आणखी वाढला तर सरकार व्याजदर आहे तेच ठेवण्याचा निर्णय घेईल. मात्र, या शिफारशींचा अर्थ असा आहे की आता निवृत्तीसाठी केवळ भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून रहाता कामा नये.

हेही वाचा – Retirement Planning : पालकांच्या निवृत्तीनंतर ‘असे’ करा आर्थिक नियोजन…

व्याजदराचे बदलते गणित

आधी व्याजदराचे हे बदलते गणित समजून घेतले पाहिजे. जेव्हा बँकेत पुरेसा पैसा येत नाही, तेव्हा बँका अधिक व्याज देऊन नागरिकांना बँकेत पैसा ठेवण्यास प्रोत्साहन देतात. अशा वेळी बँका त्यापेक्षा दीड ते दोन टक्के अधिक व्याज लावून पतपुरवठा करतात. म्हणजे जेव्हा बँक ठेवींवर १० ते १२ टक्के व्याजदर मिळत होते, तेव्हा बँका १२ ते १४ टक्के व्याजदराने कर्ज देत होत्या. याचा अर्थ नागरिक घर बांधण्यासाठी, विकत घेण्यासाठीही याच व्याजदराने कर्ज घेत होते आणि तरुण व्यावसायिकांना तर यापेक्षा अधिक व्याजदराने कर्ज घेऊन उद्योग व्यवसाय उभे करावे लागत होते. इतक्या व्याजदराने बँकेचे कर्ज मिळत असेल तर त्या देशात नवनिर्मितीला मर्यादा येतात. त्यामुळेच त्यावेळीही आणि आजही सर्वाधिक व्याजदर असणारी मोठी अर्थव्यवस्था अशीच भारताची ओळख राहिली आहे. याचा अर्थ जगासोबत राहण्यासाठी बँकिंग वाढून बँक मनी आणखी वाढण्याची गरज आहे. पण हा बदल एकतर्फी होऊ शकत नाही. बँकेचे व्याजदर जर कमी झाले तर ठेवींचेही होतात आणि कर्जाचेही होतात. पण ज्यांनी बँक ठेवींवर विसंबून आपल्या निवृत्तीचे नियोजन केले आहे, त्यांचे काय होणार? त्यांनी काय करायचे? सरकारने त्यात हस्तक्षेप करून ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर अधिक व्याज मिळत राहील अशी व्यवस्था केली आहे. पण अशी व्यवस्था किती दिवस चालेल, हे सांगता येणार नाही.

त्या ९ कोटी ज्येष्ठांचे काय ?

वरील उदाहरणात जे बँक ठेवींचे होते आहे, तेच सध्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याजाचे होते आहे. व्याजदर चढे ठेवून कोणत्याच देशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे व्याज कमी होण्याचा कालखंड आपल्याही देशात आला आहे, हे मान्य करून किमान तरुण पिढीने भविष्य निर्वाह निधीवर विसंबून राहण्यापेक्षा निवृत्तीसाठी इतर मार्गांची जोड दिली पाहिजे. व्याजदरातील हा बदल केवळ सहा कोटी ४० लाख नोकरदारांचा आहे. वास्तविक देशातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या आता १५ कोटींच्या घरात पोचली आहे. याचा अर्थ उर्वरित ९ कोटी नागरिकांच्या निवृत्तीच्या काळातील आर्थिक गरजांचाही विचार सरकारला आज ना उद्या करावाच लागणार आहे. अगदी संघटीत नोकरदारांना व्यवस्था ज्या सोयी सवलती देते, तेवढ्या सर्व ९ कोटी नागरिकांना देता येणार नाहीत, पण त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यापुरते तरी सरकारला द्यावेच लागणार आहे. या प्रवासात भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर खाली येत रहातील, हे ठरलेले आहे. येथे एक लक्षात घेतले पाहिजे, आपल्या कुटुंबात जी तरुण पिढी आहे, त्यांना व्याजदर कमी होण्याचा फायदा होणार आहे आणि त्यांना नव्या जगात काही करण्यासाठीची ती एक अपरिहार्य बाब असणार आहे.

नोकरदार आणि सर्वासाठी नवे पर्याय

आता प्रश्न असा पडतो की मग भविष्य निर्वाह निधीवर विसंबून राहिलेल्या नोकरदारांनी नेमके काय करावयाचे? त्यांना पुढील काही पर्याय आहेत.

  1.  राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (एनपीएस) ही खास निवृत्ती काळातील आर्थिक गरजांसाठीच सुरु केलेली आहे. महत्वाचे म्हणजे तिच्यात भाग घेण्यासाठी तुम्ही सरकारी किंवा खासगी नोकरदार असण्याची गरज नाही. कोणीही भारतीय नागरिक तिचा लाभ घेऊ शकतो. शिवाय तिच्या माध्यमातून मिळणारा परतावा भविष्य निर्वाह निधीपेक्षा चांगला आहे. तिच्या प्रमुख योजनांमध्ये आज किमान परतावा १२ टक्के मिळतो आहे. त्यामुळे जे आता मध्यम वयात आहेत, त्यांनी भविष्य निर्वाह निधीसोबत एनपीएस मध्येही भाग घेतला पाहिजे. एनपीएसमध्ये भाग घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत चाललीच आहे. सध्या एनपीएसचे ५ कोटी ७२ लाख सदस्य (फेब्रुवारी २०२२ अखेर) आहेत, याचा अर्थ पुढील दोन तीन वर्षात ही संख्या भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांइतकीच होईल.
  2.  भविष्य निर्वाह निधीची रक्कम ज्यांनी अलीकडेच काढली आहे आणि ज्यांना अजिबात जोखीम घ्यायची नाही, अशांनी ती ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या बँक ठेवींमध्ये ठेवली पाहिजे. ज्यात इतरांपेक्षा अधिक व्याज मिळण्याची तरतूद आहे.  जे आर्थिकदृष्ट्या अधिक साक्षर आहेत, अशांनी निवृत्तीनंतर मिळालेला काही निधी आपली जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेऊन म्युच्युअल फंडामध्ये गुंतविला पाहिजे.
  3.  जे तरुण आहेत, त्यांनी गुंतवणुकीचे नवे मार्ग शक्य तितक्या लवकर समजून घेऊन शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्गाने शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा पर्याय निवडला पाहिजे. शिवाय तरुणपणीच टर्म इन्शुरन्स आणि आरोग्य विमा काढला पाहिजे.

हेही वाचा – Retirement Planning : तरुणांनो वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्ती घ्यायची आहे? मग हे करा…

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!