Reading Time: 4 minutes

सन 2023 कसं आणि कधी संपत आलं ते कळलेच नाही. या वर्षात आपण काही चुका केल्यात का? यातून आपण काही शिकलो का? जर त्याच त्याच चुका आपण पुन्हापुन्हा करणार असलो तर आपली प्रगती होणार नाही आणि त्या जर आर्थिक चुका असतील तर होणारे नुकसान आर्थिक असणार! या वर्षाला निरोप देताना आपण अशा आर्थिक चुकांचा आढावा घेऊ, ज्या कदाचित टाळता आल्या असत्या. त्याचप्रमाणे नव्या वर्षी आपल्याकडील रोखता प्रवाह असा ठेवू ज्यामुळे आयकर कमी लागेल. आपण अधिक गुंतवणूक करू शकू असा संकल्प करूया, ज्या योगे येणारे वर्ष भरभराटीचे जाईल. बाजाराचा कल सातत्याने बदलत असतो. आपल्याला मिळणाऱ्या उत्पन्नात प्रतिवर्षी वाढ होत असते. हातात खेळत असणाऱ्या पैशांनुसार आपल्या इच्छा, गरजा आणि अपेक्षाही बदलत असतात. करविषयक नियमही थोडेफार बदलत दरवर्षी असतात, त्याचप्रमाणे गुंतवणूकीच्या नव्या संधी उपलब्ध होत असतात. डिसेंबर हा महिना असा आहे जेथे शांतपणे थोडं थांबून निरोप देत असलेल्या वर्षाचा आपण आढावा घेऊ शकतो. केलेल्या आर्थिक चुकांचे विश्लेषण करू शकतो. नवीन वर्ष किंवा त्या पुढील काळासाठीचे घेय्य निश्चित करू शकतो. पूर्वी केलेले संकल्प ठरवलेली उद्दिष्ट योग्य आहेत की त्यात बदल करावा, याकडे त्रयस्थ नजरेने पाहू शकतो. सर्वसाधारणपणे बाजाराची दिशा कशी आहे, ती आपल्या मानसिकतेस अनुकूल आहे की प्रतिकूल, यात जोखीम कशी आणि किती याचा विचार करून पुढील वर्षातील गुंतवणूक संधी कोणत्या असतील याचा अंदाज बांधता येईल. त्या क्षेत्रात आपली गुंतवणूक वाढवता येईल का, ते ठरवता येईल. जिथे काहीतरी अभ्यास करून अंदाज बांधावा लागतो तेथे चुका होणं अगदी साहजिकच आहे पण त्या कमीत कमी कशा होतील, एकाच प्रकारच्या चुका वारंवार होत असतील तर त्या टाळता कशा येतील, यावर आपली प्रगती होऊ शकते. यादृष्टीने गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुकांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा एक धावता आढावा घेऊयात-

★कोणत्याही उद्दिष्टाशिवाय केलेली गुंतवणूक: अनेकदा कोणतेही धेय्य न ठेवता गुंतवणूक केली जाते, यात आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते कारण अशी गुंतवणूक ही त्या वेळेची बाजारातील स्थिती लक्षात घेऊन म्हणजेच अल्पकालीन स्थितीचा लक्ष्यात घेऊन केलेली असते. ती गरजेला आपल्याला उपयोगी पडेलच याची खात्री देता येत नाही कारण उद्दिष्टचं नसल्याने नेमकी किती गुंतवणूक किती काळासाठी आणि कुठे करायची याचा विचारच केलेला नसतो. गुंतवणूक ही जाणीवपूर्वक त्यातील धोका स्वीकारून  त्यातून मिळणारा परतावा हा इतर धोकारहित योजनांत मिळत असलेल्या परताव्याहून अधिक असावा या हेतूनेच केलेली असते, हेच त्यामागील प्राथमिक तत्व आपण विसरून जातो. आपलं उद्दिष्ट हे, 

S M A R T म्हणजेच- 

Specific निश्चित, 

Measurable मोजता येणारे,

Achievable शक्य असणारे, 

Relevant संबंधित, 

Time-bound विशिष्ट कालमर्यादेत

असावं असं गुंतवणूक तज्ञांचं मत आहे. म्हणजे नेमकं काय आहे समजून घेऊनच मागील गुंतवणूकीचा आढावा घ्यावा आणि नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. याच दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सर्वसाधारण चुका आणि त्यावरील उपाययोजनांचा विचार करूयात-

★आपत्कालीन खर्चाची तरतूद नसणे: प्रत्येकाच्या  जीवनात काहींना काही संकटे येत असतात यावर मात करण्यासाठी काहीतरी योजना असावी लागते. या वर्षात अशी काही संकटं आपल्यावर आली का, तेव्हा आपण काय केलंत, तेव्हा आपल्याकडे पुरेशी तरतूद होती का,आठवून पहा कोणती संकटं आली ती? नोकरी गेली, कुणीतरी गंभीर आजारी पडलं, गाडी बिघडली ती दुरुस्त करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू एकापाठोपाठ एक बिघडल्याने नवीन घ्याव्या लागल्या. हे आपण टाळू शकत नाही यासाठी पुरेशी तरतूद नसेल तर उधार उसनवार करावी लागते, कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते. यामुळे आपल्या आर्थिक परिस्थितीत प्रगती होण्याऐवजी आपण दोन पावलं मागे जातो कदाचित क्रेडिट कार्डसारख्या महाग कर्जाच्या सापळ्यात अडकतो. असा काही प्रसंग आपल्यावर आला का? यासाठी आपला किमान घरखर्च 12 महिने चालेल असा आपत्कालीन फंड आपल्याकडे हवा. तो नसल्यास असा फंड कसा निर्माण करता येईल या दृष्टीने नववर्षाचा विचार करावा.

★निवृत्ती नियोजनासाठी लवकरात लवकर तरतूद करण्याची आवश्यकता न वाटणं: आपण जसे आयुष्य आज जगत आहोत तसेच आयुष्य आपल्या निवृत्तीनंतर याच जीवनशैलीच्या जवळपास असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यासाठी लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागते ही गुंतवणूक आपण जितक्या लवकर (शक्यतो उत्पन्न मिळवायला लागल्यावर दोन महिन्यात आणि उत्पन्नाच्या दहा टक्के) करू तेवढी कमीतकमी करावी लागते आणि त्याच्या चक्रवाढीचा फायदा आपल्याला मिळतो. हे करण्यासाठी जेवढा विलंब तेवढी गुंतवणूक रक्कम वाढवावी लागते.

★आयकर कायद्याच्या संबंधित चुका: अनेकदा आयकर, अग्रीमकर आयकर विवरणपत्र वेळेवर न भरणं यामुळे आपल्याला दंड भरावा लागतो काही सवलती सोडून द्याव्या लागतात. कर वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणी धावपळ केल्यास त्याचा आर्थिक ताण पडू शकतो. तेव्हा यासाठीची निश्चित योजना बनवून ठेवावी.

★आपल्या गुंतवणूक संचाचा आढावा न घेणे: गुंतवणूक संचाचा वेळोवेळी आढावा घेऊन तो आपल्या घोरणानुसार अपेक्षित परतावा देत आहे की नाही ते पाहून त्यात योग्य ते बदल करणं हे उत्तम गुंतवणूकदाराचं लक्षण आहे. जर एखादी गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नसेल तर थोडाफार तोटा सहन करून त्यातून वेळीच बाहेर पडणे आवश्यक असतं. असा आढावा वर्षातून किमान दोनदा तरी घ्यावा.

★महाग कर्जाचा बोजा कमी न करणे: गृहकर्जाचा अपवाद सोडल्यास कोणतेही कर्ज लवकरात लवकर फेडणे कधीही चांगले. अनेकदा गुंतवणूक करण्याच्या नादात महाग कर्ज फेडलं जात नाही. कर्ज काढून गुंतवणूक करणं हे आर्थिक मागासलेपणाचं लक्षण आहे यामुळे व्याजाचा बोजा तर वाढतोच पण गुंतवणूकीतून अपेक्षित परतावा न मिळाल्यास दुहेरी नुकसान होतं. जेव्हा गुंतवणूकीतून व्याज देऊन अधिक परतावा मिळवण्याची हमखास खात्री असल्यास असे धाडस करावे, शक्यतो अशी नसती उठाठेव करू नये.

★जीवनविमा, मेडिक्लेमकडे दुर्लक्ष करणं: आयुष्य अशाश्वत असल्याने कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावल्यास पूर्ण आर्थिक घडी विस्कटते त्यासाठी जीवनविमा असतो. सातत्याने वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे घरातील एखाद्या सदस्यास  एखाद्या गंभीर आजाराशी सामना करायला लागल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. जीवनविमा आणि आरोग्यविमा यासाठी करावा लागणारा खर्च त्यात असलेल्या जोखमीची किंमत समजावी. पुरेशा रकमेचा विमा घेऊन त्याचे वेळेवर नूतनीकरण करावे. 

        

सर्वसाधारणपणे होत असलेल्या या आणि अशा चुका आपण टाळाव्यात. येणाऱ्या नवीन वर्षात आपण आणि आपले कुटुंबीय यांचे आरोग्य उत्तम राहून आर्थिक भरभराट व्हावी, या सदिच्छा💐

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते आणि मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत, लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…