Reading Time: 4 minutes

कालपरवा हिंडेनबर्ग नावाच्या एका न्यायिक संशोधन (Forensic Research)करणार्‍या वित्तसंस्थेने आपल्या बाजारांतील आघडीच्या ‘अदानी’ समुहाविषयीचा एक संशोधन अहवाल जाहीर केला, आणि त्यातील नकारात्मक टिपण्ण्यांमुळे अदानी समुहाचे समभाग हे धारायाशी झाले, आणि एकुणातच भारतीय शेअरबाजार गडगडले.

खरेतर हा अहवाल, त्यावरील अदानी समुहाची अधिकृत प्रतिक्रिया, या प्रतिक्रियेला हिंडेनबर्ग समुहाचे प्रत्युत्तर व दरम्यानची बाजाराची पडझड, ही प्रामुख्याने एक आर्थिक घट्ना आहे..
मात्र आपल्या ‘थोपु’ व ‘कायप्पा’ विद्यापीठांत ‘राजकीय पक्ष व उद्योगपतींचे संबंध,’ मध्यमवर्गीय त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशाला मुकतील, बँका तारणवाल्या शेअर्सची किंमत घसरल्याने बुडतील, महागाई वाढत जाईल.. ई गावगप्पा जोरांत सुरु झाल्या,

या पार्श्वभुमीवर या आर्थिक घटनेचा, तोही मुख्यत्वे करुन शेअर बाजारावरील दृष्टिकोणांतुन, एका अज्ञानी माणसाच्या अल्पबुद्धीने घेतलेला हा वेध.

हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समुहासंदर्भांत जो अतिविस्तृत अहवाल दिला आहे, त्यात प्रामुख्याने नोंदविले्ल्या आक्षेपांतील महत्वाचा आक्षेप अदानी समुहाने आपला पैसा शुन्य करप्रणाली असणाऱ्या देशांत पाठविला, आणि तेथे अनेक छोट्या कंपन्या काढुन त्या पैशांतुन आपलेच शेअर्स खरेदी केले व ते शेअर्स तारण ठेवुन पुन्हा कर्जे घेतली,असा आहे.

याव्यतिरिक्त असे परदेशांत पाठविलेल्या पैशांबरोबरच स्थापन केलेल्या अनेक सुक्ष्म उपकंपन्या, त्यांचे झालेले व्यवहार, घेतलेली कर्जे व त्याबदल्यात तारण मालमत्तांचे प्र्माण (Current Ratio) वारंवार बदलले जाणारे मुख्य वित्तीय अधिकारी(CFO), तथाकथित अननुभवी सनदी लेखापाल (CA), अदानी कुटूंबातील अनेक नातेवाईकांना मोठी पदे, अधिकाऱ्याविरोधांत झालेल्या विविध चौकशा..असे मुद्दे या अहवालांत आहेत.

(अशा प्र्कारचा पोथीनिष्ठ अहवाल द्यायला आख्खी दोन वर्षे का लागावी?? अशी शंका रोजच्या रोज रिपोर्ट द्यायला लागणाऱ्या कारकुनी दर्जाचे काम अस्मादिकांना आली, पण ते सध्या राहु दे)

 

हे हि वाचा – Gautam Adani: शून्यापासून विश्व निर्माण करणाऱ्या गौतम अदानी यांच्या यशाचा प्रवास

 

या प्रकरणी हिंडेनबर्ग यांनीही मान्य केलेली वस्तुस्थिती ही, की सर्व व्यवहार कागदोपत्री नोंदी असलेले, सरकारी यंत्रणांच्या माध्यमांतुन, सरकारी निगराणीखालीच झाले आहेत, त्या बाबतीत अनेकदा शासकीय पातळीवरुन चौकशा झाल्या आहेत.

महत्वाची बाब म्हणजे सर्व नियम, कायदे पाळुन आपले पैसे योग्य त्या मार्गाने योग्य त्या ठिकाणी हवे तसे गुंतविणे हा अदानींनी या प्रकरणी वापरलेला मार्ग यापुर्वी व आजही अनेक कंपन्या वापरतात. रियो टीन्टो, सॅमसंग वा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्याही अशा उपकंपन्या आहेत..

याशिवाय भारतातही अनेक प्रवर्तक अप्रत्यक्ष मार्गाने आपल्या बगलबच्चांकरवी आपल्या कंपनीचे शेअर्सची खरेदी करतात. (आपल्या ‘UTI’ ची पुर्नरचना होण्याआधी काही उद्योग घराण्यांवर ‘UTI’ व्यवस्थापनाला अनेकदा अशी सक्तिची खरेदी करायला लावल्याचे आरोप होत असत.)
अर्थात या प्रकरणी ‘related party transaction disclosure’ ई. अनेक किचकट तरतुदी आहेत, ज्यांचे पालन झाले आहे का?? हा खोल विषय आहे.

अदानींनी कर्जे घेताना बॅकांकडे तारण ठेवलेले शेअर्स, ही ही काही यापुर्वी कधीही न घडलेली बाब नाही,
प्राप्त माहितीनुसार अदानी पॉवर व अदानी पोर्ट्स ह्या कंपन्या वगळता अन्य कोणत्याही कंपनीचे दहा % शेअर्सही तारण ठेवलेले नाहीत. अदानी टोटल गॅस व विल्मर या कंपन्याचे तारण शेअर्सचे प्र्माण 0% आहे.

माध्यमांत आलेल्या माहितीप्रमाणे अदानींना बॅकांनी दिलेली कर्जे एकुण ₹81,000 कोटी ईतकी आहेत, तर आपल्या एकट्या LIC च्या खात्यांत ₹80,000 कोटी किंमतीचे अदानी समुहाचे शेअर्स आहेत, सबब ह्या संस्थांचे काही खरे नाही,अशी आवई जोरात घुमते आहे.
ही माहिती सर्वसामान्य माणसाची छाती दडपणारीच आहेच, मात्र आता जरा हे ही आकडे पहा..

भारतीय बॅंकांनी वितरीत केलेल्या एकुण कर्जाची रक्कम ₹1,31,000,00 कोटी आहे, त्यांच्याकडील ठेवी आजमितीस ₹1,65,00,000 एवढ्या आहेत आणि, ‘LIC’ कडील गुंतवणुकीची किंमत ही ₹ 10,00,000+ कोटी आहे. आणखी एक सांगतो, भारतीय म्युचुअल फंडांतील अदानी समुहाच्या गुंतवणुकीचे प्रमाण हे म्युचुअल फंडांतील एकुण गुंतवणुकीच्या 1% पेक्षा कमी आहे.

आता सांगा, की अदानींचे हे प्रकरण म्हणजे अगदी ‘दर्या मे खसखस’ एवढे क्षुल्लक नसले, तरी ‘सागर मे घागरच’ आहे की नाही?? मग उगीच बॅंका बुडणार, अर्थव्यवस्था कोसळणार, महागाई वाढणार ही हाकाटी कशाला मारायची..

 

हे हि वाचा – शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे

 

या तथाकाथित महाभयंकर अहवालातील मला जाणवलेली एक गोष्ट, म्हणजे या खुलाशांत हिंडेनबर्गने अशी कोणतीही नवीन माहिती दिलेली नाही, जी याआधी सार्वजनिक रित्या खुली नव्हती.
या अहवातील अनेक खुलासे हे सर्वसामान्य गुंतवणुकदाराकरिता धक्कादायक व नीतीमत्तेशी फारकत घेणारे असु शकतील, मात्र संस्थागत मोठे गुण्तवणुकदरांकरिता तसे असयला नको. याशिवाय ते कायद्याचे उल्लंघन आहे का?? हा प्र्श्न अनुत्तरीतच रहातो.

वर म्हटल्याप्र्माणे ‘भाऊबंदच संचालक आहेत, त्यांचा तो ऑडिटर असा होता,आणि करंट रेशो तसा होता..’ ई प्रत्येकाला आधीच माहिती असलेल्या मुद्द्यांवर जागतिक स्तरावरील गुंतवणुकदारांनी आधी लक्ष न देता आत्ता, याक्षणी हबकुन जाणे,
हे म्हणजे बॉलिवुडमधील खलनायकाच्या कुटील कारस्थानांची माहिती चित्रपटांतील प्रत्येक पात्राला असते, फक्त त्याची कॉलेजवयीन लाडकी मुलगी सोडुन, तीला ते चित्रपटाच्या शेवटी कळते ..यातलाच अतर्क्य प्रकार झाला.

दुसरीकडे हिंडेनबर्गने दिलेली माहिती ही जुनी पण पुर्णतः तथ्थांवरच आधारित असल्याने अदानी त्यांच्याविरुद्ध कोणतीही न्यायालयीन कारवाई करु शकणार नाहीत, याचीही हिंडेनबर्गना खात्री असावी.

हिंडेनबर्ग अहवालातील काही मुद्दे मात्र मान्य करायलाच हवे, त्यात लिहिल्याप्र्माणे अदानी समुहाचे कर्जे घेण्याचे प्रमाण हे धोकादायक आहे हे निश्चित, आणि अदानींसारख्या बड्या घराण्यांना अशी कर्जे देण्यात सरकारी बॅंका, विमा कंपन्या जी ‘तत्परता’ दाखवितात ती ही संशयास्पद आहे.

गेल्या काही वर्षांतच अदानी समुहाच्या मुल्यात झालेली वाढ ही अवास्तव वाटावी अशीच होती, यातील अनेक कंपन्या गुंतवणुकीचे नियमित निकष पहाता अवाजवी किमतीस पोहोचल्या होत्या. ‘वाढ’ संपुन ‘सुज’ सुरु झाली होती. आणि प्रत्येक बुडबुड्याच्या वाटेंत एक टाचणी येतेच (A pin lies in wait for every bubble) हा प्रवाद येथेही खरा होणारच होता, तो झाला.

मंडळी, मंदीवाल्यांकडुन एखाद्या बड्या शेअरचा ‘गेम’ करण्याचा हा काही पहिलाच प्रयत्न नाही.

असे सांगतात, की सन 1980 च्या सुमारास स्व. मनुभाई मानेक या मुंबईतील मंदीसम्राटाने धीरुभाईंच्या रिलायन्सशी पंगा घेतला, पण धीरुभाईंनी डाव कसा उलटवला याच्या सुरस कथा अस्मादिकांनी वाचल्या आहेत.

अलिकडे्च प्रसिद्ध गुंतवणुकदार बील ॲकमन यांनी हर्बालाईफ या कंपनीविरुद्ध असेच रान उठवुन कंपनीचे कोट्यावधी शेअर्स एकतर्फा विकुन बक्कळ नफा कमाविला. (योगायोग असा, की याच ॲकमन साहेबांनी काल हिंडेनबर्ग ची तारीफ केली)
चीनमधील काही कंपन्यांबाबतही ‘मडी वॉटर्स’ नावाच्या संस्थेने हाच प्र्कार केला होता.

या प्रकरणांत सामील हिंडेनबर्ग कंपनीचा असा ‘खुन-खराबा’ करण्याचा ईतिहास सांगतो की त्यांनी सावज म्हणुन हेरलेल्या पैकी जवळजवळ ७५% कंपन्या परत पुर्वीसारखी उभारी घेवु शकल्या नाहीत.

या गौप्यस्फोटामुळे म्हणा, की काही (‘ज्ञानी’) जणांना आपल्या मा. अर्थमंत्र्यांनी केलेल्या गाजर हलव्याचा नमुना खायला मिळाल्याने म्हणा, गेल्या काही दिवस आधीच अंमळ नरम असलेली बाजाराची ‘तबियत’ आणखी बिघडली.

आता अदाननी समुहाच्या शेअर्सचे भवितव्य काय?? वा बाजारावर याचा किती परिणाम होईल आणि छोट्या गुंतवणुकदारांनी काय करावे?? या प्रश्नांवरील माझ्या विषयाच्या आकलनाकडे वळण्याआधी बाजार नेहमीच आपल्या तर्काला चकवा देणाऱ्या चाली करतो, आणि ‘Man purposes, God disposes’ या म्हणीईतकेच ‘Man purposes, Market disposes’ हे ही सत्य आहे हे लक्षांत ठेवावयास हवे.

या हिंडेनबर्ग वि. अदानी प्रकरणात अदानींच्या बाबत समुहाचे ७५% भागभांडवल त्यांच्या स्वतःकडेच आहे व काही भाग त्यांनीच छुपेपणाने घेतले असल्याचे हिडेनबर्गनेच सांगितले आहे.

सबब मंदीवाल्यांना बेछुट विक्री करायला आवश्यक ती शेअर्सची रसद मिळणे तसे कठीणच आहे. त्यामुळे भाव खुप जास्त कोसळणार नाहीत, असे मानायला हरकत नसावी. मात्र तरीही, या वावटळीनंतर अदानी पुर्वीची विश्वासार्हता व बाजारमुल्य मिळवु शकतील का?? ह्या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र अवघड आहे.

बाजाराचे बाबतीत सांगायचे तर बाजाराची नकारात्मक प्रतिक्रिया ही अतिशय जलद आणि नेहमीच आवश्यकतेपेक्षा तीव्र असते.
म्हणजे पहा ना, अदानीना भारतीय बॅंकांनी दिलेले एकुण कर्ज आहे ₹81,000 कोटी, मात्र गेल्या दोन तीन दिवसांत एकट्या ‘SBI’ च्या बाजारमुल्यातच ₹ 54,000 ची घट झाली. आणि पुर्ण अदानी समुहाच्या बाजारमुल्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान भारतीय बाजारांचे आधीच झाले आहे.

कारण खरे असो वा खोटे, बाजाराचा कल तात्पुरता का होईना मंदीचा झाला आहे, तो लगोलग बदलेल (अपवाद अर्थसंकल्पातील घोषणांचा) या आशेवर तळ शोधण्याच्या प्रयत्नात घाईने खरेदी वा करावी, सा सल्ला मी देणार नाही.
मात्र लवकरच बाजार या नकारात्मक बाबी पचवुन उभारी गाठेल, अशी आशा मी बाळगुन आहे.

 

एकीकडे नैतिकता फाट्यावर मारुन नियमांचा पुरेपुर फायदा ऊठविणारे उद्योगपति, तर दुसरीकडे अर्घवट, गोंधळात टाकणारे नरो वा कुंजरो.. शैलीचे भाष्य करणारे हिंडेनबर्ग सारखे मंदीवाले(short Sellers) या दोन ‘ज्ञानी’ लोकांच्या टक्करीत जमीनदोस्त होणारे आपण गुंतवणुकदार ‘अज्ञानी’ ठरतो असा ईतिहास आहे.

 

दोन ज्ञानी महानुभांच्या वादांत अज्ञानी लेकरांनी मधे पडु नये असे म्हणतात..
आपण पामरांनीही हाच कित्ता या वादावादींत गिरवावा हे उत्तम.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…