Reading Time: 3 minutes

शेअरबाजारात गुंतवणूक करणारे जाणीवपूर्वक धोका पत्करत असतात. यातून होऊ शकणारा आकर्षक परतावा त्यांना खुणावत असतो. कधीतरी एखादा शेअर्स आपले सर्व आयुष्यच बदलून टाकेल असा विश्वास त्यांना वाटत असतो. असे शेअर्स मिळतील न मिळतील पण शिस्तबद्ध गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीस बाजारातून मिळणारा परतावा शेअर्सवर मिळणारा लाभांश म्हणजे डिव्हिडंड आणि भाव वाढून भांडवलात होणारी वृद्धी अशा दोन प्रकारे मिळतो. डिव्हिडंड आणि भांडवलात होणारी वृद्धी दोन्ही करपात्र आहेत. डिव्हिडंड व्यक्तीच्या करपात्र उत्पन्नात मिळवला जाऊन त्यावर चालूदराने कर आकारणी केली जाते तर भांडवलात झालेली वाढ हा भांडवली नफा समजला जावून शेअर्स धारण करण्याच्या कालावधीनुसार अल्प किंवा दीर्घ मुदतीचा असतो त्यावर विशेष दराने कर भरावा लागतो तो अन्य कराच्या तुलनेत बराच कमी आहे. ज्या भावाने शेअर्स खरेदी केले त्यावर मिळणारा परतावा हा डिव्हिडंड बरोबर तुलना केली तर अत्यल्प असतो. याला अपवाद असलेले काही शेअर्स आहेत जे बँकेतील फिक्स डिपॉझिटच्या तुलनेत अधिक परतावा देतात अनेक गुंतवणूकदार असे आहेत त्यांना सातत्याने नियमित उत्पन्नाची गरज असते म्हणून आशा शेअर्सना डिव्हिडंड स्टॉक असेही म्हटले जाते परंतु त्यांचा बाजारभाव हा तुलनेने कमी असल्याने त्यातून होणारी भांडवलवृद्धी कमी असते तर जास्तीतजास्त भांडवलवृद्धी व्हावी अशी गुंतवणूक दाराची इच्छा असते.

कंपनी कायद्यात, कंपनीने तिला झालेल्या फायद्यातील निश्चित वाटा डिव्हिडंड म्हणून भागधारकांना द्यावा असे कोणतेही बंधन नाही. अशा अनेक जगप्रसिद्ध कंपन्या आहेत ज्यांनी फायद्यात असूनही अद्याप डिव्हिडंड दिलेला नाही तरीही भारतीय शेअरबाजारात सर्वसाधारणपणे फायद्यात असणाऱ्या कंपन्या डिव्हिडंड देतात. बोनस रूपाने शेअर्सही देतात वर म्हटल्याप्रमाणे ज्यांना डिव्हिडंड स्टॉक असे म्हटले जाते त्यात भांडवलवृद्धीची शक्यता कमी असते त्यांची विभागणी – डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आणि हाय डिव्हिडंड स्टॉक अशी करता येईल या कंपन्या वर्षातून एकदा किंवा दर तीन महिन्यांनी डिव्हिडंड देतात. 

डिव्हिडंड ग्रोथ स्टॉक आपण अशा कंपन्यांना म्हणू शकतो ज्या कंपन्या भविष्यात डिव्हिडंड अधिक देऊ शकतील तर हाय डिव्हिडंड स्टॉक म्हणजे अशा कंपन्या ज्या भविष्यात डिव्हिडंड कदाचित अधिक देऊ शकतील परंतु सध्या त्या त्यांच्या नफ्यातील अधिक भाग त्या डिव्हिडंड रूपाने भागधारकांना देत आहेत.

गुंतवणूकदारांनी डिव्हिडंड स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्याची कारणे-

◆सातत्याने मिळणारे अप्रत्यक्ष उत्पन्न- या कंपन्या दरवर्षी किंवा दर तिमाहिस डिव्हिडंड देत असल्याने सातत्याने काहीतरी पैसे नियमित मिळत राहतात याची तुलना बँकेतून मिळणाऱ्या फिक्स डिपॉझिट वरील व्याजाशी करता येईल. अशा तऱ्हेने नियमितपणे उत्पन्न मिळत राहणे ही काही जणांची गरज असू शकते. असे उत्पन्न नियमितपणे मिळणे ही त्याच्या दृष्टिकोनातून सुयोग्य गुंतवणूक असेल.

◆अन्य शेअर्सच्या तुलनेत कमी जोखमीची गुंतवणूक- या शेअर्समधील गुंतवणूकीत तुलनेने जोखीम कमी आहे. त्याच्या बाजारभावात फार चढ उतार होत नाहीत. बाजार अन्य कोणत्याही कारणाने खाली आला तरी या शेअर्सचे भाव फारसे उतरत नसल्याने भांडवली नफा किंचित कमी होऊ शकतो. त्यात फारसा फरक पडत नसल्याने तुलनेने यात जोखीम कमी आहे.

◆डिव्हिडंडची त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये पुनर्गुंतवणूक शक्य- जेव्हा गुंतवणूक दारास डिव्हिडंड मिळेल तेव्हा एक तर तो स्वतःसाठी खर्च करता येईल किंवा त्याच कंपनीचे अधिक शेअर्स खरेदी करता येईल. अशा पध्दतीने गुंतवणूक त्याच कंपनीच्या शेअर्समध्ये केल्यास डिव्हिडंड चक्रवाढ पद्धतीने वाढेल. यामधून मिळणारा परतावा सातत्याने वाढताच राहील.

◆दुहेरी फायदा- अशा शेअर्समधून डिव्हिडंड तर मिळतोच त्याचप्रमाणे त्यातून भांडवली नफाही होत राहील असा दुहेरी फायदा होईल त्यामुळे आपोआपच मूल्यवृद्धी होत राहील.

◆वाढत्या महागाईवर मात- यातून मिळणारा डिव्हिडंड आणि भांडवल वृध्दी यामुळेच अशी गुंतवणूक वाढत्या महागाईवर मात करणारा परतावा मिळावणारी असते.

◆बाजार अस्थिरतेवर मात- बाजार कितीही अस्थिर असला तरी अशा शेअर्सच्या बाजारभावात फारसा फरक नसल्याने बाजारातील अस्थिरतेवर आपोआपच मात केली जाते. त्यामुळे गुंतवणूक करून ती तशीच ठेवणे अशा पद्धतीने गुंतवणूक करणाऱ्याच्या दृष्टीने अशा शेअर्स मधील गुंतवणूक हे वरदान ठरण्याची शक्यता आहे.

डिव्हिडंड स्टॉकमधील गुंतवणूक कोणाच्या फायद्याची-      

डिव्हिडंड स्टॉक मधील गुंतवणूक सोपी आणि कमी जोखीम असलेलीच आहे, असा यातून समज होत असेल तरी इतक्या सहजतेने ही गुंतवणूक करावी असा विचार गुंतवणूकदारांनी करू नये. गुंतवणूक केल्याने त्यातून मिळणारे फायदे आणि त्याच्या मर्यादा जाणून घ्याव्यात त्या आपल्या गुंतवणूक धोरणाशी मिळत्या जुळत्या असतील तरच गुंतवणूक करण्याचा विचार करावा. ते स्वतःला सावध गुंतवणूकदार समजत असतील तर अशी गुंतवणूक करण्यामागचे फायदेतोटे लक्षात घ्यावेत. दीर्घकाळात अशी गुंतवणूक अपवादात्मक प्रमाणात भरपूर मूल्यवृद्धीही करून देऊ शकते. यासाठी संशोधन करून कंपनीचे मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करणे गरजेचे आहे. ग्रोथ स्टॉकमधून खात्रीपूर्वक नियमित परतावा आणि काही प्रमाणात मूल्यवृद्धी निश्चित होईल एवढेच यातून ठामपणे सांगता येईल त्यामुळे अशी गुंतवणूक ही काही जणांच्या दृष्टीने योग्य गुंतवणूक असल्याचा निष्कर्ष आपण यातून काढू शकतो. अनेक गुंतवणूकदार हीच गुंतवणूक आदर्श मानून केवळ ग्रोथ स्टॉकमध्येच गुंतवणूक करीत आहेत.

 

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संघटनेच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळाचे सदस्य असून महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकर म्हणून कार्यरत आहेत. लेखातील मते वैयक्तिक असून ती गुंतवणूक शिफारस नाही हे लक्षात घ्यावे यातील मुद्द्यांवर आपल्या गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करावी.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…