Reading Time: 3 minutes

शेअर बाजारात नोंदणी न केलेले शेअर्स म्हणजे असुचिबद्ध शेअर्स हे आपल्या लक्षात आलं असेलच याची माहिती आपण यापूर्वी घेतली आहे. त्याची थोडक्यात उजळणी करूयात.

असुचिबद्ध शेअर्स घेण्याचे फायदे:

  • शेअर्स असुचिबद्ध असले तरी त्यांची खरेदी विक्री करणारे अनेक मंच उपलब्ध असून त्यातून फायदा मिळवता येतो.
  • असे शेअर्स सुचिबद्ध झाल्यानंतर ठरावीक कालावधीनंतर त्याची विक्री करून नफा मिळवता येते.
  • याशिवाय डिव्हिडंड, राईट आणि बोनस यामुळेही त्यातून मूल्यवृद्धी होऊ शकते.
  • उज्वल भविष्य असणारे शेअर्स अधिक प्रमाणात कमी मूल्यात मिळवून निश्चित अथवा दिर्घकाळात प्रचंड लाभ मिळवता येणं शक्य आहे.

सुचिबद्ध शेअर्स आणि असुचिबद्ध शेअर्स यामधे तुलना केली तर वेगळेपणा अथवा फरक लक्षात येतो,तो असा,

  • असुचिबद्ध शेअर्स कमी तरल असतात.
  • असुचिबद्ध शेअर्सचा बाजारभाव कमी आणि अपारदर्शक असतो.
  • या शेअर्ससाठी कमी नियामक नियमन असते. 
  • या शेअर्सबद्दल माहिती सहज उपलब्ध नसल्यानं मूल्यांकन करणं कठीण होतं. 
  • मोठ्या व्यवहार संचांमुळे खरेदीदार आणि विक्रेते यांना व्यवहार असुलभता निर्माण होते. 

असुचिबद्ध शेअर्समध्ये गुंतवणूक करताना विचारात घ्यायला हवेत असे  घटक:

  • गुंतवणूकदाराची जोखीमक्षमता
  • गुंतवणुकीमागील हेतू
  • तरलतेचा अभाव
  • गुंतवणूक संच विविधता
  • नियामक असुविधा

असुचिबद्ध शेअर्सवरील  करआकारणी

असे शेअर्स दोन वर्षांच्या आत विकल्यास अल्प मुदतीचा भांडवली नफा होऊन तो करदात्यांच्या नियमित उत्पन्नात मिळवून कर आकारला जातो, तर दोन वर्षानंतर होणारा नफा दीर्घकालीन भांडवली नफा समजण्यात येऊन त्यावर सरसकट 12.5% दरानं या विशेष दरानं कर आकारला जातो.

नियामक बंधनं

  1. असुचिबद्ध शेअर्स भविष्यात शेअरबाजारात नोंदले गेल्यावर किमान सहा महिने ते विकता येत नाहीत, एवढी गोष्ट सोडून अशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यावर कोणतंही कायदेशीर बंधन नाही. 
  2. भांडवल बाजारात होणाऱ्या होणाऱ्या सर्व व्यवहारांच्या पुर्ततेची हमी बाजारानं घेतलेली असते. त्यामुळे असे व्यवहार झाल्यावर शेअर बाजाराच्या निश्चित नियमांनी ते पूर्ण केले जातात. यामध्ये वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. अशी निश्चित व्यवस्था असुचिबद्ध शेअर्ससाठी नसल्यानं या व्यवहारात अधिक जोखीम असते. 
  3. आता अनेक मध्यस्थ, मान्यताप्राप्त ब्रोकर्स, फिनटेक कंपन्या, खाजगी कंपन्या यातील व्यवहार खात्रीपूर्वक करून देतात. हे व्यवहार 24 ते 48 तासांत पूर्ण होतात. ते करणाऱ्या काही मंचाची, फिनटेक कंपन्यांची आपण माहिती आपण करून घेऊया.

अनलिस्टेडझोन

  1. झिरोदाने ज्याप्रमाणे सुचिबद्ध शेअर्सच्या ब्रोकिंग व्यवसायात क्रांती घडवून आणली, त्याप्रमाणे सन 2018 स्थापन झालेल्या या मंचाने असुचिबद्ध शेअर्सच्या व्यवहारात क्रांती घडवून आणली. 
  2. उमेश पालिवाल आणि संतोष सिंग हे अभियांत्रिकी आयआयटी पदवीधर  याशिवाय 15 वर्षाहून अधिक काळ भांडवल बाजार व्यावसायिक दिनेश गुप्ता यांनी एकत्रित येऊन हा मंच स्थापन केला आहे. 
  3. या क्षेत्रातील संधी ओळखून तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंगवर आधारित असा हा गुंतवणूकस्नेही मंच आहे. त्यावर शेअर्सच्या मागील व्यवहार किंमती उपलब्ध असल्यानं त्यावरून सध्याच्या किमतीचा अंदाज घेता येऊ शकतो.
  4. त्यांनी व्यापक संशोधन केलेलं असल्यानं त्यावर आधारित व्हिडीओ ब्लॉग पाहून गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यास उपयोग होऊ शकतो. 
  5. त्यांचे भागीदार बनल्यामुळे असुचिबद्ध शेअर्सच्या संशोधन अहवाल, बातम्या मिळू शकतात. त्याचा वापर गुंतवणूकदार आणि त्याच्याशी संबधीत व्यक्तीना होतो. त्यांचे अँपही उपलब्ध असून त्याद्वारे खरेदी विक्री करता येऊन असुचिबद्ध शेअर्स, त्यांचे भाव, आलेख (चार्ट), प्री आयपीओ गुंतवणूक, स्टार्टअप यासंबंधीत माहिती मिळाल्यानं अशा कंपन्यांमध्ये त्यांच्या मध्यस्थीनं गुंतवणूक करता येणं सहज शक्य आहे.

आर्म्स सिक्युरिटीज: परसराम ग्रुपशी संबंधित असलेली ही खाजगी कंपनी गेली 35 वर्ष गुंतवणूकदारांना असुचिबद्ध शेअर्स, सुचिबद्ध पण व्यवहार होत नसलेले शेअर्स आणि कमी तरलता असलेल्या शेअर्सचे व्यवहार करीत आहे. असुचिबद्ध शेअर्सचा एक मॉलच आहे असं  म्हणता येईल. विश्लेषण, वाजवी सेवादर, स्पर्धात्मक किमती, आणि गुंतवणूक मार्गदर्शन ही या कंपनीची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्याचेही अँप उपलब्ध आहे. 

प्लानिफाय: हा एक फिनटेक मंच असून असुचिबद्ध शेअर्स, कमी तरलता अथवा कोणतीही तरलता नसलेल्या शेअर्समधील व्यवहार पूर्ण करून देतो. त्याचेही अँप उपलब्ध आहे या शिवाय ते कंपन्या, उद्योजक यांना निधी उभारून देण्याची मदतही ते  करतात. अनेक अनिवासी भारतीय या मंचाचा वापर करीत असून नजीकच्या भविष्यात प्रचंड मोठे होण्याची ताकद या मंचाकडे आहे. शार्क टँकच्या चवथ्या भागात सर्वाधिक गुंतवणूक या मंचाने पुरस्कृत केलेल्या उद्योगांत झाली.

3i ग्रुप पीएलसी: हा ब्रोकरेज मंच असून तो सुचिबद्ध आणि असुचिबद्ध शेअर्सचे व्यवहार करण्याचे काम करतो.

एनरीच ऍडव्हरटायजर: याच क्षेत्रामधला हा एक नामवंत मंच असून त्यांनी गुंतवणूकदारांना केलेल्या शिफारसीतून 34% परतावा मिळवून दिला आहे, असा त्यांचा दावा आहे. 250 हून अधिक कंपन्यांचे व्यवहार या मंचावरून नियमितपणे होत असतात.

पूर्वीच्या तुलनेत असुचिबद्ध शेअर्स खरेदी विक्री करण्यासाठी अनेक खात्रीपूर्वक मंच उपलब्ध आहेत. वर उल्लेख असलेल्या मचांशिवाय वेल्थ विस्डम, इंक्रेड मनी, शेअरकार्ट, स्टोकिफाय, कुबेरग्रोव हे आणि यासारखे अनेक मंच अशा शेअर्सची खरेदी विक्री करण्यात कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी काही कंपन्यांचे उपलब्ध असलेले शेअर्स, त्यांचे व्यवसायक्षेत्र, त्यांचा बाजारभाव, खरेदी विक्री संच अशी नमुन्यादाखल माहिती सोबतच्या चित्रात दिली आहे. यात दाखवलेले भाव, नक्की किती गुंतवणूक करणार यावर कमी अधिक होऊ शकतात. हे भाव केवळ माहिती असावी म्हणून दिले असून त्यातील बाजारभाव आणि बाजार व्यवहार संच यात बदल होऊ शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असेल तर इच्छुक व्यक्तींशी विशिष्ट दराबाबत वाटाघाटी करता येणं इथे शक्य आहे.

अनेक ब्रोकर्स त्यांच्या नियमित  ग्राहकांना असुचिबद्ध शेअर्सची खरेदीविक्री सुविधा देत असतात. त्यात ते मध्यस्थ म्हणून काम करत असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. यात उल्लेख केलेले गुंतवणूक मंच आणि असुचिबद्ध शेअर्स यामध्ये गुंतवणूक करताना यातील सोय गैरसोय यांचा पूर्ण विचार करूनच मगच योग्य तो निर्णय घ्यावा.  लेखात सुचवण्यात आलेले मंच आणि त्यावर व्यवहार होत असलेल्या शेअर्सची कोणतीही शिफारस हा लेख करीत नाही.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.