मागच्या भागात आपण विविध मंचावर उपलब्ध असणाऱ्या अपोलो ग्रीन एनर्जी, विक्रम सोलार, टाटा कॅपिटल, एसबीआय फंड मॅनेजमेंट लिमिटेड या सूचिबाह्य कंपन्यांची माहीती मिळवली, आज अजून काही प्रमुख कंपन्यांची माहिती मिळवूयात.
- एनएसई इंडिया लिमिटेड:
- सन 1992 मधे सरकारच्या पुढाकारानं स्थापन झालेलं राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) हे जगातील आघाडीचं स्टॉक एक्सचेंज आहे. त्यामधे सुमारे 2300 कंपन्या सूचीबद्ध आहेत.
- भारतीय आयुर्विमा महामंडळ, भारतीय स्टेट बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन हे यांचे महत्वाचे भागधारक आहेत. सन 1994 मधे, NSE ने इलेक्ट्रॉनिक स्क्रीन-आधारित ट्रेडिंग आणि इंटरनेट ट्रेडिंग सुरू केलं आणि भारतीय शेअरबाजारात क्रांती केली.
- NSE चा प्रमुख निर्देशांक, निफ्टी 50, भारतीय भांडवली बाजारांसाठी जागतिक बेंचमार्क म्हणून काम करतो. NSE हे जगातील सर्वात मोठे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज आहे. ज्याचा जागतिक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट ट्रेडिंगमध्ये 21% वाटा आहे.
- चलनातील फ्युचर्स ट्रेडिंगसाठी ते जगातील दुसऱ्या क्रमांकाचे डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज देखील आहे.
- NSE चं भांडवली बाजार व्यवसाय मॉडेल प्रामुख्यानं ट्रेडिंग सेवा, एक्सचेंज लिस्टिंग, मार्केट डेटा फीड, निर्देशांक आणि तंत्रज्ञान उपाय प्रदान करतं. तसंच रोख बाजार इक्विटी शेअर्स, म्युच्युअल फंड, ईटीएफ, आरईआयटी, सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स, सरकारी सिक्युरिटीज, टी-बिल इत्यादींच्या व्यापारासाठी एक व्यासपीठ मिळवून देतं. कर्ज बाजार सरकारी, कॉर्पोरेट बाँड, व्यावसायिक कागदपत्रं आणि इतर कर्ज साधनं उपलब्ध करून देतं.
- एनएसई इक्विटी निर्देशांक, हायब्रिड निर्देशांक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, गुंतवणूक बँका, पीएमएस आणि स्टॉक एक्सचेंजसाठी कस्टमाइज्ड निर्देशांकांसाठी निर्देशांक व्यवस्थापन सेवा देखील प्रदान करत आहे.
- गेल्या तीन वर्षांत कंपनीनं 35% च्या सीएजीआरवर कामगिरी केली आहे. एनएसईचा आर्थिक वर्ष 2024 अखेरचा महसूल ₹15640 कोटी तर निव्वळ नफा ₹8327 कोटींवर पोहोचला आहे. प्रति शेअर कमाई ₹33.47 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹1650/- च्या आसपास असून व्यवहार किमान 50 शेअर्सच्या पटीत करावा लागतो.
- मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1560/₹8160 या मर्यादेत होती. काही अंतर्गत चौकशींमुळे यांचा पब्लिक इशू लांबला, मात्र तो लवकरच येण्याची शक्यता आहे.
- चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड: (सीएसके)
- चार वेळा आयपीएल विजेता असलेला ‘सीएसके’ हा भारतातला एकमेव असा क्रीडा संघ आह, ज्यामधे सर्वसामान्यांना गुंतवणूक करता येईल. ‘सीएसके’ ही सर्वात लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझींपैकी एक आहे, ज्याचे ब्रँड व्हॅल्यू मजबूत आहे.
- या ब्रँडची स्थापना सन 2008 मधे चेन्नई, तमिळनाडूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आयपीएल क्रिकेट संघाच्या रूपात झाली. ही इंडिया सिमेंट्सची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. आयपीएलची लोकप्रिय फ्रँचायझी असल्यानं, सीएसके देशातली पहिली स्पोर्ट्स युनिकॉर्न बनली. या ब्रँडचं मार्केट कॅप 7800 कोटीपर्यंत वाढलं.
- चेन्नई सुपर किंग्ज गेट तिकीट कलेक्शन, स्टेडियममधील जाहिराती आणि मर्चेंडाईज विक्री अशा विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळवते. संघाला एकूण महसुलाच्या 60% रक्कम मीडिया राईट्समधून मिळते, जी सर्वाधिक महसूल प्रवाह आहे. प्रायोजकत्वातून मिळणारं उत्पन्न एकूण महसुलाच्या सुमारे 15 ते 29% आहे आणि त्यानंतर तिकीट विक्रीतून 10% आहे.
- करोना महामारीचा अनेक ब्रँडवर परिणाम झाला असला तरी, सीएसकेनं अप्रत्यक्ष महसूल प्रवाहांद्वारे संतुलन राखण्यात यश मिळवलं आहे. आयपीएलमधील सर्वात आवडत्या संघांपैकी एक, सीएसके, मर्चेंडाईज विक्री, प्रायोजकत्व, बक्षीस रकमेचा काही भाग आणि डिजिटल व्ह्यूअरशिपद्वारे ठोस महसूल मिळवत राहील.
- आर्थिक वर्ष 2024 अखेर कंपनीनं ₹695 कोटींच्या उलाढालीवर ₹ 201 कोटींचा निव्वळ नफा कमावला. त्यांची प्रति शेअर कमाई ₹ 6.14 आहे. दहा पैसे दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹190/- च्या आसपास असून व्यवहार 250 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹166/₹220 या मर्यादेत होती.
- कंपनी शेअरबाजारात येताना, त्यांचे दर्शनी मूल्य शेअर एकत्रित करून ₹1 करेल कारण भारतीय बाजारात एक रुपयांहून कमी दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे व्यवहार होत नाहीत.
3 ऑर्बिस फायनान्शियल्स कॉर्पोरेशन लिमिटेड:
- सन 2005 मधे स्थापित, ऑर्बिस फायनान्शियल कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारतातली वित्तीय सेवा क्षेत्रातील एक प्रमुख कंपनी आहे. ऑर्बिस कस्टडी आणि फंड अकाउंटिंग, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज क्लिअरिंग, शेअर ट्रान्सफर एजन्सी आणि ट्रस्टी सेवा यासारख्या विस्तृत सेवा देते.
- कंपनीच्या ग्राहकांत 50 हून अधिक परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPIs), 150 पर्यायी गुंतवणूक निधी (AIFs) आणि 800 हून अधिक अनिवासी भारतीय (NRIs) यांचा समावेश आहे. कंपनी कस्टोडियल आणि क्लिअरिंग उत्पन्न आणि ट्रेझरी-संबंधित उत्पन्नातून महसूल मिळवते. ती भांडवली बाजारातून देखील उत्पन्न मिळवते.
- अलिकडच्या वर्षांत, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 अखेर 366 कोटी रुपयांच्या उलढालीवर 141 कोटींच्या निव्वळ नफ्यासह उत्कृष्ट आर्थिक वाढ दर्शविली आहे. प्रति शेअर कमाई ₹12.1 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹470/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹290 / ₹510 या मर्यादेत होती.
- स्टड्स एक्सेसरीज लिमिटेड:
- दुचाकी हेल्मेट उत्पादनात जागतिक आघाडीवर असल्यानं, स्टड्स संघटित दुचाकी हेल्मेट बाजारपेठेत जवळजवळ एक तृतीयांश वाटा उचलतात. कोविड-१९ दरम्यान स्टड्सना जास्त मागणी असताना फेस शिल्ड आणि प्रोटेक्शन वेअर तयार करण्याची संधी मिळाली.
- रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारत फक्त BIS-प्रमाणित दुचाकी हेल्मेटच तयार आणि विक्री करेल असे जाहीर केल्यावर स्टड्सच्या विक्रीला आणखी एक चालना मिळाली. कोविड-19 नंतर वाहतूक पुन्हा सुरू झाल्यामुळे दुचाकी हेल्मेटची मागणी झपाट्याने वाढत आहे.
- याशिवाय, लोक अनेकदा दोन ते तीन वर्षांत त्यांचे हेल्मेट बदलतात, ज्यामुळे कंपनीला अधिक व्यवसाय मिळतो. स्टड्स रायडिंग गियर ग्लोव्हज, गॉगल्स, जॅकेट आणि सेफ्टी आणि स्टोरेज गियरसह ॲक्सेसरीज उत्पादनाचा विस्तार करत आहे. याव्यतिरिक्त, स्टड्सला सायकल हेल्मेट विक्रीवर वर्चस्व गाजवण्याची संधी देखील आहे.
- कंपनी युरोप आणि अमेरिकेसह 40 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. अलीकडेच, कंपनीनं हरियाणातील फरीदाबादमधे आपली उत्पादन क्षमता दुप्पट केली आहे.
- सन 2024 आर्थिक वर्ष अखेर कंपनीची उलाढाल ₹531 कोटी असून प्रति शेअर कमाई ₹14.54 आहे. पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹680/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो. मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹670 / ₹1550 या मर्यादेत होती.
विविध मंचावर हे आणि असे अनेक कंपन्यांचे शेअर्स उपलब्ध असून त्यांचा व्यवहार संच आणि बाजारभाव यात मंचानुसार फरक पडू शकतो. मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री करायची असल्यास बाजारभावात फरक पडू शकतो. हा लेख कोणतीही गुंतवणूक शिफारस करीत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
©उदय पिंगळे
अर्थ अभ्यासक
(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.)