Reading Time: 3 minutes

गेल्या काही वर्षांत सूचिबाह्य शेअर्स अधिक लोकप्रिय झाले असून गुंतवणूकदार अशा उदयोन्मुख कंपन्यांचे शेअर्स खरेदी करत आहेत. या शेअर्समधे गुंतवणूक करून, गुंतवणूकदाराला दोन प्रकारे परतावा मिळतो. 

  • ओव्हर-द-काउंटर ट्रेडिंगमुळे या शेअर्सच्या किंमती आणि मूल्य दीर्घकाळात वाढू शकते. 
  • प्री-लिस्टिंग (सुचिबद्ध होण्यापूर्वी) आणि लिस्टिंग नफा (सुचिबद्ध झाल्यानंतर सहा महिन्यांनी) मिळू शकतो. 

अनेक लोक सूचिबाह्य शेअर्सबद्दल अधिक चौकशी करीत असून त्यांच्याविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहेत. त्यामधे सध्या उपलब्ध असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असलेल्या काही महत्वाच्या कंपन्यांची माहिती आपण आज घेऊयात.

१. अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड

  • शाश्वत ऊर्जा क्षेत्रात प्रगती करण्याचे उद्दिष्ट ठेवून, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ही भारतातील उगवत्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी सन 1994 मधे स्थापन झाली असून ती अपोलो ग्रुपच्या मालकीची आहे. 
  • अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत लागणाऱ्या सेवा पुरवण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यांची खासियत सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोमास आणि ऊर्जा साठवणूक उपायांना अनुकूलित करणे यामध्ये आहे. 
  • एनएचपीसी, आइओसी, अडाणी ग्रीन हे त्याचे ग्राहक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हरित ऊर्जा संसाधनांकडे वळण्यासाठी उद्योग आणि समुदायांना सोबत घेऊन कार्बन फूटप्रिंट कमी करणं हे त्यांचं ध्येय आहे. ही कंपनी नफ्यात असून प्रति समभाग ₹16 कमाई करीत आहे. 

आर्थिक वर्ष 2025-26 मधे 1380 कोटी आणि आर्थिक वर्ष 2026-27 मधे 2000 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळवेल अशी अपेक्षा आहे. सध्या, कंपनी विविध प्रकल्पांवर काम करत आहे, उदाहरणार्थ, 

स्मार्ट सोलर स्ट्रीट लाईट इन्स्टॉलेशन, सोलर पॅनल इन्स्टॉलेशन, थर्मल पॉवर प्रोजेक्ट आणि ग्रामीण पाणीपुरवठा प्रकल्प हे काही प्रकल्प आहेत. 

  • अंमलबजावणी अंतर्गत प्रकल्पांची एकूण किंमत अंदाजे 1375 कोटी आहे. आशादायक वाढीसह, अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक बनली आहे. 
  • दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 240/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो.  मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹155/₹515 या मर्यादेत होती.

२. विक्रम सोलर लिमिटेड

  • सन 2006 मधे स्थापित, विक्रम सोलर ही भारतातील आघाडीच्या सोलर पीव्ही मॉड्यूल उत्पादकांपैकी एक आहे. सध्या, 3.5 गिगावॅट क्षमतेसह, कंपनी एकात्मिक सौर ऊर्जा उपाय, अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) सेवा आणि ऑपरेशन्स आणि देखभाल देखील प्रदान करते. 
  • विक्रम सोलरचे तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधे तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे भारतातील 600 जिल्ह्यांमध्ये 42 हून अधिक वितरक आहेत. विक्रमचा 70% महसूल पीव्ही मॉड्यूलमधून आणि सुमारे 20% ईपीसी सेवांमधून येतो.
  • कोची (केरळ) विमानतळावर पूर्णपणे सौरऊर्जा वापरण्यात, कोलकातामध्ये तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाची स्थापना करण्यात आणि संपूर्ण भारतात मोठ्या प्रमाणात छतावरील सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात योगदान देणारी ही पहिली कंपनी आहे. 
  • कंपनीची अमेरिकेत विक्री कार्यालयं देखील आहेत आणि त्यांनी 32 हून अधिक देशांमधे  सौर पीव्ही मॉड्यूलचा पुरवठा केला आहे. कंपनीचा महसूल आर्थिक वर्ष 2023 मधे 2015 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो त्यामागील आर्थिक वर्षाच्या महसुलापेक्षा 18% जास्त आहे.
  •  त्याची प्रति शेअर कमाई ₹3.08 आहे. विक्रम सोलरने प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग (आयपीओ) साठी सेबीकडे अर्ज केल्याची बातमी असून दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 410/- च्या आसपास असून व्यवहार 100 शेअर्सच्या पटीत करावा लागतो. मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹235/₹505 या मर्यादेत होती.

३. टाटा कॅपिटल लिमिटेड: ​​

  • ही टाटा सन्सची उपकंपनी असून भारतीय रिझर्व बँकेकडे ठेवी स्वीकारत नसलेली एनबीएफसी म्हणून नोंदणीकृत आहे. तिच्या उपकंपन्यांसह, टाटा कॅपिटल कॉर्पोरेट, रिटेल आणि संस्थात्मक ग्राहकांना वित्तीय सेवा देते. 
  • कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमधे विविध प्रकारची कर्जे, गुंतवणूक सल्लागार, क्लीनटेक फायनान्स, खाजगी इक्विटी, संपत्ती उत्पादने, व्यावसायिक आणि एसएमई फायनान्स, लीजिंग सोल्यूशन्स आणि टाटा कार्ड यांचा समावेश आहे. 
  • आर्थिक वर्ष 2024 मधे कंपनीची उलाढाल ₹8630/- कोटींवर पोहोचली. प्रति शेअर कमाई ₹ 8.57 आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 960 /- च्या आसपास असून व्यवहार  30 शेअर्सच्या पटीत करावा लागतो. 
  • मागील वर्षभरात शेअरची किमान / कमाल किंमत ₹865/₹1130 या मर्यादेत होती.

४. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेड

  • ही भारतातली लोकप्रिय आणि सर्वात मोठ्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांपैकी एक आहे. सन 1987 मध्ये स्थापन झालेली ही कंपनी हा  स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अमुंडी (एक जागतिक निधी व्यवस्थापन कंपनी) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. एसबीआयकडे सध्या 63% हिस्सा आहे आणि उर्वरित 37% हिस्सा अमुंडीचा आहे. 
  • एसबीआय म्युच्युअल फंड इक्विटी म्युच्युअल फंड, डेट फंड, हायब्रिड म्युच्युअल फंड, सोल्युशन-ओरिएंटेड स्कीम आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंड यासारख्या विस्तृत श्रेणीतील म्युच्युअल फंड योजना देतात.
  • कंपनीने सन 2015 मध्ये पर्यायी गुंतवणूक व्यवस्थापन फंड (एआयएफ) देखील लाँच केला आणि भविष्यात आणखी निधी लाँच करू शकते. 53 पेक्षा जास्त म्युच्युअल फंड योजनांसह, एसबीआय म्युच्युअल फंडांकडे ₹1.65 ट्रिलियन रुपयांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) आहे आणि 12 दशलक्षाहून अधिक गुंतवणूकदार आहेत. 
  • एसबीआय फंड व्यवस्थापन सन 1988 पासून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना सेवा देत आहे. कंपनी भारतातील समर्पित ऑफशोअर फंडांचे मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करते. 
  • कंपनी एचएनआय, मोठे भविष्य निर्वाह निधी, संस्था आणि निवडक ट्रस्ट यांना पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवा देखील देते. एसबीआयएफएमचा एएयूएम पुढील सर्वात मोठ्या समकक्ष (आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड) पेक्षा 44% जास्त आहे. आणि उर्वरित बाजारपेठेने पाच वर्षांच्या कालावधीत 10% वितरित केले असताना त्यांनी त्याच कालावधीत 27% सीएजीआर गाठला आहे. 
  • अलीकडील आर्थिक अहवालांनुसार (मार्च 2024), एसबीआय फंड व्यवस्थापनाने ₹ 3418 कोटी रुपयांचा निव्वळ महसूल मिळवला आहे. प्रति शेअर कमाई ₹ 41.1 आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या या शेअर्सची सध्याची विविध मंचावरील खरेदी/ विक्री किंमत ₹ 2625/- च्या आसपास असून व्यवहार 75 शेअर्सच्या पटीत करावा लागतो. 
  •  मागील वर्षभरात त्याची किमान / कमाल किंमत ₹1785/₹2940 या मर्यादेत होती.

यापुढील भागात एनएसई इंडिया, ओर्बीस फायनांशीयल सर्व्हिसेस, चेन्नई सुपर किंग्ज आणि स्टड एक्सेसरीज लिमिटेड या कंपन्यांची माहिती घेऊ. या लेखातील माहिती हा गुंतवणूक सल्ला नाही. (अपूर्ण)

 

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.