मृत्युपत्र म्हणजे काय?

http://bit.ly/2m123Zg
2,652

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email

बागबान चित्रपट कोणाला आठवतोय? त्या चित्रपटात पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा, निवृत्तीच्यावेळी मिळालेले सर्व पैसे आपल्या मुलांच्या नावावर करून फसलेला पण पुन्हा त्याच ताकदीने परिस्थितीशी दोन हात करून स्वतःच्या पायावर उभा राहिलेला बाप अमिताभ बच्चन यांनी छान रंगवला आहे. 

वास्तव आयुष्यातही अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपला  स्वार्थ साध्य झाल्यावर आई वडिलांची अथवा घरातील वृद्ध व्यक्तींची जबाबदारी नाकारणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे कोण आपलं कोण परकं, हे ओळखून आपल्या पश्चात आपल्या स्वकष्टार्जित मालमत्ता कोणाच्या ताब्यात द्यायची, हे ठरवण्याचा अधिकार कायद्याने प्रत्येकाला दिला आहे.

आपल्या मालमत्तेचं मृत्यूपत्र (Will) बनवून आपण आपल्या स्वकष्टार्जित मालमत्तेचा वारसदार ठरवू शकतो. याचबरोबर मालमत्तेची विभागणी कशी करायची, याबद्दलच्या सूचनाही मृत्युपत्रात नमूद करता येतात. या लेखात आपण मृत्युपत्र म्हणजे काय? त्यासंदर्भातील कायदे, नियम व अटींची माहिती घेणार आहोत. 

मृत्यूपत्र (Will) म्हणजे काय? 

 • मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेचे विभाजन, वारसाहक्क, अल्पवयीन मुलांचे पालकत्व व संगोपन आणि त्यांच्या भविष्याची तरतूद इत्यादी गोष्टींसंदर्भात घेतलेला निर्णय अथवा केलेली तरतूद म्हणजे मृत्युपत्र. 

 •  हा एक कायदेशीर दस्तऐवज आहे. मृत्युपत्राला इच्छापत्र असेही म्हणतात. मृत्यूपत्र हे लिखीत स्वरुपात असावे.

 • मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने, मृत्युपत्र बनवून झाल्यावर, त्यावर किमान दोन साक्षीदारांसमोर सही करणे आवश्यक आहे. तसेच, त्यावर तारीख, वार, वेळ व ठिकाण या साऱ्याची नोंद करणेही आवश्यक आहे.

 • मृत्यूपत्र तयार करणारी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असावी. अन्यथा संबंधित मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही.

 मृत्युपत्रासंदर्भातील काही महत्वाचे नियम: 

 • आपली स्वकष्टार्जित मालमत्ता मृत्यूपत्राद्वारे एखादया व्यक्तीला अथवा संस्थेला दान करता येते. 

 • मृत्यूपत्रामध्ये अल्पवयीन (minor) अथवा मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलांच्या पालनपोषणाची व त्यांच्या भविष्याची तरतूद करुन ठेवता येते.

 • मृत्युपत्राद्वारे विवाहापूर्वी अथवा विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या अपत्यांच्या (अनौरस मुलांच्या) नावे संपूर्ण मालमत्ता करता येते. मुलं अज्ञान असली तरीही संपूर्ण मालमत्ता त्यांच्या नावे करता येते. 

 • मृत्यूपत्र असल्यास मृत्यूपश्चात त्याच्या संपत्तीचे वाटप हे “भारतीय वारसाहक्क कायदा १९२५” मधील तरतूदींनुसार केले जाते. 

 • मृत्यूपत्राअभावी मात्र व्यक्तीच्या संपत्तीचे वाटप “हिंदू वारसाहक्क कायदा १९५६” च्या तरतुदीनुसार केले जाते. यामध्ये सामान्यतः अर्धी मालमत्ता मृत व्यक्तीच्या पत्नीला आणि उर्वरित अर्धी मालमत्ता मुलांना दिली जाते. यामध्ये जर मुले अल्पवयीन असतील तर त्या संदर्भात कोर्टाकडून हस्तक्षेप केला जाऊ शकते. 

मृत्युपत्राद्वारे मालमत्तेची विभागणी:

 • मृत्यूपत्राद्वारे मालमत्तेची विभागणी करता येते. परंतु यासाठी काही नियम आहेत. सर्वच मालमत्तांची विभागणी मृत्यूपत्राद्वारे केली जात नाही. यामध्ये प्रामुख्याने निवृत्तिवेतन,  बॅंक खाते, आयुर्विमा पॉलिसी, स्टॉक, बॉंड्स, इत्यादी मालमत्तांचा सामवेश होतो. 

 • वर नमूद केलेल्या मालमत्तांसाठीचे नामांतरण म्हणजेच नॉमिनेशन हे संबंधित फॉर्म भरून त्याद्वारे निश्चित केले जात असल्यामुळे या मालमत्तांचा सामावेश मृत्यूपत्रामध्ये करता येत नाही. 

 • तसेच,  संयुक्त भाडेकरी मालमत्ता (Joint tenant property) मध्ये  उत्तरजीविता (survivorship) ही संयुक्त भाडेकरी मालमत्ता कायद्यानुसार ठरवण्यात येत असल्यामुळे या प्रकारच्या मालमत्तेसाठीही मृत्यूपत्र करता येत नाही.  

 • मृत्युपत्र करताना संपूर्ण मालमत्ता, तिचे स्वरूप, कायदेशीर वारस व कायदेशीर तरतूदींचा विचार करून योग्य त्या नियम व अटी घालाव्यात. पूर्ण विचार केलेल्या मृत्यूपत्राला  आव्हान देणे कोणालाही सहज शक्य होणार नाही. 

 • मृत्यूपत्र तयार झाल्यानंतर ते कायदेशीर सल्लागाराकडे किंवा योग्य त्या अधिकाऱ्याकडे सुपूर्त करावे. यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हा ते मृत्यूपत्र सादर केले जाऊ शकते. 

 • आयकराच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास ज्या मालमत्तेसाठी  मृत्यूपत्र तयार करण्यात आले आहे अशा मालमत्तेचे करदायित्व (tax liability) तुलनेने कमी असते.

मृत्यूपत्राची  नोंदणी (Registration):-

 • कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी करणे बंधनकारक नाही. पण तरीही नोंदणीकृत मृत्युपत्राला कायद्याचे संरक्षण असल्यामुळे त्याला आव्हान देणे सहजी शक्य होत नाही त्यामळे मृत्यूपात्राची नोंदणी करणे आवश्यक आहे. 

 • मृत्यूपत्र रजिस्टर करण्यासाठी संबंधित विभागातील रजिस्ट्रार किंवा सब रजिस्ट्रार यांच्यासमोर सादर करावे. रजिस्ट्रारकडून सर्व कागदपत्राची तपासणी झाल्यावर, ते मृत्यूपत्राबाबत समाधानकारक व निःशंक असल्यास, त्याची नोंद केली जाते. संबंधित नोंदीमध्ये तारीख, वार, दिवस व वेळ इत्यादी गोष्टींचीही नोंद केली जाते. 

 • कोर्टामध्ये रजिस्टर्ड म्हणजेच नोंदणीकृत मृत्यूपत्र नेहमीच ग्राह्य धरण्यात येते.

मृत्यूपत्र बदलता येते का ?

 • हो. एकदा केलेले मृत्यूपत्र बदलणे किंवा त्यामध्ये दुरुस्ती करणे सहज शक्य आहे.

 • मृत्यपत्रात नमूद केलेल्या मालमत्तेचे  हस्तांतरण, मृत्यूपत्रामध्ये नमूद केलेल्या व्यक्तीचा मृत्यू, लग्न किंवा घटस्फोट, मुलांचा किंवा नातवंडांचा जन्म यासारख्या अनेक कारणांमुळे मृत्यूपत्र बदलता येते.  

मृत्युपत्र कसे बदलायचे? 

 • मृत्यपत्र बदलण्याचे किंवा त्यामध्ये दुरुस्ती दोन प्रकारे करता येते-

  • पहिले मृत्यूपत्र रद्द करुन दुसरे मृत्यूपत्र तयार करणे

  • मृत्यूपत्राला नवीन पुरवणी (codicil) जोडणे.

 • या दोन पर्यायांचा वापर करून मृत्यूपत्र बदलत येते. 

 • मृत्यूपत्राला नवीन पुरवणी (Codicil) जोडण्याची प्रक्रिया मृत्यूपत्र बनविण्याप्रमाणेच करावी लागते. यामध्येही साक्षीदारांसमोर सही करून त्यावर साक्षीदारांची सही, तारीख, वार, वेळ व स्थळाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. 

 • नवीन मृत्यूपत्र तयार करताना अथवा पुरवणी जोडताना व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या स्थिर व सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पुरवणी किंवा नवीन मृत्यूपत्र ग्राह्य धरले जात नाही. 

 • एकाच व्यक्तीची एकापेक्षा अधिक मृत्युपत्र बनवलेली असतील तर त्यामध्ये नमूद केलेल्या तारखेनुसार (तारीख सारखी असल्यास वेळेनुसार) ज्या मृत्युपत्रावर सर्वात शेवटी स्वाक्षरी केली गेली आहे ते मृत्युपत्र ग्राह्य धरलं जाते. 

मृत्यूपत्राचे प्रकार-

 1. सेल्फ-प्रूव्हिंग (Testamentary Will):  

 • यामध्ये मृत्यूपत्र तयार करून त्यावर साक्षीदारांसमोर सही केली जाते. 

 • हा मृत्यूपत्राचा पारंपरिक व प्रचलित प्रकार आहे.

 1. तोंडी (Oral) मृत्यूपत्र

 • यामध्ये मालमत्तेची विभागणी वा तत्सम गोष्टींबद्दल   साक्षीदारांसमोर बोलले जाते. पण याबाबद्दल कुठेही लिखाण केले जात नाही. 

 •  लिखित दस्तावेज नसल्यामुळे या प्रकाराला कायदेशीर संरक्षण मिळत नाही. 

 1. होलोग्राफीक मृत्यूपत्र

 • हे मृत्यूपत्र साक्षीदारांच्या समोर केले जात नाही. त्यामुळे कोर्टात या प्रकाराला फारशी मान्यता नसते.

मृत्युपत्र हा एक महत्वाचा पण बहुतांश वेळा गांभीर्याने घेतला न जाणारा विषय आहे. मृत्युपत्र हे बंधन अथवा जबाबदारी नसून तो आपला हक्क आहे. त्यामुळे या हक्काबद्दल जागरूक व्हा. मृत्युपत्र तयार केल्यामुळे तुमच्या मालमत्तेचं व कुटुंबाचं भविष्य सुरक्षित राहील. तसेच, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र बांधून ठेवण्याची ताकदही मृत्युपत्रामध्ये आहे.  

मृत्युपत्राशिवाय मृत्यू आणि संपत्तीचे वाटप

कुठल्या मालमत्ता मृत्युपत्रात समाविष्ट करता येत नाहीत?

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 6 Average: 4.3]

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.