सोन्यातील गुंतवणूक यावर यापूर्वीच्या लेखात विविध पर्याय त्यातील फायदे तोटे यांचा विचार केला होता. ‘खर तर गुंतवणुकीसाठी सोने’ या दृष्टीने भारतीयांची मानसिकता आहे का? हा मोठ्या संशोधनाचा विषय होऊ शकतो. सोन्यापासून मिळत असलेला उतारा (return) हा, फारच कमी काळ बाजारात उपलब्ध इतर पर्यायांच्या तुलनेत आकर्षक असतो. अडीअडचणीला सोने उपयोगी येते म्हणून आम्ही नियमित सोने खरेदी करतो असे अनेकजण म्हणतात परंतू अत्यंत अडचणीच्या प्रसंगीही सोने विक्रीचा विचार प्राधान्याने केला जात नाही. याशिवाय धातू स्वरूपातील सोने खरेदी / विक्री किंमतीत असलेला फरक हा यातील फायद्याचा बराच भाग खाऊन टाकतो यामुळे प्रत्यक्षात फायद्यातील दिसणारा फरक फक्त कागदोपत्रीच दिसतो. असे असले तरी सोन्याच्या पेढीवर किराणामालाच्या दुकानाप्रमाणे असलेली गर्दी पाहिली तर खरोखरच गुंतवणूक म्हणून विचार करणाऱ्या लोकांनी गोल्ड ई टी एफ ,ई गोल्ड यासारख्या आधुनिक पर्यायाचा विचार करून आपल्याला त्यातील अधिक योग्य अशा पर्यायाची निवड करावी.
1. गोल्ड ई टी एफ हे म्युचुअल फंडाप्रमाणे आहेत. यातील गुंतवणूक 99.5% शुद्ध सोन्यात केली जाते. यातील एक युनिट एक ग्राम सोन्याचे प्रतिनिधित्व करतो. एक युनिट याप्रमाणे त्याची खरेदी / विक्री केली जाते. काही फंड हाऊसने हे युनिट आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही रकमेचे खरेदी करता येण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ई गोल्ड हे सोने पेपर (electronic) प्रकारात उपलब्ध असून दिर्घकाळात ई गोल्ड अधिक किफायतशीर आहे.
2.गोल्ड ई टी एफ 500 ते युनिट1000 झाली की मग फंडहाऊसच्या धोरणानुसार धातूस्वरूपात बदलता येते. काही फंड हाऊसनी याहून कमी वजनाचे सोने घातूरूपात बदलण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला असला तरी त्याचा प्रक्रियाखर्च अधिक आहे. ई गोल्ड मांत्र 8 ग्रॅम्स किंवा त्यापटीत धातुरुपात बदलून घेता येते. यासाठी लागणारा प्रक्रियाखर्च कमी आहे.
3.गोल्ड ई टी एफ याची खरेदी विक्री शेअरबाजारात नियमीत वेळात 9:15 ते 15:30 या वेळात तर ई गोल्ड कमोडिटी मार्केट वेळात 10:00 ते 23:30 या वेळात होते.
4.गोल्ड ई टी एफ एक वर्षांनी विकल्यास काही अटींसह 10% कर द्यावा लागेल. चलनवाढीचा फायदा यास मिळणार नाही. ई गोल्ड तीन वर्षांनंतर विकल्यावर चलनवाढीचा फायदा घेऊन येणाऱ्या नफ्यावर 20% कर द्यावा लागेल. करविषयक दृष्टिकोनातून दिर्घकाळात गोल्ड ई टी एफ पेक्षा ई गोल्ड खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे.
(चित्रसौजन्य- https://goo.gl/Pwo469 )
(पूर्वप्रसिद्धी- https://www.manachetalks.com/ )