मृत्यु या विषयाची चर्चा लोक अजिबात करत नाहीत तर मृत्यपत्र बनवणं ही खूप दूरची गोष्ट झाली. वास्तविक जन्माला असलेला जीव एक ना एक दिवस मरणारच त्यामुळेच आपल्या प्रत्येकाच्या जीवनात तो अपरिहार्य आहे परंतू याबाबत आपण अत्यंत बेफिकीर आहोत.
मृत्युपत्र या शब्दाची तीव्रता कमी करण्यासाठी त्यास इच्छापत्र असे म्हणावे असे अनेकजण सुचवतात परंतु ते प्रत्यक्षात आपले मृत्यूपश्चात इच्छापत्र असते. इच्छा अनेक असू शकतात त्या पूर्ण होऊ शकतील नाही होणार पण मृत्यू अटळ असल्याने त्यास मृत्युपत्र असेच म्हणणे योग्य होईल वास्तविक आपल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक जीवनात यावर सखोल चिंतन केलेले आहे असे असूनही आपण त्यावर चर्चा करणे टाळतो. ही एक अशुभ गोष्ट आहे अशी समजूत असल्याने त्यावर काही बोलले जात नाही. मृत्युपत्र म्हणजे अल्प जीवनास आमंत्रण असाही यामागे गैरसमज आहे. अज्ञान, भीती आणि स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास यामुळे अनेकदा ते करण्याचे टाळले जाते.
योग्य प्रकारे केलेले मृत्युपत्र त्यात उल्लेखलेल्या संपत्तीचे सुयोग्य वाटप करण्याचे सर्वात सर्वात सोपे अधिकृत साधन आहे. मृत्युपत्र बनवणे त्याची नोंदणी करणे सक्तीचे नाही तरीही ते योग्य प्रकारे कायद्यास अपेक्षित तरतुदीनुसार केले असल्यास आणि नोंदणी केली असल्यास त्यातील लाभार्थीच्या नावे संपत्तीचे हसत्तांतरण सुलभ होते. अनेक मालमत्ता प्रकारात नॉमिनी नेमण्याची तरतूद आहे. यामुळे चल अचल संपत्तीवर नाव लागू शकते परंतु यातील नॉमिनी हाच त्या संपत्तीचा अधिकारी नसून तो केवळ विश्वस्त असतो जर मृत्यूपत्र बनवले नसेल तर त्यामुळे मृत व्यक्तीच्या कायदेशीर हक्कात कोणताही बदल नाही त्यामुळे त्याच्या वारसांचे हक्क अबाधित रहातात. यातील चल/अचल मालमत्ता हसत्तांतर करण्यास अडचण येत नाही मात्र अचल मालमत्ता विक्री च्या वेळी ती सर्व बाजूने कायदेशीर हक्क असलेली (क्लिअर टायटल) आहे ना? त्यात अन्य कुणाचे हितसंबंध आहेत का ते पाहावे लागते. अशा वेळी मृत्यूपत्र उपयोगी पडते. कायद्यानुसार नॉमिनी या संपत्तीचा फक्त विश्वस्त असतो जर मृत्युपत्र बनवून संपत्तीचे वाटप केले नसेल तर हिंदू वारसा कायद्यात असलेल्या तरतुदींनुसार मालमत्तेची वाटणी होते. भारतातील बहुतेक व्यक्तींना लागू होणारा हिंदू विवाह कायदा हा शीख, जैन आणि बौद्ध धर्मियांना लागू आहे यानुसार एखादी व्यक्ती मृत्युपत्र न करता निधन पावल्यास त्याची वाट्यास येऊ शकणारी परंपरागत मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत असल्यास त्यावर निधन पावलेल्या व्यक्तीसाहित सर्वांचा सारखा हिस्सा असतो. पारंपरिक मिळकतीचा आपल्याला मिळालेल्या वाट्याचा आणि स्वकष्टार्जित मालमत्तेचा विनियोग व्यक्ती आपल्या मर्जीनुसार कमीअधिक करू शकते अन्यथा ती जोडीदार आणि मुले (यात मुलगा किंवा मुलगी, तसेच मुलीची विवाहित अविवाहित स्थिती, त्याचप्रमाणे औरस, अनौरस, दत्तक असा कोणताच भेदभाव न करता) यामध्ये समान विभागणी केली जाते. जर त्या व्यक्तीस जोडीदार/ मुले नसतील तर प्रथम भाऊ अगर त्यांच्या वारसास असे कोणी नसल्यास बहीण अगर बहिणीच्या मुलांना ही संपत्ती वारसाहक्काने मिळते.
मृत्युपत्राद्वारे व्यक्ती त्याचा पूर्ण अधिकार असलेली वारसाहक्काने वाटप पूर्ण होऊन मिळालेली आणि स्वकष्टार्जित संपत्ती कशी वाटली जावी याबद्धल निर्देश देऊ शकतो. याची अंमलबजावणी मृत्यूनंतर होते. ती करण्याचे व्यवस्थापकीय अधिकार आपल्याला वारसास, त्रयस्थ व्यक्ती किंवा अशा प्रकारचे काम करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या कंपनीस देता येतात. त्यात ही संपत्ती किंवा तिचा भाग नेमका कुणाला आणि किती टक्के मिळावा यात काही कमीअधिक करायचे असेल किंवा एखाद्या संस्थेस द्यायचे असेल तर तशी तरतूद करता येते. वारस नसलेल्या अन्य त्रयस्थ व्यक्तीसही ही संपत्ती देता येईल किंवा स्वतंत्र कौटुंबिक न्यास स्थापन करून त्या न्यासासही देता येईल. मात्र संस्था किंवा न्यास यास संपत्ती देताना अशा मृत्यूपत्राची नोंदणी करणे सक्तीचे आहे. आपल्याला भविष्यात काय होईल ते माहिती नसल्याने शारीरिक आणि मानसिक स्थिती उत्तम असतानाच ते बनवणे योग्य ठरते. त्यामुळे त्यात केलेल्या तरतुदी या वादाचे मुद्दे ठरण्याची शक्यता कमी राहाते.
मृत्युपत्र बनवताना लक्षात ठेवायच्या गोष्टी –
★आपल्या हक्काची वारसा हक्काने मिळालेली, स्वकष्टार्जित संपत्ती यांचे वाटप कसे व्हावे याची व्यवस्था करता येते. व्यक्तीने निर्माण केलेल्या, व्यवसाय भागीदारी, एकल कंपनी, कंपनी, ट्रस्ट यांना स्वतंत्र अस्तीत्व असल्याने त्यातील तरतूदीनुसार त्याची व्यवस्था लावता येईल.
★विवाहित महिलेस लग्नात माहेर आणि सासरच्या लोकांनी केलेले नातेवाईकांकडून वेळोवेळी भेट मिळालेलेले दागिने हे कोणीही कितीही प्रमाणात दिले असले0 तरी त्यावरील सर्वार्थाने तिचीच मालकी असते त्यास स्त्रीधन असे म्हणतात, सदर महिलेशिवाय अन्य कोणीही म्हणजे तिचा नवरा, आईवडील अथवा मुले यांचा त्यावर कोणताही अधिकार नसल्याने त्याचे वाटप कसे करावे ते ठरवू शकत नाही.
★मृत्यूपत्राचा निश्चित असा नमुना नाही तरी त्यात कोणकोणत्या गोष्टीचा कसा उल्लेख करावा याचे नमुने उपलब्ध आहेत आपल्या वकीलाशी चर्चा करून त्याचा तपशील निश्चित करावा. स्थावर जंगम मालमत्तांचा तपशील व्यवस्थित लिहावा.
★आपण किंवा आपला जोडीदार यापैकी कुणाला तरी आधी जावे लागणार याचा विचार करून जोडीदाराची पुरेशी तरतूद करावी किंवा त्यास अधिक मालमत्ता द्यावी त्याचप्रमाणे त्याच्या निवासाची सोय करावी.
★मुलांपैकी कुणाला कमी अधिक संपत्ती द्यायची असेल त्याचे सुयोग्य कारण लिहावे. म्हणजे गैरसमज होणार नाहीत. अन्य व्यक्ती संस्था यांना काही द्यायचे असल्यास त्याचाही उल्लेख कारणासह करावा. वारसा व्यतिरिक्त कुणाला काही द्यायचे असल्यास होता होईतो आपल्या हयातीतच त्यांना द्यायच्या गोष्टी देऊन टाकाव्यात. यावरून काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
★अविवाहित किंवा पुनर्विवाहित व्यक्तीने त्याच्या विवाहापूर्वी बनवलेले मृत्युपत्र विवाहानंतर आपोआपच रद्दबातल ठरते
★मृत्युपत्र बनवले आहे सांगावे आपले वारस हेच सर्व ठिकाणी नॉमिनी म्हणून असतील तर सोईचे होते परंतु त्यात काही बदल करायचा असल्यास आणि तो वारसाहक्काशी सुसंगत नसल्यास त्यातील तरतुदी जाहीर करू नयेत.
★मृत्युपत्र बनवण्याच्या दिवशी काही आजार असले आपली मानसिक स्थिती उत्तम असल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरकडून घ्यावे. दोन साक्षीदार शक्यतो आपल्यापेक्षा वयाने लहान असलेले निवडून त्यांनी वाचून त्यावर साक्षीदार म्हणून सही केली आहे अशी अपेक्षा आहे. काही विवाद निर्माण झाल्यास साक्षीदारास न्यायालय साक्ष देण्यासाठी पाचारण करू शकते.
★जरी ते प्रथम करत असाल तरी त्यास अखेरचे मृत्युपत्र म्हणावे जर आधी बनवून त्यात बदल केला असल्यास सुधारित मृत्युपत्रावर अखेरचे मृत्युपत्र असे म्हणून आधीच्या पत्राचा उल्लेख करून चालू मृत्युपत्र हेच अंतिम मृत्यूपत्र असल्याचा उल्लेख करावा.
★यातील एखादा लाभार्थी आपल्या मृत्यूपूर्वी दुर्दैवाने मरण पावल्यास त्यास मिळणारी संपत्ती किती प्रमाणात कुणास देण्यात यावी याचा स्पष्ट करावा.(अपूर्ण)