Reading Time: 4 minutes

गुंतवणूक ही स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केली जाते. आर्थिक स्वातंत्र्य मिळावे हा त्यामागचा उद्देश असतो. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय, याच्या संकल्पना व्यक्ती व्यक्तीनुसार बदलत असतात. तरीही आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला हवे तेव्हा पैसे खर्च करता येणे आणि पैशांसाठी कोणावरही अवलंबून न राहावे लागणं अस डोबळमानाने म्हणता येईल. त्यानुसार बहुतेक गुंतवणूक निर्णय घेतले जातात. मात्र असे निर्णय हे बहुदा घरातील पुरुष सभासदाकडून घेतले जातात. अशा कागदपत्रांवर महिला डोळे मिटून सह्या करतात. त्यात अनेकदा त्यांना ही काय कटकट, असेही वाटत असते. अनेकदा अशी गुंतवणूक करणाऱ्या  गुंतवणूकदारासही अगदी जुजबी माहिती असते. खर ते हे निर्णय एकमेकांच्या मतांचा आदर करून पारदर्शक पद्धतीने घ्यायला हवे.

माझ्या माहितीत असे मोजकेच गुंतवणूक सल्लागार असे आहेत, जे त्यांचा गुंतवणूक सल्ला घेण्यासाठी जोडीदारासह या किंवा अविवाहित गुंतवणूकदारास त्याच्या आईसह येण्यास सांगतात. योजना समजावून सांगून शंकांचे निरासरण करतात. काही प्रश्नावली भरून घेऊन त्यांची धोका घेण्याची क्षमता आजमावून घेतात. ही एक आदर्श पद्धत आहे. खर तर गुंतवणूक करण्यासाठी लागू असलेले नियम स्त्रियांसाठी वेगळे आणि पुरुषांना वेगळे असे काहीच नाही.

त्यामुळे-

★पुरेसा इन्शुरन्स घेणे:  आपण घेतलेले कर्ज आणि त्यात आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट रक्कम मिळवून येणाऱ्या रकमेचा  इन्शुरन्स घेणे आवश्यक आहे. असा इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स याच प्रकारात मोडतो. टर्म इन्शुरन्स हा आपण किती वर्षे कार्यरत राहू याचा विचार करून तेवढयाच कालावधीचा घ्यावा. अन्य कोणत्याही योजना प्रकारातील विमा आपली पूर्ण गरज भागवू शकत नाही. त्याचप्रमाणे प्रीमियम परत मिळणारा बोनस मिळू शकाणारा टर्म इन्शुरन्स घेऊ नये कारण  त्याचा प्रीमियम अधिक असतो. नियमित प्रीमियम भरून योजना चालू ठेवावी.

★पुरेसा आरोग्यविमा घेणे: आपण कुठे राहतो या परिसराचा विचार करून वार्षिक उत्पन्नाच्या 3 ते 5 पट आरोग्यविमा घेता येईल. याचे प्रीमियम आजकाल खूप वाढले असून व्यक्तिगत विमा घेण्याऐवजी कुटुंबाचा एकत्रित विमा घेणे किफायतशीर आहे.

★प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेअरबाजारातील गुंतवणूक: यातून महागाईवर मात करणारा परतावा मिळू शकत असल्याने, आपल्या स्वप्नपूर्तीसाठी लवकरात लवकर गुंतवणूक करण्यास सुरुवात करावी. दोन्ही प्रकारात व्यवस्थित गुंतवणूक स्वतः अथवा सल्लागाराची मदत घेऊन करता येईल.

★गुंतवणूक विविध प्रकारात विभागावी: गुंतवणूक विविध मालमत्ता प्रकारात विभागून  दीर्घ काळासाठी केल्यास त्यातील धोक्याची तीव्रता कमी होते.

★स्थावर मालमत्तेमधील गुंतवणूक: अशी गुंतवणूक हा कदाचित आतबट्याचा व्यवहार ठरू शकतो. त्याऐवजी रिटस आणि इनवीट या आधुनिक पर्यायांचा विचार करावा.

★सोन्यातील गुंतवणूक- अशी गुंतवणूक दागिन्यांच्या स्वरूपात न करता शुद्ध स्वरूपात करावी. यासाठी डिजिटल गोल्ड, इजिआर हे आधुनिक पर्याय उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे सरकारकडून हमी असलेले सुवर्ण सार्वभौम रोखे हे नियमित उत्पन्न देणारे आणि आयकरात काही सवलती देणारे आहेत त्यांचा अवश्य विचार करता येईल.

★याशिवाय पारंपारिक बचतीच्या पर्यायांचा वापर गरजेनुसार करता येईल.

या सर्वांना लागू असणाऱ्या प्राथमिक गोष्टी आहेत. यातील एक अथवा अनेक प्रकार एकत्र करून आपले गुंतवणूक घोरण ठरवून वेळोवेळी त्याचा आढावा घेता येईल. किमान ₹50 लाख गुंतवणूक करू शकणारे गुंतवणूकदार गुंतवणूक संच व्यवस्थापन करणाऱ्या (पीएमएस) तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊ शकतात आणि आपली गुंतवणूक अधिक चांगल्या करू शकतील किंवा स्वतः अभ्यास करूनही गुंतवणूक करू शकतील. यात स्त्री की पुरुष असा कोणताही भेदभाव नाही. फक्त स्त्री म्हणून आपण आपला आणि कुटुंबाचा विचार करून गुंतवणूक करणार असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या.

*आपल्या आणि जोडीदाराच्या (जोडीदार असल्यास) उत्पन्नाचा अंदाज घ्या. उत्पन्न आणि जबाबदाऱ्या यांचा विचार करा.

*विवाहाचा विचार करणार असल्यास/ नसल्याच्या शक्यतांचा त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांचा विचार करा.

*भारतातील स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांहून अधिक आहे यादृष्टीने भविष्याचा विचार करा.

*कौटुंबिक जबाबदाऱ्यामुळे महिलांचे अनेकदा करियरकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. यातून काही मानसिक समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

*जास्त जगण्याची शक्यता म्हणजे निरोगी जगण्याची हमी असे नाही वयानुसार आजार मागोमाग येतील याचा विचार करा.

*जितक्या सहजतेने आपण अन्य गोष्टी खरेदी करतो, तपासून पाहतो. दर्जा आणि दर याची तुलना करून कोणती वस्तू सुयोग्य ते ठरवतो त्याचप्रमाणे गुंतवणूक करा.

*स्त्रिया मनात आणल्यास पुरुषांहून अधिक वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करू शकतात तेव्हा सर्व दृष्टीकोनातून विचार करा. यासाठी कोणतीही गुंतवणूक नीट पारखावी त्या संबंधीत किरकोळ शंकांचे समाधान करून घ्यावे. जर घरातील एखादी व्यक्ती या विषयात तज्ञ असेल तर त्याच्याशी चर्चा करून त्याचे मत आजमावून किंवा पूर्ण खात्री असल्यास विश्वास ठेवून निर्णय घ्यावा.

*ज्ञानातील गुंतवणूक ही सर्वश्रेष्ठ गुंतवणूक: यासंबंधी अधिकाधिक ज्ञान मिळवणे आवश्यक असून त्यासाठी काही रक्कम खर्च करण्याची तयारी ठेवावी.

महिलांचा गुंतवणूक दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी दोन वर्षांपूर्वी ग्रोव्ह या गुंतवणूक पोर्टलमार्फत एक सर्व्हे घेण्यात आला. यात अडीच लाख महिलांना प्रश्नावली पाठवण्यात आली त्यातील 28000 महिलांनी प्रश्नावली भरून सहभाग घेतला एवढ्या कमी सहभागातून खात्रीपूर्वक सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नसतील तरी मिळालेले प्रतिनिधीक निष्कर्ष असे आहेत-

*गुंतवणूक करणाऱ्या महिलांचे प्रमाण (नोकरी व्यवसाय करणाऱ्या न करणाऱ्या) वाढत आहे.

*अनेक महिला स्वतंत्र गुंतवणूक निर्णय घेत आहेत

*18 ते 25 वर्षाच्या आतील महिलांचे शेअरबाजार म्युच्युअल फंड योजनांत  गुंतवणूक करण्याचं प्रमाण वाढत आहे.

*सर्वच वयोगटातील महिलांपैकी 25% महिलांना सोन्यातील गुंतवणूक योग्य वाटते यातील 40% महिलांचे उत्पन्न 10 लाख रुपयांहून अधिक आहे.

*₹30 लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांना स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक करणे महत्वाचे वाटते यातील 6% महिला क्रेप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करीत आहेत.

*50% महिला काही उद्दिष्ट ठेवून गुंतवणूक करीत आहेत, 43% महिला कुटूंबास मदत म्हणून गुंतवणूक करीत आहेत, 4 मधील 1 महिलेचे पर्यटन हेही गुंतवणूक उदिष्ट आहे.

*उद्दिष्टांची तुलना करता जास्त उत्पन्ना पासून कमी उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांचे लवकर सेवानिवृत्ती घेणे हे उद्दिष्ट उतरत्याक्रमाने आहे. अल्प मध्यम उत्पन्न मिळवणाऱ्या महिलांचे लग्न आणि मुलांचे शिक्षण असे उद्दिष्ट चढत्या क्रमाने आहे. तरुण महिलांचा कल वैयक्तिक उद्दिष्ट, पर्यटन आणि उच्च शिक्षण असा आहे.

*10 लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या 20% महिला कर वाचावा म्हणून गुंतवणूक करतात.

2000 गुंतवणूक न करणाऱ्या महिलांपैकी 49% महिला गुंतवणुकीबद्धल काहीच माहिती नाही. 32% महिलांना त्यांच्याकडे गुंतवणूक करण्यासाठी पुरेसे पैसेच नाहीत असं वाटतंय. तर 13% महिलांना शेअरबाजारात गुंतवणूक करून आपले पैसे बुडतील असं वाटतंय त्यामुळेच या गटातील महिलांची अर्थसाक्षरता वाढणे जरुरीचे आहे. अँपची मदत घेऊन स्वतःची स्वतःच माहिती मिळवून गुंतवणूक करणे सोपे झाले आहे.

सर्व भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अर्थसाक्षर व्हा, गुंतवणूक वाढवा, स्वावलंबी व्हा!

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी असून लेखातील मते वैयक्तीक असल्याची नोंद घ्यावी)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…