सेवानिवृत्तीचा लाभ बँकांमध्ये ठेवरूपात ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि अन्य गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे.
बँकिंग अग्रणी भारतीय स्टेट बँकेने रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वीच सोमवारी आपल्या बचत खात्यावरील व्याज दरात कपात केली. खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा कमी शिल्लक असणाऱ्या खातेदारांना यापुढे चार टक्क्यांऐवजी ३.५ टक्के व्याज दर देण्याचा निर्णय बँकेने घेतला. गेल्या सहा वर्षांतील बँकेने बचत खातेदारांना देऊ केलेला हा सर्वात कमी व्याजाचा दर असून, तिच्या ९० टक्के खातेदारांना याचा फटका बसणार आहे.
मुदत ठेवींबाबत सध्या बहुतांश बँकांकडून वार्षिक ६.७५ टक्क्यांचा व्याज दर दिला जातो. अधिक मुदतीच्या ठेवींवर तर यापेक्षाही कमी व्याज दर बँका देतात. रिझव्र्ह बँकेच्या रेपो दर कपातीने या तुटपुंज्या व्याज दरातही बँकांकडून लवकरच कपात केली जाईल. ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींसाठी बहुतांश बँका पाव ते अर्धा टक्का वाढीव व्याज दर देत असल्या तरी, बँक ठेवींवरील लाभ हा करपात्र असल्याने प्रत्यक्षात परतावा दर हा पाच टक्क्यांच्या आसपास राहतो. याच पातळीवर चलनवाढीचा दरही असल्याने प्रत्यक्षात ठेवींवरील परतावा दर शून्यवत होतो.घसरत्या व्याज दराच्या काळात बँकांमध्ये जमा पुंजी राखणे आकर्षक राहिलेले नाही. केवळ या पैशांचा सांभाळ होईल, भांडवलवृद्धीसाठी बचतदारांना अन्य पर्याय शोधणे भाग ठरेल. ज्येष्ठ नागरिकांना (साठीपुढील) केंद्र सरकारने सुरू केलेली नवीन प्रधानमंत्री व्यय वंदना योजनेचा पर्याय स्वीकारता येईल. एलआयसीकडून राबविल्या जात असलेल्या या योजनेतून प्रत्यक्षात ८.३ टक्के दराने त्यांना करमुक्त परतावा मिळू शकेल. या शिवाय म्युच्युअल फंडाच्या रोखे तसेच लिक्विड योजनांचा मार्गही गुंतवणूकदारांना स्वीकारण्याचा वित्तीय नियोजकांचा सल्ला आहे. त्यांच्या मते, बँक ठेवींपेक्षा किमान दोन टक्के अधिक परतावा, शिवाय तुलनेने अधिक रोकडसुलभ ही गुंतवणूक ठरेल.