नुकत्याच संपलेल्या तिमाहीत देशाची सोने आयात दुप्पटीहून अधिक झाली असून जून २०१७ अखेर ती ११.२५ अब्ज डॉलर झाली आहे. ओणमपासून सुरू होणाऱ्या सणांच्या हंगामात मौल्यवान धातूकरिता ग्राहकांकडून खरेदी वाढण्याच्या पाश्र्वभूमीवर सोन्याची मागणी नोंदविली गेली आहे.
एप्रिल ते जून २०१७ दरम्यान सोन्याची आयात ११.२५ अब्ज डॉलर झाली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ती ४.९० अब्ज डॉलर होती, केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी स्पष्ट केले.
गेल्या तिमाहीतील अखेरच्या महिन्यात सोन्याची आयात १.२० अब्ज डॉलरवरून २.४५ अब्ज डॉलपर्यंत गेली आहे. वाढत्या मौल्यवान धातूच्या आयातीमुळे आयात-निर्यातीतील दरी मानली जाणारी व्यापार तूट जूनमध्ये १२.९६ अब्ज डॉलरवर गेली आहे. जून २०१६ मध्ये ती ८.११ अब्ज डॉलर होती. जून २०१७ मध्ये चांदीची आयात मात्र २८.६ टक्क्यांनी घसरून १७.८ कोटी डॉलर झाली आहे.