मुंबई, फेब्रुवारी १९९२,— तो स्व. हर्षद भाईंचा जमाना होता, संध्याकाळी उशीरा ICWAI च्या अभ्यासिकेतुन बाहेर पडताना शेअर बाजाराच्या ईमारती जवळ फटाक्यांचे बरेच आवाज ऐकले. पुढे ट्रेन मध्ये कळले की सादर झालेल्या अनुकुल अर्थसंकल्पामुळे ‘सेन्सेक्सने’ म्हणे पहिल्यांदाच 3,000 अंकाची पातळी गाठली होती. जिकडे तिकडे बाजारातील तेजीचच चर्चा होती. “काय जोशी साहेब, आता पुढे काय वाटते?? अहो, रिटायरमेंटसाठी म्हणुन घेतले होते ACC चे शेअर्स, पण वर्षभरातच दामदुप्पट झाले की —” एक यशस्वी गुंतवणुकदार त्यांच्या दुसर्या, तितक्याच यशस्वी, मित्रास विचारत होते. त्यावर “अरे, शहाणा असशील तर मोकळा हो, विकुन टाक सगळे, — बाबा, 3,000 म्हणजे डोक्यावरुन पाणी, आता आणखी किती होणार होउन होउन?? थोडक्यात समाधानी असावे माणसाने — ” जोशी उवाच.
पुणे, नोव्हेंबर 2013, — गेल्या आठवड्यांत, दिवाळीच्या तोंडावरच आपल्या याच संवेदी सुचकांकाने 21,000 हा जादुई टप्पा पार करुन सर्वकालीन उच्चांकाची नोंद केली. या ‘फील गुड’ पार्श्वभुमीवर, व्यावसायिक दृष्ट्या काही महत्वाच्या व्यक्तीना दीपावलीच्या शुभेच्छा द्यावयाला व्यक्तीशः जाण्याच्या माझ्या प्रथेप्रमाणे एका बड्या आसामीकडे गेलो असता गप्पांच्या ओघांत ‘येत्या दिवसांत छान संधी आहे गुंतवणुकीस —‘ असा सुर लावला तेंव्हा त्यांनी ” — आता काय उपयोग हो हे बोलुन ?? गेली, — संधी घालवली आपण, जेंव्हा बाजार खाली आला होता तेव्हा का नाही हो भेटलांत ??————” अशी माझी संभावना केली.
तात्पर्य काय, तर बाजार उच्चांकी पातळीवर आहे, आपण काय करावे ?? हा द्विधा उत्पन्न करणारा प्रश्न (१) आधीच ‘आत’ असलेल्या आणि (2) आता नव्याने बाजारांत शिरु पहाणार्या, अशा सर्वच गुंतवणुकदारांना वेळोवेळी पडत असतो, हेम्लेट्ला पडलेल्या त्या ‘to be or —‘ या प्रश्नासारखाच.
शेअर्स खरेदी करण्याची (वा विकण्याची) सर्वोत्तम वेळ आणि सर्वोत्तम पद्धती कोणती ?? हा खरेतर चर्वितचर्वणाचा कालातीत मुद्दा. आता वेळेचे म्हणाल तर निर्देशांकाचा उच्चांक ( वा निचांक) ही केवळ एक सापेक्ष कल्पना आहे. तो काही त्याच्या प्रवासाचा शेवट नव्हे. खरे म्हणजे गुंतवणुकदाराच्या दृष्टीने खरेदी हा भविष्यकाळाशी निगडित व्यवहार आहे, म्हणजेच वस्तुची भविष्यकालीन किंमत ही आजच्या किंमतीपेक्षा अधिक असावी हे कोणत्याही गुंतवणुकीमागील सोपे गृहित आहे पण अनेकदा आपण खरेदी चा संबंध भुतकाळाशी जोडतो. कालच्या पेक्षा आज महाग आहे,— केवळ हाच खरेदी न करण्याचा निकष कसा काय असु शकतो ? त्याच प्रमाणे इतर घटकांचा विचारही न करता तात्कालिक फायद्याकडे पाहुन हातातील चांगला शेअर घाईघाईने विकणे म्हणजेच सोन्याचे अंडे देणार्या कोंबडी चे जे झाले तेच करणे नव्हे काय ?? ह्या सार्या प्रकारांपेक्षा उद्याचे काय, हा प्रश्न अधिक महत्वाचा नाही का ??.
‘मंदीमध्ये खरेदी’ हाच बाजारात फायदा मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे असा सार्वत्रिक समज आहे. पण वस्तुस्थिती खरचं तशी आहे का?? ” —चुकले, बाजार खाली असतानाच खरेदी करायला हवी होती” या मनोवृत्तीच्या लोकांसाठी थोडे आकडेवारीच्या जंगलात शिरुया
जागतिक किर्तीचे गुंतवणुक सल्लागार आणि जगांतील सर्वाधिक खपाच्या ‘True Wealth Systems’ या वार्तापत्राचे संपादक स्टीव्ह जुग्गेरुड यानी अमेरिकेच्या S&P 500 या निर्देशांकाची थोडीथोडकी नव्हे तर गेल्या 100 वर्षांची आकडेवारी तपासुन एक मनोरंजक सादरीकरण केले आहे. त्यांच्या प्रयोगाप्रमाणे सन 1950 ते 2012 या कालावधीतील साप्ताहिक भावांनुसार, एखाद्या शेअरने त्याची वर्षांतील सर्वोच्च किमत नोदविल्याबरोबर तो खरेदी केला गेला व तो पुढील 01 वर्ष सांभाळला, असे मानल्यास अशा गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा 8.5% होता. याच कालावधीत बाजाराने अशाच 01 वर्ष मुदतीकरिता केलेल्या सामान्य गुंतवणुकीवर 7.2% एवढा परतावा नोदविला होता आणि शेवटी, जर अशीच खरेदी शेअरने वार्षिक निचांक नोदविल्याबरोब्बर केली असे मानल्यास पुढे 01 वर्षाने काय घडले असेल असे तुम्हांस वाटते ??—- परतावा 6.00% एवढाच होता.
स्टीव्ह यांनी हाच प्रयोग वेगवेगळ्या कालावधीसाठीही केला. पण निष्कर्ष कायम राहिला तो हा, की तेजी मधील नियमित खरेदी ही मंदीमधील तशाच खरेदीपेक्षा फायद्याची ठरते. आपल्याकडील जाणकारही ओहोटीत पोहोणे हे भरती आलेल्या समुद्रात पोहोण्यापेक्षा अधिक धोकादायक असते असेच सांगतात. त्यांचे म्हणणे आणि हे विवेचन यांच्या मागचे तर्कशास्त्र सारखेच आहे.
शेअर्स खरेदीच्या पद्धतीबाबत महान गुंतवणुक गुरु वॉरेन बफेट यांचा आदर्श ठेवावयाचा झाल्यास कायम कमी किंमतीचे पर्याय शोधत बसण्यापेक्षा ( बेजामिन ग्रॅहम ज्याला ‘cigar-butt investing’ असे संबोधतात) श्रेष्ठ दर्जाच्या कंपन्यांचे शेअर्स ‘योग्य’ किंमतीस घेणे ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. त्यांनी सांगितल्यप्रमाणे केवळ अशाच कंपन्या ते गुंतवणुकीसाठी निवडतात ज्या प्रदीर्घ काळ (1) व्यवस्थापनाचा उच्च दर्जा राखुन आहेत ज्यायोगे कंपनीच्या महसुल व नफा यात सातत्याने वाढ दिसते (2) ज्या नफ्याबरोबरच नफ्याचे प्रमाणही वाढ्विण्यांत आणि प्रतिस्पर्ध्यापेक्षा स्वतःला अधिक सुरक्षित ठेवण्यात (moat) यशस्वी होतात. (3) व्यावसायिक विकास करीत असुनसुध्दा कर्जाचे प्रमाण अल्प ठेवण्यांत यशस्वी होतात आणि (4) वरील निकषांचे पालन करीत असतानाही ज्या आपल्या हिस्टोरिकल व्हॅल्युएशनच्या पट्ट्याच्या निम्नस्तराजवळ आहेत. या 04 निकषांचा अवलंब करुन बनवलेला ‘बफेट-मुनगर’ पोर्ट्फोलियो आज गुंतवणक विश्वांतील सर्वाधिक सातत्यपुर्ण पोर्ट्फोलियोंपैकी एक समजण्यांत येतो.
शेअर्स खरेदी बाबत ते स्वस्त आहेत, योग्य आहेत, की महाग हे ठरविण्याच्या वरील मुलभुत विश्लेषणाबरोबरच काही गणिती निकषांवरुनही परिस्थितीचा अंदाज बांधणे आपल्याला शक्य होत असते. बाजाराचा PE, PEG वा डीव्हीडंड यील्ड हे रेशो यापैकी काही महत्वाचे मापदंड आहेत.
PE रेशो म्हणजे हा इंडेक्सच्या ( पर्यायाने त्यातील कंपन्यांच्या) एकुण उपार्जनाची म्हणजे प्रती शेअर मागे कमविल्या जाणार्या नफ्याची तुलना सद्य किंमतीबरोबर करतो. हा रेशो कमी म्हणजे बाजार( वा तो शेअर) स्वस्त आहे आणि रेशो जास्त म्हणजे तो महाग होय. सर्वसाधारणतः सेन्सेक्स बाबत हा रेशो 15 च्या आजुबाजुस राहिला आहे. आज तो 17.71 आहे मात्र जानेवारी 08 मध्ये तो 25.53 होता (सेन्सेक्स 21,200+) आणि नोव्हे.10 मध्ये तो 23.03 (सेन्सेक्स 21,100+) होता.
PEG रेशो हा याही पुढे जावुन PE रेशो आणि उपार्जानाच्या वाढीच्या वेगाची तुलना करतो. अधिक खोलात न जाता सांगायचे तर हा रेशो जेवढा 01 च्या जवळ तितके चांगले. आजमितीस तो 1.1 आहे आणि या आधीच्या वर दिलेल्या दोन्ही वेळा तो.1.5 पेक्षा अधिक होता.
चालु बाजारभाव आणि मिळणारा लाभांश यांची तुलना करणारा डीव्हीडंड यील्ड रेशो, जो जेवढा जास्त तेवढा उत्तम, तो ही आजच्या घडीस आधीपेक्षा अनुकुल (ऑक्टोबर13 = 1.46 / जानेवारी 08 = 0.88 / नोव्हेबर10 =1.06 ) आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे शेअर बाजार म्हटले म्हणजे धोक्याची शक्यता असतेच असते, मग निर्देशांक कोठेही असो. केवळ तो खाली आला आहे का ? मग ‘–घ्या हात धुवुन’ आणि शिखरावर असेल तर ‘–खरेदीचे बघायलाच नको’, हा बाजाराविषयक गैरसमज दुर करता आला तर करणे, हाच या सार्या पुराणाचा एकमेव उद्देश आहे. खरेदी वा विक्रीचा आंघळा साहसवाद केंव्हाही घातकच. गुंतवणुकदाराची भुमिका ऑलिम्पिक मधील नेमबाजासारखी, एकाग्र चित्ताने लक्षवेधाचा प्रयत्न करणारी असावी, हिंदी मारधाड चित्रपटांतील व्हिलनसारखी, अंधाधुंद गोळीबार करणारी नसावी, एवढे्च या निमित्ताने सुचवायचे आहे.
सारांश, विमान ‘टेक ऑफ’ करण्यास तयार आहे, तेंव्हा झट्पट शिरकाव करा आणि उड्डाणाचा आनंद घ्या, —- मात्र सीट बेल्ट घट्ट बाधावयास आणि पॅराशुट बरोबर ठेवण्यास विसरु नका.