कर्ज घेताना लक्षात ठेवायच्या ५ गोष्टी

Reading Time: 2 minutes

कर्ज घेणं किंवा मिळणं म्हणजे फक्त पैसे नसून ती एक आर्थिक, सामाजिक, व त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नैतिक जबाबदारी आहे. कर्ज हे योग्य कारणांसाठी घेतले गेले पाहिजे. पण सबळ कारणांनीही कर्ज घेतले तरी त्या संस्थेबद्दल, आणि सुविधेबद्दल सखोल माहिती असणे आवश्यक आहे. आजकाल तंत्रज्ञानाचा अमर्यादित वापर करून कर्ज देणाऱ्या संस्था आपल्यावर त्यांच्या माहितीचा, योजनांचा भडीमार करत असतात. फोन, ई-मेल, किंवा मेसेजद्वारे त्यांच्या आकर्षक व कमी व्याजदरांची माहिती देऊन, किंवा कमी वेळात कर्जवितरणाचे दाखले देऊन आपल्याला भूरळ घालायच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी फक्त आपली कुवत वा पात्रता आहे, बँकांचे व्याजदर कमी आहेत, किंवा करात सूट मिळते म्हणून कर्ज घेऊ नये. कर्जासाठी अर्ज करताना काही गोष्टींचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे.

 1. परतफेड करायची क्षमता- आपले पूर्वज किंवा वडिलधाऱ्या व्यक्ती सांगतात तेच इथे लागू होतं- अंथरूण पाहून पाय पसरावे. खिशाला जास्त ताण न पडता सहज फेडलं जाईल इतकंच कर्ज घ्या. यातला साधा व अलिखित नियम असा की महिन्याला तुमच्या सगळ्या कर्जांची मिळून जावक ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या ५०%पेक्षा जास्त नको. 

 1. कमीत कमी परतफेड कालावधी- बहुतांश संस्थांचा परतफेडीचा कालावधी हा जास्तीत जास्त ३० वर्षे इतका असतो. कर्जाचा कालावधी जितका जास्त तितका त्याचा हप्ता (EMI) कमी बसतो. हे ऐकायला आकर्षक वाटत असलं तरी तितकसं फायदेशीर नाही. जास्त कालावधीच्या कर्जात मूळ रकमेपेक्षा व्याज बरंच जास्त भरावं लागतं. उदाहरणार्थ- १० वर्ष कालावधीच्या कर्जात मूळ रकमेच्या साधारणतः ५७% व्याज भरलं जातं. त्यामुळे परतफेड करायचा कालावधी शक्यतो कमी असलेला बरा. अनेकदा, विशेषतः तरूण अर्जदारांच्या बाबतीत मासिक उत्पन्न कमी असल्याने कर्जाचा कालावधी कमी ठेवणे शक्य नसते. अशा वेळेला दरवर्षी पगारवाढीनुसार कर्जाचा हप्ता(EMI) ही वाढवत नेणे फायद्याचे ठरू शकते. 

 1. नियमीत व वक्तशीर परतफेड- कोणत्याही प्रकारच्या परतफेडीबद्दल कमालीचा वक्तशीरपणा असायला हवा. मग ते क्रेडिट कार्डचं बिल असो वा कर्जाचा हप्ता. हप्ता चुकणं, चुकवणं किंवा बिलं उशीरा भरणं याचा तुमच्या भविष्यात कर्ज मिळण्याच्या शक्यतांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

 1. दिखाव्यासाठी कर्ज नको- 

  • इतर कुठे गुंतवणूक करायची किंवा फक्त आर्थिक प्रदर्शनासाठी कधीही कर्ज घेऊ नका. 

  • गुंतवणूक म्हणजे एक प्रकारची बचत असते. बचत ही आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून होणे अपेक्षित असते. कोणत्याही मार्गाने पैसे उधार घेऊन गुंतवणूक करणे हे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखे आहे. 

  • ह्यातली दुसरी लक्षात घ्यायची बाब अशी की अशाप्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या परताव्याचे तुमच्या कर्जाच्या व्याजदराशी गणित जुळण्याची शक्यता कमीच असते. अधिक परतावा मिळण्याची शक्यता असलेल्या इक्विटी सारख्या गुंतवणुकींमध्ये जास्त जोखिम असते.  

  • तसंच, विवेकाधीन खर्चांसाठी, ऐशोआरामासाठी कर्ज घेणे हे ही चुकीचेच. आपल्याला हव्या तशा जीवनशैलीत जगण्यासाठी कर्ज घेणे योग्य नाही. आयुष्यात मौजमजा, मनोरंजन हवे, हव्या त्या वस्तू घेता यायला हव्या, किंवा आपलं स्वप्न असलेल्या एखाद्या ठिकाणी फिरायलाही जावं, पण ह्या सगळ्या गोष्टीं आपल्या बचतीतून झालेल्या अधिक चांगल्या. स्वतःचं घर असणं हे ही एक स्वप्नंच असतं, पण ते कितीही बचत केली तरी एकरकमी घेणं आजकाल शक्य नाही. 

  • उलट, मौजमजा, मनोरंजन ह्या आपल्या प्राथमिक गरजा नाहीत, शिवाय त्यांसाठी योग्य प्रकारे बचत केली असता त्या साध्य करणं सहज शक्य आहेत. तेव्हा कर्ज घेताना स्वतःला “आपण ते कशासाठी घेत आहोत, व त्याची आपल्याला खरंच गरज आहे का?”  हे विचारणं महत्त्वाचं आहे.

 1. वाचा आणि समजून घ्या – 

  • कर्जाची सर्व कागदपत्र नीट वाचा व समजून घ्या.  “नमूद केलेल्या सर्व नियम व अटी मी मन्य करतो” ह्या वाक्यावर सही करणे ही सहज सोडून द्यायची गोष्ट नाही. 

  • कर्जाच्या कागदपत्रात संस्थेकडून नमूद झालेली ओळ अन् ओळ डोळ्यात तेल घालून वाचायला व समजून घ्यायला हवी. तुम्ही सही केली म्हणजे तुम्ही सगळ्या बाबी नीट वाचल्या आहेत व त्यासगळ्याला तुमची मान्यता आहे असे समजले जाते. 

  • त्यानंतर कोणत्याही कारणास्तव त्यात फेरबदल होऊ शकत नाही. त्यामुळे “मी हे वाचलंच नव्हतं, मला हे माहिती नव्हतं. हा माझ्यावर अन्याय आहे” वगैरेसारखा पश्चात्ताप पुढे टाळण्यासाठी हा सगळा मसुदा वाचणं गरजेचं असतं. 

  • ह्यातली भाषा, संज्ञा कितीही किचकट वाटल्या तरी त्या जाणून घेणं अर्जदाराचा हक्क असतो. जर तुम्हाला ह्यातील काहीही समजण्यास अडचण येत सेल तर एखाद्या आर्थिक सल्लागाराशी किंवा चार्ट्र्ड अकाऊंटंटशी संपर्क साधा.

   (चित्र सौजन्य- गुगल इमेजेस)

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *