वैयक्तिक कर्ज घेताय? मग लक्षात ठेवा हे ११ नियम

Reading Time: 3 minutes

नवीन तंत्रज्ञानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. या बदलातून बँकिंग आणि वित्त क्षेत्रही मागे राहिले नाही. आजकाल एसएमएस, मेल आणि फोन कॉलवरून देखील  वैयक्तिक कर्जाची ऑफर मिळत असते. काहीजण कमी व्याज दराने वैयक्तिक कर्ज देण्याची ऑर देतात. यामुळे बरेच जण या सापळ्यात अडकतात आणि कर्ज घेतात.

वैयक्तिक कर्जाची निवड करण्याआधी, “वैयक्तिक कर्जाची गरज खरोखरच आहे का?” हा विचार करावा.  

“किती आणि कोणत्या कर्जदाराकडून कर्ज घ्यावे? त्याची परतफेड कशी करावी? त्यासंबंधीचे नियम काय आहेत?” अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखामधून मिळतील.

वैयक्तिक कर्ज घेताना पाळायचे काही महत्वाचे नियम:

१. गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका :

 • आधुनिक तंत्रज्ञानाने  कर्ज देण्याची आणि कर्ज घेण्याची संपूर्ण व्यवस्था सोपी केली आहे. परंतु गरज नसताना किंवा गरजेपेक्षा जास्त कर्ज घेण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला मनासारखे कर्ज मिळणे ही एक आनंदाची गोष्ट असते. पण तेच कर्ज फेडताना आपण कधीही आंनदी नसतो. 
 • ‘आपण सहजपणे परतफेड करू शकता असे कर्ज घ्या.’ गुंतवणुकीच्या सामान्य नियमानुसार, वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयसाठी मासिक पगाराच्या जास्तीत जास्त १०% पगार खर्चकरू शकता.

२. कर्जासाठी नेहमी सर्वोत्तम पर्याय निवडा :

 • वैयक्तिक कर्जासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ऑफर केलेले दर आणि शुल्क प्रत्येक कर्जदारासाठी वेगवेगळे असू शकते. म्हणून, वैयक्तिक कर्जाची निवड करताना कम्पॅरिझन वेबसाईटची मदत घ्या. यामध्ये व्याजदर आणि इतर शुल्क तपासा.
 • त्याचबरोबर, आपल्या कर्जाची परतफेड लवकरात लवकर करायची असल्यास, किती रक्कम वाचू शकेल, याचीही तुलना करा.

३. परतफेड करताना ईएमआय  वेळच्या वेळी भरा  :

 • मुदतपश्चात उशीरा केलेल्या कर्जाच्या परतफेडीमुळे दंड भरावा लागू शकतो आणि त्यामुळे  सिबिल (CIBIL) स्कोअर देखील खराब होतो. 
 • उशीरा भरलेल्या ईएमआयमुळे (EMI) थेट सिबिल स्कोअरवर प्रभाव पडत असल्यमुळे कर्ज घेणाऱ्याची विश्वासार्हता कमी होते आणि भविष्यात कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वेळच्या वेळी ईएमआय भरणे नेहमी हिताचे असते.

४. वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी ईएमआयची तुलना करा :

 • आजकाल ऑनलाइन ईएमआय कॅल्क्युलेटर अनेक वेबसाइटवर उपलब्ध आहेत.  जर आपण ईएमआय आधीच कॅल्क्युलेट केला तर मासिक बजेटवर होणाऱ्या परिणामाचा अंदाज कर्ज घेण्यापूर्वीच येईल.                                        

५. कर्जाचा कार्यकाल शक्य होईल तेवढा कमी ठेवण्याचा प्रयत्न करा :

 • दीर्घ कालावधीची निवड केल्यामुळे नेहमीच ईएमआय कमी होतो, या मोहात अनेकजण अडकतात. परंतु या प्रकरणात घेतलेल्या कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक पैसे आपण भरत असतो.
 • कालावधी कमी असेल तर ईएमआय थोडा जास्त असतो. परंतु त्यामध्ये कर्जफेड कमी वेळेत करता येते.साहजिकच व्याज म्हणून कमी रक्कम भरावी लागते.

६. कर्ज करार नीट समजून घ्या :

 • कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करताना कर्जदाराला कर्ज करारावर सही करावी लागते. सही करताना करारनामा (Agreement) नीट वाचून घ्या. त्यामध्ये नमूद केलेले नियम व अटी समजून घ्या.
 • या करारांना नीट समजून न घेतल्यामुळे भविष्यात अचानकपणे काही अनपेक्षित शुल्क भरायची वेळ येऊ शकते. तसेच, त्यासंदर्भात संदिग्धता निर्माण होऊ शकते.

७. शक्य असेल तेव्हा कर्जाची रक्कम आगाऊ भरा :

 • शक्य असेल तिथे नेहमी पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. बचत केलेले पैसे कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरा. बोनस, इन्सेंटिव्हस यासारख्या बऱ्याच मार्गाने मिळणाऱ्या जास्तीच्या पैशांचे योग्य नियोजन करून वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी आपण वापरू शकतो.  
 • वैयक्तिक कर्जाची परतफेड केल्यामुळे व्याजाची लक्षणीय रक्कम वाचविण्यास मदत होईल. कर्जाची परतफेड झाल्यानंतर उर्वरित पैशाचा वापर इतर कामांसाठी करता येऊ शकतो.

८. कर्ज स्विच पर्यायाचा विचार करा :

 • अनेकदा बँका अथवा फायनान्शिअल इन्स्टिट्यूशन्स नवीन ग्राहकांना कमी व्याजदर आकारतात, अथवा वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स देतात. अशावेळी तुम्ही  तुमचे कर्ज स्विच करू शकता. त्यामुळे एकदा कर्ज घेतले की त्यामध्ये बदल करता येणार नाही,असा विचार करसापेक्षा अशा ऑफर्सवर व व्याजदरामध्ये होणाऱ्या बदलांवर नेहमीच लक्ष ठेवा.
 • स्विच करताना व्याजदरांमध्ये कमीतकमी २% फरक असावा. तसेच स्विचिंग आणि प्रक्रिया शुल्क दराचाही विचार करा.

९. गुंतवणुकीसाठी वैयक्तिक कर्ज घेऊ नका :

 • वैयक्तिक कर्ज तसं बघायला गेलं तर असुरक्षित कर्ज आहे. यासाठी उच्च व्याज दर आकारले जातात.
 • काहीजण वैयक्तिक कर्जे घेऊन मोठी  गुंतवणूक करतात. (उदा. स्टॉक, शेअर किंवा कोणत्याही व्यवसायासाठीही). अशावेळी बहुतांश वेळा नफा मिळण्याची खात्री नसते.
 • शक्य असल्यास वैयक्तिक कर्जामधून गुंतवणूक टाळण्याचा प्रयत्न करा. शिवाय, गुंतवणूक केलेल्या पैशांमधून पैसे कमविणे, ही गुंतवणूकीची मूलभूत संकल्पना आहे. परंतु कर्जाद्वारे मिळणाऱ्या रक्कमेमध्ये व्याजदेखील समाविष्ट असते. त्यामुळे, निर्णय घेताना, गुंतवणुकीतून होणारा फायदा खरंच होणार आहे का? याचा सखोल विचार करावा लागतो.

१०. पहिले वैयक्तिक कर्ज पूर्ण भरल्याशिवाय दुसरे वैयक्तिक कर्ज घेऊ नका :

 • अनेकदा सतत वाढत जाणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे मागील कर्जाची परतफेड न करता दुसरे वैयक्तिक कर्ज  घेतले जाते. यामधून कर्जदाराकडे आर्थिक स्थिरता नाही हे स्पष्ट होते, म्हणूनच कर्जाचा अर्जही नाकारला जाऊ शकतो. ज्यामुळे सिबिल स्कोअर कमी होतो.
 • मागील वैयक्तिक कर्ज असल्यास, नवीन कर्ज घेण्याआधी आधीचे वैयक्तिक कर्ज फेडले पाहिजे. फॅमिली ट्रिप, मनोरंजन, शॉपिंग अशा गरजांसाठी वैयक्तिक कर्ज घेणं शक्यतो टाळावं.

११. मोठ्या कर्जाच्या रकमेसाठी विमा घ्या :

 • काही विमा कंपन्या मोठ्या रकमेच्या कर्जासाठी विमा पॉलिसीची सुविधा देतात. कर्ज घेताना त्यासंबंधी माहिती घ्या. जेव्हा कर्जाची रक्कम मोठी असेल तेव्हा कर्ज संरक्षण म्हणून असा विमा फार उपयोगी ठरतो. जेव्हा कर्ज घेणारा परतफेड करण्यास अपयशी ठरतो तेव्हा कर्ज विमा कर्जदाराच्या अथवा त्याच्या कुटुंबाच्या मदतीला धावून येतो.
 • अनेक कर्ज विमा संरक्षणामध्ये नोकरीचे नुकसान, मोठा अपघात, कायमस्वरूपी आणि तात्पुरती अपंगता आणि मृत्यू देखील समाविष्ट आहेत. अशा आपत्तीकालीन प्रसंगात कर्जदाराचा उर्वरित ईएमआय विमा कंपनी भरते.

पर्सनल लोन विषयी सर्व काही भाग १पर्सनल लोन विषयी सर्व काही भाग २,

पर्सनल लोन नामंजूर होण्याची कारणे- भाग १,  सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर |

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *