नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ऊर्जा क्षेत्रासाठी 19,100 कोटी रुपयांची तरतूद केली. यात नवीन ऊर्जा क्षेत्र आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र यांचा समावेश आहे. 2023-2024 च्या अर्थसंकल्पाच्या सुधारित अंदाजापेक्षा (7,848 कोटी ) जवळपास 79% वाढ पाहायला मिळाली.
विकासासाठी जी अनेक संसाधनं महत्वाची आहेत, त्यात उर्जेचा समावेश होतो. जगाच्या तुलनेत भारतात दर माणशी विजेचा वापर कमी आहे.मात्र तो सातत्याने वाढत चालला आहे. त्याला वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे आणखी गती मिळते आहे.
- 2023 हे वर्ष जगासाठी सर्वात उष्ण ठरले आणि त्याचा थेट परिणाम ते सुसह्य करण्यासाठी कुलर, एसी, पंखे, फ्रिज याचा वापर वाढला. म्हणजेच विजेचा वापर वाढला.
- भारताची राजधानी दिल्लीसह अनेक शहरांत यावर्षी 50 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान गेले. सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले.
- याच काळात विजेची विक्रमी मागणी नोंदविण्यात आली, याचा अर्थ विजेचा वापर करून तापमान सुसह्य करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि तो वाढतच जाणार आहे.
- गुंतवणुकीचा विचार करता उर्जा क्षेत्रातील कंपन्यांना या बदलाचा फायदा होणार आहे. नवे उर्जा प्रकल्प टाकणाऱ्या, वीज दरवाढ करणाऱ्या आणि विजेचा साठा करणाऱ्या कंपन्यांना या बदलाचा फायदा होणार आहे.
- भारताने 2030 पर्यंत उर्जा निर्मितीमध्ये मोठा बदल करण्याचे ठरवलं आहे. तो बदल म्हणजे थर्मल पॉवरवरील म्हणजे कोळश्यातून होणारी वीज निर्मिती कमी करणं.
- येत्या सहा वर्षात जास्तीत जास्त 50 टक्केच वीजनिर्मिती कोळश्यापासून करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेला वाढते कार्बन इमिशन कारणीभूत असल्यानं ते कमी करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात असून भारत त्यात सक्रिय झाला आहे.
- कारण उष्णता वाढीचा सर्वाधिक फटका भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या देशाला सर्वाधिक बसू शकतो. उष्णतेच्या लाटा आणि पावसाच्या लहरीपणातून आपण सध्या त्याचा अनुभव घेतच आहोत.
- उर्जा क्षेत्रातल्या या बदलामुळे ग्रीन एनर्जीचं (कार्बन उत्सर्जन न करणाऱ्य़ा) महत्व वाढत चाललं आहे. त्यात सौरउर्जा, पवनउर्जा आणि हायड्रोजन उर्जेचा समावेश होतो.
- पण या उर्जेचं स्वरूप उर्जा कोळसा जाळून 24 तास उर्जा मिळते, त्या उर्जेसारखं नसून ती काही ठरावीक तासच मिळू शकते. त्यामुळे ती साठवून वापरणं क्रमप्राप्त आहे. याचा अर्थ उर्जा साठवण्याला नजीकच्या भविष्यात अतिशय महत्व येणार आहे.
उर्जा साठवून ठेवण्याचे तीन मार्ग आहेत.
- पहिला मार्ग म्हणजे बॅटरीमध्ये वीज साठविणे.
- दुसरा मार्ग जल उर्जेचे व्यवस्थापन हा आहे म्हणजे दिवसा धरणाचं पाणी पंप करण्यासाठी अपारंपरिक उर्जा वापरणे आणि रात्री जेव्हा थर्मल पॉवरची उर्जा अधिक होते, तेव्हा तेच पाणी पुन्हा मूळ साठ्यात टाकण्यासाठी थर्मल पॉवर वापरणे.
- आणि तिसरा मार्ग म्हणजे हायड्रोजन किंवा ग्रीन अमोनिया उर्जेचा साठा करणे.
ऊर्जा साठवणुकीचे महत्व :
- उर्जेचा साठा करणं, अनेक दृष्टींनी महत्वाचं ठरतं. विजेच्या ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी, सर्वाधिक मागणी असलेल्या काळात तो साठा वापरणे आणि सौर, पवन उर्जेचा परिणामकारक वापर करणे, त्यामुळेच शक्य होते.
- 2023 च्या राष्ट्रीय वीज योजनेनुसार (एनईपी) 2027 पर्यंत विजेचा साठा 82.37 गीगावॉट तर 2032 मध्ये तो 411.4 गीगावॉट असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. 2047 पर्यंत तर ही क्षमता दोन हजार 380 गीगावॉट म्हणजे 50 पट वाढेल, असे प्रयत्न भारत करणार आहे.
- याचा फायदा वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना होणारच आहे, पण त्याहून अधिक फायदा वीज साठ्विणाऱ्या कंपन्यांना होणार आहे.
याचा अर्थ वीज साठा करण्यात आघाडीवर असलेल्या कंपन्यांमध्ये केलेली दीर्घ काळातील गुंतवणूक पुढील काळात चांगला परतावा देणारी ठरणार आहे.
अशा तीन कंपन्या या क्षेत्रात सध्या आघाडीवर आहेत. त्या म्हणजे अमारा राजा एनर्जी, एक्साईड इंडस्ट्रीज आणि टाटा केमिकल.
या तीन्ही कंपन्या गुंतवणुकीसाठी सध्या कशा आहेत, हे पुढील तक्त्यातून स्पष्ट होईल.
कंपनीचे नाव | 9 जुलै 2024 चा भाव | गेल्या वर्षभरातील परतावा | मार्केट कॅप
(कोटी रुपये) |
पीई रेशो |
Amara Raja Energy & Mobility
|
1670 | 138% | 30,272 | 34 |
Exide Industries
|
577 | 132% | 48,960 | 56 |
Tata Chemicals
|
1082 | 8% | 27,523 | 102 |
— यमाजी मालकर
#राष्ट्रीय वीज योजना
#ऊर्जा क्षेत्र
#नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र
#renewable energy sector