Reading Time: 2 minutes
आर्थिक विषयाची किमान माहिती असावी, म्हणून मागच्या लेखामधे आपण मालमत्ता (ॲसेट), वार्षिक अहवाल (ॲन्युअल स्टेटमेंट), ताळेबंद (जमाखर्च), उच्च आर्थिक मूल्य असलेले समभाग (ब्लुचीप शेअर्स), रोखे (बॉण्ड), भांडवली नफा (कॅपिटल गेन), पैशाचा प्रवाह (कॅश फ्लो) , पत (क्रेडिट) या काही प्राथमिक संकल्पनांची थोडक्यात माहिती करून घेतली. आता आजच्या लेखामधून आणखी काही संकल्पना समजून घेऊया.
घसारा निधी / घट (Depreciation) :
- जमीन वगळता सर्व स्थिर मालमत्ता म्हणजे इमारत, यंत्रसामुग्री, फर्निचर, उपकरणं यांच्या किमतीत सातत्याने घट होत असते. या मालमत्ता वापरण्यास अयोग्य झाल्यावर त्याऐवजी नव्या मालमत्ता खरेदी कराव्या लागतात. यासाठी मूळ मालमत्तेच्या कमी झालेल्या मूल्याएवढी तजवीज करावी लागते, त्यास घसारा असे म्हणतात.
- घसारा मोजण्यासाठी सदर मालमत्ता उपयोगी पडण्याचा कालावधी, तसंच काही कालावधीनंतर मालमत्तेची विक्री केली तर येऊ शकणारी किंमत, नवीन मालमत्तेची खरेदी करण्यासाठी लागणारी सर्व रक्कम (ज्यात वाहतूक खर्च, स्थापना खर्च, कर इत्यादी) याचा विचार केला जातो.
- केवळ वस्तूच्या वापरामुळे नाही, तर तंत्रज्ञानातील बदलामुळेही एखादी वापरातील वस्तू कालबाह्य होऊन नवीन वस्तू घ्यावी लागते, यासाठी काही तरतूद करून ठेवावी लागते.
- घसारा हा खर्च समजला जाऊन, तो कोणत्या वस्तूसाठी किती प्रमाणात घेतला जावा या विषयी कायद्यात असलेल्या तरतुदीप्रमाणेच रक्कम बाजूला ठेवावी लागते.
अर्थसाक्षरता : काही आर्थिक संज्ञा पार्ट 1
समभाग( Shares)-
- व्यवसाय उभारणीसाठी मोठ्या भांडवलाची गरज लागते, जे (भांडवल)प्रवर्तक, जनता आणि बाजारातून कर्ज घेऊन उभं केलं जातं.
- व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं म्हटल्यास, कर्जासाठी काहीतरी तारण ठेवावं लागतं किंवा हमीदार लागतो. याशिवाय त्यावर व्याजही द्यावं लागत असल्याने देयता वाढते.
- याउलट प्रवर्तक, जनता, गुंतवणूक कंपन्या यांच्याकडून भांडवल गोळा केले, तर त्यामुळे देयता न वाढल्याने कमी दरात मोठी रक्कम भांडवल रूपाने उपलब्ध होते.
- अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर समभाग म्हणजे कंपनी मालकांच्या (मालकीचा) भांडवलाचा एक भाग होय. यावर कोणत्याही निश्चित परताव्याची हमी नसते. दुय्यम बाजारात हे भाग विकता येतात किंवा विकत घेता येतात. त्यामुळे यात बऱ्यापैकी तरलता असते.
- कंपनीची मालमत्ता आणि दायित्व माहिती असल्यास मालमत्तेतून दायित्व वजा केले असता, येणारी रक्कम ही त्या समभागांची एकूण रक्कम असते.
- कंपनी कायद्यातील या तरतुदीमुळे व्यावसायिकांना कमी खर्चात भांडवल उपलब्ध होते, तर गुंतवणूकदारांना त्यांनी स्वीकारलेल्या जोखमीच्या तुलनेत कोणत्याही अतिरिक्त देयाशिवाय आकर्षक परतावा मिळण्याची शक्यता असते.
जावे आयपीओच्या गावा : स्वीगी आयपीओ
प्रति समभाग कमाई (Earning per share)-
- समभाग (शेअर्स) हे कंपनीच्या मालकीचे प्रतिनिधित्व करतात. कंपनीला झालेल्या निव्वळ नफ्यातून कर देऊन झाल्यावर प्रति समभाग किती कमाई झाली, याची माहिती देणारं आर्थिक गुणोत्तर आहे.
- प्रति समभाग उच्च उत्पन्न मिळवणाऱ्या कंपन्यांची गणना सुदृढ कंपन्यात होते, या कंपन्या आपल्या भागधारकांना सातत्याने लाभांश, हक्कभाग आणि बोनस शेअर्स देत असतात.
- साहजिकच या कंपन्या आपल्याकडे असाव्यात असं अनेकांना वाटत असतं, त्यांना अधिक मागणी असते, त्यामुळेच त्यांचा बाजारभावही अधिक असतो.
प्रारंभिक भाग विक्री (Initial Public Offer)-
- बाजारात प्रथमच एखाद्या खाजगी कंपनीला सार्वजनिक करून, त्यांचे शेअर्स उपलब्ध करून दिले जातात. यालाच प्रारंभिक भाग विक्री म्हंटले जाते. या प्रक्रियेत गुंतवणूकदारांना कंपनीचे समभाग नव्याने उपलब्ध करून दिले जातात आणि अथवा प्रवर्तकांकडून काही भाग विक्रीसाठी काढला जातो.
- हे भाव सममूल्याने अथवा अधिभार (सरचार्ज) देऊन दिले जातात. यात अधिभार किती घ्यावा हे कंपनीने नेमलेल्या लीड मॅनेजरच्या सल्ल्याने ठरवण्यात येते.
- कोणत्या कंपनीने किती अधिमूल्य (प्रीमिअम) घ्यावे यावर सध्या कोणतेही बंधन नाही.
- बाजारात अस्तित्वात असलेल्या कंपनीने सर्वांसाठी शेअर्स विक्रीसाठी काढल्यास त्याला फॉलो ऑन ऑफर असे म्हटले जाते.
आयकर विवरणपत्र (Income Tax Returns)-
- सर्व मार्गाने मिळालेले एकूण उत्पन्न, नवीन प्रणालीनुसार, तीन लाखाहून अधिक अथवा जुन्या प्रणालीनुसार अडीच ते पाच लाखाहून अधिक असेल, तर सर्व मार्गाने मिळणाऱ्या उत्पन्नाची एकूण मिळकतीनुसार (म्हणजेच व्यवसाय अगर पगाराचं उत्पन्न, मिळालेलं व्याज, भांडवली नफा, घरभाडे असल्यास अन्य उत्पन्न) लागू असलेल्या प्रकारचा तपशीलवार फॉर्म भरून विशिष्ट मुदतीत एकूण उत्पन्न जाहीर करावं लागतं. त्या फॉर्मला आयकर विवरणपत्र असे म्हणतात.
- हा फार्म भरणं आणि कर भरणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. यामुळे आपले निश्चित उत्पन्न किती आहे, याला पुष्टी मिळते, जे कर्ज घेणं आणि जामीन राहणं यासाठी आवश्यक आहे. हाच फार्म वेळेत भरून, अधिक कापलेला कर आपल्याला परत मिळवता येतो. (क्रमश:)
Share this article on :