Reading Time: 4 minutes

शेअरबाजारात विविध प्रकारचे गुंतवणूकदार अनेक व्यवहार करत असतात, या सर्व व्यवहारांना ट्रेडिंग असं म्हटलं जातं. गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक करण्याच्या कालावधीवरून ते अल्प, मध्यम की दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, हे समजतं. या कालावधीची निश्चित अशी सीमारेषा नाही. आयकर कायद्यानुसार शेअर्समधे किमान एक दिवस ते एक वर्ष या कालावधीसाठी केलेली गुंतवणूक अल्पकालीन तर त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूक समजली जाते. यातून मिळालेला नफा-तोटा हा भांडवली नफा-तोटा समजला जातो. हा नफा-तोटा व्यक्तीच्या उत्पन्नाचा भाग समजला जातो, यामुळे यावर कर द्यावा लागतो.

  • लोकांनी अशी गुंतवणूक करावी आणि अधिकाधिक लोक भांडवली बाजाराकडे आकर्षित व्हावेत, यासाठी या उत्पन्नावर नियमित करदरांच्या ऐवजी विशेष दराने कर आकारणी केली जाते.
  • या पद्धतीने तुमचा निव्वळ भांडवली नफा कितीही असला आणि तो दीर्घकालीन असेल, तर एक लाख पंचवीस हजारावर सरसकट 12.5% दराने कर द्यावा लागतो.
  • तर अल्पकालीन भांडवली नफ्यावर सरसकट 20% दराने कर आकारणी केली जाते. यामुळे अधिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती मोजमाप करून जोखीम घेऊन (Calculated Risk) भांडवल बाजारात गुंतवणूक करण्यासाठी तयार होतात. व्यक्ती जितकी जास्त जोखीम घेऊ शकते, यावर नफा किंवा नुकसान कमी-अधिक होण्याची शक्यता असते. 

डे ट्रेडिंग

  • शेअर बाजारात अजून एका पद्धतीनं ट्रेडिंग करता येतं, याला डे ट्रेडिंग असं म्हणतात आणि अश्या प्रकारचं ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांना “डे ट्रेडर्स” म्हटलं जातं. या प्रकारच्या ट्रेडिंगमधे ट्रेडर आपले खरेदी आणि विक्रीचे व्यवहार एकाच दिवसात पूर्ण करतात. 

उदाहरणार्थ, 

समजा, आज मार्केट सुरू झाल्यावर एका ट्रेडरने ‘अबक’ या कंपनीचे 500 शेअर्स खरेदी केले आणि  हे 500 शेअर्स आजच मार्केट बंद होण्याआधी विकले, हा व्यवहार म्हणजे एका दिवसात पूर्ण झाला. यालाच डे ट्रेडिंग असं म्हणतात.

  • डे ट्रेडिंगचा गुंतवणूक करण्याचा कालावधी हा सेकंदाचा काही भाग ते कामकाजाचा पूर्ण एक दिवस असा असतो. 
  • शेअर्सच्या भावातील फरकाचा लाभ उठवून कमीतकमी वेळात अल्प भांडवलावर अधिक नफा मिळवणं, हे या ट्रेडर्सचं उद्दिष्ट असतं. यातून मिळालेलं उत्पन्न हे अन्य मार्गाने मिळालेलं उत्पन्न समजून त्यावर नियमितदरानं कर आकारणी केली जाते.
  • एखाद्या व्यक्तीचा शेअर्स खरेदीविक्री करणं हाच व्यवसाय असल्यास, त्याला कायद्याने उपलब्ध असलेल्या व्यावसायिक खर्चाच्या वजावटींचा लाभ घेता येतो. पूर्वी या संबंधात अनेक वाद निर्माण झाल्यानं त्यावर उपाय म्हणून शेअर खरेदी विक्री करणं ही गुंतवणूक आहे की व्यवसाय? हे जाहीर करण्याचं स्वातंत्र्य करदात्यांना मिळालं आहे.

स्कँल्पिंग :      

  • स्कँल्पिंग म्हणजे एक प्रकारची डे ट्रेडिंगचीच पद्धत आहे. यात ज्या मालमत्ता प्रकारात उदाहरणार्थ, शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, करन्सी यामधे डे ट्रेडिंग होऊ शकतं, त्यात स्कँल्पिंग करता येतं.
  • इथे सोयीसाठी शेअर्स विचारात घेतले आहेत. शेअरच्या भावात पडणाऱ्या छोट्याशा फरकाचा लाभ डे ट्रेडर्स मिळवत असतात. एक किंवा त्याहून अधिक कंपन्यांच्या शेअर्सचे अनेक छोटे छोटे ट्रेड दिवसभरात घेतले किंवा विकले जातात.
  • सकाळी मार्केट चालू झाल्यावर शेअर्स खरेदी अथवा विक्री करून आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत किंवा पोझिशन स्क्वेअर अप करण्याच्या वेळेपर्यंत अथवा स्टॉपलॉस हिट होईपर्यंत वाट पाहणं, ट्रेडरला मान्य असतं.
  • आपला डे ट्रेडिंगचा व्यवहार ते चुकूनही डिलिव्हरीमधे बदलून घेत नाहीत. त्यांचं टार्गेट आणि स्टॉपलॉस हे अन्य डे ट्रेडर्सच्या तुलनेत अत्यंत छोटे असतात. तसेच त्यांचं गणिताचं ज्ञान पक्क असतं. यामुळे भावात किती फरक पडला की आपल्याला सर्व खर्च वजा करून फायदा होईल (Break even) अथवा तोटा होईल हे त्यांना निश्चित माहित असतं.

स्कँल्पिंगचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे आहेत. 

फायदे:

  • मोठ्या प्रमाणात नफा होण्याची शक्यता- स्कँल्पिंगमधे व्यवहार संख्या अधिक असते. यात प्रत्येक व्यवहारात कमी नफा असला तरी अनेक व्यवहारांचा मिळून एकत्रित नफा मोठा असण्याची शक्यता असते.
  • व्यवहार जोखीम- स्कँल्पिंग व्यवहारामधे, ट्रेडर्स त्यांच्याकडे असणाऱ्या पैशावर किती प्रमाणात व्यवहार करता येतील, हे माहीत असल्यामुळे त्यांना स्वतःच्या मर्यादा ठाऊक असतात. त्यामुळे जे काही नफा-नुकसान होईल; ते आजच होईल, हे त्यांना माहित असते. यामुळे या व्यवहारामधे जोखीम अत्यंत कमी असते.
  • व्यवहारातली लवचिकता- स्कँल्पर (स्कँल्पिंग करणारे) बाजाराच्या बारीकसारीक हालचाली टिपत असल्यानं बाजाराच्या दिशेनुसार(सकारात्मक/नकारात्मक) ट्रेड घेतात, टार्गेट बदलतात किंवा स्टॉपलॉस बुक करतात.
  • बाजाराकडे नाविन्यपूर्ण पद्धतीने पहाण्याची दृष्टी- स्कँल्पिंग करणारे ट्रेडर्स बाजाराच्या दिशेवर लक्ष ठेवत असल्यानं आणि सरावानं त्यांची नजर तयार होते आणि ते सूक्ष्म फरक सुद्धा टिपू शकतात. त्यामुळे बाजाराच्या चढ-उतारावर नुसती नजर टाकून काय होऊ शकेल हे त्यांना सहज समजतं.

तोटे : 

  • जादा जोखीम– स्कँल्पिंग करणारे हे खूप मोठ्या संख्येनं ट्रेडिंग करत असल्यानं, व्यवहार त्यांच्या विरोधात गेल्यास अधिक नुकसान होऊ शकतं.
  • ब्रोकरेज आणि अन्य चार्जेस- स्कँल्परला मिळू शकणाऱ्या नफ्याशी तुलना केली, तर स्कँल्पिंगमधे मोठ्या संख्येनं व्यवहार होत असतात. यामुळे दलाली आणि अन्य चार्जेस व्यवहाराच्या तुलनेनं अधिक द्यावे लागतात.
  • जास्त वेळ घेणारे आणि निर्णय तत्परता– स्कँल्पिंग करताना पूर्ण वेळ बाजार हालचालींवर लक्ष ठेवावे लागते. त्याप्रमाणे होणाऱ्या  बदलानुसार झटपट निर्णय घ्यावे लागतात.
  • मानसिक ताण – स्कँल्पिंग करणाऱ्या व्यक्तींना झटपट निर्णय घेण्याच्या नादात मानसिक ताण येऊ शकतो.
  • बाजारातील अस्थिरता– बाजारात एकाच वेळी अनेक मध्यस्थ काम करत असतात. त्यामुळे बाजार सातत्यानं वरखाली होत असतो. जास्त अस्थिरता ट्रेडर्सना अनुकूल असली, तरी त्यात निर्णय चुकण्याची शक्यता अधिक असते.
  • तरलतेचा अभाव– काही शेअर्स कमी तरल असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्याची इच्छा असली, तरी तसं करता येत नाही. यामुळे अपेक्षित किंमत मिळू शकत नाही.

स्कँल्पिंगची वैशिष्ट्ये:

  • अत्यल्प व्यवहार कालावधी – स्कँल्पिंगमधले व्यवहार काही सेकंद ते काही मिनिटे या कालावधीचे असतात.
  • अधिक व्यवहार वारंवारता- कालावधी कमी असल्याने एक वा अनेक कंपन्यांच्या शेअर्समधे वारंवार एकसारखे अधिक व्यवहार केले जातात.
  • अत्यल्प नफा उद्दिष्ट – स्कँल्पिंगमधले बहुतेक सर्व व्यवहार अत्यल्प नफा मिळवण्यासाठी केले जातात.
  • तांत्रिक विश्लेषणाचा वापर – स्कँल्पिंग व्यवहार करताना तांत्रिक विश्लेषण उपयोगी पडत असल्यामुळे स्कँल्पर त्याचा प्रामुख्याने वापर करतात.

लोकप्रिय स्कँल्पिंग तंत्रे:

  • रेंज ट्रेडिंग – शेअर्सची किंमत पातळी ओळखून त्याच दरम्यान व्यवहार करणं.
  • ट्रेंड फॉलोइंग – शेअर्सचा कल (सकारात्मक/नकारात्मक) ओळखून त्यानुसार व्यवहार करणं.
  • ब्रेकआउट ट्रेडिंग – अचानक होणारे भावातील बदल ओळखून व्यवहार करणं.  
  • मिन रिव्हर्शन – शेअर्सची किंमत कालांतराने सरासरी किमतीत बदलते, ते ओळखून व्यवहार करणं.

स्कँल्पिंगसाठी आवश्यक कौशल्ये: 

  • बाजार ज्ञान – स्कँल्पर म्हणून काम करण्यासाठी बाजाराचे सखोल ज्ञान असणं गरजेचं आहे.
  • तांत्रिक विश्लेषण – निर्णय घेण्यासाठी विविध तांत्रिक गोष्टींचा विचार केला जात असल्यामुळे या विषयाचं ज्ञान असणं गरजेचं आहे.
  • जोखीम व्यवस्थापन – कोणत्याही गुंतवणूकीसाठी जोखीम व्यवस्थापन आवश्यक आहे, त्याचप्रमाणे स्कँल्पिंगसाठी ही त्याची गरज आहे.
  • शिस्त – आपल्या गुंतवणूक धोरणाचे तंतोतंत पालन करण्याची शिस्त अंगीकारायला हवी.
  • तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता – शेअर्सचे भाव क्षणार्धात वरखाली होत असल्यामुळे निर्णय झटपट घेण्याचं कौशल्य असायला हवं. यात एक चूक म्हणजे आर्थिक नुकसानच निश्चित आहे.

स्कँल्पिंग सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी :

  • योग्य ट्रेडिंग प्लँटफॉर्म – ट्रेडिंग करत असताना, व्यवहारावर किमान ब्रोकरेज लावणारे ब्रोकर निवडणं, यामुळे व्यवहाराचा खर्च कमी होईल.
  • निश्चित असा ट्रेडिंग प्लॅन- शेअर बाजारात व्यवहार करताना कोणत्या पातळीवर करायचा? स्टॉपलॉस, एन्ट्री-एक्सिट कुठे घेणार याबद्दल संदिग्धता नसावी.
  • सराव मंच – ट्रेडिंगच्या सरावासाठी अनेक ट्रेडिंग प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत. यात प्रत्यक्ष पैशांशी संबंध येत नसल्यामुळे व्यवहार करण्यात कोणताही धोका नाही. 
  • व्यवहार पातळी- सुरुवातीला छोटे आणि कमी संख्येने व्यवहार करून कालांतराने व्यवहारांचे प्रमाण वाढवावे.

         डे ट्रेडिंग हे दुय्यम दर्जाचे आहे, असे गुंतवणूक तज्ञ समजतात. असे असले तरी ही एक गुंतवणूक करण्याची सर्वमान्य पद्धत आहे. डे-ट्रेडर्स ट्रेडिंग करत असल्यामुळे बाजाराचा भावफलक सतत हलता राहतो.  व्यवहारांची संख्या वाढते आणि कमी होते. शेअरबाजारात बहुसंख्य व्यवहार याच प्रकारात होतात. यामधून सरकारला कर मिळतो.

स्कँल्पिंग करण्यासाठी जोखीम – पुरस्कार(परतावा) गुणोत्तर (Risk Reward Ratio) याचबरोबर ट्रेडिंगवर समर्पितता (Delegation), शिस्त (Discipline) आणि सतत शिकत राहण्याची इच्छाशक्ती असण्याची गरज आहे.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी ग्राहक संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणूनही कार्यरत आहेत. लेखात व्यक्त केलेली मते पूर्णपणे वैयक्तिक समजावी.)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.