Reading Time: 3 minutes

शेअर बाजारात आपल्याला मालमत्ता प्रकारांचा सध्याचा बाजारभाव दिसत असतो. एक गुंतवणूकदार म्हणून आपल्या गुंतवणुकीचं  योग्य मूल्य शोधून कमी किमतीत अथवा रास्त किमतीत (स्वस्त नाही.)  गुंतवणूक संधी शोधणं, हे कौशल्याचं काम आहे. यासाठी मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण यांचा आधार घेतला जातो. मूलभूत विश्लेषणात उत्पादक, उत्पादन, विक्री, कमाई यासारख्या व्यवसायाच्या कामगिरीवर आधारित संदर्भांचा विचार केला जातो. याचा अभ्यास करण्यासाठी वार्षिक अहवालाचा उपयोग करतात. मध्यम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीसाठी मूलभूत विश्लेषणाच्या पद्धतीचा वापर करतात. तांत्रिक विश्लेषण (शेअर्सची किंवा मालमत्ता प्रकरांची) भूतकाळातील किंमत, हालचाल, बाजार उलाढाल, त्यांची पद्धती, रचना याच्या उपलब्ध माहितीवरून भविष्यातील त्यांच्या कामगिरीचा अंदाज बांधत असतात. यावरून कोणत्या किंमतीने मालमत्तेची खरेदी करायची, काय भाव आल्यावर विक्री करायची याचा अंदाज बांधला जातो. हे करत असताना “भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची सातत्याने पुनरावृत्ती होत असते” हे गृहीत धरलं आहे. अल्पकालीन गुंतवणूकदारांना किमान भांडवलात आणि कमी कालावधीत अधिकाधिक नफा मिळवायचा असल्यामुळे ते प्रामुख्याने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतात.

अल्पकालीन गुंतवणूकदार, डे ट्रेडर्स, स्विंग ट्रेडर्स, पोझिशनल ट्रेडर्स तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून प्रामुख्यानं पुढील गोष्टी ठरवतात,

  • मालमत्तेची नेमकी खरेदी अथवा विक्री करून, कुठं उलट ट्रेंड घ्यायचा ते ठरवतात.
  • बाजाराची समर्थन आणि प्रतिकार पातळी ओळखून, व्यवहार करताना आपलं नुकसान होऊ नये याची काळजी घेतात.
  • बाजार भावना म्हणजे बाजारात तेजी आहे अथवा मंदी आहे, किंवा एका विशिष्ट पातळीवर स्थिर झाला आहे का ? ते जाणून घेऊन त्यात होणारे बदल लक्षात घेतात. 

हे विश्लेषण जाणून घेताना विविध तक्ते, आलेख यांचा वापर केला जातो, ते किंमत आणि उलाढाल याचा आधार घेऊन बनवले जातात ते असे-

  • रेखा तक्ते – हे बाजाराचा कल एका रेषेत दृश्य स्वरूपात दाखवतात, यासाठी विशिष्ठ कालावधीतील छोटे भाग, घटना यांचा संदर्भ घेतला जातो.
  • बार चार्ट – हे विशिष्ट कालावधीतील खुला-बंद भाव ,सर्वात कमी आणि सर्वाधिक भाव याचा विचार करून बनवलेले असतात, त्यामुळे ते रेखा तक्त्याहून अधिक तपशील पुरवतात.
  • कॅडल स्टिक चार्ट – कॅडल स्टिक चार्ट, बार चार्टशी मिळतेजुळते असल्यामुळे किंमत हालचाल आणि कलबदल ओळखण्यास मदत करतात.

तांत्रिक विश्लेषणाचे विविध संकेतक – भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यासाठी विविध संकेतकांचा  वापर केला जातो. भारतीय बाजारात वापरले जाणारे सर्वसामान्य संकेतक खालीलप्रमाणे आहेत.

  • अद्ययावत सरासरी किंमत (Moving Average) ही विशिष्ट कालावधीमधली, भूतकाळातल्या दिलेल्या किंमतीचा विचार करून अंकगणितीय सरासरी कदली जाते, तर घातांकीय हालचाल सरासरी- इएमए  (Exponential Moving Average-EMA)मधे, अलीकडच्या किमतीचा विचार करून सरासरी काढली जाते. यामुळे अल्प आणि मध्यम काळातील किंमतीचा कल समजून घेऊन अंदाज बांधता येतो.
  • सापेक्ष शक्ती निर्देशांक (Relative Strength Index) अलीकडील ट्रेडिंग कालावधीच्या बंद होणाऱ्या किमतीवरून शेअर किंवा बाजाराच्या शक्तीची म्हणजे अधिक खरेदी होत असेल तर , भाव वर जाण्याची शक्यता असते अथवा अधिक विक्री होत असल्यास किंमती खाली येतील याच्या शक्यता सूचित करतो. 
  • बदलते सरासरी अभिसरण / विचलन (MA convergence divergence) – यातून दोन-इएमए मधील संबध दाखविला जातो. अभिसरणात दोन्ही इएमए एकमेकांच्या दिशेने जातात तर विचालनात एकमेकांपासून दूर जातात, अल्प मुदतीत किंमतीमधे होणारी हालचाल ओळखून, त्याचं मूल्यांकन करता येतं .
  • हालचाल रेषा (Trendline) – ही एक रेषा असून तिच्या मदतीनं बाजाराच्या हालचालीचं समर्थन आणि प्रतिकार (support and resistance )कुठे असेल ते समजू शकतं, त्यानुसार व्यवहार करता येतात. या रेषा क्रम संलग्न करून निष्कर्ष काढण्यासाठी वापरल्या जातात, बाजाराची दिशा आणि सामर्थ्य दाखवतात.
  • समर्थन आणि प्रतिकार – भाव पातळी एकच एक दिशा दाखवीत नाही. जर भाव वरवर जात असेल, तर एका मर्यादेनंतर तो खाली येतो किंवा खाली खाली जाणारा भाव एका मर्यादेवर स्थिर होऊन पुन्हा वाढतो, नंतर एका पातळीवर स्थिरावतो. या स्थिरावलेल्या पातळीत भाव वर-खाली होत असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुंतवणूकीच्या संधी असतात.
  • करारांची संख्या – ठरावीक काळात एकूण किती खरेदी-विक्री करार झाले, त्यांच्या संख्येवरून, त्याचप्रमाणे करार करण्यास स्वारस्य असलेल्या गुंतवणूकदारांची संख्या आणि त्यात होणारी उलाढाल, अचानक होणारी वाढ यावरून अनेकजण अंदाज बांधत असतात.

         या सर्व संकेतकांचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणात तांत्रिक विश्लेषण केले जाते. बाजारात सर्वाधिक व्यवहार हे झटपट फायदा मिळवणं, या प्रकारात होतात.  तर त्याखालोखाल मध्यम कालावधीमधे गुंतवणूक होत असल्यामुळे बाजारफलक सतत हलत राहतो. यासाठी आधार म्हणून काही पद्धती वापरल्या जातात.

  • कल ओळख (Trend analysis) – यामधे किंमती वाढत राहतील, अजून वाढतील, कमी होतील अथवा आणखी खाली जातील, की एका मर्यादित पातळीत राहतील या गोष्टी पाहिल्या जातात.
  • समर्थन आणि प्रतिकार (Support and Resistance) –  शेअर्स अथवा बाजाराची घसरण थांबेल तो समर्थन बिंदू आणि  वाढ थांबण्याची शक्यता तो प्रतिकार बिंदू, हे  शोधून खरेदी विक्री कोणत्या किंमतीवर केली जावी ते ठरवलं जातं.
  • बॉलिंगर बँड – यातून सरासरी किंमत पट्याच्या आधारावर बाजारातली तरलता आणि त्यातले बदल याविषयी माहिती मिळते.
  • फिबोनाची रिटरॅटमेन्ट – हे एक गुणोत्तर आहे, ज्यात किंमत खाली किंवा वर जाईल याची  शक्यता सांगितली  जाते.
  • कँडलस्टिक – ही एक जपानी पद्धत असून यामधे, भावातील फरक आकृतिबंधाच्या साहाय्याने पाहण्याचा प्रयत्न करून त्याचा अर्थ लावण्यात येतो. उदा दोजी, हॅमर त्यांना निश्चित असे अर्थ आहेत.
  • उलाढाल – विशिष्ट कालावधीतले बाजारातले व्यवहार, त्यामधे झालेले बदल यावरून अंदाज उलाढाल किती झाली याचे बांधले जातात.
  • विविध आलेख- किमतींमधले बदल आलेखाद्वारे दाखवून त्यातून भविष्यातील किमतीचा अंदाज बांधण्यात येतो. या आलेखांना हेड अँड शोल्डर, डबल टॉप/ बॉटम, फ्लॅग यासारखी नावे दिली आहेत. अशा आलेखांचे विशेष अर्थ ही आहेत.
  • पॅराबोलीक एसएआर- याद्वारे असा बिंदू निश्चित होतो, जिथून स्टॉक अथवा बाजार त्याच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करेल. 

        एक किंवा अनेक पद्धतींनी  केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या मर्यादा आहेत. यातली कोणतीही पद्धत यशाची हमी देत नाही. तांत्रिक विश्लेषक त्यांचा वापर करून आपलं व्यापार घोरण ठरवतात. असं करणं आणि त्यावर त्वरित निर्णय घेऊन तो अमलात आणणं हे अतिशय कौशल्याचं काम आहे. अनेकजण सर्वत्र उपलब्ध असलेल्या सारख्या माहितीस स्वतःचं  ज्ञान आणि अनुभव यांची जोड देऊन निर्णय घेत असल्यामुळे त्यांचे निष्कर्ष वेगवेगळे असू शकतात. जास्तीत जास्त एकसमान निर्णय असतील, त्या दिशेला बाजाराचा कल झुकतो. तो ओळखण्यात अधिकाधिक अचूकता आली तरच गुंतवणूक यशस्वी होऊ शकते.

©उदय पिंगळे

अर्थ अभ्यासक

(लेखक मुंबई ग्राहक पंचायत या स्वयंसेवी संस्थेचे क्रियाशील कार्यकर्ते असून संस्थेच्या मध्यवर्ती कार्यकारणीचे सदस्य आहेत याशिवाय महारेराच्या सामंजस्य मंचावर मानद सलोखाकार म्हणून कार्यरत आहेत लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत)

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.