त्या छोट्याश्या गावातील टुमदार चर्चमध्ये ‘फादर’ म्हणून नुकताच रुजू झालेला राजबिंड्या व्यक्तीमत्त्वाचा ‘तो’ वयाने तसा तरुणच होता. दोन तीन रविवार गेले असती नसतील…प्रार्थनेसाठी नियमाने येणा-या एका शालीन, सुस्वरुप, लाघवी तरुणीने त्याचे लक्ष वेधून घेतले होते. का कोण जाणे, तिला एकदा तरी भेटावे अशी तीव्र इच्छा त्याला होवू लागली होती. एखादवेळी त्याने तसा प्रयत्न करुनही पाहिला, पण प्रार्थनेच्या अगदी वेळेवर चर्चमध्ये येणारी ‘ती’ नंतर मात्र लगेचच निघून जाई. ती चर्चची सभासद नसून कोणाकडेतरी काहीशा कारणाने थोड्याच दिवसांकरता आली आहे हे ही त्याला कळले होते.
तो आठवड्यातील एक शांत दिवस होता. काही महत्वाच्या कामासाठी शेजारील शहरात जाणे आवश्यक असल्याने फादर चर्च बाहेरच बसची वाट पहात उभे होते. अकस्मात ती प्रकटली. तशीच, नेहमीसारखी सुंदर, सुहास्यवदना, प्रसन्न. तिलाही कुठेतरी जायचे होते बहुधा. दोघांनीही एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केले.
थोडा वेळ गेला आणि अचानक पावसाची रिमझिम सुरु झाली. तिने चटकन आपल्याजवळची छत्री उघडली. फादर मात्र छत्रीविनाच आले होते. काही क्षण तसेच गेले. त्या तरुणीशी जवळीक, संवाद साधण्याची ही संधी. तारुण्य सुलभ भावना आणि ‘फादरहूड’ यांत ही संधी साधावी की नाही अशी घालमेल चालू झाली होती. तिच्या जवळ असलेल्या छत्रीचा फायदा घेवून, थोडे जवळ सरकून तिच्याशी काही बोलणार तोच तिने आपल्या स्नेहार्द्र आवाजात विचारले-
“Father.. Do you remember the first part of Ephesians 5:16??”
फादर गडबडले. त्यांना वेळेवर काही आठवेना. मात्र आपली अशी सलगी न आवडल्यानेच तिने आपल्याला हे ‘संतवचन’ विचारले असावे अशी खात्री होवून ते तात्काळ भानावर आले अणि वेगाने मागे सरकले. नेमकी पुढच्याच काही क्षणांतच तिला हवी असलेली बस आली अणि ती निघूनही गेली.
या अनपेक्षित प्रसंगाने अस्वस्थ झालेले फादर आपला मूळ बेत बदलून बसस्टॉपवरुन परत चर्च मध्ये केवळ त्या वचनाचा अर्थ पहाण्याकरता आले . ताबडतोब त्यांनी New Testament चे पुस्तक काढले आणि त्यांना तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले-
Ephesians 5:16 – Make the most of every opportunity..!!!
दुर्दैवाने आता त्यांना फक्त तिच्या विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच मिळणार होते, ती नव्हे! यानंतर फादरना ती परत कधीही दिसली नाही.
आपलेही असेच होते. अनेकदा बाजार आकर्षक असतो. एवढेच नव्हे तर आपल्याला खुणावत असतो, सुचवत असतो. मात्र त्याच्याशी जवळीक साधण्याच्या एकापेक्षा एक सुंदर संधी आपल्या मनातील व्दिधा, शंका-कुशंका आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळे तशाच सुटून जातात. असे होऊ देऊ नका.
(चित्र सौजन्य- https://static-news.moneycontrol.com/static-mcnews/2017/09/Stocks_BSE_Nifty_Asian_Markets_Wall_street_Sensex1-770×433.jpg )