आजकाल अनेक ठिकाणी तुम्हाला KYC(Know your Customer) चा फॉर्म भरुन द्यावा लागतो. मग तुमचे बॅंक खाते असो वा विमा पॉलिसी. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (MCA) कडून नुकत्याच जाहिर करण्यात आलेल्या सुचनेनुसार उद्योगजगतात KYC चा एक नवीन फॉर्म दाखल करण्यात आला आहे. सदर फॉर्म हा सर्व नोंदणीकृत (रजिस्टर्ड ) कंपनीच्या सर्व संचालकांनी (डायरेक्टर्स) भरुन द्यायचा आहे.
या सुचनेनुसार, भारतातील सर्व नोंदणीकृत कंपनीच्या संचालकांना (डायरेक्टर्स) व एल.एल.पी. भागीदारांना (LLP Partners) के.वाय.सी. प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. दि. ३१ मार्च २०१८ व त्यापूर्वी ज्या व्यक्तींना डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर (DIN) मिळालेला आहे आणि ज्यांच्या ह्या नंबरची नोंद अप्रूव्ड अशी आहे, अश्या प्रत्येक सद्य (करंट) व अपात्र (डिस्कॉलिफाईड) संचालकाला ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यासाठी DIR-3 KYC हा फॉर्म भरावा लागणार आहे.
-
DIR-3 KYC हा फॉर्म भारतातील सर्व नोंदणीकृत ( रजिस्टर्ड ) कंपन्यांच्या प्रत्येक संचालकाने ३१ मार्च २०१८ पूर्वी भरुन देणं आवश्यक होतं. परंतु चालू आर्थिक वर्षासाठी सदर फॉर्म भरुन देण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
-
हा फॉर्म कंपनीच्या प्रत्येक संचालकाने स्वतःच्या ई-मेल आयडी व मोबाईल नंबर सह (सदर ई-मेल व मोबाईल नंबर हा OTP द्वारे व्हेरिफाईड केलेला असावा) भरुन देणे आवश्यक आहे. प्रत्येक संचालकासाठीचा ई-मेल आयडी व मोबाईल नंबर युनिक असणं गरजेचं आहे.
-
असा सही केलेला फॉर्म कंपनी सेक्रेटरी (CS), चार्टर्ड अकाऊटंट (CA), अथवा कॉस्ट ॲंड मॅनेजमेंट अकाऊंटंट (CMA) कडून प्रमाणित करुन घेणं बंधनकारक आहे.
-
के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुमचा डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर ‘DIR-3 के.वाय.सी. दाखल केले नाही’ ह्या कारणांतर्गत रद्द होईल आणि दंडाची ५००० ही रक्कम भरून के.वाय.सी. पूर्ण केल्याशिवाय तो पुन्हा सक्रीय होणार नाही.
के.वाय.सी. कागदपत्रं-
१. पॅन कार्ड
२.मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
3. (गेल्या २ महिन्यातील) बँक स्टेटमेंट किंवा वीजबिल किंवा टेलिफोन बिल किंवा मोबाईल बिल
४. पासपोर्ट साईजचे फोटो
५. संचालकाची डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट(डी.एस.सी.)
अर्थसाक्षर.कॉम सर्व कंपनी संचालक आणि एल.एल.पी. भागीदारांना लवकरात लवकर ३१ ऑगस्ट २०१८च्या आत आपली के.वाय.सी. प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करत आहे.