-
म्युच्युअल फंडाची चांगली योजना कशी निवडायची हे आपण बऱ्याच वेळा त्या योजनेचा पूर्वीचा इतिहास पाहून ठरवतो परंतु ती योजना पुढेही चांगलाच परतावा देईल हे खात्री पूर्वक नाही सांगू शकत. अशा परिस्थितीत काही वेळा आपण त्याची दृढता किंवा सातत्य पाहतो तसेच बाजाराच्या चढ उताराच्या काळात फंड व्यवस्थापकाने कसा परतावा दिला आहे ते पाहतो.
-
त्याच बरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, फंड व्यवस्थापकाची गुंतवणूक करण्याची पद्धत. आज आपण जाणून घेऊया फंड व्यवस्थपनेच्या पद्धती विषयी. भारतात प्रामुख्याने वृद्धी आधारित पद्धत (ग्रोथ स्टाईल ) किंवा मूल्य आधारित पद्धत (व्हॅल्यू स्टाईल) ने फंड व्यवस्थापन होते.
-
वृद्धी आधारित पद्धतीमध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्यांवर लक्ष ठेवतात ज्यांचे एका समभागा मागे उत्पन्न हे त्या क्षेत्रा मधील कंपन्यांच्या सरासरी उत्पन्ना पेक्षा जास्त आहे.
-
भांडवली बाजारामध्ये मध्ये एक संदर्भ वापरला जातो, EPS. म्हणजेच ( अर्निंग पर शेयर ) गुणांक. कंपनीचा एका समभागा मागील उत्पन्नाचा गुणांक. वृद्धी आधारित पद्धतीमध्ये योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये अशा कंपन्या असतात ज्यांचा EPS हा सरासरी EPS पेक्षा जास्त असतो. वृद्धी आधारित पध्धतीतील कंपन्यांची वाढ ही बेंचमार्क कंपन्यांपेक्षा जास्त जोमाने होते. मात्र भांडवली बाजारातील उताराच्या काळात हे समभाग तितकेच जोमाने खाली येतात.
-
फंड व्यवस्थापनेची दुसरी पद्धत म्हणजे मूल्य आधारित (व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट). मूल्य आधारित पद्धतीच्या योजनेच्या पोर्टफोलिओ मध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्या निवडतो ज्यांचा समभागांचा भाव हा आज जरी खाली दिसत असला तरी येणाऱ्या काळात जोमाने वाढू शकतात.
अशा कंपन्यांची निवड करण्यासाठी फंड व्यवस्थापक प्रामुख्याने ३ घटक पाहतात.
१) ह्या पद्धती मध्ये फंड व्यवस्थापक अशा कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो ज्यांचा P /E Ratio(प्राईस टू अर्निंग ) गुणांक हा त्या क्षेत्रामधील सरासरी गुणांकापेक्षा कमी आहे. P/E मोजण्यासाठी कंपनीच्या प्रत्येक समभागामागील उत्पन्न व कंपनीच्या एकूण समभागांचे गुणोत्तर होय. हे गुणोत्तर जेवढे कमी तेवढे त्या कंपनीच्या वाढीची क्षमता जास्त.
२) त्याच प्रमाणे P/B Ratio (शेयर प्राईस टू बुक व्हॅल्यू ) गुणोत्तर ही पहिले जाते. P/B मोजणे म्हणजे कंपनीच्या प्रत्येक समभागामागील उत्पन्न व कंपनीची एकूण निव्वळ मालमत्ता ह्याचे गुणोत्तर होय. हा गुणांक जेवढा कमी तेवढे मूल्य आधारित गुंतवणुकीला वाढीची शक्यता जास्त.
३) आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे (Dividend yield डिव्हीडंड यील्ड) म्हणजेच जी कंपनी वरचेवर लाभांश देते त्याच्या समभागांची किंमत नेहमीच खाली राहते अशा कंपनी मध्ये वाढीची शक्यता जास्त असते.
-
फंड व्यवस्थापक फक्त हे गुणांक बघून गुंतवणूक करत नाहीत, तर आणखी बऱ्याच गोष्टी चा अभ्यास करून योजनेचा पोर्टफोलिओ बनवतात.
-
फंड व्यवस्थापकांना मदत करण्यासाठी जे समभाग संशोधन विश्लेषक (रिसर्च अनॅलिस्ट) असतात ते अभ्यासपूर्वक अशा कंपन्या शोधून काढतात. काही वेळा विश्लेषक हे प्रत्यक्ष कंपनी प्लांट किंवा फॅक्टरी मध्ये जाऊन तसेच कंपनीच्या व्यवस्थापकांना वरचेवर भेटून कंपनीचा अभ्यास करतात.
-
भांडवलीबाजार जेव्हा वरच्या पातळीवर असतो व तो खाली येण्याची शक्यता असते किंवा बाजार अस्थिर असतो अशावेळी दीर्घ मुदतीसाठी मूल्य आधारित (व्हॅल्यू स्टाईल) फंडामध्ये गुंतवणूक करणे हिताचे असते. कारण मूल्य आधारित पोर्टफोलिओवर बाजाराच्या अस्थिरतेचा तितका प्रभाव पडत नाही.
-
ज्या गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची क्षमता कमी असते, मात्र जास्त परतावा मिळण्याच्या दृष्टीने इक्विटी फंडामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी असते अशा गुंतवणूक दारांसाठी मूल्य आधारित फंड योग्य पर्याय ठरतो. मात्र मूल्य आधारित फंडाकडून जास्त परतावा मिळण्या साठी आपल्याला जास्त कालावधी साठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
-
अल्प कालावधी मध्ये वृद्धी आधारित फंड आणि मूल्य आधारित फंड ह्यांच्या कामगिरीची तुलना करणे योग्य नाही मात्र दीर्घावधीमध्ये म्हणजे साधारण ५ वर्ष किंवा अधिक काळात आपण ह्या दोन्ही प्रकारच्या फंडाची तुलना करू शकतो.
-
सध्याची भांडवली बाजाराची स्थिती पहिली तर लक्षात येते की बाजार हा अजूनही वरच्या पातळीवर आहे आणि साधारण एक वर्ष नंतर येणाऱ्या निवडणुकांकडे पाहिल्यास, निवडणूक आटोपेपर्यंत बाजार असाच अस्थिर राहील. अशा परिस्थितीत भांडवली बाजारातून जास्त परतावा मिळण्यासाठी मूल्य आधारित (व्हॅल्यू ) फंडामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक केली पाहिजे.
-
अमेरिकेतील सुप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे हे सुद्धा व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धती अवलंबतात. त्यांनी व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धतीने स्वतः साठी तसेच त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगली धनवृद्धी केली आहे.
-
त्यांच्या मते दीर्घावधीसाठी म्हणजेच १५/२० वर्षे किंवा त्याहून जास्त काळा करिता व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट केल्यास आपणास चांगली धनवृद्धी होते. आपल्याकडे मात्र आपण ३-४ वर्ष गुंतवणुकीला दीर्घावधी समझतो व आपण संयम दाखवत नाही. आपणही फार दीर्घावधीसाठी गुणवणूक केल्यास आपल्याला चांगली धनवृद्धी करता येईल .वृद्धी पद्धतीतील ( ग्रोथ ) फंड आणि मूल्य आधारित पद्धतीतील (व्हॅल्यू ) फंड हे ससा व कासवाच्या शर्यती प्रमाणे असतात मात्र ह्या स्पर्धेत दीर्घावधी मध्ये मूल्य आधारित पद्धतीतील (व्हॅल्यू ) फंड जिंकतात.
येणाऱ्या ८/१० वर्ष मध्ये आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था हि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा अभ्यास आहे. अशावेळी सामान्य गुंतवणूकदारांनी भारताच्या विकासावर विश्वास ठेवून १०/१५ वर्षाच्या काळाकरिता दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आर्थिक समृद्धता येईल.
लेखक : निलेश तावडे ,
९३२४५४३८३२
लेखक हे म्युच्युअल फंड क्षेत्रात २० वर्षे कार्यरत होते, आता आर्थिक सल्लागार आहेत.
(चित्रसौजन्य- https://bit.ly/2NKchdM )
(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx )
(अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 820 880 7919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ नावाने सेव्ह करून त्यावर ‘अपडेट’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)