Reading Time: 4 minutes
कोरोना: आर्थिक सहभागीत्व वाढेल, ते गुंतवणुकीच्याच मार्गाने
भारतीय अर्थव्यवस्था परस्परविरोधी अशा अनेक गोष्टींचाअनुभव घेत आहे. कोरोना संकटाचा संभ्रम अजून संपला नसताना या गोष्टींकडे आधी जागरूक भारतीय नागरिक म्हणून आणि नंतर एक गुंतवणूकदार म्हणून उघड्या डोळ्यांनी पाहण्याची गरज आहे.
कोरोना आणि भारतीय अर्थव्यवस्था:
- कोरोना साथीसोबत आपल्याला दीर्घकाळ जगावे लागणार आहे, हे आता अगदी स्पष्ट झाले आहे.
- हे संकट किती लांबेल, याची कोणालाच कल्पना नसल्याने त्याविषयीचे दिवसागणिक वेगवेगळे अंदाज तज्ज्ञांकडून दिले गेले. पण ते सर्व फोल ठरले.
- दोष कोणाचाच नाही, पण त्याचे जनजीवनावर अतिशय विपरीत परिणाम होत असल्याने कोणाला तरी जबाबदार धरून त्यावर राग व्यक्त करणे, ही समाजाची मानसिक गरज आहे. ती सध्या वेगवेगळ्या व्यासपीठांवर भागविली जाते आहे.
- हा मुद्दा बाजूला ठेवला तर आता भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थितीची अतिशय गांभीर्याने चर्चा करावी लागणार आहे. कारण आता आपल्यातील काही समुहाचे आर्थिक प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करू लागले आहेत.
- जगाच्या तुलनेत गेली अनेक दशके अतिशय स्थैर्य उपभोगणाऱ्या भारतीय समाजाला कोरोनाने मोठाच धक्का दिला आहे.
- मनुष्यहानी आणि मानसिक हानी भरून काढणे शक्य नसते, पण जीवनक्रम सुरु ठेवण्याचे काम अर्थचक्र करू शकते. ते चक्र लवकरात लवकर सुरु व्हावे आणि त्या चक्रात आपल्या वाट्याला बरे दिवस यावेत, असे प्रत्येकाला वाटणे अगदी साहजिक आहे.
अर्थव्यवस्था: निर्मला सीतारमन यांची काही सूचक विधाने
- या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची अर्थव्यवस्थेविषयीची काही सूचक विधाने गेल्या काही दिवसांत प्रसिद्ध झाली आहेत.
- हे संकट ‘ॲक्ट ऑफ गॉड’ आहे म्हणजे देवाची करणी आहे, असे काही त्यांनी म्हटले आहे.
- आजच्या अत्याधुनिक जगाला हे संकट कोठून आले आणि कसे जाणार, याचा नऊ महिने थांगपत्ता लागत नसताना ही देवाची करणी (नियती) आहे, असे म्हणण्यास वाव आहे.
- कोरोना संकटामुळे जे आर्थिक प्रश्न निर्माण होत आहेत, त्यांना तोंड देताना सर्वव्यापी दृष्टीने पाहण्याची गरज आहे, असे त्यांचे दुसरे एक विधान आहे.
- ही सर्वव्यापी दृष्टी म्हणजे त्याकडे पारंपरिक अर्थशास्त्राच्या पद्धतीने पाहता येणार नाही, असे त्यांना म्हणायचे आहे. अर्थव्यवस्था किती वेगाने घौडदौड करते आहे, यापेक्षा अधिकाधिक नागरिकांना काहीही करून जगण्याची संधी देणे, ही आजची गरज आहे. ती भागविण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सहभागीत्व आणि संपत्ती वितरणाचे काही धाडसी निर्णय घेण्याची वेळ सरकारवर येवू शकते, याचे हे सुतोवाच असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. कारण लोकशाहीमध्ये तेच अपेक्षित आहे.
अर्थव्यवस्थेची केवळ घौडदौड नको आहे !
- गेले नऊ महिने जे घडते आहे, तसे पूर्वी कधीही घडले नव्हते आणि त्याला सामोरे जाताना पूर्वी घडविले नव्हते, असेच काहीतरी करावे लागणार आहे.
- शेतकऱ्यांना दिली जात असलेली थेट आर्थिक मदत, स्वस्त धान्य दुकानातून ८१ कोटी नागरिकांना दिले जात असलेले धान्य, महिलांना जन धन खात्याच्या माध्यमातून केली जात असलेली मदत, गरजू कुटुंबाना मोफत देण्यात आलेले सिलेंडर, हे असे काही मार्ग आहेत.
- युरोपामध्ये निदर्शने होत असताना भारतीय समाज शांत वाटतो आहे, त्याचे कारण त्याचे व्यक्तीमत्व जसे आहे, तसेच या उपाययोजना आहेत.
- अशा मार्गाने पारंपारिक अर्थाने थेट विकासाला हातभार लावला जात नसला तरी ती आजची सर्वात महत्वाची गरज आहे.
- उलट पुढील काळात ही मदत आणखी वाढविण्याची वेळ येणार आहे. याची जाणीव अर्थमंत्र्यांना असलेच. त्यामुळेच आणखी काही पॅकेज देण्याची वेळ आली, तर सरकार त्यासाठी तयार आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.
- अर्थव्यवस्थेची पारंपरिक अर्थाने घौडदौड झाली नाही तरी चालेल, पण माणसे जगविली पाहिजेत, असाच विचार केवळ भारतच नव्हे तर जगालाही करावा लागणार आहे, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
पण शेअर बाजार का वाढतो आहे?
- अशी ही चिंता एकीकडे व्यक्त केली जात असताना भारताच्या शेअर बाजारात काही वेगळेच चालले आहे.
- ते म्हणजेच नजीकच्या भविष्यकाळात अर्थव्यवस्था कशी असेल, ती कधी वेग घेईल, याविषयीचे आडाखे बांधण्याची संधी सध्याची स्थिती देत नसतानाही शेअर बाजार मात्र उधळला आहे.
- कोरोना संकटाचे गांभीर्य लक्षात आले तेव्हा तो कोसळला होता आणि तेथपासून म्हणजे तीन चार महिन्यात त्याने ५० टक्के उसळी मारली आहे.
- काही व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरु झाल्यामुळे वाढत गेलेल्या आशा त्याला कारणीभूत असाव्यात.
- किंवा भारतीय अर्थचक्र लवकर वेग घेईल, असे गुंतवणूकदारांना वाटत असावे.
- किंवा भारताच्या ग्रोथ स्टोरीवर देशी आणि विदेशी गुंतवणूकदारांना विश्वास असावा.
- किंवा काही नागरिकांकडे गुंतवणूक करण्यासाठीचा पैसा पडून असावा.
- किंवा याकाळात घरात बसल्याबसल्या पैसा मिळत असेल तर त्यात का भाग घेऊ नये, असे वाटल्याने गुंतवणूकदारांची वाढलेली संख्या, हेही त्याचे कारण असू शकेल.
- अर्थात, त्याचे एकच विशिष्ट असे काही कारण नाही. या सर्व कारणांचा थोडा थोडा वाटा असल्याने भारतीय शेअर बाजार, अशा आव्हानात्मक आर्थिक स्थितीतही वाढतो आहे, ही वस्तुस्थिती आहे.
- शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे अधिकाधिक नागरिकांचे लक्ष यानिमित्ताने गेले, हे चांगलेच झाले.
- या गुंतवणुकीचा फायदा आपल्या देशातील मोजके गुंतवणूकदार आतापर्यत घेत होते. पण आता लाखो नव्या गुंतवणूकदारांनाही त्यात भाग घेता येईल.
परतावा उत्तम, पण सावधान !
- विकासाच्या मागे लागलेल्या जगाच्या महागाईत वाढ होणे, हे अपरिहार्य मानले जाते. त्यामुळे त्या महागाईवर मात करणारी गुंतवणूक असली पाहिजे.
- बँकेतील एफडी किंवा पारंपरिक जीवनविमा अशा महागाईवर मात करू शकत नाही.
- महागाईवर मात करणारी गुंतवणूक म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूक हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे.
- अर्थात, या गुंतवणुकीत कायमच मोठी जोखीम राहिली आहे. कारण शेअर बाजारात सतत चढउतार चालू असतात आणि त्याचा फायदा बहुतांश ट्रेडिंग करणारी मंडळीच घेत असते.
- पण जे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजे चांगले शेअर घेऊन शांत बसणे, असा मार्ग अवलंबतात, त्यांनाही शेअर बाजाराने चांगला परतावा दिला आहे.
- सोबतच्या चौकटीवरून त्याची कल्पना यावी. हे आकडे तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. त्याने हुरळून जावून शेअर बाजारात आपणही गुंतवणूक करावी, असे अनेकांना वाटून जावू शकते. पण अभ्यास न करता तसे केले तर आहे ते मुद्दल घालवून बसण्याची वेळ येवू शकते, असा इशाराही देऊन ठेवला पाहिजे.
अबब, केवढा हा परतावा !
|
अशा संकटसमयी गुंतवणूक कामी येई
- ज्यांना शेअर बाजारातील परताव्याचा फायदा घ्यायचा आहे, त्यांनी मोजके म्युच्युअल फंड निवडून त्यात दर महिन्याला विशिष्ट रक्कम (एसआयपी) गुंतविण्यास सुरवात केली पाहिजे.
- शेअर बाजारातील चढउतारांची जेव्हा सवय होईल, तेव्हाच डीमॅट खाते उघडून थेट शेअर घेण्यास हरकत नाही.
- शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची ही शिफारस नव्हे. मात्र गुंतवणुकीच्या इतर सर्व मार्गाने असा परतावा मिळत नाही, म्हणून या गुंतवणुकीकडे आपले लक्ष असले पाहिजे, हे लक्षात आणून देण्यासाठी हे प्रयोजन.
- अशा चढउतारांवर मात करून कोरोना संकटातही जे गुंतवणूकदार शेअर बाजारात टिकून होते, त्यांनी गेल्या तीन महिन्यात चांगला पैसा मिळविला आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातही ते जवळ चांगले पैसा बाळगून आहेत.
- अशा आर्थिक संकटात गुंतवणूक कामाला येते, म्हणून हातात पडत असलेल्या उत्पन्नातून किमान १० टक्के तरी गुंतवणूक केली पाहिजे. असे केल्यानेच आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि अशा संकटकालीन आर्थिक चिंता कमी करता येतात.
– यमाजी मालकर
For suggestions queries – Contact us: [email protected]
Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE
Download Arthasakshar App – CLICK HERE
Read – Disclaimer policies
Share this article on :