Reading Time: 2 minutes
आज सोनियाचा दिनु…….!!!
आज धनत्रयोदशी! सर्वांच्या आवडत्या सणाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आयुर्वेदामध्ये आजच्या दिवसाचं विशेष महत्व आहे. आज आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचं पूजन केले जाते. तर धर्मशास्त्रानुसार आजच्या दिवशी सुवर्ण म्हणजेच सोन्याची खरेदी करणे शुभ समजले जाते. माणसाच्या आयुष्यात आरोग्याची किमंत सुवर्णमूल्यापेक्षा जास्त आहे. आजच्या दिवसाचं महत्व लक्षात घेता, आजच्या दिवशी धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांचे सूर परस्परांशी जुळूनयेतात. पण या सुवर्ण खरेदीचे सूर अर्थशास्त्राशी जुळतात का? हा मुद्दाही तेवढाच महत्वाचा आणि विचार करण्याजोगा आहे.
सोने खरेदी आणि भारतीय अर्थव्यवस्था:
- भारत देश एकूण वापराच्या जवळपास ९९% सोनं आयात करतो. सोन्यावरील आयात शुल्क ४% वरून १०% पर्यंत गेले आहे. गेल्या काही वर्षातील सातत्याने वाढणारे सोन्याचे भाव देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरत आहेत आहेत. ऑक्टोबर २०१४ रोजी सोन्याचा दर २७३८४/- रुपये (प्रति १० ग्रॅम) होता तर चालू वर्षात म्हणजेच ऑक्टोबर २०१८मध्ये हाच भाव वाढून ३१९१५/- रुपये झाला आहे.
- २००१ मध्ये, सोन्याचे एकूण उत्पादन ३७६४ टन होते आणि भारताने ४६२ टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या १२.२७% सोने आयात केले होते. तर २०१२ मध्ये एकूण उत्पादन ४१३० टन होते व भारताने १०७९ टन म्हणजेच एकूण उत्पन्नाच्या २६.१२% होते. सध्या भारत देश एकूण उत्पन्नाच्या ३०% सोने आयात करतो.
- यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पर्यायाने देशाच्या GDP वर होत आहे. तसेच आपल्या देशातील ‘कॅश’ दुसऱ्या देशात जाऊन त्याचा परिणाम थेट भारतातील चालू खात्यातील तूटीवर (Current Account Deficit) होत असतो. अर्थशास्त्रातील नियमानुसार, करंट अकाउंट डेफिसिट (CAD) जास्त असेल तर ते संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकअसते.
- सोन्याचे सांस्कृतिक महत्त्व हे फक्त देशातील ग्रामीण जनतेपुरतेच मर्यादित नाही. अनेक उच्चशिक्षित लोक तसेच राजकारणीही सोन्याच्या खरेदीला अनन्यसाधारण महत्व देताना दिसत आहेत. त्यात रिअल इस्टेट आणि भांडवली बाजारपेठे (Capital Market) यावर झालेला मंदीचा परिणाम लक्षात घेता अनेकजण सोन्यामधील गुंतवणुकीचा पर्याय निवडतआहेत. सोन्याची मागणी नेहमीच वाढत असते आणि गेल्या चार वर्षांमध्ये सुवर्ण गुंतवणूक कितीतरी पटीने वाढली आहे.याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.
- ‘युपीए’ सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारतीय ग्राहकांना सोन्याची खरेदी करण्याचे मोह टाळण्याविषयी आवाहन केले होते. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात सकारात्मक परिणामही झाला होता. सध्याचे ‘एनडीए’ सरकारही करंट अकाउंट डेफिसिट (CAD) नियंत्रणात आणण्यामध्ये काही प्रमाणात यशस्वी झाले आहे तरीही वाढत चाललेली सुवर्ण गुंतवणूक, तेलाचे भाव आणि इतर काही गोष्टी, यामुळे हे प्रमाण पुरेसे आहे का नाही? याबाबत मात्र अर्थतज्ञ साशंक आहेत.
- विकसनशील देशाचा जास्त पैसा हा औद्योगिक उत्पन्नाच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आयात करण्यासाठी वापरला गेला पाहिजे. कारण औद्योगिक क्षेत्राच्या वाढीवर देशाची प्रगती व अर्थव्यवस्था अवलंबून असते. तसेच औद्योगिक जगताकडून देशाला काही प्रमाणात परतावाही मिळत असतो. याउलट सुवर्ण गुंतवणूक एकतर बँक लॉकरमध्ये साठविली जाते किंवा दागदागिने बनविण्यासाठी एक्सचेंज केली जाते.
सोने खरेदी आणि गुंतवणूक:
- गुंतवणुकीचे विविध पर्याय उलब्ध असूनही नागरिकांचा कल सुवर्ण गुंतवणुकीकडे वाढत चालला आहे. खरंतर या गुंतवणुकीमध्ये जोखीम तर असतेच शिवाय विक्रीमूल्यही तुलनेने कमी मिळते.
- इतर गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती नसणे, त्याबद्दलचे समज- गैरसमज यासारख्या अनेक कारणांमुळे सोने खरेदी/गुंतवणुकीकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
- डिजिटल खरेदीचा पर्यायही प्रत्येकासाठी सोयीचा असेलच असं नाही. तसंच डिजिटल खरेदी ग्राहकांची विश्वासअर्हता आणि पसंती मिळविण्यात फारशी यशस्वी होताना दिसत नाहीये. या पर्यायाला ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
- सन २०१७ मध्ये आलेल्या नोटबंदीचा सोने खरेदीवर काही प्रमाणात परिणाम झाला होता. यावर्षी मंदीमुळे म्हणा किंवा सोन्याच्या भाववाढीमुळे सोन्याच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता सोनारांकडून वर्तविण्यात येत असली तरीही एकूणच सणवार आणि सोने खरेदीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व लक्षात घेता सोने खरेदीवर फारसा परिणाम होण्याची शक्यता तुलनेने कमी आहे.
- तेव्हा या धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याआधी गुंतवणुकीच्याइतर पर्यायांचाही जरूर विचार करा.
टीम अर्थसाक्षरतर्फे सर्वांना शुभ दीपावली
(चित्रसौजन्य: https://bit.ly/2QkHWzC )
Share this article on :