क्रेडिट कार्ड वापरताना या ६ चुका कटाक्षाने टाळा

Reading Time: 3 minutes

प्रत्येकवेळी रोख रकमेची जोखीम बाळगण्यापेक्षा खिशात क्रेडिट कार्ड बाळगणे सोयीचे ठरते. सध्या क्रेडिट कार्डचा वापर वाढत चालला आहे. मागील २ वर्षात भारतात क्रेडिट कार्ड  वापरात कमालीची वाढ झाली आहे.ऑगस्ट २०१८ पर्यंत भारतात क्रेडिट कार्ड धारकांची संख्या सुमारे ४ कोटी एवढी होती. ज्यांनी नव्याने क्रेडिट कार्डचा वापर सुरु केला आहे त्यांच्याकडून मात्र काही चुका होऊ शकतात. क्रेडिट कार्डच्या साहाय्याने व्यवहार करताना अगदी डोळसपणे काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. ज्यामुळे व्यवहारात पारदर्शकता व सुरक्षितता राखण्यात येईल. तसेच होणारी फसवणूक किंवा आर्थिक नुकसानही टाळता येईल. 

क्रेडिट कार्ड कॅशबॅक एक भुलभुलैया

क्रेडिट कार्डचा वापर करताना पुढील काही चुका कटाक्षाने टाळायला हव्यात 

१. क्रेडिट कार्डच्या सुरक्षेबाबतचा निष्काळजीपणा 

 • एटीएम कार्डप्रमाणे क्रेडिट कार्डही सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. कार्डाचा गैरवापर होऊ नये म्हणून ऑनलाईन किंवा इतर व्यवहार टाळण्यासाठी कार्डचा तपशील, पासवर्ड  याबाबत गुप्तता ठेवणे आवश्यक असते. 
 • काही फसव्या लोकांकडून  क्रेडिट कार्डचा कोड क्रमांक विचारण्याचे व त्याद्वारे खात्यातून परवानगीशिवाय व्यवहार करून फसवणुकीचे प्रकारही समोर आले आहेत. 
 • तुमच्या क्रेडीट कार्डचा सीव्हीव्ही कोड (कार्ड व्हेरीफिकेशन व्हॅल्यु) किंवा कार्ड सेक्युरीटी कोड (सीएसस) क्रमांक कुणालाही देऊ नये. 
 • क्रेडिट कार्डबाबत कोणतीही माहिती कुठल्याही बँकेकडून फोनवरून विचारण्यात येत नाही, बँकेकडून कुठलाही पिन नंबर फोनवरून विचारला जात नाही. म्हणून आपली आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी कार्डचा तपशील कोणालाही देऊ नका. 

क्रेडिट कार्ड आणि सिबिल (CIBIL) स्कोअर

२. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरणे 

 • आपण ज्या कंपनीचं क्रेडिट कार्ड वापरतो त्या कंपनीकडून पूर्वसूचना देण्यासाठी एसएमएस किंवा मेलद्वारे आपल्या बिलाची एकूण देय रक्कम भरण्याची अंतिम मुदत याबात पूर्ण माहिती देण्यात येते. कृपया या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. 
 • क्रेडिट कार्डच बिल वेळेवर न भरल्यास पुढील महिन्यात खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट फ्री क्रेडिट मिळत नाही.  
 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रेडिट स्कोअरवर याचा नकारात्मक परिणाम होतो व भविष्यात कुठल्याही कर्ज योजनेचा व इतर सोयींचा लाभ घेताना अडचण निर्माण होते. त्यामुळे शक्य असल्यास थकबाकी न ठेवता बिलाची संपूर्ण देय रक्कम वेळेतच भरणे फायद्याचे ठरते. 

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

३. क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त खर्च करणे 

 • क्रेडिट कार्ड उपयुक्त असले तरी खर्च नेमका किती करायचा हे आपणच ठरवायला हवं. मोठ्या किमतीच्या वस्तू एका स्वाईपद्वारे खरेदी करता येतात या गोष्टीचं आकर्षण खूप असतं. या ओघात आपण भरमसाठ खरेदी करत राहतो. 
 • काही अनावश्यक खर्च वेळीच टाळले पाहिजेत. क्रेडिट कार्ड वापरून व्यवहार करण्यावर काही मर्यादा असतात. अर्थात त्या मर्यादेपेक्षाही जास्त खर्च केला गेल्यास निश्चित तुम्हाला अतिरिक्त व्याजाचा  भुर्दंड बसतो.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो म्हणून क्रेडिट कार्ड वापरत असाल तर काही गोष्टींची दक्षता घ्या. 

क्रेडिट कार्डचं चुकवलेलं एक बिलही कमी करते तुमचा क्रेडिट स्कोअर!

४. क्रेडिट कार्डच्या बिल पूर्ण न भरता फक्त “मिनिमम ड्यू” रक्कम भरणे 

 • प्रत्येक महिन्यात बँकेकडून क्रेडिट कार्डच स्टेटमेंट पाठवण्यात येतं. अनेकजण हे स्टेटमेंट पूर्ण वाचण्याचे कष्ट देखील घेत नाहीत. 
 • यामध्ये किमान देय रक्कम म्हणजे ‘मिनिमम ड्यू’ आणि पूर्ण देय रक्कम म्हणजे टोटल आऊटस्टँडिंग याची व्यवस्थित नोंद केलेली असते. तरीही बरेचजण किमान देयची रक्कम भरून रिकामे होतात. 
 • किमान देय भरल्याने कार्ड पुढे सुरु राहते मात्र उर्वरित बिलाच्या रकमेवर अतिरिक्त २%ते ४% व्याज आकारण्यात येते. वर्षाकाठी हा व्याजदर २४%ते ४८%पर्यंत जातो. 
 • तुमच्या क्रेडिट कार्डवर काही थकबाकी असल्यास पुढील खरेदी करताना इंटरेस्ट फ्री कालावधी मिळत नाही म्हणून मासिक स्टेटमेंट नीट पाहायला हवं व शक्य असल्यास बिल भरताना संपूर्ण देय रक्कम भरावे. याचा फायदा क्रेडिट स्कोअर चांगला राहण्यासाठी होतो. 

५. क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढणे

 • एटीएम सेवा वापरून क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सोय सुद्धा उपलब्ध आहे पण त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त व्याज आणि व्यवहार शुल्कसुद्धा भरावे लागते. 
 • क्रेडिट कार्डमधून अल्प मुदतीच्या कर्जाप्रमाणे पैसे मिळवता येतात ज्याला ‘कॅश अ‍ॅडव्हान्स’ असंही म्हणतात. क्रेडिट कार्डमधून काढलेल्या रोख पैशावर २-४% व्याज आकारण्यात येते व ते व्याज ज्या क्षणी पैसे काढले त्या क्षणापासून चालू होते. 
 • काही व्यापारातील मोठी खरेदी करण्यासाठी वैगरे क्रेडिट कार्डमधून पैसे काढले तर व्याजदराच मीटर त्या क्षणापासून चालू होत. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान परकीय चलन बदल करून घेताना या सेवेचा वापर होऊ शकतो, मात्र त्यावर ही व्यवहार शुल्क लावले जाते. म्हणून शक्य होईल त्याठिकाणी रोख पैसे काढताना क्रेडिट कार्ड न वापरता डेबिट कार्ड च वापरावे. 

तुमचा क्रेडिट रिपोर्ट कितपत खरा आहे?

६. एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्डचा वापर करणे 

 • काही अडचणींमध्ये क्रेडिट कार्ड अतिशय उपयोगी पडते. परंतु एकाच व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणे धोकादायक ठरू शकते.
 •  क्रेडिट कार्ड असलं की बराच खर्च होतो आणि जास्त क्रेडिट कार्ड असतील तर खर्च ही जास्तच.
 • अशा परिस्थितीमध्ये क्रेडिट कार्डची बिल भरण्याची मासिक प्रक्रिया आणि देय भरण्याचे नियम न पाळले गेल्यास याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. त्यामुळे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरणे टाळावे. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *