क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

Reading Time: 3 minutes

क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे?

मागील लेखामध्ये आपण क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे समजून घेतले होते, या लेखामध्ये  क्रेडिट कार्ड योग्य पध्दतीने कसे वापरावे आणि क्रेडिट कार्ड वापरण्याचे तोटे याची माहिती घेऊया.

क्रेडिट कार्डचा वापर योग्य पध्दतीने कसे वापराल ?

 • कार्ड घेताना प्रत्येक नियम समजून घ्यावे:– क्रेडिट कार्ड घेताना आपण फॅार्म भरून देत असतो. पण बहुतांश वेळा आपण त्या फॅार्ममधील नियम वाचत नाही. त्या नियमांमध्ये कोणत्या गोष्टीसाठी किती शुल्क आकारले जाते याची माहिती मिळते. अनेक वेळा ऑफर्स मुळे आपण सहज क्रेडिट कार्ड घेतो व शुल्कांकडे दुर्लक्ष करतो. नुतनीकरणाची फी, वार्षिक शुल्क, देय उशीरा झाल्यावर द्यावा लागणारा दंड याची माहिती क्रेडिट कार्ड देणाऱ्या अधिकाऱ्याकडून समजून घ्यावी.
 • निश्चित मुदतीत पेमेंट करा:बँकेतर्फे निश्चित करण्यात आलेल्या तारखेपर्यंत पेमेंट करणे फायदेशीर ठरते. ठरलेल्या मुदतीत पेमेंट केल्याने अतिरिक्त शुल्क देखील भरावे लागत नाही व त्यामुळे क्रेडिट स्कोअर देखील चांगला होता. ज्याचा फायदा कर्ज घेताना होत असतो.

मागणी न करताच क्रेडिट कार्ड आले तर काय कराल?

 • व्यवहारांची नोंद ठेवा:–आपण क्रेडिट कार्डचा वापर करून अनेक व्यवहार करत असतो. या सर्व व्यवहारांची नोंद ठेवणे फायदेशीर ठरते व आपल्या अतिरिक्त खर्चावर देखील मर्यादा घालता येतात.
 • क्रेडिट कार्ड स्टेटमेंट बारकाईने वाचावे:– अनेक वेळा आपण स्टेटमेंटकडे पाहण्याची देखील तसदी घेत नाही. फक्त पेमेंट करण्याची रक्कम पाहून स्टेटमेंट ठेऊन देतो. या स्टेटमेंटमध्ये किमान देय रक्कम आणि पूर्ण देय रक्कम लिहिलेली असते. मात्र, किमान देय रक्कम  रक्कम सर्वात खाली लिहिलेली असल्याने अनेकजण फक्त तेवढीच रक्कम भरतात. त्यामुळे उर्वरित रक्कमेवर व्याज भरावे लागते. शक्य असल्यास पुर्ण पेमेंट करणे फायदेशीर ठरते. जेणेकरून, अतिरिक्त शुल्क भरण्याचे टळते.
 • क्रेडिट लिमिट ओलांडू नका:– बँकेकडून क्रेडिट कार्ड घेताना क्रेडिट लिमिट निश्चित करण्यात आलेली असते. त्या लिमिटपर्यंतच खर्च केल्यावर बँक त्यावर कोणतेही शुल्क आकारत नाही. मात्र जर लिमिट पेक्षाही अधिक खर्च केला तर त्यावर बँक निश्चित व्याजदर आकारते. त्यामुळे लिमिट पेक्षा अधिक खर्च करणे टाळावे.
 • रोख रक्कम कमीत कमी काढावी:– अडचणीच्या काळात आपण क्रेडिट कार्डचा वापर करून रोख रक्कम काढतो असतो; पण वारंवार क्रेडिट कार्डचा वापर करून रोख रक्कम काढणे तोट्याचे ठरते. बँक यावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारत असते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करून वारंवार रोख रक्कम काढणे टाळले पाहिजे.
 • अतिरिक्त खर्च टाळावा:– बँका अनेकवेळा आपला वापर बघून क्रेडिट लिमिट वाढवत असतात. क्रेडिट लिमिट वाढल्याने आपण देखील मोठ्या प्रमाणात खर्च करू लागतो. अशा वेळेस जर आपल्याला देय देणे शक्य झाले नाही तर कर्जात अडकण्याची शक्यता असते. तसेच, वेळेत पेमेंट केले नाही तर दंड आकारला जातो तो वेगळाच. जर तुम्हाला वाटत असेल की, तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहात, तर तुम्ही बँकेशी संपर्क साधून तुमची क्रेडिट लिमिट कमी करणे फायदेशी ठरते.

  कॅश – लेसकॅश ते कॅशलेस

क्रेडिट कार्डचे तोटे –

 • अनावश्यक खरेदीमध्ये वाढ:आपल्याकडे पैसे नसतानाही क्रेडिट कार्डमुळे आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करत असतो. अशा वेळेस आपल्याकडून मोठ्या प्रमाणात अनावश्यक खरेदी होते व त्यामुळे आपल्या खर्चात वाढ होते. क्रेडिट कार्ड वापरकर्त्याला त्याचा वापर व पेमेंट नियमित असेल तर क्रेडिट कार्डवरील लिमिट देखील वाढवली जाते. क्रेडिट कार्डवरील लिमिट वाढवल्यामुळे खर्च करण्याची प्रवृत्ती देखील वाढते.
 • छुपे खर्च:- सुरूवातीला क्रेडिट कार्ड हे वापरण्यास सरळ व सोपे वाटत असते. परंतु, क्रेडिट कार्डच्या वापरात अनेक छुपे खर्च लावण्यात आलेले असतात, ज्याची माहिती आपल्याला नसते.  क्रेडिट कार्डवर वेगवेगळ्या प्रकारचे कर व फी आकरली जात असते. जसे की, उशीर केलेले देय, क्रेडिट कार्ड घेतानाची फी, नुतनीकरणाची फी आणि प्रक्रिया शुल्क असे वेगवेगळे छुपे खर्च कार्डवर लावले जातात. निश्चित केलेल्या तारखेच्या आत देय असलेली रक्कम जमा केली नाही तर त्यावर दंड देखील आकारला जातो. जर वारंवार पेमेंट करायला उशीर झाला तर, निश्चित केलेली क्रेडिट लिमिट देखील कमी होते. तसेच आपला क्रेडिट स्कोअर देखील कमी होतो व भविष्यात कर्ज घेताना काही प्रमाणात अडचणी येतात.

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

 • जास्त व्याजदर:निश्चित केलेल्या तारखेपर्यंत पेमेंट केले नाही तर त्यावर मोठ्या प्रमाणात विलंब शुल्क आकारले जाते. हे व्याज दरमहा ३% म्हणजे वार्षिक ३६% एवढेसुद्धा असू शकते.
 • फसवणूक:– क्रेडिट कार्डच्या बाबतीत वारंवार ही गोष्ट होत नसली तरीही, अनेक वेळा आपण क्रेडिट कार्डच्या फसवणूकीला बळी पडू शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून, एखादी व्यक्ती आपली वैयक्तिक माहिती चोरू शकते व आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करून, त्यावर खरेदी देखील करू शकते. जर क्रेडिट कार्ड चोरीला गेले तर त्यावर एखादी व्यक्ती खरेदी करू शकते व जोपर्यंत आपण क्रेडिट कार्ड चोरीला अथवा हरवल्याची माहिती बँकेला देत नाही तोपर्यंत त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असते. त्यामुळे बँकेकडून आलेले दरमहा स्टेटमेंट वाचणे गरजेचे आहे. जर त्यामध्ये काही चुकीचे आढळले तर त्याची माहिती त्वरीत बँकेला द्यावी.

सावधान !! ऑनलाईन फ्रॉड कॉल…

Disclaimer:   https://arthasakshar.com/disclaimer/  

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Web Search: How to use Credit Card Marathi Mahiti

Leave a Reply

Your email address will not be published.